Friday, September 25, 2026

वृत्त क्रमांक

अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान

• नांदेड तालुक्यात 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

• महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. 25 : राष्ट्रीय कृषी विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन)’ अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. या प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संचासाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळणार आहे. यासाठी दि. 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नांदेड तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल यांनी केले आहे.

इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज सादर करावा. त्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

पोर्टलवर ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज सादर करताना सर्व माहिती अचूक व परिपूर्ण भरावी. चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे.

अर्जासाठी शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी, ओळख पडताळणीसाठी आवश्यक शासकीय कागदपत्रे, बँक पासबुक आणि जातीचा दाखला असणे अनिवार्य आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक’ अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के, तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान देय आहे. यासाठी क्षेत्राची कमाल मर्यादा 5 हेक्टरपर्यंत आहे.

राज्य पुरस्कृत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना – प्रति थेंब अधिक पीक योजनेतून लाभ घेतलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के, तर इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान देण्यात येते. त्यामुळे दोन्ही योजनांमधून अनुक्रमे 80 टक्के व 75 टक्के अनुदान मिळते.

याशिवाय अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून उर्वरित 10 टक्के, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून 15 टक्के अनुदान देण्यात येते. या योजनांच्या एकत्रित लाभातून पात्र अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना एकूण 90 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकते.

नांदेड तालुक्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांनी विशेष मोहिमेच्या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर तातडीने अर्ज करावेत.

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत मदत व अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी परिसरातील सामूहिक सेवा केंद्र (सीएससी), सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल यांनी केले आहे.

**

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर व पशुधनासाठी १२ उपाययोजना व सवलती लाग...