Friday, September 25, 2026

वृत्त क्रमांक

अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान

• नांदेड तालुक्यात 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

• महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. 25 : राष्ट्रीय कृषी विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन)’ अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. या प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संचासाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळणार आहे. यासाठी दि. 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नांदेड तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल यांनी केले आहे.

इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज सादर करावा. त्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

पोर्टलवर ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज सादर करताना सर्व माहिती अचूक व परिपूर्ण भरावी. चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे.

अर्जासाठी शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी, ओळख पडताळणीसाठी आवश्यक शासकीय कागदपत्रे, बँक पासबुक आणि जातीचा दाखला असणे अनिवार्य आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक’ अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के, तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान देय आहे. यासाठी क्षेत्राची कमाल मर्यादा 5 हेक्टरपर्यंत आहे.

राज्य पुरस्कृत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना – प्रति थेंब अधिक पीक योजनेतून लाभ घेतलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के, तर इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान देण्यात येते. त्यामुळे दोन्ही योजनांमधून अनुक्रमे 80 टक्के व 75 टक्के अनुदान मिळते.

याशिवाय अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून उर्वरित 10 टक्के, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून 15 टक्के अनुदान देण्यात येते. या योजनांच्या एकत्रित लाभातून पात्र अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना एकूण 90 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकते.

नांदेड तालुक्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांनी विशेष मोहिमेच्या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर तातडीने अर्ज करावेत.

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत मदत व अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी परिसरातील सामूहिक सेवा केंद्र (सीएससी), सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल यांनी केले आहे.

**

वृत्त क्रमांक

सर्पदंश झाल्यास अंधश्रद्धेला बळी पडू नका; तातडीने शासकीय रुग्णालयात उपचार घ्या

• नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत सर्पदंशावरील औषधसाठा उपलब्ध

• जिल्हा शल्य चिकित्सक यांचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. 25 : सर्पदंश ही तातडीची वैद्यकीय आणीबाणी असून, वेळेत योग्य वैद्यकीय उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचविता येतो. त्यामुळे सर्पदंश झाल्यास कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता रुग्णाला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाने सर्पदंशाचा समावेश अधिसूचित आजार म्हणून केला आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांनी सर्पदंशाच्या घटनांमध्ये मांत्रिक, झाडफूक किंवा जडीबुटीच्या उपचारांवर अवलंबून न राहता तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. उपचारास होणारा विलंब रुग्णाच्या जीवावर बेतू शकतो.

नांदेड जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, नांदेड येथे सर्पदंशावरील अँटी-स्नेक व्हेनम (ASV) आणि आवश्यक औषधसाठा उपलब्ध असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले.

सर्पदंशावरील विषरोधक उपचार वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेणे महत्त्वाचे आहे.

सर्पदंश झाल्यास काय करावे ?

सर्पदंशानंतर पहिल्या काही मिनिटांत योग्य प्रथमोपचार व तातडीने रुग्णालयात पोहोचणे महत्त्वाचे आहे.

• रुग्णाला धीर देऊन शांत ठेवावे. घाबरून धावपळ करू देऊ नये.

• दंश झालेला हात किंवा पाय लाकडी पट्टी अथवा कापडाच्या साहाय्याने स्थिर ठेवावा.

• सूज येण्यापूर्वी अंगठी, कडे, घड्याळ व घट्ट कपडे काढून टाकावेत.

• रुग्णाला चालवत नेण्याऐवजी वाहनातून किंवा 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करावे.

हे प्रकार कटाक्षाने टाळा

सर्पदंश झालेल्या जागी ब्लेडने कापू नये किंवा रक्त वाहू देऊ नये. तोंडाने विष शोषण्याचा प्रयत्न करू नये. दंश झालेला अवयव दोरी किंवा कापडाने अतिघट्ट बांधू नये. अशा प्रकारांमुळे अवयवाला इजा होण्याची शक्यता असते.

तसेच मांत्रिक, भोंदूबाबा किंवा झाडफुकीच्या नादात वैद्यकीय उपचारांना विलंब करू नये. सर्पदंशाच्या रुग्णाला त्वरित वैद्यकीय उपचार मिळणे हाच जीव वाचविण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे.

शेतात किंवा गवतात काम करताना मजबूत पादत्राणे व जाड हातमोजे वापरावेत. रात्री शेतात किंवा घराबाहेर जाताना विजेरी (टॉर्च) आणि काठी सोबत ठेवावी. घराभोवती लाकडांचे ढीग, कचरा व दगड साठू देऊ नयेत. जमिनीवर झोपणे टाळून खाटेचा वापर करावा आणि मच्छरदाणी व्यवस्थित खोचून झोपावे. सर्पदंशाच्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेसाठी 108 किंवा 102 या टोल-फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा.

