Thursday, February 5, 2026

वृत्त क्र. 177

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना   

नांदेड, दि. 5 फेब्रुवारी :- इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना सुरू झालेली आहे. 

वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता भोजन तसेच निवास व्यवस्था व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरीत करण्यात येते. इच्छुक विद्यार्थी व विद्यार्थीनीनी यांनी जिल्हयामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या बारावी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्यत्तुर अभ्यासक्रमास असणाऱ्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक प्रथम वर्षातील अभ्यासक्रमाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सन 2025-26 या वर्षांसाठी शासकीय वसतिगृह योजनेचे ऑनलाईन पध्दतीने सदर अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर 6 ते 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ विहित केलेल्या वेबसाईटमध्ये ऑनलाईन अर्ज भरावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र. 176

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार,

विश्वकर्मा पुरस्कार, क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड, दि. 5 फेब्रुवारी :- महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार सन 2025-26 वर्षाकरीता व्यक्ती आणि संस्था यांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक सचिन खुणे यांनी केले आहे.  

इतर मागास विकास विभागांतर्गत कार्यरत इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांच्यामार्फत पुढील शासन निर्णय व शुध्दीपत्रकांन्वये विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पुरस्कारांसाठी पात्र व इच्छुक व्यक्ती तसेच संबंधित समाजाच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था यांच्याकडुन रितसर प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.  

अर्जदार व्यक्ती/संस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील उत्थानासाठी सलग व उल्लेखनीय स्वरुपाचे कार्य केलेले असावे. अर्ज विहीत नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून शासन निर्णयातील नमुद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे, कार्याचा सविस्तर अहवाल, शिफारस पत्रे व अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अपुर्ण, चुकीची माहिती असलेले अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत.  

पुरस्काराबाबत अंतिम निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. पात्र व इच्छुक व्यक्ती व संस्थांनी शनिवार 21 फेब्रुवारी 2026 रोजी कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक सचिन खुणे यांनी केले.

00000

 वृत्त क्र. 175

अनुसूचित जमातीच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या 

आयोजनासाठी इच्छुक संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, दि. ५ फेब्रुवारी :- आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दाम्पत्यांसाठी आदिवासी क्षेत्रामध्ये कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. 

या योजनेअंतर्गत जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या सेवाभावी संस्थांना अर्थसहाय्य देण्यात येते.

त्याअनुषंगाने, सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी किमान १० नवदाम्पत्ये असणे आवश्यक आहे. सदर योजनेबाबत आदिवासी विकास विभागाच्या दिनांक १८ फेब्रुवारी २००९ च्या शासन शुद्धीपत्रकातील परिशिष्ट ‘ब’ मध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीप्रमाणे परिपूर्ण अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

इच्छुक सेवाभावी संस्थांनी आपले परिपूर्ण अर्ज व आवेदनपत्र प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट, जि. नांदेड येथील माहिती सुविधा केंद्रामध्ये सादर करावेत. अर्ज सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत स्वीकारले जातील.

अधिक माहितीसाठी संबंधित संस्थांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, किनवट येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

 वृत्त क्र. 174

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धा २०२६

नांदेड जिल्ह्यासाठी प्रेरणादायी निवासी प्रशिक्षण पर्व सगरोळी येथे संपन्न

नांदेड, दि. 5 फेब्रुवारी :- पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धा २०२६ अंतर्गत २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र (के.व्ही.के.), सगरोळी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मार्गदर्शन करताना शेतकरी हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. 

बदलत्या काळात शेतीमध्ये ज्ञानाधिष्ठित, तंत्रस्नेही व वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून उत्पादनवाढ, खर्च नियंत्रण व उत्पन्नवाढीचे नवे मार्ग शोधावेत, असे प्रेरणादायी आवाहन त्यांनी केले.

हा कार्यक्रम नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक व परिवर्तनकारी ठरला. प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शेतकऱ्यांना दिलेली सदिच्छा भेट शेतकऱ्यांसाठी विशेष प्रेरणास्त्रोत ठरली.

या निवासी प्रशिक्षणासाठी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील विविध गावांतून शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तीन दिवस चाललेल्या प्रशिक्षणात आधुनिक शेती तंत्रज्ञान, शाश्वत शेती पद्धती, गटशेती, मूल्यवर्धन, शेतीपूरक उद्योग, बाजारपेठ व्यवस्थापन तसेच शेतीतील नव्या संधी याबाबत सखोल व प्रात्यक्षिकाधारित मार्गदर्शन देण्यात आले. प्रशिक्षण काळात शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य, आत्मविश्वास आणि बदलाची सकारात्मक जाणीव स्पष्टपणे दिसून आली.

