वृत्त
निवडणूक तयारीत सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा - विभागीय आयुक्त जी. श्रीकांत
वृत्त
निवडणूक तयारीत सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा - विभागीय आयुक्त जी. श्रीकांत
वृत्त क्रमांक
डाक जीवन विमा योजनेअंतर्गत थेट विमा प्रतिनिधी पदासाठी मुलाखत
नांदेड(जिमाका), दि. 8 : नांदेड डाक विभागाच्या वतीने डाक जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (आरपीएलआय) योजनेंतर्गत थेट विमा प्रतिनिधी (विमा सल्लागार) म्हणून नियुक्तीसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून दि. 30 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत अधीक्षक डाकघर कार्यालय, नांदेड विभाग, नांदेड येथे स्वखर्चाने थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अर्ज अधीक्षक डाकघर कार्यालय, नांदेड विभाग येथे उपलब्ध आहेत.
उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी किमान 18 वर्षे असावे. तसेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त मंडळाची इयत्ता 10 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बेरोजगार व स्वयंरोजगार व्यक्ती, माजी विमा सल्लागार, विमा कंपन्यांचे माजी विमा प्रतिनिधी, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या, महिला मंडळ कार्यकर्ते, ग्रामप्रधान, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटांच्या सदस्यांसह पात्र व्यक्ती अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल. यामध्ये व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्त्व, जीवन विम्याचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान आणि स्थानिक परिसराची माहिती आदी बाबींची पडताळणी करण्यात येईल.
निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपये सुरक्षा ठेव म्हणून राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) किंवा किसान विकास पत्र (केव्हीपी) स्वरूपात जमा करावी लागेल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरता परवाना देण्यात येईल. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाची परवाना परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर हा परवाना कायमस्वरूपी करण्यात येईल. सदर परीक्षा तीन वर्षांच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. नियुक्ती ही परवाना व कमिशन तत्त्वावर राहणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस येताना बायोडाटा, मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे अथवा अनुभव प्रमाणपत्र आणि दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे सोबत आणावीत, असे आवाहन अधीक्षक डाकघर, नांदेड विभाग यांनी केले आहे.
***
वृत्त क्रमांक
भोगवटादार वर्ग-2 जमिनीवर शेतकऱ्यांना सुलभ कर्जपुरवठा करा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे निर्देश
• शासनाच्या पूर्वपरवानगीच्या कारणास्तव कर्जप्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत
• कर्जपुरवठ्यात अनावश्यक अडथळे टाळावेत
नांदेड (जिमाका), दि. 8 : भोगवटादार वर्ग-2 म्हणून जमीन धारण करणाऱ्या पात्र शेतकरी व भोगवटादारांना पीक कर्ज तसेच शेतीच्या विकासासाठी आवश्यक मध्यम व दीर्घ मुदतीचे तारण कर्ज मिळण्यास अडचणी येऊ नयेत. शासनाची पूर्वपरवानगी अथवा नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे कारण देऊन पात्र कर्जदारांना कर्जापासून वंचित ठेवू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित अधिकारी, बँका व वित्तीय संस्थांना दिले आहेत.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मधील कलम 36 (4) नुसार भोगवटादार वर्ग-2 म्हणून जमीन धारण करणाऱ्या भोगवटादारांना सहकारी बँका, भू-विकास बँका, भारतीय स्टेट बँक अथवा संबंधित कायद्यानुसार पात्र इतर बँका व महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाकडून जमिनीच्या तारणावर कर्ज घेता येते. अशा कर्जासाठी जमीन तारण ठेवताना जिल्हाधिकारी किंवा शासनाच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
भोगवटादार वर्ग-2 जमिनीवर कर्ज घेतलेल्या कर्जदाराने कर्जाची परतफेड केली नाही, तर त्याची जबाबदारी संबंधित कर्जदाराची राहते. कर्जाच्या थकबाकीच्या वसुलीसाठी तारण ठेवलेल्या जमिनीची विक्री अथवा लिलाव करण्याची परिस्थिती उद्भवल्यास, त्यासाठी शासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. तसेच अशा जमिनीच्या विक्रीचा व्यवहार नोंदणीकृत करणे बंधनकारक राहील.
या तरतुदींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आपल्या अधिनस्त कार्यक्षेत्रातील सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकारी तसेच बँका व इतर वित्तीय संस्थांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्याचे निर्देश दिले आहेत.
पात्र शेतकरी व भोगवटादारांना पीक कर्ज, शेती विकासासाठी मध्यम व दीर्घ मुदतीचे तारण कर्ज सुलभतेने उपलब्ध होईल, यासाठी सर्व संबंधितांनी तात्काळ आवश्यक कार्यवाही करावी. शासनाच्या परवानगीच्या कारणास्तव कर्जप्रकरणात अनावश्यक अडथळे निर्माण करू नयेत किंवा नाहरकत प्रमाणपत्राची मागणी करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.
**
वृत्त क्रमांक
शासकीय जमिनींच्या नोंदींची तपासणी करून योग्य सत्ता प्रकार निश्चित करा-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे निर्देश
• गाव नमुना 1-क व सातबारा उताऱ्यावरील नोंदीत सुसंगती राखण्याच्या सूचना
नांदेड (जिमाका), दि. 8 : शासकीय जमिनींच्या गाव नमुना नं. 1-क व सातबारा उताऱ्यावरील नोंदींची तपासणी करून प्रचलित शासन तरतुदींनुसार संबंधित जमिनीचा योग्य प्रकार व सत्ता प्रकार निश्चित करावा. त्यानुसार अधिकार अभिलेखात आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.
मुदखेड तालुक्यातील काही शासकीय गायरान जमिनींचे पट्टे वाटप झाल्यानंतर सातबारा उताऱ्यावर भोगवटादार वर्ग-2 अशी नोंद न होता ‘भूधारणा पद्धती – सरकार, सरकारी पट्टेदार’ अशी नोंद झाल्याचे तहसीलदार, मुदखेड यांनी निदर्शनास आणून दिले होते. संबंधित जमिनी कायमस्वरूपी वाटप झालेल्या असतानाही वारस नोंद तसेच बोजा घेण्यास अडचणी येत असल्याचे त्यांनी कळविले होते.
या पार्श्वभूमीवर इतर तालुक्यांमध्येही अशा स्वरूपाच्या अडचणी उद्भवू नयेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना त्यांच्या तालुक्यातील शासकीय जमिनींच्या नोंदींची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
शासकीय निर्णयानुसार निर्बंधित सत्ता प्रकाराच्या जमिनींच्या अनधिकृत हस्तांतरणामुळे शर्तभंग, वाद व तक्रारी निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच अशा व्यवहारांमुळे शासनाच्या महसूल उत्पन्नाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सुधारित गाव नमुना नं. 1-क मध्ये निर्बंधित सत्ता प्रकाराच्या जमिनींच्या वर्गवारीनुसार स्वतंत्र नोंदी ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.
त्यानुसार संबंधित तहसीलदारांनी गावनिहाय शासकीय जमिनींच्या गाव नमुना नं. 1-क व सातबारा उताऱ्यावरील नोंदी तपासून त्यामध्ये आवश्यक ती सुसंगती राखावी. प्रचलित शासन तरतुदी व शासन परिपत्रकातील सूचनांनुसार प्रकरणनिहाय योग्य ती कार्यवाही पूर्ण करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
या कार्यवाहीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची पाहणी व नियंत्रण ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित तहसीलदारांची राहील, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्देशात नमूद केले आहे.
**
वृत्त क्रमांक
भू-विकास बँक कर्जमाफीधारकांना पीक कर्जाचा मार्ग मोकळा
सातबारावरील बोजे तात्काळ कमी करण्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे निर्देश
नांदेड (जिमाका), दि. 8 : शासन निर्णयानुसार भू-विकास बँकेच्या सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णतः माफ करण्यात आले असून, त्यांच्या सातबारा उताऱ्यावरील भू-विकास बँकेच्या कर्जबोजाच्या नोंदी कमी करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. कर्जबोजाची नोंद अभिलेखावर कायम असल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना अडचणी येऊ नयेत, यासाठी सर्व तहसीलदारांनी प्रलंबित नोंदी सरसकट कमी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.
