वृत्त क्रमांक
अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन संचासाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान
• ठिबक व तुषार सिंचनासाठी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम
• महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका), दि. 25 : राष्ट्रीय कृषी विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक (सूक्ष्म सिंचन)’ अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. या प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संचासाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळू शकतो. यासाठी जिल्ह्यात दि. 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अर्धापूर तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, अर्धापूर यांनी केले आहे.
इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करावा. अर्जासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin या संकेतस्थळाचा वापर करावा. पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
अर्ज सादर करताना शेतकऱ्यांनी सर्व माहिती अचूक व परिपूर्ण भरावी. चुकीची अथवा अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे. अर्जासाठी आधार कार्ड, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक, ओळख पटविण्यासाठी आवश्यक शासकीय कागदपत्रे, बँक पासबुक आणि जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक’ अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के, तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान देय आहे. यासाठी क्षेत्राची कमाल मर्यादा 5 हेक्टरपर्यंत आहे.
राज्य पुरस्कृत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत पूरक अनुदानाची तरतूद आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना – प्रति थेंब अधिक पीक योजनेतून लाभ घेतलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के, तर इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान देण्यात येते. त्यामुळे या दोन्ही योजनांमधून अनुक्रमे 80 टक्के व 75 टक्के अनुदान मिळते.
याशिवाय अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून उर्वरित 10 टक्के, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून 15 टक्के अनुदान देण्यात येते. यामुळे पात्र शेतकऱ्यांना एकूण 90 टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळू शकतो.
अर्धापूर तालुक्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांनी या विशेष मोहिमेच्या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर तात्काळ अर्ज करावेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व योजनेच्या अधिक माहितीसाठी परिसरातील सामूहिक सेवा केंद्र (CSC), सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
***
No comments:
Post a Comment