Thursday, February 2, 2023

वृत्त क्रमांक 52

 ते धनादेश हस्तांतरीत करतांना

कोर्ट जेंव्हा हळवे होते 

·  प्रमुख सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या हस्ते

त्या व्यक्तींच्या कुटुंबियांना धनादेश सुपूर्द    

नांदेड (जिमाका) दि. 2 :- कोविड-19 मुळे महामारीच्या काळात अनेकांनी आपले जीव पणाला लावत कर्तव्यात कसूर होऊ दिली नाही. यात न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाही अधिक काटेकोर कर्तव्याचे पालन करावे लागले. यातील अनेकांना टाळेबंदीच्या काळात इतरांप्रमाणे कोविडच्या आजारातून जावे लागले तर काहींना आपला जीव यात गमवावा लागला. नांदेड येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालत कार्यरत असलेले सहाय्यक अधिक्षक प्रल्हाद सोनटक्के व लघुलेखक सतीशकुमार कानेगांवकर यांना कोविडमुळे आपला जीव गमवावा लागला. 

टाळेबंदीच्या काळात अशा कर्तव्यतत्पर असलेल्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता म्हणून शासनाने त्यांच्या वारस कुटूंबियांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपये एवढे सानुग्रह अनुदान मंजूर केले. जिल्हा न्यायालयात आज कोविड मुळे जीव गमावलेल्या या दोन व्यक्तींच्या कुटुंबियांना हे मंजूर सानुग्रह अनुदानाचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. अत्यंत हळव्या अशा या छोटेखानी कार्यक्रमात सर्वांच्या पापण्या ओलावल्या. नांदेड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या हस्ते श्रीमती रेखा प्रल्हाद सोनटक्के आणि श्रीमती कल्पना सतीशकुमार कानेगांवकर यांना हे धनादेश सन्मानपूर्वक देण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. 

यावेळी जिल्हा न्यायाधीश-1 शशिकांत ए. बांगर, वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश श्रीमती अर्चना प्र. मांडवगडे आणि मुख्य न्याय दंडाधिकारी श्रीमती किर्ती प्र. जैन (देसरडा) यांची उपस्थिती होती. शासनाकडे सामुग्रह अनुदान मिळविण्यासाठी सतत पाठपुरवठा करून सामुग्रह अनुदानाची रक्कम मयत न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळवून देण्यासाठी जिल्हा न्यायालय, नांदेड आणि मुख्य न्यायदंडाधिकारी नांदेड येथील कर्मचाऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले.

00000    




No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...