दि. 9 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णतः माफ करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनीवरील भू-विकास बँकेच्या कर्जबोजाच्या नोंदी कमी करण्याचे निर्देश यापूर्वीही देण्यात आले होते. बहुतांश ठिकाणी ही कार्यवाही पूर्ण झाली आहे. काही ठिकाणी सातबारा उताऱ्यावर कर्जबोजाच्या नोंदी अद्याप कायम असल्याचे निदर्शनास आले आहे.
तीनही नावांवरील बोजाच्या नोंदी कमी करण्याचे निर्देश
भू-विकास बँकेशी संबंधित भू तारण बँक, भू विकास बँक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक मर्या., मुंबई या नावांनी सातबारा उताऱ्यावर नोंद असलेले कर्जबोजे सरसकट कमी करण्याची कार्यवाही तहसीलदारांनी तात्काळ करावी. यासाठी भू-विकास बँक अथवा सहकार विभागाकडून स्वतंत्र ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पीक कर्ज वितरणात अडथळा नको
भू-विकास बँकेच्या कर्जाची शासनाने कर्जमाफी केली असल्याने संबंधित शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना भू-विकास बँकेच्या ना-हरकत दाखल्याची मागणी करू नये. उर्वरित कर्जबोजाच्या नोंदी कमी करण्याची कार्यवाही सुरू असल्याने, अशा शेतकऱ्यांना तूर्त बोजाविरहित गृहित धरून पीक कर्ज वितरणाची कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.
याबाबत जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी जिल्ह्यातील सर्व बँका व वित्तीय संस्थांना आवश्यक सूचना द्याव्यात. पात्र शेतकरी कोणत्याही परिस्थितीत पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेऊन त्यांना सुलभ व तातडीने कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकारी कर्डिले यांनी निर्देशित केले आहे.
***
वृत्त क्रमांक
श्री रेणुकादेवी संस्थानचे अद्ययावत संकेतस्थळ नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तांच्या सेवेत
लाईव्ह दर्शन, वाहतूक, पार्किंगसह विविध सुविधा एका क्लिकवर
नांदेड (जिमाका), दि. ८ : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री रेणुकादेवी संस्थान, माहूरचे अधिकृत संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले असून, आश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात दि. ११ ऑक्टोबर २०२६ पासून ते भक्तांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. नवरात्रौत्सवादरम्यान माहूरगडावर येणाऱ्या भाविकांना आवश्यक माहिती आणि विविध सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे.
लाईव्ह दर्शनासह धार्मिक कार्यक्रमांचे दैनंदिन अपडेट्स
अद्ययावत संकेतस्थळावर श्री रेणुकादेवीच्या गाभाऱ्यातील लाईव्ह दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच नवरात्रौत्सवादरम्यान होणाऱ्या महाआरती, छबिना, कुमारिका पूजन यांसह विविध धार्मिक विधींचे दैनंदिन व्हिडीओ अपडेट्स उपलब्ध असतील. नऊ दिवस नऊ आरत्या आणि नऊ अष्टकांचे दैनंदिन अपडेट्स तसेच नृत्य व संगीत कार्यक्रमांचे व्हिडीओ प्रक्षेपणही संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
वाहतूक, पार्किंग, आरोग्य व आपत्कालीन सेवांची माहिती
भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसची वाहतूक व्यवस्था व वेळापत्रक, माहूरगडाच्या पायथ्याशी असलेल्या पार्किंगची माहिती, लाईव्ह मॅपद्वारे दिशादर्शन, आरोग्य सुविधांची माहिती व गुगल लोकेशन तसेच आपत्कालीन सेवांची माहिती आणि दिशादर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विविध आस्थापनांची माहितीही लाईव्ह मॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
नवरात्रौत्सवाच्या काळात देशभरातून मोठ्या संख्येने भाविक श्री रेणुकादेवीच्या दर्शनासाठी माहूरगडावर येतात. भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावे तसेच माहूरगडावरील वाहतूक, पार्किंग, आरोग्य आणि आपत्कालीन सेवांची माहिती सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने संकेतस्थळ अधिक उपयुक्त स्वरूपात अद्ययावत करण्यात आले आहे, अशी माहिती श्री रेणुकादेवी संस्थान, माहूरच्या विश्वस्त समितीच्या वतीने देण्यात आली.
