Sunday, September 20, 2026

वृत्त क्रमांक 

नांदेड जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’च्या  प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले  

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन 

नागरिकांनी शासकीय योजना व सेवांचा अवश्य लाभ घ्यावा

नांदेड(जिमाका), दि. 20 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘सेवा परमोधर्म’ या उक्तीनुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विविध शासकीय सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 दरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाची नांदेड जिल्ह्यात प्रभावी व यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी योग्य समन्वय ठेवून उपक्रमांचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. दरम्यान, या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी शासकीय योजना व सेवांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. 

‘सेवा संकल्प अभियान’च्या जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

 या बैठकीस दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, सर्व उपविभागीय अधिकारी, महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त राजपाल कोल्हे, नगर पालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त , यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते. 

शासनाच्या निर्देशानुसार दि. १७ सप्टेंबर ते दि. १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत नागरिककेंद्री विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, सेवा व उपक्रमांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविणे, नागरिकांमध्ये शासकीय योजनांविषयी जनजागृती करणे तसेच प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करणे, हा अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचे  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले. 

 या अभियानांतर्गत ‘सेवा सेतू अभियान’, ‘इनोव्हेशन चॅलेंज’, ‘सेवा माझे योगदान’, ‘विकसित भारत संकल्प यात्रा’, ‘सेवा ज्योत यात्रा’, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, ‘अंगणवाडी उत्सव’, ‘आशीर्वादाचा दिवा’, ‘बदलाची गोष्ट’, ‘आभार आणि संकल्पाची रांगोळी’, ‘नमो सेवा गाथा’, ‘जल, जन आणि संकल्प यात्रा’ तसेच ‘जनसेवक महाकुंभ’ यांसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगून सर्व विभागप्रमुखांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी तसेच अभियानात केलेल्या कामाची पूर्वीची व नंतरची छायाचित्रे आणि व्हिडीओ चित्रिकरण करून ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांचा या अभियानात व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांनी आपल्या कार्यक्षेत्रानुसार उपक्रमांचे नियोजन करावे. प्रत्येक उपक्रमाचा उद्देश, अपेक्षित लाभार्थी, आवश्यक मनुष्यबळ, प्रसिद्धी-प्रसार आणि अंमलबजावणीचे वेळापत्रक याबाबत योग्य नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिल्या.

‘सेवा सेतू’च्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘इनोव्हेशन चॅलेंज’, युवक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, महिला व बालकल्याणाशी संबंधित उपक्रमांद्वारे जनसहभाग वाढविणे, तर ‘जल, जन आणि संकल्प यात्रा’च्या माध्यमातून जलसंवर्धन व लोकसहभागाचा संदेश देण्यावर भर देण्यात येणार आहे.

अभियानाच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी व्यापक प्रसिद्धी-प्रसार करण्याच्या दृष्टीनेही संबंधित विभागांनी नियोजन करावे. शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून देताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर विशेष प्रयत्न करावेत, असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.

‘सेवा परमोधर्म’ या संकल्पनेनुसार नागरिकांना अधिक गतिमान, पारदर्शक आणि प्रभावी सेवा देण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी यावेळी सांगितले.

***



Saturday, September 19, 2026

वृत्त क्रमांक 

नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण  22 सप्टेंबर रोजी जाहीर होणार

नांदेड(जिमाका), दि. 19: नांदेड तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या सन 2025 ते 2030 या कालावधीतील सरपंच पदाच्या आरक्षणाची अधिसूचना जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशान्वये प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्ग यासाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी नांदेड यांच्या दि. 11 सप्टेंबर 2026 रोजीच्या अधिसूचनेनुसार नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 17 सरपंच पदे, तर खुल्या प्रवर्गासाठी 37 सरपंच पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. यापैकी एकूण 28 सरपंच पदे महिलांसाठी राखीव असतील. नागरिकांचा मागास प्रवर्गातील 9 आणि खुल्या प्रवर्गातील 19 पदे महिलांसाठी राखीव राहतील.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या सरपंच पदांच्या आरक्षणात बदल होत नसल्याने, नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्ग यांचे आरक्षण निश्चित करण्याचे आदेश तहसीलदार, नांदेड यांना देण्यात आले होते. त्यानुसार ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गातील सरपंच पदांचे आरक्षण सोडत पद्धतीने मंगळवार, दि. 22 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय, नांदेड येथील मा. उपविभागीय अधिकारी, नांदेड यांच्या बैठक कक्षात (दुसरा मजला) निश्चित करण्यात येणार आहे.

