Monday, March 28, 2022

 किन्नरांच्या पुनर्वसनातील नांदेडचा पॅटर्न

राज्यातील पथदर्शी उपक्रम ठरेल

-         पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड, (जिमाका) दि. 28 :-  भारतीय राज्य घटनेने सर्वांना समान न्यायाची हमी दिलेली आहे. अनेक वर्षांपासून दूर्लक्षीत असलेल्या व समाजाकडून सतत अवहेलनेला सामोरे जावे लागणाऱ्या आपल्या किन्नरांना विकासाच्या प्रवाहात आणून त्यांना योग्य त्या सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यातला राज्यातील पथदर्शी उपक्रम म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. 

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या नूतनीकरणाचे उद्घाटन व या इमारतीत किन्नरांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेतू सुविधा केंद्राबाबत प्रमाणपत्राचे हस्तांतरण, जिल्ह्यातील 34 किन्नरांना मतदान ओळखपत्राचे वाटप आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरण इमारतीत करण्यात आले. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

माणूस म्हणून जगण्यासाठी आजही किन्नरांना संघर्ष करावा लागतो. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने यथाशक्य प्रयत्न करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्यांच्या स्मशानभूमीचा प्रश्न होता. तोही आता मार्गी लागला आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र ही अत्यावश्यक बाब आहे. आधारकार्ड पासून प्रत्येक बाबीला लागणारे पुरावे हे तृतीयपंथीयांकडे, किन्नरांकडे उपलब्ध असतील हे सांगता येत नाही. त्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन सामाजिक न्याय विभाग, जिल्हा प्रशासन, मनपा यांनी संयुक्त प्रयत्नांतून किन्नरांना निवडणूक कार्डपासून इतर प्रमाणपत्र, त्यांच्या निवासाचा प्रश्न आदी बाबींचा विचार करून जी मोहिम हाती घेतली आहे ती कौतूकास पात्र असल्याचे गौरोद्गार पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काढले. 

किन्नर गौरी बक्ष हिने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याने आमच्यासाठी वेगळे व आवश्यक कार्य करून जो विश्वास दाखविला आहे त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे सर्व किन्नरांच्यावतीने आभार मानले.

00000   

 





 

 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...