Thursday, February 2, 2023

वृत्त क्रमांक 54

 महात्मा गांधी व्यसनमुक्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला, उपचार, पुनवर्सन योजनेंतर्गत व्यसनमुक्ती क्षेत्रात बहुमुल्य काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना अनुदान देण्याबाबतची योजना सुरु करण्यात आली आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रात बहुमुल्य काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी त्यांचा प्रस्ताव व आवश्यक कागदपत्रे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयात शुक्रवार 10 फेब्रुवारी 2023  रोजी सायं. 5 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 10 मार्च 2017 रोजीचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थ्‍ळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.  या योजनेकरिता नांदेड जिल्हयातील इच्छुक संस्थांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले.  

00000

वृत्त क्रमांक 53

 अन्यथा त्या कृषि योजनांच्या लाभाधारकांऐवजी

प्रतिक्षा यादीतील इतर शेतकऱ्यांना देऊ लाभ 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना आणि बिरसामुंडा कृषिक्रांती योजनेसाठी जिल्हा परिषदेचे आवाहन    

नांदेड (जिमाका) दि. 2 :- आदिवासी शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात येता यावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना आणि बिरसामुंडा कृषिक्रांती योजना (क्षेत्राबाहेरील व क्षेत्रांतर्गत) कार्यरत आहेत. यात असंख्य शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेऊन प्रगती साध्य केली आहे. सन 2021-22 मधील महाडीबीटी पार्टलद्वारे जिल्ह्यातील एकुण 999 लाभार्थ्यांची निवड झाली आहे. तथापि त्यांना पोर्टलवर अर्जातील त्रुटींची पुर्तता पोर्टलवर करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. या सुचना देऊनही अनेकांनी आपली पूर्तता केली नाही. 

ही बाब विचारात घेऊन ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन त्रुटी भरण्यासाठी अडचण येत असेल त्यांच्यासाठी त्या-त्या भागातील कृषि अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषि) यांच्याशी संपर्क साधून आपले त्रुटी येत्या 8 दिवसात पुर्तता करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विकास विभागाकडून करण्यात आले आहे. जे निवड झालेले लाभार्थी आपल्या त्रुटीची पूर्तता आठ दिवसात करणार नाहीत, असे निवड झालेले लाभार्थी इच्छूक नाहीत असे समजून त्यांची निवड रद्द केली जाईल व प्रतिक्षा यादीतील इतर शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल, असेही जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

000000

वृत्त क्रमांक 52

 ते धनादेश हस्तांतरीत करतांना

कोर्ट जेंव्हा हळवे होते 

·  प्रमुख सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या हस्ते

त्या व्यक्तींच्या कुटुंबियांना धनादेश सुपूर्द    

नांदेड (जिमाका) दि. 2 :- कोविड-19 मुळे महामारीच्या काळात अनेकांनी आपले जीव पणाला लावत कर्तव्यात कसूर होऊ दिली नाही. यात न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाही अधिक काटेकोर कर्तव्याचे पालन करावे लागले. यातील अनेकांना टाळेबंदीच्या काळात इतरांप्रमाणे कोविडच्या आजारातून जावे लागले तर काहींना आपला जीव यात गमवावा लागला. नांदेड येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालत कार्यरत असलेले सहाय्यक अधिक्षक प्रल्हाद सोनटक्के व लघुलेखक सतीशकुमार कानेगांवकर यांना कोविडमुळे आपला जीव गमवावा लागला. 

टाळेबंदीच्या काळात अशा कर्तव्यतत्पर असलेल्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता म्हणून शासनाने त्यांच्या वारस कुटूंबियांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपये एवढे सानुग्रह अनुदान मंजूर केले. जिल्हा न्यायालयात आज कोविड मुळे जीव गमावलेल्या या दोन व्यक्तींच्या कुटुंबियांना हे मंजूर सानुग्रह अनुदानाचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. अत्यंत हळव्या अशा या छोटेखानी कार्यक्रमात सर्वांच्या पापण्या ओलावल्या. नांदेड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या हस्ते श्रीमती रेखा प्रल्हाद सोनटक्के आणि श्रीमती कल्पना सतीशकुमार कानेगांवकर यांना हे धनादेश सन्मानपूर्वक देण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. 

यावेळी जिल्हा न्यायाधीश-1 शशिकांत ए. बांगर, वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश श्रीमती अर्चना प्र. मांडवगडे आणि मुख्य न्याय दंडाधिकारी श्रीमती किर्ती प्र. जैन (देसरडा) यांची उपस्थिती होती. शासनाकडे सामुग्रह अनुदान मिळविण्यासाठी सतत पाठपुरवठा करून सामुग्रह अनुदानाची रक्कम मयत न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळवून देण्यासाठी जिल्हा न्यायालय, नांदेड आणि मुख्य न्यायदंडाधिकारी नांदेड येथील कर्मचाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले.

00000    




  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...