लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के प्रतिनिधीत्व मिळवून देणारे #नारीशक्तीवंदन हे विधेय संसदेच्या नवीन इमारतीत पारीत झालेले पहिले विधेयक ठरले हे ही वेशिष्टयपूर्ण आहे.
Monday, April 13, 2026
विशेष करून #नारीशक्तीवंदन विधेयकामुळे आधीपासून अनुसूचित जाती व जमातीतील महिलांसाठी राखीव असलेल्या जागा आता या आरक्षणाअंतर्गत येणार आहेत.
वृत्त क्रमांक
सामाजिक समता सप्ताह अंतर्गत
जेष्ठ नागरिक जनजागृती मेळावा व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
नांदेड, दि. 13 एप्रिल : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत 08 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत सामाजिक समता सप्ताह राबविल्या जात आहे. या समता सप्ताह अंतर्गत 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता संध्या छाया संचलित रुस्तुमजी मेवालाल वृद्धाश्रम मालेगाव रोड, नांदेड येथे जेष्ठ नागरिक जनजागृती मेळावा व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी.डी जोशी, पाटोदेकर हे होते. तर प्रमुख पाहुण्या म्हणून वृद्धाश्रमाच्या सचिव सुरेखा पाटणे ह्या होत्या. सदरील कार्यक्रमास समाज कल्याण विभागाचे विठ्ठल बोराटे, वरिष्ठ लिपीक कपिल जेटलावार, कनिष्ठ लिपीक, गजानन पंपटवार, तालुका समन्वय विजय माळवतकर, प्रमोद गायकवाड उपस्थित होते.
समाज कल्याण विभागाकडून मान्यवरांचा संविधान प्रास्ताविक उद्देशिका प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. सदरील ज्येष्ठ नागरिक आरोग्य शिबिरास स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुप्रिया गोडघासे तसेच त्वचारोग तज्ञ डॉ. अनिकेत जोशी आणि कान, नाक, घसा तज्ञ डॉ. अश्विन लव्हेकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका समन्वयक गजानन पांपटवार यांनी केले. यात ज्येष्ठ नागरिकांसाठी समाज कल्याण विभाग व शासनाच्या विविध विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती सांगण्यात आली. त्यानंतर वृद्धाश्रमाच्या सचिव सुरेखा पाटणे यांनी वृद्धांना दिलेल्या जाणाऱ्या सोयी सुविधा व त्यांच्या दिनचर्या बद्दल माहिती दिली.
त्यानंतर विठ्ठल बोराटे यांनी वृद्धांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप पी.डी.जोशी पाटोदेकर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप फटाले यांनी व आभार डॉ. सुप्रिया गोडघासे यांनी केले. कार्यक्रमानंतर लगेचच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वृद्धाश्रमातील वृद्धांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
आज 13 एप्रिल रोजी नांदेड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा परिसर, अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर, राजश्री शाहु महाराज पुतळा परिसर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले पुतळा परिसर, छ.शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळा परिसर, प्रमुख रसत्यावरील मस्जिद परिसर, बौद्ध विहार अशा ठिकाणी समतादुत दिलीप सोंडारे व समतादुत शेख ईर्शाद व कार्यालयातील कर्मचारी विठ्ठल बोराटे, वरीष्ट लिपिक, कपिल जेटलावार, कनिष्ठ लिपिक श्रीमती एस के काळे, रहिम शेख ता.समन्वयक गणेश माळवदकर, गजानन पांपटवार यांनी स्व्च्छता माहीमेत सहभाग नोंदविला. सदरील कार्यक्रम सहाय्यक आयुक्त शिवानंद मीनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
00000
वृत्त क्रमांक
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू :
मदत आणि उपचाराला मिळणार गती
आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार
मुंबई, दि. 13 एप्रिल : राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्यावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहे. या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन 8 तासांत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहेत. त्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही. त्यामुळे उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे. या प्रणालीचे येत्या काही दिवसातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षा कडून देण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षभरापासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामध्ये नावीन्य पूर्ण रुग्णस्नेही बदल करण्याचे काम सुरु आहे. त्याचाच एक भाग मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवी ऑनलाईन प्रणाली असणार आहे. रुग्णाने रुग्णालयात सर्व रीतसर कागदपत्रे दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन त्याचा अर्ज मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविणार आहे. त्या ठिकाणी नियमानुसार सर्व कागदपत्रे असल्यास अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन 8 तासांत पूर्ण होणार आहे. यामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकाला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच, गेल्या आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत राज्यातील तब्बल 40 हजार 776 रुग्णांना 333 कोटी 6 लाख 81 हजार 500 रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले की, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत आहे. यामुळे आता अर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद होऊन रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नवीन प्रणालीचे अधिकृत उद्घाटन लवकरच होणार असून, त्यानंतर राज्यभरात ती प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गरजू रूग्णांनी 1800 123 2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
****
विशेष वृत्त
शहरातील 273 अंगणवाड्यामध्ये बालके, गरोदर,स्तनदा माता, किशोरवयीन मुलींना पुरविल्या जातात विविध सेवा
नांदेड दि. 13 एप्रिल :-नांदेड शहर प्रकल्पांतर्गत एकूण 273 अंगणवाडी केंद्र शहरातील आर्थिक व सामाजिकदृष्टया मागासलेल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या अंगणवाडी केंद्रामार्फत 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालके, गरोदर माता, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींना एकूण 06 प्रकारच्या सेवा पुरविल्या जातात.
पुरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, अनौपचारिक पुर्व प्राथमिक शिक्षण, आरोग्य व आहार शिक्षण व संदर्भ सेवा. अंगणवाडी मार्फत 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना तसेच गरोदर , स्तनदा माता यांना टीएचआर THR (Take Home Ratio) दिल्या जाते. तसेच 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना HCM (Hot Cook Meal) गरम ताजा आहार दिल्या जातो.
लसीकरण या सेवेअंतर्गत 0 ते 6 वयोगटातील बालके व गरोदर मातांना आरोग्य विभागाच्या मदतीने प्रत्येक महिण्यात लसीकरण करण्यात येते. दर सहा महिण्याला राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत (RBSK) 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपाणी करण्यात येते. या तपासणीद्वारे अंगणवाडी कार्यक्षेत्रात असलेल्या कुपोषित बालकांची संख्या निश्चित होते. कुपोषित मुलांना NRC मध्ये दाखल करण्यात येते. तसेच अंगणवाडी मार्फत 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना पुर्व शालेय शिक्षण देण्यात येते. आजारी बालके, कुपोषित बालके, गरोदर माता यांना संदर्भ सेवा पुरविल्या जातात. तसेच अंगणवाड्या मधून 0 ते 6 वर्षे वयोगटाची बालके, स्तनदा माता, गरोदर माता, किशोरवयीन मुली यांच्यासाठी शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा मोफत देवून त्यांच्या विकासासाठी उपाययोजना राबविल्या जातात, अशी माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड यांनी दिली आहे.
000000
विशेष लेख
महिला आर्थिक विकास महामंडळ ; महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण आणि अंगीकृत उपक्रम असून, महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. २४ फेब्रुवारी १९७५ रोजी महिला सक्षमीकरणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या महामंडळाची स्थापना करण्यात आली. पुढे २० जानेवारी २००३ रोजी माविमला महिला विकासासाठी राज्यस्तरीय “शिखर संस्था” म्हणून मान्यता देण्यात आली. माविम केंद्र व राज्य शासनाच्या विविध महिला सक्षमीकरण योजनांची राज्यस्तरीय नोडल एजन्सी म्हणून अंमलबजावणी करते. तसेच शासन विभाग, वित्तीय संस्था, स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसहाय्य गट यांच्यात समन्वय साधून एक मजबूत दुवा म्हणून कार्य करते. माविमचे मुख्यालय मुंबई येथे असून, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये त्याची कार्यालये कार्यरत आहेत.
माविमचे ध्येय्य व उद्दिष्टे
माविमचे मुख्य ध्येय म्हणजे निरंतर विकास प्रक्रियेद्वारे महिलांसाठी सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय प्रस्थापित करणे, हे होय. तर महत्वाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे सांगता येतील.
• ग्रामीण महिलांचे संघटन करणे
• महिलांच्या क्षमता विकसित करणे
• आत्मविश्वास वाढविणे
• उद्योजकीय विकास घडविणे
• रोजगार व बाजारपेठ यांची सांगड घालणे
• शिक्षण, संपत्ती व सत्तेत महिलांचा सहभाग वाढविणे
• स्वयंसहाय्य बचत गटांना संस्थात्मक स्वरूप देऊन बळकट करणे
माविमची कार्यपद्धती लोकसहभाग, गरजेनुसार नियोजन, लवचिक धोरणे व प्रभावी व्यवस्थापन यावर आधारित आहे. गरीबातील गरीब घटकांपर्यंत पोहोचून त्यांना सक्षम बनविणे हा या संस्थेचा केंद्रबिंदू आहे.
कार्यक्षेत्र आणि प्रभाव
माविम आज राज्यातील ग्रामीण व शहरी भागात व्यापक पातळीवर कार्यरत आहे:
• कार्यक्षेत्र : ३५ जिल्हे व २५९ नागरी स्थानिक संस्था (ULBs)
• गावांची संख्या : १०,४९५
• स्वयंसहाय्य बचत गट (SHGs) : १,६८,३६१
• एकूण सदस्य संख्या : २०.७४ लाख
• गावस्तरीय संस्था : ८,८५१
• लोकसंचालित साधन केंद्रे (CMRC) : ३६१
• बँक कर्ज वितरण : ₹६५३९ कोटी
• कर्ज परतफेड दर : ९९.५%
• उद्योग/व्यवसायात गुंतलेल्या महिला : ८.७० लाख
संस्था बांधणी व बळकटीकरण
स्थानिक समुदायांच्या सक्षमीकरणासाठी बचत गट, ग्राम संस्था, CMRC, सूक्ष्म वित्त सेवा यांची उभारणी व बळकटीकरण, माविमंच्या सुक्ष्म उद्योग जाळ्याद्वारे केले जाते. एकमेकांना प्रेरणा देत, उभारी व सहाय्य देत हे उद्योग महिला करीत आहेत. त्यासाठी माविमं त्यांना वित्तीय पुरवठा, उत्पादन, विक्री इ.साठी लिंकेजेस पुरवते.