हे आरक्षण सन 2025 ते 2030 या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी लागू राहणार आहे. या सोडतीसाठी सर्व संबंधित तसेच माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी निर्धारित दिनांक व वेळेस तहसील कार्यालय, नांदेड येथे उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार, नांदेड यांनी केले आहे.

***

वृत्त क्रमांक 

भरती परीक्षा सुधारणांवर उच्चस्तरीय समितीशी संवाद ! 

विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांनी उपस्थित राहावे

 

नांदेड, दि. 19 :- राज्यातील भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी गठित राज्य भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय समिती सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर विभागाच्या दौऱ्यावर येत आहे.

 

यावेळी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्था, कोचिंग सेंटर व हितसंबंधित घटकांशी संवाद होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते १.३० या वेळेत पत्रकार परिषद, तर दुपारी २.३० नंतर जिल्हास्तरीय उमेदवार व इतर भागधारकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्यात येणार आहे.

 

भरती परीक्षा पद्धतीबाबत अनुभव व सूचना मांडू इच्छिणाऱ्या संबंधितांनी या संवादात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

***

वृत्त  

गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा जागतिक पटलावर नेण्यासाठी दस्तऐवजीकरण करा

विभागीय आयुक्त जी‌ श्रीकांत यांचे आवाहन 

छत्रपती संभाजीनगर, दि. १९ :- महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची सांस्कृतिक समृद्धी व वैशिष्ट्ये जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी व्यापक डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यात येत आहे. नागरिक, गणेश मंडळे आणि संबंधित यंत्रणांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले.

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, युनेस्कोचा वारसा दर्जा व अन्य जागतिक मानांकने मिळविण्याच्या दृष्टीने ही मोहीम राबविण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील पुरातत्व संचालनालयामार्फत ‘बाप्पा डॉट ओआरजी’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून हे दस्तऐवजीकरण करण्यात येत आहे.

या संकेतस्थळावर घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवातील पूजा, सजावट, गणेशमूर्ती, खाद्यपरंपरा, लोककला, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम तसेच सांस्कृतिक वैशिष्ट्यांची छायाचित्रे व व्हिडिओ नागरिकांना अपलोड करता येणार आहेत. राज्यातील ३५ हून अधिक ऐतिहासिक शहरांसह देशभरातील गणेशोत्सवाशी संबंधित परंपरांची माहितीही संकलित केली जाणार आहे. सहभाग नोंदविणाऱ्या नागरिकांना ‘डिजिटल सांस्कृतिक संवर्धक’ प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

गणेशोत्सव काळातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन, सार्वजनिक सुरक्षा, महिला व बालसुरक्षा, सामाजिक सलोखा, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, रक्तदान व व्यसनमुक्ती यांसारख्या समाजोपयोगी उपक्रमांचेही दस्तऐवजीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस यंत्रणेने समाजमाध्यमांतून या उपक्रमाचा प्रचार करावा तसेच वाहतूक नियंत्रण कक्ष, महत्त्वाची ठिकाणे आणि गणेश मंडळांजवळ ‘बाप्पा डॉट ओआरजी’चा क्यूआर कोड उपलब्ध करून द्यावा.

गणेश मंडळांनीही नागरिकांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी सकारात्मक संवाद, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक सहभाग यांचे छायाचित्रण व व्हिडिओ संकलित करून संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावेत. या उपक्रमासाठी ईफ्लॅग संस्थेचे तांत्रिक सहकार्य घेण्यात येत आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्हाधिकारी व महानगरपालिका प्रशासनाने नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करून उपक्रमाचा नियमित आढावा घ्यावा. महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची सुरक्षित, शिस्तबद्ध, सामाजिकदृष्ट्या सकारात्मक आणि सर्वसमावेशक प्रतिमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. माहिती व जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून गणेशोत्सवात शासकीय योजनांच्या व्यापक प्रचार - प्रसारासाठी 'लोकसंवाद' हा उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमास सर्व शासकीय विभागातील अधिकाऱ्यांनी सहयोग करून उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घ्यावा, असे आवाहनही विभागीय आयुक्तांनी केले आहे. 