“वेळेवर योग्य वैद्यकीय उपचार, हाच सर्पदंशावर खात्रीशीर उपाय आहे. नागरिकांनी अंधश्रद्धेला बळी न पडता तातडीने उपचार घ्यावेत,” असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केले आहे.

***

वृत्त क्रमांक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर

लोहा येथे पीक परिस्थितीची करणार पाहणी

नांदेड (जिमाका), दि. 25 : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ह्या उद्या शनिवार, दि. 26 सप्टेंबर 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्या लोहा तालुक्यातील टंचाईसदृश परिस्थिती व पीक परिस्थितीची पाहणी करणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि. 26 सप्टेंबर रोजी सकाळी 7.20 वाजता पुणे विमानतळ येथून विमानाने नांदेडकडे प्रयाण करतील. सकाळी 8 वाजता श्री गुरु गोविंदसिंहजी विमानतळ, नांदेड येथे आगमन होईल. सकाळी 8.05 वाजता नांदेड जिल्ह्यातील टंचाईसदृश परिस्थितीच्या पाहणीसाठी लोहाकडे प्रयाण करतील.

सकाळी 9 वाजता लोहा जि.नांदेड येथे आगमन झाल्यानंतर त्या पीक परिस्थितीची पाहणी करतील. त्यानंतर मोटारीने परभणी जिल्ह्यातील टंचाईसदृश परिस्थितीच्या पाहणीसाठी मरडसगाव, ता. गंगाखेड, जि. परभणीकडे प्रयाण करतील.

***

वृत्त क्रमांक

जिल्ह्यात सोमवारी माहिती अधिकार दिन

• शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचे निर्देश

नांदेड (जिमाका), दि. 25 : माहितीचा अधिकार अधिनियमाबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी आणि नागरिकांना त्यांच्या माहितीच्या अधिकाराची प्रभावी जाणीव व्हावी, यासाठी सोमवार, दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी जिल्ह्यात ‘माहिती अधिकार दिन’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी विविध जनजागृतीपर उपक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.

राज्य शासनाच्या 20 सप्टेंबर 2008 रोजीच्या शासन निर्णयानुसार दरवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस राज्य पातळीवर ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. माहितीच्या अधिकाराबाबत समाजात व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने 28 सप्टेंबर 2008 पासून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे.

माहिती अधिकार दिनानिमित्त शालेय शिक्षण तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिनस्त सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये माहितीच्या अधिकारावर आधारित विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रश्नमंजूषा, चित्रकला, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्रे आणि व्याख्यानमाला यांचा समावेश असेल.

या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहितीचा अधिकार अधिनियम, त्याचा उद्देश, नागरिकांचे अधिकार तसेच शासकीय कामकाजातील पारदर्शकतेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

माहिती अधिकार दिनाच्या माध्यमातून नागरिकांना माहितीचा अधिकार अधिनियमाचा योग्य वापर, त्याअंतर्गत माहिती मिळविण्याची प्रक्रिया तसेच शासकीय कामकाजातील पारदर्शकता व उत्तरदायित्व याबाबत माहिती देण्यावर भर देण्यात येणार आहे.

विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना, नागरिकांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लायन्स क्लब, रोटरी क्लब तसेच इतर समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने स्थानिक पातळीवर पारितोषिकांची व्यवस्था करण्याच्या सूचनाही शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील सर्व अधिनस्त शासकीय कार्यालयांनी संदर्भाधीन शासन निर्णयातील सूचनांचे पालन करून माहिती अधिकार दिनाची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच आवश्यक जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करून त्याची कार्यवाही करावी.

आयोजित कार्यक्रमांची माहिती, केलेल्या कार्यवाहीचा तपशील आणि संबंधित छायाचित्रांसह अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.

**

 वृत्त क्रमांक

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात २९ सप्टेंबर रोजी शौर्यदिन 

माजी सैनिक, वीरनारी, वीरमाता-पिता व शहीद जवानांच्या नातेवाईकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. २५ : भारतीय सैन्य दलाने २९ सप्टेंबर २०१६ रोजी जम्मू-कश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या हद्दीत सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांविरुद्ध धडक कारवाई केली. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीची जनतेला माहिती व्हावी तसेच देशभक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी ‘शौर्यदिन’ साजरा करण्यात येतो.

यावर्षी मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नांदेड येथे ‘शौर्यदिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात माजी सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीरनारी, वीरमाता-पिता, शहीद जवानांचे नातेवाईक तसेच देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त ले. कर्नल राहुल वैजनाथ माने यांनी केले आहे.

****

वृत्त क्रमांक

अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन संचासाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान

• ठिबक व तुषार सिंचनासाठी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

• महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. 25 : राष्ट्रीय कृषी विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन)’ अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. या प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संचासाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळू शकतो. यासाठी जिल्ह्यात दि. 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अर्धापूर तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, अर्धापूर यांनी केले आहे.

इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करावा. अर्जासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin  या संकेतस्थळाचा वापर करावा. पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

अर्ज सादर करताना शेतकऱ्यांनी सर्व माहिती अचूक व परिपूर्ण भरावी. चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. अर्जासाठी आधार कार्ड, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक, ओळख पटविण्यासाठी आवश्यक शासकीय कागदपत्रे, बँक पासबुक आणि जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक’ अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के, तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान देय आहे. यासाठी क्षेत्राची कमाल मर्यादा 5 हेक्टरपर्यंत आहे. 

राज्य पुरस्कृत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत पूरक अनुदानाची तरतूद आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना – प्रति थेंब अधिक पीक योजनेतून लाभ घेतलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के, तर इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान देण्यात येते. त्यामुळे या दोन्ही योजनांमधून अनुक्रमे 80 टक्के व 75 टक्के अनुदान मिळते.

याशिवाय अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून उर्वरित 10 टक्के, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून 15 टक्के अनुदान देण्यात येते. यामुळे पात्र शेतकऱ्यांना एकूण 90 टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळू शकतो.

अर्धापूर तालुक्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांनी या विशेष मोहिमेच्या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर तात्काळ अर्ज करावेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व योजनेच्या अधिक माहितीसाठी परिसरातील सामूहिक सेवा केंद्र (CSC), सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

***

वृत्त क्रमांक

भिलगावातील शासकीय सेवा शिबिरातून 302 नागरिकांना विविध सेवांचा लाभ

नांदेड (जिमाका), दि. 25 : महाराष्ट्र शासन आणि टाटा मोटर्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या एकात्मिक ग्रामविकास प्रकल्प (IVDP 2.0) अंतर्गत किनवट तालुक्यातील भिलगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित शासकीय सेवा शिबिरातून 302 नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. शिबिरास पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, गटशिक्षणाधिकारी निळकंठ चेतले यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या शिबिरात विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला. यामध्ये 31 रहिवासी प्रमाणपत्रे, 36 जात प्रमाणपत्रे, 9 आधार अद्ययावतीकरण, 7 बँक खाती आणि 6 रेशन कार्ड अशा एकूण 89 नवीन सेवांसाठी प्रक्रिया करण्यात आली. तसेच 41 रहिवासी प्रमाणपत्रे, 22 उत्पन्न प्रमाणपत्रे, 56 आभा कार्ड, 37 आयुष्मान कार्ड आणि 57 ई-श्रम कार्ड अशी एकूण 213 कागदपत्रे वितरित करण्यात आली.

या शिबिरादरम्यान शाळेतील मुलींना गुड टच-बॅड टच या विषयावर मार्गदर्शन करून बालसुरक्षेबाबत जागृती करण्यात आली. घरकुल लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. तसेच महिला मेळाव्याच्या माध्यमातून महिलांना लोकसहभागाचे महत्त्व पटवून देत ग्रामविकास प्रक्रियेत सक्रिय सहभागासाठी प्रेरित करण्यात आले.

यावेळी डॉ. प्रविणकुमार घुले यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण भागात आवश्यक कागदपत्रांअभावी अनेक नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहतात. एकात्मिक ग्रामविकास प्रकल्पाचा उद्देश शासन आणि गावातील अंतर कमी करणे हा असून, भिलगावातील 302 सेवांना मिळालेला प्रतिसाद ही कार्याची पोचपावती असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकांक्षित तालुका समन्वयक पांडुरंग मामीडवार यांनी केले, तर टाटा मोटर्स फाउंडेशनचे तालुका समन्वयक रवी गुंडेवाड यांनी आभार मानले. 

या शिबिरास विविध विभागांचे विभागप्रमुख, वैद्यकीय अधिकारी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), ग्राम महसूल अधिकारी, उमेद अभियानाचे अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी तसेच टाटा मोटर्स फाउंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते.

***







वृत्त क्रमांक

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे

29 सप्टेंबर रोजी होणारा पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ स्थगित

नांदेड (जिमाका), दि. 25 : भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 चा कार्यक्रम जाहीर केला असून, संबंधित निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला रोजगार महाकुंभ पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे.

रोजगार महाकुंभाची नवीन तारीख व वेळ निश्चित झाल्यानंतर संबंधित महाविद्यालये, उमेदवार व इतर संबंधितांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.

या अनुषंगाने सर्व संबंधित महाविद्यालयांनी रोजगार मेळाव्याच्या आयोजनासाठी करण्यात येणारी प्रसिद्धी, उमेदवारांची नोंदणी, उमेदवारांना उपस्थित राहण्याबाबतची कार्यवाही तसेच इतर सर्व तयारी पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगित ठेवावी.

रोजगार महाकुंभासाठी नोंदणी केलेल्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

***

वृत्त क्रमांक अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान •   नांदेड तालुक्यात 15 सप्टेंबर ते 15...