महिला सक्षमीकरण व सामाजिक समता
• कार्यात्मक साक्षरता
• लिंग समानता उपक्रम
• आरोग्य जागरूकता
• कायदेशीर साक्षरता
• राजकीय सहभाग, या नुसार उपक्रम राबवून चालना दिली जाते. त्याचा परिणाम महिलांच्या सक्षमीकरणावर दिसून आला आहे.
मायक्रो-फायनान्स सेवाः- बचत, कर्ज आणि विमा सुविधा उपलब्ध करून आर्थिक स्थैर्य निर्माण करणे व जोखीम कमी करणे, यासाठी महिलांना संघटीत करणे, त्यांच्या आर्थिक साक्षरता निर्माण करुन त्यांना बॅंक प्रणालीशी जोडणे इ. उपक्रम राबविले जातात. त्यात माविमची यंत्रणा सहाय्य करते.
उपजीविका व उद्योजकता विकासः- महिलांच्या कौशल्यांचा विकास करून त्यांना उत्पन्नाचे शाश्वत स्रोत उपलब्ध करून देणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे व बाजारपेठेची उपलब्धता निर्माण करणे. जीवनाशी निगडीत व जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना सहाय्य करण्यात येते.
माविमचे विविध उपक्रमः- माविम विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. त्याद्वारे विविध उपक्रम राबवून माविम समाजातील विविध घटकांतील महिलांना एकत्र आणण्यात यशस्वी झाली आहे.
• नव तेजस्विनी – महाराष्ट्र ग्रामीण महिला विकास प्रकल्प
• अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रम (MWEP)
• राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM)
• महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान (MSRLM)
• पाणी, स्वच्छता व आरोग्य (WASH)
• SPARK प्रकल्प (अपंगत्व समावेशक ग्रामीण परिवर्तन)
• स्मार्ट प्रकल्प
महिलांच्या जीवनात आमुलाग्र बदलः-
माविमच्या उपक्रमांमुळे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून आले आहेत:
• ७९ टक्के CMRC स्वयंपूर्णपणे कार्यरत
• महिलांना २ ते ३ शाश्वत उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध
• १,४८,२८१ महिलांचा मायक्रो लाईव्हलीहुड योजनांमध्ये सहभाग
• उत्पन्नात ₹५,००० ते ₹२०,००० पर्यंत वाढ
• बँकांकडून ₹४२९५ कोटी कर्ज उपलब्ध
• विविध योजनांतून ₹६३ कोटींचा लाभ
• महिलांचा निर्णय प्रक्रियेत व पंचायत राज संस्थांमध्ये वाढता सहभाग
• कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान वापरामुळे श्रम कमी
माविम हे केवळ एक महामंडळ नसून महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारे प्रभावी माध्यम आहे. स्वयंसहाय्य बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन, सामाजिक सक्षमीकरण आणि उद्योजकतेला चालना देत माविम महाराष्ट्रातील महिला विकासाचा मजबूत पाया उभारत आहे.
संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड
0000000
वृत्त क्रमांक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सामाजिक समता कार्यक्रम संपन्न
नांदेड, दि. 13 एप्रिल : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम” अंतर्गत 08 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
याच अनुषंगाने आज 13 एप्रिल 2026 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. विठ्ठल प्रभाकरराव मोरे हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सचिन सूर्यवंशी हे होते. कार्यक्रमास संस्थेतील कर्मचारी, प्रशिक्षणार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार, युगपुरुष, विद्वान कायदेतज्ञ, अर्थतज्ञ, समाजसुधारक आणि दूरदृष्टीचे नेते होते. त्यांच्या विचारांनी समाजाला समता, न्याय आणि बंधुतेचा मार्ग दाखविला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात विजतंत्री व्यवसायाचे शिल्पनिदेशक खडसे एस. जी. यांच्या गीताने झाली. प्रमुख व्याख्याते डॉ. मोरे यांनी अत्यंत प्रभावी व उद्बोधक मार्गदर्शन करताना डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीत डॉ. आंबेडकर यांचे योगदान अधोरेखित करत लोकशाही, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, समता व बंधुता या मूल्यांवर आधारित आधुनिक भारताचा पाया त्यांनी रचल्याचे सांगितले.