**

सुधारित वृत्त क्रमांक 

पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे 

मराठवाड्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा 

चारा, पाणी व वीजपुरवठ्याच्या नियोजनाचे निर्देश

मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग तातडीने पूर्ण करावेत

लोकप्रतिनिधींच्या सूचनांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश

शेतकरी व नागरिकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये 

नांदेड (जिमाका), दि. 19 : मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले असून, पावसात खंड पडल्याने शेती पिकांवर परिणाम झाला आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई व मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील. पीक विम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळण्यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक व अचूकपणे तातडीने पूर्ण करावेत. या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज आयोजित बैठकीत दिले.

नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील आठही जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी ऊर्जा, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार रामराव वडकुते, खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, खासदार संजय जाधव, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार सर्वश्री. हेमंत पाटील, अमरनाथ राजूरकर, सईद खान, कैलास पाटील, बाबूराव कदम कोहळीकर, भिमराव केराम, राजेश पाटील, राजू नवघरे, प्रताप पाटील चिखलीकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी, कृषी आयुक्त सुरज मांढरे, उपायुक्त रिता मैत्रेवार, वरिष्ठ अधिकारी  बैठकीस उपस्थित होत्या. तर खासदार अशोकराव चव्हाण, खासदार अजित गोपछडे, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार बजरंग सोनवणे, खासदार डॉ. कल्याण काळे यांच्यासह विविध विधानसभा मतदार संघातील आमदार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.  

यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे  बैठकीत सहभागी झालेले नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपली मते मांडली. 

मराठवाड्यातील 76 तालुक्यांमध्ये कमी पाऊस व पावसातील खंडामुळे पीक नुकसान, चारा टंचाई तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात. शेतकरी अडचणीत असल्याने त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागावे, त्यांच्या अडचणी व म्हणणे समजून घ्यावे. शासन शेतकऱ्यांच्या सेवेसाठी असून, त्यांना आर्थिक पाठबळ देणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले.

जिल्ह्यात पिण्याचे पाणी, चारा तसेच अखंडित वीजपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे. संकटाच्या काळात शासन शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात 56 लाख शेतकऱ्यांना 40 हजार 385 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जमाफी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करावे. कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर झाली असून, उर्वरित शेतकऱ्यांच्या त्रुटींची पूर्तता होताच टप्प्याटप्प्याने कर्जमाफी देण्यात येईल. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध करून द्यावे तसेच कर्जमाफीची यादी संबंधित बँकांमध्ये प्रसिद्ध करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती व अफवा पसरविणाऱ्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. सॅटेलाईटच्या माध्यमातून विमा संरक्षणाबाबतची बाब तातडीने केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. चारा व पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे, असेही कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींनी पीक नुकसान, चारा व पाणीटंचाई, जलजीवन मिशन, जलसंधारण, अखंडित वीजपुरवठा तसेच इतर विविध विषयांबाबत मांडलेल्या सूचनांची नोंद घेऊन त्यावर प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाने करावी. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, प्रशासनातील सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश कृषी मंत्री भरणे यांनी दिले.

ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, राज्यात सध्या विजेचा तुटवडा नाही. त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात लोडशेडींग होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. 

बैठकीचे प्रास्ताविक कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी केले. यावेळी लातूर विभागाचे कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर विभागाचे कृषी सहसंचालक तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीची माहिती सादर केली.

बैठकीस नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जालना जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, बीडचे जिल्हाधिकारी , छत्रपती संभाजीनगरचे अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकिणे यांच्यासह सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

**















वृत्त क्रमांक 

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुयणी येथे केली पीक परिस्थितीची पाहणी

• शेतकऱ्यांनी चिंता करू नये; शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी
नांदेड (जिमाका), दि. 19 : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुयणी येथे पीक परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण आणि संभाव्य नुकसानाबाबत त्यांनी माहिती घेतली.
शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या आस्थेने ऐकून घेत, ‘शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करू नये. शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी असून, जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील,’ अशी ग्वाही श्री. भरणे यांनी दिली.
यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
***






Friday, September 18, 2026

वृत्त क्रमांक 

दुष्काळाची बनावट यादी सोशल मीडियावर व्हायरलबाबत प्रशासनाकडून खुलासा

कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये

नांदेड, दि. १९ : जिल्ह्यात दुष्काळग्रस्त गावांची यादी जाहीर झाल्याचा दावा करणारी बनावट यादी सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. ही यादी अधिकृत नसून शेतकरी व नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पिकांची व पर्जन्यमानाची वस्तुस्थिती तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुष्काळाबाबत शासनस्तरावरून अधिकृत निर्णय झाल्यानंतर संबंधित यादी व आदेश अधिकृत माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येतील.

