वृत्त क्र. 730
युवकांनी कौशल्यावर आधारित उद्योजकतेच्या
संधीचा लाभ घ्यावा : कुलगुरू डॉ. मनोहर चासकर
· जागतिक युवक कौशल्य दिन उत्साहात साजरा
· युवा उद्योजकांनी दिले यशस्वीतेचे प्रेरणादायी मार्गदर्शन
नांदेड दि. 15 जुलै :- युवकांनी स्वतःवर विश्वास ठेवत नवकल्पना आणि कौशल्यावर आधारित उद्योजकतेच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले.
जागतिक युवक कौशल्य दिन-2025 जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात आज साजरा करण्यात आला. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. चासकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले होते.
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे विचार मांडले. त्यांनी कौशल्य हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नाही तर नव्या संधी निर्माण करण्याचे माध्यम असल्याचे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपस्थित युवकांना कौशल्याचे महत्त्व समजावून सांगून रोजगाराच्या नव्या संधी शोधण्यासाठी प्रेरित केले.
यावेळी विविध शासकीय योजनांचे सादरीकरण करण्यात आले. स्थानिक यशस्वी उद्योजकांनी मार्गदर्शनसत्रात त्यांच्या उद्योग प्रवासाची माहिती देत युवकांमध्ये प्रेरणा जागवली. यात निळंकठ कोंकणे- एलईडी लाइट्स मॅन्युफॅक्चरिंग नर्सी, शिवहार कुरुंके-मिनरल वॉटर बॉटल्स उत्पादन, श्रीमती सविता मोरे- सुगंधी तेल निर्मिती, मोहम्मद जेद-कोल्डड्रिंक्स नांदेड, एकवंत गवदवार-मसाला उद्योग नांदेड, श्रीमती देवकीनंदा-खादी उत्पादन, शुभम पवार-कोकम सॉफ्ट ड्रिंक या उद्योजकांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमात RSETI, NULM, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, कृषी व समाज कल्याण आदी विभागांचे योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. युवक-युवतींसाठी हे व्यासपीठ मार्गदर्शक, प्रेरणादायी आणि उद्योजकतेकडे घेऊन जाणारा मैलाचा दगड ठरला.
00000