तसेच महिलांना शिक्षणाच्या संधी, सतीप्रथा निर्मूलन, मतदानाचा हक्क, कामगार कायदे, महिलांचे हक्क, आर्थिक समता आणि समान वेतन यासाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाली असून देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, यामागे डॉ. आंबेडकर यांचे अमूल्य योगदान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोतदार डी. ए. (रा. से. योजना) यांनी केले, तर आभार प्रदर्शन गटनिदेशक सोनटक्के एस. जी. यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
00000
वृत्त क्रमांक
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून समाजाने लेखणी हातात घेतली - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
• समाजात शांतता व सलोखा राखणे ही सर्वांची जबाबदारी
• जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न
नांदेड दि. 13 एप्रिल :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून समाजातील नागरिकांनी लेखणी हातात घेतली आहे. त्यामुळे शिक्षणातून समाजाची मोठी प्रगती झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांचे विचार समाजात गेले पाहिजे. त्यासाठी आपण निरंतर वाचन केले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या अनुषंगाने समाजात शांतता व सलोखा राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आज जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले, महापौर श्रीमती कविता मुळे, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्यासह जिल्हास्तरीय शांतता समितीचे विविध स्थायी- अस्थायी सदस्य, निमंत्रीत सदस्य, विविध धर्मगुरू, नागरिक, पत्रकार आदींची उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाने विविध चांगली व्यवस्था केली आहे. नांदेड जिल्हा हा चळवळीचा जिल्हा असून विविध सामाजिक कार्यक्रमात, प्रशासनात समाजाचा एकत्रीत सहभाग मोठा असतो. मोठ्या आवाजातील डिजे ऐवजी लेझीम सारखे उपक्रम हाती घेऊन तणाव कमी करुन आनंदात आपण जयंती उत्सव साजरे करू या, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात सीसीटीव्ही प्रणाली आवश्यक असून यासाठी प्रयत्न चालू आहेत. शांतता समितीच्या बैठकीत महिलांचा अधिक सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. नांदेड जिल्ह्यातील कायदा सुव्यस्थेबाबत बैठक काही दिवसात घेतली जाईल. यात विद्यार्थ्यांसह महाविद्यालयाचा सहभाग असेल. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जिल्ह्यात सर्व नागरिकांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शुभेच्छा दिल्या.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर समाजाने चालावे. यासाठी समता, बंधुत्व, एकोप्यातून जयंती आपण साजरी करू या. जयंती काळात युवकांवर योग्य जबाबदारी दिली पाहिजे. उन्हापासून नागरिकांची काळजी घेतली पाहिजे. यासाठी मनपाचे सर्व सहकार्य राहील, असे महापौर कविता मुळे यांनी सांगितले.
सर्वांच्या चांगल्या चर्चेतून योग्य नियोजन पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे. मिरवणूक मार्गात, परिसरात संपूर्ण व्यवस्था चांगली राहील. मार्गात कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता पोलीस विभागाकडून घेतली जाते. यासाठी पोलीस प्रशासन तत्पर असल्याचे पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्याची चांगली प्रतिमा कायम आहे. यासाठी आपल्या सर्वांचे योगदान मोलाचे आहे. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण उत्साहात साजरी करू या. यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ 112 या टोलफ्री नंबरवर संपर्क साधावा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त युवक-विद्यार्थ्यांसाठी 18 तास अभ्यासाचा उपक्रम पोलीस प्रशासनाच्यावतीने साजरा केला जाणार आहे. यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या विविध सूचनेसह नागरिकांना जयंती काळात कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता मनपाकडून घेतली जाईल, असे मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सांगितले. यावेळी बैठकीत विविध सदस्यांनी उपयुक्त सूचना दिल्या. मिरवणुकीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनेक नागरिक बाहेर पडतात. त्यांची सुरक्षा, आरोग्य, पाणी व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरा, स्वच्छता आदी विषयांबाबत सदस्यांनी मनोगत व्यक्त केले. विविध विभागांने करावयाच्या व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली.
निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रास्ताविकात बैठकी विषयी माहिती दिली तर सदस्य सचिव तथा अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांनी नांदेड जिल्ह्यात शांतता कायम राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने शांतता समितीची बैठक शांततेत पार पडली असून उपस्थित सर्व सदस्यांचे शेवटी त्यांनी आभार मानले.
00000
वृत्त क्रमांक
भोकर येथे बुधवारी पंडीत दीनदयाळ रोजगार मेळाव्याचे आयोजन
नांदेड दि. 13 एप्रिल :- नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व दिगांबरराव बिंदु महाविद्यालय, भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वा. दिगांबरराव बिंदु महाविद्यालय, भोकर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा/प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक, शाळा व महाविद्यालय तसेच इतर आस्थापनांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी बुधवार 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वा. दिगांबरराव बिंदु महाविद्यालय, भोकर येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. रा.म.कोल्हे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी कार्यालयाचा ई-मेल nandedrojgar०१@gmail.com वर किंवा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 वर संपर्क साधावा, असेही कळविले आहे.
