Monday, March 28, 2022

 नांदेड जिल्ह्यात आज एकही कोरोना बाधित नाही

तर एक कोरोना बाधित झाला बरा  

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 660 अहवालापैकी एकही अहवाल पॉझिटीव्ह आढळला नाही. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 798 एवढी झाली आहे. यातील 1 लाख 102 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 4 रुग्ण उपचार घेत आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील एका कोरोना बाधिताला औषध उपचारानंतर बरे झाल्याने आज सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात एकुण 4 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 95 हजार 385

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 75 हजार 456

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 798

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 102

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-10

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-4

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 नांदेड येथून बासर पर्यंत केवळ तासाभरात

- पालकमंत्री अशोक चव्हाण 

·         नांदेड महानगरातील दिडशे कोटी रुपये किंमतीच्या

विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारोहात सूतोवाच 

नांदेड, (जिमाका) दि. 28 :- इतर  महानगरांच्या तुलनेत नांदेड वासियांना विविध विकास कामांसाठी सुमारे एक तपापेक्षा अधिक काळ प्रतिक्षा करावी लागली. या कालावधीत नागरिकांनी विनातक्रार अनेक असुविधा सहन केल्या. मात्र हा विकासाचा अनुशेष अडीच वर्षात जेवढ्या जलद गतीने भरून काढता येईल याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मराठवाड्याच्या इतर महानगरांच्या तुलनेत नांदेड हे महानगर विविध विकास योजनांनी परीपूर्ण असलेले महानगर म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. 

नांदेड महानगरातील विविध भागात विकास कामांचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते करण्यात आला. या भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने चैतन्य नगर तरोडा बु. येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष  समारंभात ते बोलत होते. यावेळी विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, महापौर जयश्री पावडे, उपमहापौर अब्दुल गफार अ. सत्तार, मनपा स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी आदी मान्यवर या समारंभास उपस्थित होते.   

तरोडा बु., निळा येथून बासर पर्यंत सुमारे 1 हजार कोटी रुपये निधीचा चांगला सिमेंटचा रस्ता पूर्ण केला जाणार आहे. बासर हे सर्वांच्या श्रद्धेचे स्थान आहे. तेलंगणाच्या सिमेवर या मार्गामुळे आता निजामाबाद पर्यंत पोहचण्याचा मार्ग अधिक सुकर व जलद होईल. या महामार्गाच्या जाळ्यातून नांदेड येथील विविध विकासाला, उद्योग व्यवसायाला चालना मिळेल. नांदेड जिल्हा वासियांनी जो विश्वास दाखविला आहे त्या विश्वासाला विविध विकास योजनांच्या कर्तव्यपूर्तीतून हा स्नेह अधिक दृढ करून अशा भावना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या. 

नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी जी कटिबद्धता दाखविली, कृषि क्षेत्रासह नांदेडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यादृष्टीने विष्णुपुरी सारखा प्रकल्प साकारला, या महानगराच्या विस्ताराच्या दृष्टिने जी पायाभरणी केली त्याचा कृतीशील वारसा व कटिबद्धता स्विकारून नांदेड जिल्ह्याच्या विकासाला कुठली कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विकासाची मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत, मी ती पाहतो. समृद्धी महामार्गाला नांदेड जोडणे हे माझे स्वप्न होते. त्याची मान्यता घेऊन पूर्तता केली आहे. प्रत्यक्षात मार्गही लवकरच साकारेल. बुलेट ट्रेन हेही स्वप्न आहे. लातूर-नांदेड वेगळा रेल्वे मार्ग हे सुद्धा स्वप्न असून त्याच्या पूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

नांदेडच्या विकासातला बॅकलॉक दुप्पट वेगाने भरून काढण्याची जबाबदारी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्विकारली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व सर्व विभागाने नांदेडच्या विकासाला खंबीर साथ दिली आहे. सर्वांनी एकत्र येऊन विकासातील हा असमतोल दूर करण्याचा हा संकल्प असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी केले. 

गत अडीच वर्षात तरोडा भागातील विकास कामांना गती आली. विकास कामांसाठी निधी खेचून आणण्यात पालकमंत्री या नात्याने चव्हाण यांनी कुठलेही कमतरता ठेवली नाही. कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी जे समर्थ नेतृत्व दिले त्याला तोड नाही. या नेतृत्वासमवेतच विकास कामांसाठी जो विश्वास महाराष्ट्राला त्यांनी दिला त्यातून विविध योजना साकारल्या. नांदेडच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व सर्व संबंधित विभागांच्या मंत्री महोदयांशी योग्य समन्वय साधत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विकासाला जी चालना दिली त्याला तोड नसल्याचे प्रतिपादन आमदार बालाजी कल्याणकर यांनी केले. 

आमदार राजूरकर यांनी तरोडा भागातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. हे शहर वरचेवर वाढत असून या भागातील नवीन कॉलनीसाठी रस्ते, पिण्याचे पाणी व इतर पायाभूत सुविधा अधिकाअधिक चांगल्या कशा पोहचविता येतील याकडे आम्ही भर देत असल्याचे सांगितले. यावेळी महापौर जयश्री पावडे यांचे समवोचित भाषण झाले. या कार्यक्रमाचे संचलन संतोष पांडागळे यांनी केले.

0000

 किन्नरांच्या पुनर्वसनातील नांदेडचा पॅटर्न

राज्यातील पथदर्शी उपक्रम ठरेल

-         पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड, (जिमाका) दि. 28 :-  भारतीय राज्य घटनेने सर्वांना समान न्यायाची हमी दिलेली आहे. अनेक वर्षांपासून दूर्लक्षीत असलेल्या व समाजाकडून सतत अवहेलनेला सामोरे जावे लागणाऱ्या आपल्या किन्नरांना विकासाच्या प्रवाहात आणून त्यांना योग्य त्या सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यातला राज्यातील पथदर्शी उपक्रम म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. 

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या नूतनीकरणाचे उद्घाटन व या इमारतीत किन्नरांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेतू सुविधा केंद्राबाबत प्रमाणपत्राचे हस्तांतरण, जिल्ह्यातील 34 किन्नरांना मतदान ओळखपत्राचे वाटप आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरण इमारतीत करण्यात आले. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

माणूस म्हणून जगण्यासाठी आजही किन्नरांना संघर्ष करावा लागतो. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने यथाशक्य प्रयत्न करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्यांच्या स्मशानभूमीचा प्रश्न होता. तोही आता मार्गी लागला आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र ही अत्यावश्यक बाब आहे. आधारकार्ड पासून प्रत्येक बाबीला लागणारे पुरावे हे तृतीयपंथीयांकडे, किन्नरांकडे उपलब्ध असतील हे सांगता येत नाही. त्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन सामाजिक न्याय विभाग, जिल्हा प्रशासन, मनपा यांनी संयुक्त प्रयत्नांतून किन्नरांना निवडणूक कार्डपासून इतर प्रमाणपत्र, त्यांच्या निवासाचा प्रश्न आदी बाबींचा विचार करून जी मोहिम हाती घेतली आहे ती कौतूकास पात्र असल्याचे गौरोद्गार पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काढले. 

किन्नर गौरी बक्ष हिने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याने आमच्यासाठी वेगळे व आवश्यक कार्य करून जो विश्वास दाखविला आहे त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे सर्व किन्नरांच्यावतीने आभार मानले.

00000   

 





 

 

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...