Friday, January 20, 2017

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत जिल्ह्यात
29 जानेवारी, 2 एप्रिल रोजी बालकांचे लसीकरण
मोहिम यशस्वी करण्याचे, सुक्ष्म नियोजनाचे जिल्हाधिकारी काकाणी यांचे निर्देश

नांदेड दि. 20 :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात रविवार 29 जानेवारी व रविवार 2 एप्रिल 2017 रोजी 0 ते 5 वयोगटातील बालकांसाठी लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील एकही बालक वंचित राहणार याची दक्षता घेण्यात यावी. त्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत पोहचण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश मोहिमेसाठीच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. मोहिमेच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे,निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. बालाजी शिंदे, डॅा. कैलास शेळके, डॅा. डी.टी. कानगुळे यांच्यासह महिला व बालविकास तसेच शिक्षण आणि आरोग्य विभागांशी संबंधित वैद्यकीय अधिकारी आदींची उपस्थिती होती.
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, जिल्ह्यातील सन 2012 पासूनची जन्मनोंदीबाबतची माहिती एकत्रित करण्यात यावी. गावनिहाय या माहितीचे विश्र्लेषण करण्यात यावे. तसेच आधार नोंदणी क्रमांकाशीही या लसीकरणाच्या मोहिमेची सांगड घालण्यात यावी. यामुळे जिल्ह्याचा लक्ष्यांक निश्चित करणे शक्य होईल. यातून सुक्ष्म नियोजन करता येईल आणि जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. याचवेळी त्यांनी जिल्ह्यातील सूजाण नागरिक म्हणून शुन्य ते पाच वयोगटातील बालकांना या दोन्ही दिवशी पोलीस लस पाजण्यासाठी संबंधित पालकांनी जागरूक रहावे. तसेच अन्य संवेदनशील घटकांनी याबाबत जनजागरण करावे व मोहिम यशस्वी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यातील शुन्य ते पाच वयोगटातील बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत सुमारे 4 लाख 18 हजार 76 पालकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी जिल्ह्यात 2 हजार 686 केंद्र संख्या राहणार आहे. या केंद्राशिवाय फिरते पथकांद्वारेही प्रवासातील आणि स्थलांतरणाच्या ठिकाणी बालकांना लस पाजण्यात येणार आहे. यासाठीची लस (व्हायल्स)मध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली आहे. विशेषतः जोखीमीचे क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या भागातील एकही बालक लसीपासून वंचित राहू नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यासाठी महिला व बालविकास, शिक्षण विभागांचा सक्रीय सहभाग घेण्यात येत असून, ग्रामस्तर ते तालुका आणि शहरस्तरापर्यंत विविध घटकांना मोहिमेत समाविष्ट करण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षीका, मुख्यसेविका, वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून मोहिम  यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे लसीकरण मोहिमेच्या पुर्वतयारीबाबत डॅा. शिंदे यांनी तपशीलवार माहिती बैठकीत सादर केली. 29 जानेवारीच्या मोहिमेनंतर पुढे तीन दिवस सलगपणे ग्रामीण भागात, तर पाच दिवस शहरी भागात घरभेटींद्वारेही कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी सर्वेक्षण करून, लस पाजण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीत लसीकरण मोहिमेशी निगडीत विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. केंद्रे यांच्यासह उपस्थित वैद्यकीय अधिकारी आदींनीही सहभाग घेतला.

000000
निवडणूक प्रचारातील वाहनांसाठी
आरटीओची परवानगी बंधनकारक
 नांदेड दि. 20 :-  जिल्हा परिषद व  पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 साठी राजकीय पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी वाहनांवर विविध पक्षांचे ध्वज / जाहिराती लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी संबंधितांनी वाहन तपासणी करुन रितसर अर्ज व शुल्क प्रादेशिक परिवहन कार्यालयात भरणा केल्यास त्वरीत परवानगी देण्यात येईल. संबंधितानी याची नोंद घ्यावी. विनापरवानगी निवडणुकीच्या प्रचारासाठी वापर करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000
कुष्ठरोग निर्मुलनासाठी 30 पासून जिल्ह्यात
स्पर्श जनजागृती अभियान,  रॅलीने प्रारंभ होणार
अभियानासाठी प्रभावी नियोजनाचे मु.का.अ. केंद्रे यांचे निर्देश