त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित याद्यांवर विश्वास ठेवू नये तसेच त्या पुढे प्रसारित करू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

00000

 वृत्त 

भरती परीक्षा सुधारणांवर चर्चेसाठी उपस्थित राहण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

२१ सप्टेंबर रोजी उच्चस्तरीय समिती भेट देणार 

छत्रपती संभाजीनगर, दि. १८ :- राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी गठित उच्चस्तरीय समिती सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात भेटण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या भेटीसाठी विद्यार्थी, परीक्षार्थी व संबंधित घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, अभ्यासिका चालक-मालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच परीक्षा पद्धतीबाबत सूचना मांडू इच्छिणाऱ्या नागरिकांनी भेटसाठी उपस्थित राहून आपले अनुभव व सूचना समितीसमोर मांडाव्यात. यापूर्वी ई-मेलद्वारे सूचना व अभिप्राय सादर केलेल्या विद्यार्थी व संबंधित घटकांनीही बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी आवश्यक सुधारणा, तसेच परीक्षा प्रक्रियेतील अडचणी व त्यावरील उपाययोजनांबाबत याबाबत चर्चा होणार आहे. परीक्षा पद्धतीशी संबंधित विविध घटकांना प्रत्यक्ष चर्चेत सहभागी होऊन आपल्या सूचना मांडण्याची संधी मिळणार आहे.

भरती परीक्षा पद्धती अधिक सक्षम करण्यासाठी विद्यार्थी, परीक्षार्थी, क्लास चालक-मालक व संबंधित संस्थांनी या बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या सूचना मांडाव्यात, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.

---

 वृत्त 

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील पिकांच्या स्थितीची करणार प्रत्यक्ष पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

मुंबई, दि.१८ सप्टेंबर : राज्यातील काही भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतीपिकांवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती महसूल विभागातील विविध भागांना भेटी देऊन ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करणार असून, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. तसेच, या दौऱ्यादरम्यान दोन्ही महसूल विभागांतील पिकांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. या बैठकींना संबंधित पालकमंत्री, सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी तसेच संबंधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पावसाची स्थिती आणि त्याचा शेतीपिकांवर होत असलेल्या परिणामाचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ कार्यालयीन पातळीवरील अहवालातून जाणून न घेता मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि बळीराजाशी थेट संवाद साधावा, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या होत्या. त्यानुसार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा हा दौरा होत आहे.

या दौऱ्यात पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, पिकांची सद्यस्थिती, सुकलेल्या किंवा नुकसानग्रस्त पिकांची पाहणी तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींची प्रत्यक्ष माहिती घेतली जाणार आहे. यासोबतच स्थानिक प्रशासन, कृषी विभागाचे अधिकारी आणि संबंधित यंत्रणांकडूनही परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे.

“शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी केवळ कार्यालयातील अहवाल पुरेसे नाहीत; त्यांच्या बांधावर जाऊन, त्यांच्या पिकांची आणि परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे एकटे सोडले जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेतली असून, आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.या दौऱ्यात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, पिकांची सद्यस्थिती आणि स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेतल्या जातील. प्रत्यक्ष पाहणी आणि उपलब्ध वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे परिस्थितीचा अहवाल शासनाला सादर केला जाईल. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न केले जातील,” असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी जाणून घेऊन परिस्थितीनुसार तातडीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. 

१९ सप्टेंबर : नांदेडमध्ये आढावा बैठक; नांदेड–हिंगोली–वाशिममध्ये पिकांची पाहणी

दि.१९ सप्टेंबर रोजी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दौऱ्याची सुरुवात नांदेड येथून होणार आहे. सकाळी १० वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील पिकांच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीस पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी तसेच संबंधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता नांदेड जिल्ह्यातील पुयणी येथे पिकांची पाहणी करण्यात येणार आहे. पुढे हिंगोली जिल्ह्यातील बोराला व हिवरा, तसेच वाशिम जिल्ह्यातील झोडगा, सुपखेला, वरुड बुद्रुक, कुपटा आणि खेरडा या गावांमध्ये प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांच्या परिस्थितीची पाहणी केली जाणार आहे. पावसाचे प्रमाण, पिकांची सद्यस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर सायंकाळी अकोला येथे मुक्काम करण्यात येणार आहे.

