Friday, January 20, 2017

कुष्ठरोग निर्मुलनासाठी 30 पासून जिल्ह्यात
स्पर्श जनजागृती अभियान,  रॅलीने प्रारंभ होणार
अभियानासाठी प्रभावी नियोजनाचे मु.का.अ. केंद्रे यांचे निर्देश

नांदेड दि. 20 :- राष्ट्रीय कुष्ठरोग निमुर्लन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान व विशेष कुष्ठरोग शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या जनजागृतीसाठी 30 जानेवारी 2017 रोजी होणाऱ्या ग्रामसभेला अधिकारी , कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून कुष्ठरोगाविषयी माहिती देवून त्यासंबंधी समाजात असणारे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांनी केले.    
जिल्हा परिषदेच्या सभागृहात राष्ट्रीय कुष्ठरोग निमूर्लन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान , विशेष कुष्ठरोग शोध मोहिम व दुर्गम गावात कुष्ठरोग जनजागृती मोहिम या कार्यक्रमासंदर्भात आयोजित बैठकीत पद्माकर केंद्रे हे अध्यक्षपदावरुन बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. कैलास शेळके, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. डि. टी. कानगुळे, शिक्षण, महिला व बाल कल्याण आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कुष्ठरोग हा अल्पसंसर्गजन्य रोग आहे. वेळेत निदान व पूर्ण उपचाराने कुष्ठरोग मुक्त होतो. त्यासाठी सर्व शासकीय रुग्णालये आरोग्य केंद्रामध्ये मोफत औषधोपचार दिला जातो, याची माहिती जनतेला होणे आवश्यक आहे. त्यासाठी हे अभियान व मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेचे योग्य नियोजन करुन कुष्ठरोग निमुर्लनाचा संदेश गावोगावी पोहचावा , असे पद्माकर केंद्रे यांनी सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रीय कुष्ठरोग निमूर्लन कार्यक्रमाची माहिती डॉ. डि. टी. कानगुले यांनी सादरीकरणातून दिली. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत सोमवार 30 जानेवारी 2017 रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये कुष्ठरोग प्रतिज्ञा, कुष्ठरोगाची माहिती व नियमित विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे याची माहिती दिली जाणार आहे. दळणवळणास कठीण दुर्गम अशा जिल्ह्यात 404 गावामध्ये 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2017 या काळात आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत विशेष जनजागृती मोहिमेतून कुष्ठरोगाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  
नांदेड जिल्ह्यात 1982 पासून आजपर्यंत 64 हजार 853 कुष्ठरोग्यांनी एम. डी. टी. हा औषधोपचार घेतल्याने कुष्ठरोग मुक्त झाले आहेत. जिल्ह्यात मागील तीन वर्षात कुष्ठरोग विकृती दर्जा-2 व नवीन बाल कुष्ठरुग्ण आढळलेल्या 46 गावात व नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील 16 , किनवट व देगलूर नगरपालिका क्षेत्रातील प्रत्येकी तीन व हदगाव नगरपालिाका क्षेत्रातील एक असे एकुण 69 भागामध्ये व गावामध्ये दि. 6 ते 21 फेब्रवारी 2017 या दरम्यान शहरी भागातील 300 घरे व गावामधील संपूर्ण घरोघरी जावून ही विशेष कुष्ठरोग सर्वेक्षण मोहिम राबविली जाणार आहे ,  अशी माहिती यावेळी देण्यात आली.
कुष्ठरोग निमूर्लन जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची रॅलीचे सोमवार 30 जानेवारी रोजी नांदेड शहरात आयोजन करण्यात आले असून या रॅलीमध्ये सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही पद्माकर केंद्रे यांनी केले.
0000000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...