वृत्त क्रमांक
जिल्ह्यात सोमवारी माहिती अधिकार दिन
• शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचे निर्देश
नांदेड (जिमाका), दि. 25 : माहितीचा अधिकार अधिनियमाबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी आणि नागरिकांना त्यांच्या माहितीच्या अधिकाराची प्रभावी जाणीव व्हावी, यासाठी सोमवार, दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी जिल्ह्यात ‘माहिती अधिकार दिन’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी विविध जनजागृतीपर उपक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.
राज्य शासनाच्या 20 सप्टेंबर 2008 रोजीच्या शासन निर्णयानुसार दरवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस राज्य पातळीवर ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. माहितीच्या अधिकाराबाबत समाजात व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने 28 सप्टेंबर 2008 पासून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे.
माहिती अधिकार दिनानिमित्त शालेय शिक्षण तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिनस्त सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये माहितीच्या अधिकारावर आधारित विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रश्नमंजूषा, चित्रकला, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्रे आणि व्याख्यानमाला यांचा समावेश असेल.
या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहितीचा अधिकार अधिनियम, त्याचा उद्देश, नागरिकांचे अधिकार तसेच शासकीय कामकाजातील पारदर्शकतेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
माहिती अधिकार दिनाच्या माध्यमातून नागरिकांना माहितीचा अधिकार अधिनियमाचा योग्य वापर, त्याअंतर्गत माहिती मिळविण्याची प्रक्रिया तसेच शासकीय कामकाजातील पारदर्शकता व उत्तरदायित्व याबाबत माहिती देण्यावर भर देण्यात येणार आहे.
विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना, नागरिकांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लायन्स क्लब, रोटरी क्लब तसेच इतर समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने स्थानिक पातळीवर पारितोषिकांची व्यवस्था करण्याच्या सूचनाही शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील सर्व अधिनस्त शासकीय कार्यालयांनी संदर्भाधीन शासन निर्णयातील सूचनांचे पालन करून माहिती अधिकार दिनाची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच आवश्यक जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करून त्याची कार्यवाही करावी.
आयोजित कार्यक्रमांची माहिती, केलेल्या कार्यवाहीचा तपशील आणि संबंधित छायाचित्रांसह अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.
**
No comments:
Post a Comment