२० सप्टेंबर : अकोला येथे अमरावती विभागाचा आढावा

दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृहात अमरावती महसूल विभागातील पिकांच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीस पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी तसेच संबंधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विभागातील पिकांची सद्यस्थिती, पावसाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणींचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर दुपारी १२.०५ वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे आयोजित उद्घाटन व शिवार फेरी कार्यक्रमास कृषीमंत्री उपस्थित राहतील.

000

वृत्त क्रमांक 

सेवा संकल्प अभियानातून नांदेड जिल्ह्यात आरोग्य सेवांना गती

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान विशेष आरोग्य तपासणी, जनजागृती व सेवा उपक्रम

नांदेड (जिमाका), दि. १८ : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नांदेड जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. ग्रामीण व शहरी भागातील शेवटच्या घटकापर्यंत सुलभ, दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली.

या अभियानात ‘नागरिक प्रथम’ हा दृष्टिकोन ठेवून विविध आरोग्य तपासण्या, विशेष आरोग्य शिबिरे, उपचार व जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड वाटप

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत पात्र नागरिकांना कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचारासाठी ‘वय वंदना कार्ड’ प्राधान्याने वितरित करण्यात येणार आहेत.

ज्येष्ठ नागरिकांची विशेष आरोग्य तपासणी

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग तसेच मोतीबिंदू तपासणीवर विशेष भर देण्यात येणार आहे.

माता-बाल आरोग्य व अॅनिमिया निर्मूलनावर भर

तीव्र व मध्यम रक्ताक्षय असलेल्या गर्भवती महिलांसाठी विशेष मोहीम राबवून आवश्यक उपचारांसह FCM (Ferric Carboxy Maltose) इंजेक्शन देण्यात येणार आहे. स्तनपानाबाबत जनजागृती तसेच किशोरवयीन मुला-मुलींसाठी क्षमता बांधणी कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार आहेत.

३० वर्षांवरील नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणी

‘तिशीचा पल्ला—तपासणीचा सल्ला’ या उपक्रमांतर्गत ३० वर्षांवरील नागरिकांची मधुमेह व उच्च रक्तदाबासाठी घरोघरी तसेच आरोग्य केंद्रांवर तपासणी करण्यात येणार आहे.

दुर्धर आजारग्रस्त बालकांचा शोध

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (RBSK) बालकांमधील जन्मजात दोष व दुर्धर आजारांचा शोध घेऊन आवश्यक शस्त्रक्रिया व मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध

ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशावरील प्रतिविष उपचार, रेबीज प्रतिबंधक लस, हायड्रॉक्सीयुरिया तसेच मधुमेह व उच्च रक्तदाबावरील आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे.

याशिवाय रक्तदान शिबिरे, अवयवदान संकल्प, पोषण व अॅनिमिया जनजागृती, व्यसनमुक्ती, दिव्यांगजन सहयोग तसेच जन्म-मृत्यू नोंदणी व दाखले वितरण यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. क्षयरोग रुग्णांचा शोध घेऊन उपचार सुरू नसलेल्या रुग्णांची संख्या किमान ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्टही अभियानांतर्गत ठेवण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व दुर्बल घटकांनी आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आयुष्मान आरोग्य मंदिर किंवा ग्रामीण रुग्णालयात जाऊन अभियानांतर्गत उपलब्ध मोफत तपासणी व आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले आहे.

****

Thursday, September 17, 2026

वृत्त क्रमांक 

स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त नांदेडसाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री अतुल सावे

•‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ मोहिमेचा शुभारंभ; आगामी सण-उत्सव स्वच्छ वातावरणात साजरे करण्याचे आवाहन

नांदेड(जिमाका), दि. 17: नांदेड शहर हे मराठवाड्यातील महत्त्वाचे शहर असून, शहराला महाराष्ट्रातील आदर्श आणि सुंदर शहर बनविण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने आपल्या घरासोबतच परिसरही स्वच्छ ठेवावा, असे आवाहन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. 

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर व्हीआयपी रोडवरील शहीद जवान स्मारक परिसरात आयोजित विशेष कार्यक्रमात पालकमंत्री अतुल सावे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता करत व भिंतीवर पेंटींग करत ‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर, महापौर कविता मुळे, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार, उपमहापौर दीपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती वीरेंद्रसिंग गाडीवाले, सभागृह नेते महेश कनकदंडे, महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, संजय कौडगे, चैतन्यबापू देशमुख, किशोर स्वामी, विविध प्रभागांतील नगरसेवक, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी आगामी सण-उत्सवांचे स्वागत स्वच्छ आणि सुंदर नांदेडमध्ये करूया, असे आवाहन केले. स्वच्छतेची ही मोहीम केवळ एक दिवसापुरती मर्यादित न राहता ती लोकचळवळ बनावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नांदेड शहर स्वच्छ, सुंदर आणि पूर्णपणे कचरामुक्त करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनामार्फत ‘स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड’ ही व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सेवा संकल्प अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.

