Sunday, April 12, 2026

 वृत्त क्रमांक  

जिल्हा युवा पुरस्कारासाठी 22 एप्रिलपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 13 एप्रिल : जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल 2026 असून, अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवती व संस्थांनी या पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे. 

अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर यांच्याशी संपर्क साधावा असेही कळविले आहे.

राष्ट्र व राज्याच्या उभारणीत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून राज्यातील युवक व विविध संस्था सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. युवांमधील सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे व त्यांचा गौरव करणे आवश्यक आहे. राज्याच्या युवा धोरणांतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 12 नोव्हेंबर 2013 च्या शासन निर्णयानुसार राज्य युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

सन 2025-26 या वर्षासाठी जिल्हा युवा पुरस्कारांतर्गत जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 1 युवक, 1 युवती आणि 1 नोंदणीकृत संस्था यांची निवड करण्यात येणार आहे.

अर्जदारांनी सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक कार्य, स्वच्छता, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, तसेच राज्य व देशाच्या साधनसंपत्तीचे जतन आणि दुर्बल घटकांसाठी स्वयंप्रेरणेने केलेले कार्य यामध्ये योगदान दिलेले असणे अपेक्षित आहे. अर्जासोबत संबंधित कार्याचे पेपर कात्रणे, छायाचित्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच मागील तीन वर्षांच्या कार्याचा आढावा, पुढील दोन वर्षे सातत्याने सामाजिक कार्य करण्याचे हमीपत्र व चारित्र्य प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे :

युवक व युवती यांना प्रत्येकी रु. 10 हजार रुपये रोख, संस्थेस 50 हजार रुपये, याशिवाय गौरवपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.

00000

वृत्त क्रमांक  

सामाजिक समता सप्ताहांतर्गत संविधान जागर व महिला मेळावा संपन्न

नांदेड, दि. 12 एप्रिल :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह-2026 अंतर्गत आज 12 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता समाज कल्याण कार्यालय येथील सांस्कृतिक सभागृहात “संविधान जागर व महिला मेळावा” उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक आयुक्त शिवानंद मीनगिरे हे होते. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून महिला व मुलांकरिता सहाय्यक कक्ष, पोलीस मुख्यालय, नांदेड येथील समुपदेशक मोनिका वामन बिरादार उपस्थित होत्या. तसेच समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे व वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक लक्ष्मी गायके यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यानंतर मान्यवरांचा भारतीय संविधान उद्देशिकेची प्रत व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या मेळाव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच संविधान जागर अंतर्गत भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया, समित्या, अनुच्छेद, मूलभूत अधिकार व कर्तव्ये याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले.

प्रास्ताविक समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे यांनी केले. त्यांनी महिलांना दैनंदिन जीवनातील समस्या, बालविवाह प्रतिबंधक कायदा, हुंडाबळी प्रतिबंधक कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 याबाबत माहिती दिली.

समुपदेशक मोनिका बिरादार यांनी महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांविषयी मार्गदर्शन करताना महिलांनी आपल्या हक्कांविषयी सजग राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप शिवानंद मीनगिरे यांनी केला. सूत्रसंचालन गजानन पापटवार यांनी तर आभार प्रदर्शन लक्ष्मी गायके यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

हा कार्यक्रम सहायक आयुक्त शिवानंद मीनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

0000





छेडछाडीविरोधात महिलांना आता मिळणार अधिक सक्षम संरक्षण! ‘शी-बॉक्स’ पोर्टलमुळे कामाच्या ठिकाणासह सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीच्या तक्रारी...