वृत्त क्रमांक
भिलगावातील शासकीय सेवा शिबिरातून 302 नागरिकांना विविध सेवांचा लाभ
नांदेड (जिमाका), दि. 25 : महाराष्ट्र शासन आणि टाटा मोटर्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या एकात्मिक ग्रामविकास प्रकल्प (IVDP 2.0) अंतर्गत किनवट तालुक्यातील भिलगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित शासकीय सेवा शिबिरातून 302 नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. शिबिरास पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, गटशिक्षणाधिकारी निळकंठ चेतले यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला. यामध्ये 31 रहिवासी प्रमाणपत्रे, 36 जात प्रमाणपत्रे, 9 आधार अद्ययावतीकरण, 7 बँक खाती आणि 6 रेशन कार्ड अशा एकूण 89 नवीन सेवांसाठी प्रक्रिया करण्यात आली. तसेच 41 रहिवासी प्रमाणपत्रे, 22 उत्पन्न प्रमाणपत्रे, 56 आभा कार्ड, 37 आयुष्मान कार्ड आणि 57 ई-श्रम कार्ड अशी एकूण 213 कागदपत्रे वितरित करण्यात आली.
या शिबिरादरम्यान शाळेतील मुलींना गुड टच-बॅड टच या विषयावर मार्गदर्शन करून बालसुरक्षेबाबत जागृती करण्यात आली. घरकुल लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. तसेच महिला मेळाव्याच्या माध्यमातून महिलांना लोकसहभागाचे महत्त्व पटवून देत ग्रामविकास प्रक्रियेत सक्रिय सहभागासाठी प्रेरित करण्यात आले.
यावेळी डॉ. प्रविणकुमार घुले यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण भागात आवश्यक कागदपत्रांअभावी अनेक नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहतात. एकात्मिक ग्रामविकास प्रकल्पाचा उद्देश शासन आणि गावातील अंतर कमी करणे हा असून, भिलगावातील 302 सेवांना मिळालेला प्रतिसाद ही कार्याची पोचपावती असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकांक्षित तालुका समन्वयक पांडुरंग मामीडवार यांनी केले, तर टाटा मोटर्स फाउंडेशनचे तालुका समन्वयक रवी गुंडेवाड यांनी आभार मानले.
या शिबिरास विविध विभागांचे विभागप्रमुख, वैद्यकीय अधिकारी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), ग्राम महसूल अधिकारी, उमेद अभियानाचे अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी तसेच टाटा मोटर्स फाउंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते.
***
No comments:
Post a Comment