00000
प्रासंगिक लेख / आंबेडकर जयंती / 14 एप्रिल 2026
बाबासाहेबांचे संविधान म्हणजे...एकसंघ भारताची पोलादी चौकट
14 एप्रिल हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील प्रेरणादायी पर्व आहे. या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महाराष्ट्र शासन तसेच देशातील विविध संस्थांकडून त्यांच्या कार्याचा गौरव करणारे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. 'विश्वरत्न', 'भारतरत्न', 'घटनाकार” आणि 'भारत भाग्यविधाता' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून विविधतेने नटलेल्या भारताला एकसंघ राष्ट्र म्हणून बांधून ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य केले.त्यामुळेच त्यांच्या जयंती दिनी संपूर्ण देशात त्यांना आदरांजली व्यक्त केली जाते. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतची जनता आजच्या दिवशी महामानवापुढे नतमस्तक होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले संविधान व त्यावर आधारित लोकशाही जोपर्यंत भारतात आहे, एकसंघ भारतासाठी कायद्याची पोलादी चौकट कायम आहे.त्यांना आदरांजली व्यक्त करताना संविधानाच्या स्वरुपात बाबासाहेबांनी दिलेल्या समानतेच्या,न्यायाच्या आणि बंधुतेच्या धाग्यात सर्व भारतीयांना गुंफण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे.
राष्ट्र प्रथम – बाबासाहेबांचा दृष्टिकोन
बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका स्पष्ट होती. संविधान सभेत बोलताना ते म्हणाले होते, “राष्ट्र प्रथम, समाज नंतर आणि व्यक्ती त्यानंतर.” स्वतः आयुष्यभर सामाजिक अन्याय सहन करूनही त्यांनी कधीही कोणाबद्दल सूडाची भावना बाळगली नाही. उलट, त्यांनी अशी राज्यघटना निर्माण केली ज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला समान न्याय मिळेल.
आचार्य प्र. के. अत्रे यांनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर लिहिलेल्या आपल्या आदरांजलीत आंबेडकरांना “जुलूमाविरुद्ध उगारलेली वज्राची मुठ” असे संबोधले आहे. ही उपमा त्यांच्या संघर्षशील वृत्तीचे आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्याचे अचूक चित्रण करते.
भारताच्या अखंडतेची शाश्वती
स्वातंत्र्यानंतर भारत एकसंघ राहील का याबाबत अनेक पाश्चिमात्य नेत्यांना शंका होती. विविध धर्म, भाषा, जाती यामुळे भारताचे विभाजन होईल, असे भाकीत केले जात होते. विस्टन चर्चिल यांसारख्या नेत्यांनी भारताच्या एकात्मतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.जगातील अनेक नेत्यांनी हा खंडप्राय देश एकत्र राहणार नाही,असे भाकीत केले होते.पाकिस्तानच्या फाळणीनंतर पश्चिम आशिया खंडात धर्माच्या नावावर झालेली अमानुष मानवी कत्तल जगाच्या पुढे होती. भारतातील विविधता, विविध धर्मांचे लोक,धर्मावरून झालेली विभागणी हे मोठे उदाहरण पुढे होते. त्यामुळे भारताचे भविष्य अंधकारमय वाटणे तत्कालीन परिस्थितीला धरून होते.मात्र बाबासाहेबांनी अभ्यासाअंती यावर रामबाण उपाय शोधून काढला. ते म्हणजे संविधान, आपली राज्यघटना. संविधान सभेपुढील भाषणात ते म्हणाले होते,स्वातंत्र्य आणि समानता ही मूल्ये बंधूतेशिवाय टिकू शकत नाही.राजकीय लोकशाही यशस्वी तेव्हाच होईल जेव्हा सामाजिक लोकशाही अस्तित्वात असेल.त्यामुळे आजचा दिवस सामाजिक लोकशाही बळकट करण्याचा देखील आहे.भारतीय संविधान सामाजिक आर्थिक, राजकीय,समानता देण्याच्या दृष्टीने अतिशय श्रेष्ठ दर्जाचे दस्तावैज आहे.
संविधानातील कलम;एकात्मतेचा कणा
आपण बघतो, भाषा, प्रांत,जाती,अस्मिता यावरून देशात आजही अनेक आंदोलने सुरू असतात, विविध संघटना आणि राजकीय पक्ष आपापल्या भूमिका मांडत असतात.संविधानाचे वैशिष्ट्य म्हणजे संविधान भाषा,प्रांत,जाती,अस्मिता यांचे अस्तित्व मान्य करते.मात्र सोबतच राष्ट्रापुढे सर्व बाबी गौण ठरवते.विधिमंडळ,कार्यपालिका, न्यायपालिका,माध्यमे अशा सर्व स्तंभांना त्यांनी परस्पर पूरक उभे केले आहे.त्यामुळे भारतीय राज्यघटनेला पुढे ठेवूनच सर्व घटकांना आपली वाटचाल करावी लागते.“भारतीय संसद, न्यायपालिका आणि कार्यपालिका या एकमेकांवर नियंत्रण व संतुलन (checks and balances) ठेवतात. कार्यपालिका राज्यघटनेनुसार प्रशासन करते, आणि या सर्वांवर माध्यमे व जनतेचे लक्ष राहते. जबाबदारीची,कार्यवाहनाची,जाणिवांची आणि दायित्वाची अशी मजबूत पोलादी साखळी घटनेच्या माध्यमातून निर्माण झाली आहे.त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहेत भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार. या मूलभूत अधिकारांनी स्पष्ट बजावले आहे की या मूलभूत अधिकारांनी स्पष्ट केले, ‘हा देश हा अस्मितेवर नव्हे,भावनेवर नव्हे तर सर्वसंमतीवर चालेल.’