डिजिटल माध्यमातून भाविकांना सुविधा
संकेतस्थळाची निर्मिती व अद्ययावतीकरण महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त सेटट्राईब या माहिती-तंत्रज्ञान कंपनीमार्फत सेवार्थ करण्यात येत आहे. ई-गव्हर्नन्स आणि डिजिटल सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कंपनीच्या माध्यमातून श्री रेणुकादेवी संस्थानच्या भाविकांसाठी डिजिटल माध्यमातून माहिती आणि सुविधा अधिक सुलभ करण्याचे काम करण्यात येत आहे.
नवरात्रौत्सवादरम्यान आवश्यक माहिती व विविध सुविधांसाठी भाविकांनी shrirenukadevi.in या श्री रेणुकादेवी संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन संस्थानच्या विश्वस्त समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
****
वृत्त क्रमांक
जिल्ह्यात 9 ते 23 ऑक्टोबरदरम्यान शस्त्र व जमावबंदी आदेश लागू
नांदेड(जिमाका), दि. 8: जिल्ह्यात आगामी काळात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, यात्रा, मिरवणुका तसेच संभाव्य आंदोलने होणार आहेत. नवरात्रोत्सव, माहूर येथील रेणुकामाता यात्रा, दसरा, विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिन, शीख समाजाचे विविध कार्यक्रम तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 37 (1) (3) अन्वये नांदेड जिल्ह्यात दि. 9 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि. 23 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास शस्त्रे, काठ्या, लाठ्या, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा वस्तू बाळगण्यास मनाई आहे. तसेच दाहक अथवा स्फोटक पदार्थ, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, जाहीर घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे तसेच सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल अशा प्रकारचे भाषण, हावभाव, फलक किंवा चित्रांचे प्रदर्शन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमण्यासही मनाई करण्यात आली आहे.
हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी व शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने विशेष परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू राहणार नाही. सभा, मिरवणूक, मोर्चा, पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास तसेच ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्याचे अधिकार संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना राहतील. नागरिकांनी आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हा दंडाधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
***
वृत्त
दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवावा – उपजिल्हाधिकारी अजय शिंदे
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त नांदेडमध्ये ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन
नांदेड(जिमाका), दि. 08: मराठी भाषेची प्राचीन परंपरा, समृद्ध साहित्य आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी नागरिकांनी दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढवावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांनी केले.
अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
या कार्यक्रमास तहसीलदार विकास बिरादार, नायब तहसीलदार सुनंदा कऱ्हाळे, जिल्हा ग्रंथालयातील प्रताप सूर्यवंशी, डॉ. राममनोहर लोहिया नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे ग्रंथपाल श्रीनिवास इज्जपवार, शंकर पवार यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती अभ्यासिकेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्र शासनाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी 3 ते 9 ऑक्टोबर हा कालावधी अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेचा गोडवा, तिचा ऐतिहासिक वारसा आणि समृद्ध साहित्यपरंपरेची ओळख शालेय विद्यार्थी व तरुण पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. मराठी भाषेविषयीचा अभिमान जनमानसात रुजविण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन महत्त्वपूर्ण असल्याचे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचारांना चालना मिळते आणि व्यक्तिमत्त्व विकासाला मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचे सभासद होऊन वाचनाची आवड जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रताप सूर्यवंशी यांनी केले.
हे ग्रंथप्रदर्शन 9 ऑक्टोबर 2026 पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथसंपदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
***
वृत्त निवडणूक तयारीत सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा - विभागीय आयुक्त जी. श्रीकांत नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा छत्रपती ...