या मोहिमेंतर्गत शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत गल्ल्या, वस्त्या आणि चौकांची सखोल स्वच्छता करण्यात येणार आहे. शहर संपूर्णपणे कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. प्रमुख रस्ते आणि दुभाजकांची विशेष स्वच्छता, सार्वजनिक भिंतींची रंगरंगोटी, दुभाजकांवरील झाडांची छाटणी आणि परिसराचे सुशोभीकरण यावर भर देण्यात येणार आहे.

आगामी श्री गणेशोत्सव आणि दुर्गादेवी उत्सवाच्या काळात नांदेड शहरात भाविकांची मोठी गर्दी होते. हे लक्षात घेऊन सर्व प्रमुख धार्मिक स्थळे, मंदिर परिसर, विसर्जन मार्ग आणि उत्सव मार्गांवर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या ठिकाणी चोवीस तास स्वच्छता आणि कचरा संकलनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

स्वच्छ नांदेड – सुंदर नांदेड ही मोहीम यशस्वी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे, युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. शहरातील स्वच्छता कायम राखण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.

***










वृत्त क्रमांक 

जिल्‍हाधिकारी कार्यालयात केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी 

नांदेड (जिमाका), दि. 17 : जिल्‍हाधिकारी कार्यालयात केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करण्‍यात आली. प्रबोधनकारांच्‍या प्रतिमेस पुष्‍पमाला अर्पण करून अभिवादन करण्‍यात आले.

यावेळी रावसाहेब पोहरे,गजानन ऐनवाड,भास्‍कर गुंगे ,सुरेश पेदेवाड, संतोष गज्‍जेवार, बालासाहेब भराडे, अनिल पाटील अजय दुधकवडे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

***



 वृत्त क्रमांक 

पशुधन विमा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

विमा हप्त्याच्या 85 टक्के रकमेचा शासनाकडून भार; पशुपालकांनी योजनेचा लाभ घ्यावा

नांदेड (जिमाका), दि. 17 : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राज्यात ‘पशुधन विमा योजना’ राबविण्यास शासनाने मान्यता दिली असून, या योजनेसाठी शेतकरी-पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पशुधनाला आजार, अपघात, नैसर्गिक आपत्ती तसेच अन्य कारणांमुळे होणाऱ्या अनैसर्गिक मृत्यूपासून आर्थिक संरक्षण देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

दि. 25 ऑगस्ट 2026 रोजी पशुसंवर्धन विभागाने ‘ॲग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनी ऑफ इंडिया लि.’ सोबत सामंजस्य करार केला आहे. राज्यभर योजनेच्या अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रियेद्वारे एआयसीची निवड करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत विमा हप्त्याच्या 85 टक्के रकमेचा भार केंद्र व राज्य शासन अनुक्रमे 60:40 या प्रमाणात उचलणार आहे. लाभार्थी पशुपालकाला केवळ 15 टक्के हिस्सा भरावा लागणार आहे. विमा प्रीमियमचा दर एक वर्षासाठी 4.30 टक्के, दोन वर्षांसाठी 7.50 टक्के आणि तीन वर्षांसाठी 10.50 टक्के निश्चित करण्यात आला आहे.

70 हजार रुपये किमतीच्या संकरित गाईसाठी एक वर्षाचा एकूण विमा हप्ता 3 हजार 10 रुपये असून, त्यापैकी पशुपालकाचा 15 टक्के हिस्सा 451 रुपये 50 पैसे आहे. दोन वर्षांसाठी हा हिस्सा 787 रुपये 50 पैसे, तर तीन वर्षांसाठी 1 हजार 102 रुपये 50 पैसे राहील.

10 पशुधनापर्यंत अनुदानाचा लाभ

एका कुटुंबातील कमाल 10 पशुधनासाठी विमा योजनेच्या अनुदानाचा लाभ घेता येईल. दुभत्या गाईसाठी कमाल 70 हजार रुपये, दुभत्या म्हशीसाठी 80 हजार रुपये, बैलासाठी 70 हजार रुपये, रेड्यासाठी 80 हजार रुपये, तर शेळी व मेंढीसाठी प्रति जनावर कमाल 7 हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध आहे.