शोषित,वंचित,गरीब मागास सर्व घटकांना समतोल विकासाची संधी मिळणे व त्यांच्या न्याय्य हक्काचे रक्षण होणे किती आवश्यक आहे हे बाबासाहेबांना माहिती होते. त्यामुळेच त्यांनी घटनेमध्ये मूलभूत अधिकार सुस्पष्टपणे अंतर्भूत केले.या अधिकारामुळे कायद्यापुढे सर्व समान आणि सर्वांना कायद्याचे संरक्षण मिळाले आहे.
समानतेचा अधिकार (कलम 14 ते 18)
बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत अधिकारांमध्ये 14 ते 18 या कलमांमध्ये सर्व नागरिक कायद्यापुढे समान असतील,
जात, धर्म, वंश,लिंग किंवा जन्मस्थानावरून भेदभावास मनाई,अस्पृश्यता अमान्य,आणि नियुक्तीची समान संधी,तसेच देशाप्रतीची बांधीलकी या बाबी नमूद केल्या. एका सामान्य स्त्री-पुरुषाला देशाचा प्रधानमंत्री, राष्ट्रपती बनण्याचा अधिकार देतानाच भेदभावाला त्यांनी या समानतेच्या अधिकाराने कायदेशीर बंधन घातले आहे.
स्वातंत्र्याचा अधिकार (कलम 19 ते 22)
ज्यांना हजारो वर्ष शिक्षण, वाणी, अधिकार आणि सहभागांपासून जाती धर्माच्या आधारावर संधी नाकारली गेली. त्या सर्वांना स्वतंत्र भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्याचे कार्य बाबासाहेबांमुळे झाले. राज्यघटनेतील कलम 19 प्रत्येक भारतीयाला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देते.भारताचा नागरिक कोणत्याही राज्यामध्ये मुक्त संचार करू शकतो. भारताच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा अधिकार त्याला मिळालेला आहे.जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण,शिक्षणाचा हक्क,न्यायालयात दाद मागण्याचा हक्क,विनाकारण स्थानबद्ध न करण्याचा हक्क अशा अनेक मूलभूत हक्कांची तरतूद करण्यात आली आहे.
शोषणाविरुद्ध संरक्षण (कलम 23-24)
हजारो वर्षाची वेठबिगारी, सालदारी, बिनपगारी शोषणाला बळी पडलेल्या शोषितांना थेट घटनेच्या माध्यमातूनच बाबासाहेबांनी न्याय दिला. भारतीय राज्यघटनेच्या कलम 23 आणि 24 मध्ये शोषणाविरुद्ध संरक्षण दिले आहे.या कायद्यामुळे स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात माणसांना गुलाम ठेवणे, वेठबिगारी सारखे काम करुन घेणे, बिनपगारी सालदारी करणे, सक्तीने सेवा करायला सांगणे, धर्म, वंश, जात यावरुन काम करुन घेणे, बळजबरीची मजुरी करुन घेणे, 14 वर्षाखालील कोणत्याही बालकाकडून काम करुन घेणे, अर्थात बालमजुरीवर बंदी घालण्यात आली.ही फार मोठी क्रांती होती आणि याचा कायदा बनल्यामुळे हजारो सालाच्या गुलामगिरीतून मागासवर्गीयांची, शोषितांची मुक्तता झाली.
धर्मस्वातंत्र्य (कलम 25 ते 28)
धार्मिक चालीरीती व रुढीपरंपरांच्या नावावर शतकानुशतके चाललेल्या शोषणाला घटना लागू झाल्यानंतर कायद्याच्या चौकटीने कायमचा पायबंद बसला. सोबतच सर्वांना आपापला धर्म पाळण्याची मुभा देण्यात आली. मात्र सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्याला घातक नसेल अशा वर्तनाची हमी कायद्याने घेण्यात आली. प्रत्येक धर्माला धार्मिक विधी, धार्मिक व्यवहाराची व्यवस्था, सांस्कृतिक शैक्षणिक हक्क प्रदान करण्यात आले.धार्मिक शिक्षण, धार्मिक उपासनेचे स्वातंत्र्य मिळाले. भारतातील विविध जातीधर्मांच्या लोकांना राज्यघटनेने हे स्वातंत्र्य सार्वजनिक सुव्यवस्थेच्या अधीन राहून पाळण्याचे अधिकार या कलमाने दिले. भारतीय समाजावर असणारा धर्माचा,धार्मिक चालीरीतींचा पगडा, याचा अभ्यास करून बाबासाहेबांनी मूलभूत हक्कांमध्ये हे स्वातंत्र्य बहाल केले आहे. यासोबतच त्यांनी कलम 29,30 अन्वये अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार आपली भाषा व संस्कृती जपण्याचा अधिकार दिला आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतातला कोणताही नागरिक त्याच्यावरील अन्यायासाठी कलम 32 अन्वये हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.