नांदेड दि. 20 :- राष्ट्रीय कुष्ठरोग निमुर्लन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान व विशेष कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या जनजागृतीसाठी 30 जानेवारी 2017 रोजी होणाऱ्या ग्रामसभेला अधिकारी , कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून कुष्ठरोगाविषयी माहिती देवून त्यासंबंधी समाजात असणारे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांनी केले.    
जिल्हा परिषदेच्या सभागृहात राष्ट्रीय कुष्ठरोग निमूर्लन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान , विशेष कुष्ठरोग शोध मोहिम व दुर्गम गावात कुष्ठरोग जनजागृती मोहिम या कार्यक्रमासंदर्भात आयोजित बैठकीत पद्माकर केंद्रे हे अध्यक्षपदावरुन बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. कैलास शेळके, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. डि. टी. कानगुळे, शिक्षण, महिला व बाल कल्याण आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कुष्ठरोग हा अल्पसंसर्गजन्य रोग आहे. वेळेत निदान व पूर्ण उपचाराने कुष्ठरोग मुक्त होतो. त्यासाठी सर्व शासकीय रुग्णालये आरोग्य केंद्रामध्ये मोफत औषधोपचार दिला जातो, याची माहिती जनतेला होणे आवश्यक आहे. त्यासाठी हे अभियान व मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेचे योग्य नियोजन करुन कुष्ठरोग निमुर्लनाचा संदेश गावोगावी पोहचावा , असे पद्माकर केंद्रे यांनी सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रीय कुष्ठरोग निमूर्लन कार्यक्रमाची माहिती डॉ. डि. टी. कानगुले यांनी सादरीकरणातून दिली. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत सोमवार 30 जानेवारी 2017 रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये कुष्ठरोग प्रतिज्ञा, कुष्ठरोगाची माहिती व नियमित विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे याची माहिती दिली जाणार आहे. दळणवळणास कठीण दुर्गम अशा जिल्ह्यात 404 गावामध्ये 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2017 या काळात आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत विशेष जनजागृती मोहिमेतून कुष्ठरोगाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  
नांदेड जिल्ह्यात 1982 पासून आजपर्यंत 64 हजार 853 कुष्ठरोग्यांनी एम. डी. टी. हा औषधोपचार घेतल्याने कुष्ठरोग मुक्त झाले आहेत. जिल्ह्यात मागील तीन वर्षात कुष्ठरोग विकृती दर्जा-2 व नवीन बाल कुष्ठरुग्ण आढळलेल्या 46 गावात व नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील 16 , किनवट व देगलूर नगरपालिका क्षेत्रातील प्रत्येकी तीन व हदगाव नगरपालिाका क्षेत्रातील एक असे एकुण 69 भागामध्ये व गावामध्ये दि. 6 ते 21 फेब्रवारी 2017 या दरम्यान शहरी भागातील 300 घरे व गावामधील संपूर्ण घरोघरी जावून ही विशेष कुष्ठरोग सर्वेक्षण मोहिम राबविली जाणार आहे ,  अशी माहिती यावेळी देण्यात आली.
कुष्ठरोग निमूर्लन जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची रॅलीचे सोमवार 30 जानेवारी रोजी नांदेड शहरात आयोजन करण्यात आले असून या रॅलीमध्ये सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही पद्माकर केंद्रे यांनी केले.
0000000


राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई, ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 20 - राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्यानिमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात 17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्याच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आला आहे. त्यांनी असे खराब झालेले , माती लागलेले जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.

00000000
युवा मतदारांमध्ये सुरु झाला जागर
सक्षम करुया युवा व भावी मतदार
अभियानाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
 नांदेड दि. 20 -  मतदार जागृती दिनानिमित्त जिल्हाभर विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न होत असून निवडणूक आयोगाने या निमित्ताने तयार केलेल्या लघूपट (फिल्म), गेट-सेट-वोट या संगणक गेम्सला युवा मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्ताने विविध महाविद्यालयातील युवा मतदारात खऱ्या अर्थाने जागर सुरु झाला आहे.
येथील ग्रामीण तंत्रनिकेतनमध्ये बुधवारी झालेल्या कार्यक्रमात उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसिलदार पी. के. ठाकूर, ग्रामीण तंत्रनिकेतनचे प्राचार्य विजय पवार, नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत र्इव्हीएम मशीनचे प्रत्याक्षिक तसेच लघुपटाचे प्रदर्शन व संगणक गेम्सचा स्पर्धा संपन्न झाल्या.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. पिनाटे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की , मतदार नोंदणी विषयी युवकांनी सजग राहिले पाहिजे. सर्वसमावेशक मतदार तयार होण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावेत आणि सक्षम करुया युवा व भावी मतदार हे अभियान यशस्वी करावे. उपविभागीय अधिकारी श्री. कुलकर्णी यांनी सांगितले की , युवा पिढी हा देशाचा आधार आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी व सर्व मतदारांना मतदानाविषयी जागृत करण्यासाठी युवकांचे योगदान नेहमीच महत्वाचे राहिले आहे.

नायब तहलिसदार श्री. स्वामी यांनी प्रास्ताविकात मतदार जागृती विषयी प्रशासनातर्फे आयोजित विविध कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी प्राचार्य विजय पवार यांनीही विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. देऊळगावकर यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे पद्माकर कुलकर्णी, राजीव कानगुले, शेख अझहर यांनी संयोजन केले. 

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...