Wednesday, September 16, 2026

वृत्त क्रमांक

भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी नागरिकांनी सूचना व अभिप्राय सादर करावेत

• परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय समितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन

• 18 सप्टेंबरपर्यंत सूचना सादर करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. 16 : राज्यातील भरती परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी शासनाने परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय समिती (Exam Reform Task Force) गठीत केली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य शाखेत (परीक्षा) विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत नांदेड जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांतील विद्यार्थी-उमेदवार, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित घटकांकडून परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी सूचना, हरकती व अभिप्राय मागविण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील इच्छुकांनी दि. 18 सप्टेंबर 2026 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत आपल्या सूचना व अभिप्राय सादर करावेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात प्रत्यक्ष भेट देऊन अथवा ई-मेलद्वारे सूचना पाठविता येतील.

ई-मेलद्वारे सूचना पाठविण्यासाठी csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in आणि nandedrdc33@gmail.com या ई-मेल पत्त्यांचा वापर करावा.

परीक्षा प्रणालीचा आढावा, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता व सुरक्षितता, प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून निकाल जाहीर करण्यापर्यंतची प्रक्रिया, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, गैरप्रकारांना प्रतिबंध, उत्तम कार्यपद्धती आणि परीक्षा केंद्रांसाठी आवश्यक मानके या विषयांवर सूचना व अभिप्राय सादर करता येतील.

तक्रार निवारण व समन्वयासाठी संपर्क

विशेष कक्षाचे प्रमुख निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड (मो. 9890282222) हे आहेत. सहायक कक्षप्रमुख तहसीलदार (सर्वसाधारण) (मो. 7719031102) यांच्यासह सहायक म्हणून गजानन ऐनवाड, सहायक महसूल अधिकारी (मो. 9604058042) आणि ए. के. हिवाळे, महसूल सहायक (मो. 7767860444) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील सर्व 16 तालुक्यांतील विद्यार्थी-उमेदवार, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित घटकांनी परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी आपल्या सूचना, हरकती आणि अभिप्राय विहित मुदतीत विशेष कक्षात अथवा वरील ई-मेल पत्त्यांवर सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

**

वृत्त 

सेवा संकल्प अभियानाची मराठवाडा विभागात सक्षमतेने अंमलबजावणी करा : विभागीय आयुक्त जी. श्रीकांत 

छत्रपती संभाजीनगर, दि. १६ (जिमाका) : सेवा संकल्प अभियानाची मराठवाडा विभागात सक्षमतेने, नियोजनबद्ध व काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी विभागातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज घेतलेल्या बैठकीनंतर विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून अभियानातील प्रत्येक उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

 उद्यापासून शासकीय निर्देशानुसार नियोजित प्रत्येक दिवसाच्या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी होईल आणि त्याचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचेल, याकडे सर्व अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

सेवा सेतू शिबिरे, विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ, स्वच्छता व श्रमदान, जनजागृती तसेच ‘सेवा माझे योगदान’सह अभियानांतर्गत नियोजित सर्व उपक्रमांमध्ये विभागातील आठही जिल्ह्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

00000

वृत्त 

तुमच्या सूचनेतून बदलणार भरती परीक्षेची दिशा

विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा क्लास चालक-मालक, शिक्षकांनी २१ सप्टेंबरच्या बैठकीत सहभागी व्हावे

सहआयुक्त मंजूषा मिसकर यांच्या सूचना ; आठही जिल्ह्यांतून अभिप्राय संकलनाला वेग

छत्रपती संभाजीनगर, दि. १६ :- भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणा अधिक परिणामकारक करण्यासाठी विद्यार्थ्यांसह स्पर्धा परीक्षा क्लास चालक-मालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था व संबंधित घटकांनी आपल्या सूचना व अनुभव मांडावेत. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात होणाऱ्या बैठकीत जास्तीत जास्त संबंधितांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहआयुक्त मंजूषा मिसकर यांनी केले.

याअनुषंगाने आज विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त मंजूषा मिसकर यांनी विभागातील आठही जिल्ह्यांतील टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीस विभागीय माहिती कार्यालयाचे माहिती उपसंचालक प्रवीण टाके उपस्थित होते. बैठकीत प्राप्त सूचना व अभिप्रायांचे वर्गीकरण, संबंधितांना भेटीसाठी वेळ देणे आणि २१ सप्टेंबरच्या बैठकीसाठी आवश्यक व्यवस्थेबाबत सूचना देण्यात आल्या.