या कार्यक्रमास उपसंचालक आत्मा श्रीमती अर्चना गुंजकर, कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन प्रमोद देशमुख, पाणी फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य समन्वयक सत्यवान देशमुख, नांदेड विभागीय समन्वयक प्रविण काथवटे,श्री संदीप चव्हाण सर उमेद तालुका व्यवस्थापक कंधार तसेच अश्वमेध ग्रामीण पाणलोट क्षेत्र विकास व शैक्षणिक संस्था, कंधार येथील विविध विभागांचे अधिकारी, तज्ज्ञ मार्गदर्शक व मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची स्पष्ट दिशा, नव्या संधींची ओळख आणि शाश्वत शेतीचा मार्ग मिळाल्याचा अभिप्राय व्यक्त करण्यात आला. प्रशिक्षणार्थींनी तीन दिवसांच्या अनुभवांबाबत समाधान व्यक्त करत भविष्यात आपल्या शेतीत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला.

एकूणच फार्मर कप स्पर्धा २०२६ अंतर्गत आयोजित हा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरला असून शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम घडवणारे पाऊल ठरले आहे.

०००००




विशेष लेख, दि. 5 फेब्रुवारी 2026  

जलतारा पाणीदार नांदेडच्या दिशेने भक्कम पाऊल !

नांदेड जिल्हा पाणीदार होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी एक महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलले असून, जिल्हाभर ‘जलतारा’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील मोठा भाग कोरडवाहू असून अनेक शेतकरी वर्षातून केवळ एकच पीक घेतात. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून प्रत्येक शेतात जलसंधारण व्हावे, या उद्देशाने नांदेड जिल्ह्यात एक लाख जलतारे उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वतः पुढाकार घेतला असून, प्रत्येक तालुक्यातील गावांमध्ये प्रत्यक्ष जलतारा उभारणीच्या कामास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करताना जलताराचे महत्त्व, तांत्रिक बाबी आणि दीर्घकालीन फायदे समजावून सांगण्यात येत आहेत.

भूजलपातळी वाढीस चालना

या मोहिमेमुळे आगामी काळात नांदेड जिल्ह्यातील भूजलपातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. पावसाचे पाणी थेट जमिनीत मुरवून त्याचा प्रभावी वापर शक्य होणार असून, परिणामी शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच वर्षातून दोन पिके घेणे शक्य होणार आहे.

तंत्रज्ञानाची साथ मोबाईल ॲपद्वारे पारदर्शकता

‘जलतारा’ उपक्रम अधिक परिणामकारक, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. प्रत्येक कामाचे जिओ-फेन्सिंग, नोंदणी, छायाचित्रण आणि प्रत्यक्ष प्रगती निरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपचे उद्घाटन नुकतेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रणालीमुळे कामांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता वाढून दर्जेदार व वेळेत कामे पूर्ण होणार आहेत.

आतापर्यंतची प्रगती

या उपक्रमांतर्गत आत्तापर्यंत 34 हजार 434 जलतारांचे शेतकऱ्यांकडून प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यापैकी 28 हजार 814 इतक्या जलतारांना प्रशासकीय मान्यता सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांकडून कामाची मागणी होताच या कामांना सुरू करण्यात येणार आहे.

नांदेड जिल्ह्याची भौगोलिक पार्श्वभूमी

नांदेड हा महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या दृष्टीने दहावा सर्वात मोठा जिल्हा आहे. येथील बहुतांश नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. गोदावरी नदीच्या काठावर असतानाही जिल्ह्यातील अनेक शेतकरी अजूनही मोठ्या प्रमाणावर एकाच पिकावर अवलंबून आहेत.

हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्प

पावसाचे पाणी साठवून त्यातून वर्षातून दोन पिके घेण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत रुरल लाईव्हलीहूड फाऊंडेशन (BRLF), मनरेगा विभाग व जिल्हा प्रशासन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सहा तालुक्यांत तीन संस्थांच्या माध्यमातून हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत ई-पीआर, शिवारफेरी, हाऊसहोल्ड सर्वे करून नागरिकांच्या गरजांनुसार पाच वर्षांचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. ग्रामसभेत मंजुरीनंतर एनआरएम, जमीन वापर आणि उपजीविकेची मालमत्ता या स्वरूपातील कामांना सुरुवात करण्यात आली असून, त्यात जलतारासारख्या कामांचा समावेश आहे.