‘नो टॅग, नो क्लेम’ नियम

विम्यासाठी पशुधनाची ‘भारत पशुधन प्रणाली’ (NDLM) वर 12 अंकी कानातील बिल्ला (Ear Tag/UID) सह नोंदणी असणे बंधनकारक आहे. विमा कंपनीकडून UID सोबत RFID तंत्रज्ञानाचाही वापर केला जाऊ शकतो. योजनेत ‘नो टॅग, नो क्लेम’ या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे.

मृत्यूनंतर 15 दिवसांत थेट बँक खात्यात भरपाई

विमाधारक पशुधनाचा मृत्यू झाल्यास 24 तासांच्या आत विमा कंपनीला नोंदणीकृत संपर्क माध्यमातून माहिती देणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे व शवविच्छेदन अहवाल सादर केल्यानंतर पात्र विमा दाव्याची रक्कम 15 दिवसांच्या आत थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात (DBT) जमा केली जाणार आहे. मुदतीत पात्र विमा दाव्याची भरपाई न केल्यास विमा कंपनीला 12 टक्के दराने व्याज देणे बंधनकारक राहील.

राज्यात या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ (MLDB), नागपूर यांच्यामार्फत करण्यात येणार असून, राज्यस्तरावर पशुसंवर्धन आयुक्तांकडून योजनेचे सनियंत्रण केले जाणार आहे.

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजनेमुळे राज्यातील पशुपालकांना पशुधनाच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळणार आहे. सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाची ‘भारत पशुधन प्रणाली’वर नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. 

**




 वृत्त क्रमांक 

स्वाधार योजनेच्या नूतनीकरण अर्जांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

नांदेड (जिमाका), दि. 17: अनुसूचित जातीतील 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आणि समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा तसेच तालुकास्तरावर राबविण्यात येणाऱ्या या योजनेच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील नूतनीकरण अर्ज सादर करण्यासाठी आता बुधवार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महानगरपालिका क्षेत्रापासून पाच किलोमीटरच्या आत तसेच नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि तालुक्याच्या हद्दीतील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी नूतनीकरणासाठी HMAS संकेतस्थळावर आपला यूजर आयडी व पासवर्ड वापरून अर्ज सादर करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पूर्णपणे जोडणे आवश्यक आहे.

ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळल्या आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह त्या त्रुटींची पूर्तता करावी. अर्जाची सद्यस्थिती विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर वेळोवेळी तपासावी. मुदत संपल्यानंतर नूतनीकरणाचा अर्ज सादर करता येणार नसल्याने पात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत अर्ज पूर्ण करावा. अर्जासंदर्भातील सूचना विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तसेच ई-मेलवर पाठविण्यात आल्या आहेत. 

स्वाधार योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य मिळत असल्याने या मुदतवाढीचा पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रियेलाही मुदतवाढ

शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज सादर करण्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठीही तत्काळ अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

समाज कल्याण विभाग, नांदेडच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरही विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी आवश्यक माहिती आणि सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी Instagram व Facebook वरील samajkalyannanded हे अधिकृत पेज फॉलो करून योजनांबाबतची माहिती आणि अडचणींचे निराकरण करून घ्यावे.

विद्यार्थ्यांनी इतर अनधिकृत ग्रुप किंवा व्यक्तींशी संपर्क न साधता समाज कल्याण कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या अधिकृत व्हॉटसॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हावे. काही अडचण किंवा समस्या असल्यास समाज कल्याण कार्यालयातील संबंधित टेबलच्या कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 

हुतात्म्यांचे शौर्य आणि त्याग नव्या पिढीला दिशा देणारी ऊर्जा – नरेंद्र चव्हाण

बारड येथे ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम’ छायाचित्र प्रदर्शन, तिरंगा रॅली व सांस्कृतिक कार्यक्रम