सर्वांसाठी न्याय – व्यापक दृष्टी
बाबासाहेब स्वतः वंचित समाजातून आले होते, पण त्यांनी फक्त मागासवर्गीयांसाठी नव्हे तर सर्व समाजासाठी न्याय व्यवस्था उभी केली.
अनुसूचित जाती-जमातींसाठी आरक्षण, समान संधी,सामाजिक न्यायासाठी कायदेशीर संरक्षण त्यांनी दिले. सोबतच कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली.
संविधान सभेला दिलेले तीन इशारे
संविधान सभेच्या निर्मितीत अनेक महान नेत्यांचे, मान्यवरांचा हातभार होता. मात्र तरीही बाबासाहेबांनाच घटनेचे शिल्पकार संबोधले जाते. कारण, त्यांनी घटनेच्या अंमलबजावणीची दिशा आणि सूत्रे स्पष्टपणे अधोरेखित केली.त्यांची संविधान सभेतील भाषणेही तेवढी बोलकी आहेत. भारतीय संविधान सामाजिक, आर्थिक, राजकीय, समानता देण्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम अशी घटना आहे मात्र या घटनेचा वापर कोण करणार ? कसा करणार ? आणि किती प्रामाणिकपणे करणार ? यावरच घटनेच्या अंमलबजावणीचे फलित अवलंबून असेल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी घटना निर्माण करणाऱ्या संविधान सभेपुढे बोलताना तीन महत्त्वाचे इशारे दिले होते...
ते म्हणाले होते,देशातील सामाजिक असमानता दूर होणे आवश्यक आहे.आम्ही सर्वप्रथम भारतीय होणे आवश्यक आहे.त्यांनी परस्पर बंधुतेवर भर दिला.बंधुता म्हणजे राष्ट्रातील सर्व लोकांमध्ये बंधूभाव आणि एकतेची भावना निर्माण करणे होय.
त्यांनी दुसरा इशारा दिला होता आर्थिक विषमतेचा. देशातील सर्व नागरिकांचा समतोल आर्थिक विकास होणे आवश्यक आहे, कारण आर्थिक विषमता श्रीमंत-गरीब दरी वाढवते. ही दरी वाढली तर असंतोष वाढेल.
त्यांचा तिसरा इशारा होता.सांप्रदायिकता वाढायला नको. सांप्रदायिकता म्हणजे विशिष्ट धर्माला अधिक महत्त्व देणे. भारत हा विविध धर्मांचा देश आहे.कोणत्याही धर्माचा द्वेष, वाढायला नको. धर्माधारित द्वेष राष्ट्राच्या एकात्मतेला तडा देईल. हे इशारे आजही तितकेच महत्त्वाचे आहेत.
घटना निर्मिती – राष्ट्रनिर्मितीचा पाया
भारतीय राज्यघटना ही केवळ कायद्यांचा संच नाही, तर त्यात राष्ट्रनिर्मितीचा स्वयंस्पष्ट आराखडा आहे. बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून संघराज्य व्यवस्था मजबूत केली केंद्र आणि राज्य यांच्यात संतुलन ठेवले. न्यायव्यवस्थेला स्वातंत्र्य दिले.यामुळे भारत एक अखंड आणि सक्षम राष्ट्र बनला.
संविधान टिकले तर लोकशाही टिकेल
महामानवाला अभिवादन करताना प्रत्येक भारतीयाने ही शपथ घेणे गरजेचे आहे की, संविधान टिकले तर लोकशाही टिकेल. आणि राजकीय लोकशाही तेव्हाच टिकेल जेव्हा सामाजिक लोकशाही अस्तित्वात असेल. आपण संविधानाच्या अमृत महोत्सवी काळात आहोत.
या पार्श्वभूमीवर प्रत्येक भारतीयाने संविधान समजून घेणे आवश्यक आहे.संविधानाचे पालन करणे आवश्यक आहे.आपल्या अधिकारांसोबत भारताचा नागरिक म्हणून आपली कर्तव्येही ओळखणे आवश्यक आहे.
बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून एकसंघ, न्याय्य आणि प्रगत भारत उभा केला. जगाला वाटत होते की भारत टिकणार नाही, पण आज भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे,जगातील महाशक्ती म्हणून उदयास येत आहे. हे त्यांच्या दूरदृष्टीचे फलित आहे.