‘Catch the Rain’ संकल्पनेतून जलतारा चळवळ

“Catch the Rain – Where it falls, When it falls” या राष्ट्रीय संकल्पनेनुसार, प्रत्येक शेतातील पाणी त्याच शेतात मुरविण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात मोठया प्रमाणात जलतारा चळवळ सुरू केली असून, येणाऱ्या कालावधीत जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतात 1 लाख जलतारा तयार करण्यात येणार आहेत.

जलतारा कामाचे स्वरूप

शेतातील प्रत्येक एक एकर क्षेत्रात उताराच्या दिशेने ५ फूट रुंद, ५ फूट लांब व ६ फूट खोल खड्डा खोदून त्यात खाली मोठे दगड, त्यावर मध्यम आकाराचे दगड भरून जलतारा तयार करण्यात येतो. एका जलतारामध्ये पावसाळ्यात सुमारे ३.६० लाख लिटर पाणी मुरविण्याची क्षमता आहे. त्यामुळे शिवारातील विहिरी व बोअरवेलला पाणी मिळण्यास मदत होऊन भूजलपातळी वाढीस चालना मिळणार आहे.

आर्थिक सहाय्य

मनरेगा अंतर्गत प्रत्येक जलतारासाठी ५ हजार २०० रुपये मजुरी स्वरूपात शेतकऱ्यास देण्यात येतात. सातबारा व उतारानुसार कमाल ५ एकरपर्यंत ५ जलतारे उभारण्याचा लाभ घेता येणार असून, एका शेतकऱ्यास २६ हजार रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. यासाठी शेतकऱ्याने स्वतः काम करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामरोजगार सहाय्यक, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कृषी सेवक, HIMWP/BRLF तालुका समन्वयक, मनरेगा एपीओ, अभियंता, पंचायत समिती किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अलका पाटील

उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

000000











 वृत्त क्र. 173

एसजीजीएस आयई अँड टी आणि सर्वह इन्क्युबेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने

नांदेड येथे प्रादेशिक इनोवेशन व स्टार्टअप संवाद

नांदेड, दि. 5 फेब्रुवारी : - श्री गुरु गोबिंदसिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (SGGSIE&T), नांदेड आणि सर्वह इन्क्युबेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रादेशिक इनोवेशन व स्टार्टअप संवाद कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार 6 फेब्रुवारी 2026 रोजी एसजीजीएस आयई अँड टी नांदेड येथे करण्यात आले आहे.

हा संवाद कार्यक्रम विद्यार्थ्यांपासून स्टार्टअप्स, प्राध्यापक, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक तसेच इनोवेशन परिसंस्थेतील भागीदारांना एकत्र आणून इनोवेशन, उद्योजकता आणि प्रादेशिक स्टार्टअप परिसंस्था विकासावर सखोल चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (MSInS), महाराष्ट्र शासन यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते महाराष्ट्राच्या इनोवेटिव दृष्टीकोनाविषयी, शासनाच्या विविध उपक्रमांविषयी तसेच विद्यार्थी, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्र नवोन्मेष प्रक्रियेत कशा प्रकारे सहभागी होऊ शकतात याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

हा प्रादेशिक संवाद महाराष्ट्रातील नवीन्यता व स्टार्टअप परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी सहकार्य, ज्ञानविनिमय आणि संवादाचे प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.

कार्यक्रमाचा तपशील: दिनांक: ६ फेब्रुवारी २०२६, वेळ: सकाळी १०.३० ते दुपारी १

स्थळ: श्री गुरु गोबिंदसिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (SGGSIE&T), नांदेड

हा कार्यक्रम विद्यार्थी, स्टार्टअप्स, प्राध्यापक, उद्योग प्रतिनिधी आणि इनोवेटिव परिसंस्थेतील भागीदारांसाठी खुला आहे. नोंदणीसाठी लिंक या QR स्कॅन करा : https://forms.gle/NptDJZwEFhSDdfYv9

00000

  वृत्त क्र.  181 सोमवारी आयटीआय पास उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन   नांदेड, दि. 6 फेब्रुवारी : मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना के...