नांदेड(जिमाका), दि. 17: हुतात्म्यांचे शौर्य आणि त्याग हा केवळ इतिहासाचा भाग नसून, नव्या पिढीला दिशा देणारी ऊर्जा आहे. मराठवाड्याला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नसून स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांच्या शौर्यामुळे व बलिदानामुळे 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला. त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन नव्या पिढीने देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे प्रतिपादन भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट प्रतिनिधी नरेंद्र चव्हाण यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुदखेड तालुक्यातील बारड येथे केंद्रीय संचार ब्यूरो आणि ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. बारड येथील हुतात्मा स्मारक परिसरात दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी नरेंद्र चव्हाण, माजी उपसरपंच बाळासाहेब देशमुख बारडकर, केंद्रीय संचार ब्यूरोचे प्रसिद्धी प्रमुख सुमित दोडल, ग्रामविकास अधिकारी सतीश लाठकर, सुनील देशमुख, प्रदीप भोसिकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आजच्या काळात तरुणांनी शिक्षण, तंत्रज्ञान आणि समाजसेवेच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे. भौतिक प्रगती मोठ्या प्रमाणात झाली असली तरी इतिहासातील शौर्य आणि त्यागापासून प्रेरणा घेऊन सामाजिक, आर्थिक आणि वैचारिक आव्हानांना सामोरे जाण्याचे धैर्य तरुणांनी दाखविले पाहिजे, असे नरेंद्र चव्हाण यांनी यावेळी म्हणाले. 

मराठवाडा मुक्तिसंग्रामात नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांनी सक्रिय सहभाग घेतला होता. येथील भूमिपुत्रांनी निजामाच्या रझाकारांविरुद्ध सशस्त्र लढा देत स्वातंत्र्याच्या लढ्यात मोलाचे योगदान दिले. या लढ्यात बारड गावाचीही महत्त्वपूर्ण भूमिका राहिली असून, बारड येथील 33 स्वातंत्र्यसैनिकांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी होत स्वातंत्र्यप्राप्तीसाठी योगदान दिले.

या विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या शूरवीरांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

मुक्तिसंग्रामाची देदीप्यमान गाथा, हुतात्म्यांचे बलिदान आणि स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचा सहभाग यांची माहिती देणारे विशेष ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम छायाचित्र प्रदर्शन’ हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी झालेल्या शूरवीरांची माहिती नागरिक आणि विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यांच्या शौर्याची आणि धाडसाची प्रेरणादायी गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात आली.

बारड येथील जिल्हा परिषद हायस्कूल आणि कन्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत रॅलीत सहभाग नोंदविला.

यावेळी शाहीर वाघमारे, शाहीर विनोद गोडबोले आणि शाहीर रमेश गिरी यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय संचार ब्यूरोचे सुमित दोडल यांनी केले. ग्रामविकास अधिकारी सतीश लाठकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालनाची जबाबदारी जोंधळे यांनी पार पाडली.

**






सुधारित वृत्त क्रमांक 

दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री अतुल सावे

पीक परिस्थिती, पर्जन्यमान, पाणीसाठा व वीजपुरवठ्याचा घेतला आढावा

आवश्यक मदतीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार

नांदेड(जिमाका), दि. 17: दुष्काळसदृश्य परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. 

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा पालकमंत्री अतुल सावे यांनी आढावा घेतला. यावेळी आमदार बाबूराव कदम कोहळीकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, महावितरणचे अधीक्षक अभियंता अजितकुमार खंदारे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे, विष्णुपुरीचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. बनसोड, उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती, पर्जन्यमान, पाणीसाठा आणि नियमित वीजपुरवठ्याचा सविस्तर आढावा घेतला. पावसाचा खंड तसेच पावसातील अनियमिततेचा सर्वाधिक परिणाम सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांवर झाला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, पिकांच्या संभाव्य नुकसानीची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी शासनाकडे वस्तुनिष्ठ माहिती सादर करण्यात येईल, असे पालकमंत्री सावे यांनी सांगितले.

दुष्काळसदृश्य परिस्थितीत संभाव्य उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेऊन सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे. नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक नियोजन व उपाययोजना आतापासूनच कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री अतुल सावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा तसेच आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता याचाही आढावा घेतला. पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत आवश्यक नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती, पर्जन्यमान, पाणीसाठा, पाणी आराखडा आणि नियमित वीजपुरवठा याबाबतची माहिती पालकमंत्र्यांना दिली. तसेच संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी चारा लागवड, केटीवेअर बंधारे आणि इतर आवश्यक उपाययोजनांचा आढावाही सादर केला.

जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित उपाययोजना आणि सद्यस्थितीची माहिती बैठकीत सादर केली. 

**







वृत्त क्रमांक   नांदेड जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’च्या  प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने नियोजन करावे  - जिल्हाधिकारी राहु...