14 एप्रिलच्या त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्यापुढे नतमस्तक होताना... चला भारतीय म्हणून आपण एकच संकल्प करुया...संविधानाचा सन्मान करुया, समानतेचे,बंधुत्वाचे मूल्य जपूया सर्वप्रथम एक भारतीय बनूया आणि एकसंघ भारत अधिक मजबूत करुया... हीच महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल.
प्रवीण टाके
उपसंचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर
9702858777.
0000000
वृत्त क्रमांक
नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंश : महाराष्ट्राचा अभिमान
डॉ. पंडित नांदेडकर यांना राष्ट्रीय स्तरावर तृतीय पारितोषिक
नांदेड, दि. 13 एप्रिल : नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंशाच्या संवर्धन व संशोधनाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत असून, या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तज्ज्ञांचा गौरव करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा नुकताच NBAGR मार्फत आयोजित SOCDAB-2026 परिषदेत स्मृतिचिन्ह देऊन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत पशुवैद्यक व पशु विज्ञान महाविद्यालय, परभणी येथील पशु अनुवंश व पैदास विभागाचे प्राध्यापक डॉ. पंडित नांदेडकर यांना दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी करनाल येथील ICAR-राष्ट्रीय प्राणी आनुवंशिक संसाधन ब्युरो येथे आयोजित राष्ट्रीय परिषद व पाळीव पशु संवर्धन सोसायटीच्या XXIII व्या वार्षिक अधिवेशनात ‘मथुरा लभान गोवंश - महाराष्ट्राचा अभिमान’ या विषयावरील मौखिक सादरीकरणासाठी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या यशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी डॉ. पंडित नांदेडकर यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे, डॉ. प्रवीणकुमार घुले, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. मकरंद खरवडकर, डॉ. श्याम पवळे तसेच मथुरा-लभान पशुपालक उपस्थित होते.
यावेळी डॉ. सखाराम खुणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ‘मथुरा-लभान’ गोवंशास राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाची माहिती सादर केली. तसेच किनवट तालुक्यात सुरू असलेल्या कार्याचा आढावाही मांडण्यात आला.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मथुरा-लभान पशुपालक बालसिंग नानगू खचकड, रा. नागसवाडी, ता. किनवट यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या पशुसंवर्धन कार्याचे कौतुक केले तसेच मथुरा-लभान गोवंशाच्या संशोधन व संवर्धनासाठी शुभेच्छा दिल्या.
०००००
विशेष वृत्त
संकटात महिलांना सावरणारं ‘सखी वन स्टॉप सेंटर’ पीडित व गरजू महिलांना देत आहे आधार; तात्पुरत्या निवाऱ्याचीही सुविधा
नांदेड, दि. 13 एप्रिल : केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय तसेच महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, नांदेड अंतर्गत चालविण्यात येणारे सखी वन स्टॉप सेंटर हे संकटग्रस्त महिलांसाठी एक सुरक्षित व आधारदायी केंद्र ठरत आहे.
महिलांवरील कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये पीडित महिलांना एकाच छताखाली सर्व प्रकारची मदत मिळावी, या उद्देशाने केंद्र शासनाने या केंद्राची स्थापना केली आहे. या केंद्रामार्फत महिलांना कायदेविषयक मदत, वैद्यकीय सेवा, मानसिक, सामाजिक व कौटुंबिक समुपदेशन तसेच तात्पुरता निवारा अशा सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेले हे केंद्र महिला व बालविकास भवन, महात्मा फुले मार्केट शेजारी, गणेश नगर रोड, नांदेड येथे २४ तास सुरू असून, अनेक पीडित व गरजू महिलांना याचा लाभ मिळत आहे. या केंद्राच्या माध्यमातून महिलांना संकटातून सावरण्यासाठी आणि आत्मविश्वासाने उभे राहण्यासाठी प्रभावी मदत मिळत आहे.
सखी वन स्टॉप सेंटर मध्ये शारीरिक, मानसिक, लैंगिक किंवा आर्थिक अत्याचार ग्रस्त महिलांना मदत मिळू शकते. याशिवाय कौटुंबिक हिंसाचार, मानवी तस्करी, बलात्कार, लैंगिक शोषण यांसारख्या गंभीर घटनांतील पीडित महिलांना तातडीने आवश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे महिलांना निर्भयपणे परिस्थितीचा सामना करण्यास मदत होते.
तसेच, १८१ महिला हेल्पलाईन ही सेवा देखील या केंद्रामार्फत २४ तास कार्यरत आहे. कोणत्याही संकटात असलेल्या महिलांनी किंवा अशा प्रकारची घटना आढळल्यास नागरिकांनी त्वरित १८१ या क्रमांकावर संपर्क साधून मदत मागावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000
छेडछाडीविरोधात महिलांना आता मिळणार अधिक सक्षम संरक्षण! ‘शी-बॉक्स’ पोर्टलमुळे कामाच्या ठिकाणासह सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीच्या तक्रारी...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
वृत्त क्रमांक 975 हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जनक्रांती व हुतात्मा संतराम कांगठीकर वाचनालयात भव्य ग्रंथप्रदर्शन नांदेड, दि. 17 सप्...