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड व हिंगोली या आठ जिल्ह्यांतील विद्यार्थी, परीक्षार्थी, पालक, शिक्षक, स्पर्धा परीक्षा क्लास चालक-मालक, अभ्यासिका चालक व शैक्षणिक संस्थांनी भरती परीक्षेचा प्रत्यक्ष अनुभव लक्षात घेऊन ठोस सूचना द्याव्यात, असे मिसकर यांनी सांगितले.

१८ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आठही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांत विशेष कक्ष कार्यरत राहणार आहेत. नागरिकांना या कक्षात सूचना, शिफारशी, हरकती व निवेदने सादर करता येतील. प्रत्यक्ष उपस्थित राहता न येणाऱ्यांनी csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in (सीएसएन-एग्झाम रिफॉर्म्स टास्क फोर्स ॲट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन) या ई-मेलवर अभिप्राय पाठवावा.

प्राप्त ई-मेल व निवेदनांचे १७ सप्टेंबरपर्यंत वर्गीकरण करून १८ व १९ सप्टेंबर रोजी संबंधितांना भेटीसाठी वेळ देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन स्मार्ट सिटी कार्यालयात नोंदणी, टोकन, गटनिहाय प्रवेश, आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी, चहापान व सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्याच्या सूचनाही मिसकर यांनी दिल्या.

प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून निकालापर्यंतची प्रक्रिया, प्रश्नपत्रिकेची सुरक्षितता, परीक्षा केंद्र व्यवस्थापन, डिजिटल व बायोमेट्रिक प्रणाली, सीसीटीव्ही, मूल्यांकन, तक्रार निवारण तसेच पेपरफुटी व गैरप्रकारांना प्रतिबंध याबाबतही सूचना अपेक्षित आहेत.

भरती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि परीक्षा क्षेत्रातील जाणकारांचा प्रत्यक्ष अनुभव सुधारणा प्रक्रियेत महत्त्वाचा असल्याने २१ सप्टेंबर रोजी स्मार्ट सिटी कार्यालयात होणाऱ्या बैठकीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या सूचना मांडाव्यात, असे आवाहन सहआयुक्त मंजूषा मिसकर यांनी केले.

***




वृत्त क्रमांक

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन  

समस्याग्रस्त व पीडित महिलांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. १६ : शासन निर्णयानुसार दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सप्टेंबर महिन्यातील महिला लोकशाही दिन सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

हा महिला लोकशाही दिन महसूल प्रबोधिनी (प्रशिक्षण केंद्र), एसबीआय एटीएमच्या मागे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

या बैठकीस संबंधित समितीचे सदस्य तसेच शासन निर्णयात नमूद संबंधित विभागांचे अधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

समस्याग्रस्त व पीडित महिलांनी आपल्या तक्रारी, समस्या व निवेदने विहित नमुन्यात अर्जाद्वारे महिला लोकशाही दिनी सादर करावीत, असे आवाहन महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आणि सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

***

वृत्त क्रमांक

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा नांदेड दौरा

नांदेड (जिमाका), दि. 16 : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे दि. 16 व 17 सप्टेंबर 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

दि. 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता त्यांचे नांदेड येथे आगमन होऊन हॉटेल सुर्या प्राईड येथे राखीव व मुक्काम आहे.

दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता ते रामानाईक तांडा (हाडोळी ज.), ता. लोहा येथे रवाना होतील. सकाळी 8 वाजता रामानाईक तांडा येथे आगमन व राखीव कार्यक्रमानंतर सकाळी 11 वाजता नांदेडकडे प्रयाण करतील. दुपारी 12.05 वाजता हॉटेल सुर्या प्राईड येथे आगमन व राखीव सोयीनुसार शासकीय वाहनाने यवतमाळकडे प्रयाण करतील.

*****

वृत्त क्रमांक

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन

नांदेड (जिमाका), दि. 16 :- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार, दि. 17 सप्टेंबर 2026 रोजी  राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ होणार आहे. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे सकाळी 8.30 वा. हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण केले जाईल. यानंतर  सकाळी  9 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होईल. या समारंभास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.   

समारंभासाठी निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये.  या मुख्य शासकीय समारंभास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालये, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 9.30 नंतर आयोजित करावेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या परिपत्रकानुसार प्लास्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना व आदेश दिले आहेत.  

**

वृत्त   दुष्काळ, पाऊस, पीक नुकसान, पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याबाबत राज्य शासनाकडून केंद्रीय पथकाकडे सविस्तर सादरीकरण केंद्रीय पथकाकडून...