Friday, March 27, 2020


अत्यावश्यक वस्तूची वाहतूक :  
नियंत्रण कक्ष स्थापन ; वाहतूक प्रमाणपत्राचे वितरण   
नांदेड दि. 27 :- कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने वेळीच उपाययोजना केल्या आहेत. अत्यावश्यक सेवा व वस्तू यांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनांना कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा क्रमांक 842 180 0099 असा आहे.
अत्यावश्यक वस्तुची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिमा तपासणी नाके देगलूर, बिलोली आणि सिमा तपासणी केंद्र भोकर यांच्याकडून वाहतूक प्रमाणपत्र दिले जात आहे. जिल्ह्यातील सर्व मालवाहूकदारांनी संबंधित ठिकाणी संपर्क साधावा. त्यांच्या वाहनातून अत्यावश्यक वस्तुची वाहतूक करणार असल्याबाबत पुरावा सादर करुन प्रत्येक वाहनासाठी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे.
संचारबंदीमुळे ज्या वाहनधारकांना परिवहन कार्यालयात येणे शक्य नाही त्यांनी कार्यालयाच्या mh26@mahatranscom.in या ई-मेलवर वाहन क्रमांक नमूद करुन अर्ज केल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्रमाणपत्र दिले जाईल. याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000



नागरिकांच्या मदतीसाठी :
नियंत्रण कक्षाची स्थापन
नांदेड दि. 27 :-संचारबंदी व लोकडाऊनच्या अनुषंगाने नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात एक सुसज्ज नियंत्रण कक्ष स्थापना करण्यात आला आहे. येथील दूरध्वनी क्रमांक 02462- 234720 व हेल्पलाइन क्रमांक 1091 100 क्रमांकाच्या पाच लाईन सुरु करण्यात आल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यात व शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून राज्यभर कलम 144 फौजदारी प्रक्रिया संहिता अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे पोलिसांसोबत सुसंवाद साधण्यासाठी व त्यांच्या समस्या, तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुविधा व्हावी. यासाठी नांदेड जिल्हा पोलिस दलातर्फे व्हाट्सअप मेसेज सेवा सुरु करण्यात आली आहे. ही सेवा 24 तास उपलब्ध असते त्याचा क्रमांक 88888 89255 हा आहे. त्यावर देखील नागरिकांना माहिती दयावी, असे आवाहन नांदेडचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.  
00000


अत्यावश्यक वस्तु पुरवठा करणाऱ्या
वाहनांना वाहतूक प्रमाणपत्राचे वितरण
नांदेड दि. 27 :- कोरोना विषाणू संदर्भात उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थिती संदर्भात अत्यावश्यक सेवा, वस्तु यांचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना वाहतूक प्रमाणपत्र देण्यासाठी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शनिवार 28 मार्च 2020 पासून कक्ष स्थापन करण्यात येत असून कक्ष सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत कार्यान्वित राहील.
या कक्षाचा ई-मेल आयडी  collectoroffice09@gmail.com असून जिल्ह्यातील वाहनधारकांना प्रत्यक्ष उपस्थित राहून किंवा ईमेलवर अर्ज करता येईल. सोबत वाहनाचे आरसीबुक, फिटनेस प्रमाणपत्र, करपावती, वाहनांचा विमा, परमिट आदी वैध कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांच्या वाहनासाठी वाहतूक प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. तालुका स्तरावरसुद्धा तहसिल कार्यालयात वाहनधारकांना वाहतूक परवानगीसाठी अर्ज करु शकतील. याची नोंद जिल्ह्यातील वाहतूक संघटना व वाहनधारकांनी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


अत्यावश्यक सेवांच्या वाहतूकीस बंदी नाही  
-          जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 
नांदेड,दि. 27: शासनाच्‍या अत्‍यावश्‍यक सेवांच्‍या वाहूतकीस बंदी नाही, असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात ट्रान्‍सपोर्टर्सच्‍या बैठकीत आज ते बोलत होते.  
यावेळी ट्रान्‍सपोट्रर्सचे जिल्‍हाध्‍यक्ष जाहेद भाई, जिल्‍हा मालक असोसिएशनचे अध्‍यक्ष सुखासिंग हुंडा, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्‍पर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन विभागाचे राहूल जाधव, जिल्‍हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक आदींची उपस्थिती होती.
डॉ. विपीन म्‍हणाले, अत्‍यावश्‍यक सेवांच्‍या वाहतूकीच्‍या अनुषंगाने वाहनांसाठी पासेस उपलब्‍ध करून देण्‍यासाठी, जिल्‍हाधिकारी कार्यालयातील कक्षात महसूल, पोलीस‍ विभाग, परिवहन विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.
अत्‍यावश्‍यक सुविधेसाठी पासेस‍ मिळण्‍याबाबत मागणी प्राप्‍त होताच पासेस निर्गमित करण्‍यात येतील. पासेसची प्रत वाहनाच्‍या समोरील भागात काचेच्‍या मधल्‍या बाजूने लावणे बंधनकारक राहील.
तालुक्‍याच्‍या ठिकाणी महसूल व पोलीस विभाग यांचे नियंत्रण कक्ष उघडण्‍यात येत आहे. त्‍यांच्‍याकडून अर्ज आल्‍यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ई-मेलद्वारे कार्यालयाची मान्‍यता आल्‍यानंतर परवाना निर्गमित करावा. वाहतूकदारांनी collectoroffice09@gmail.com या ईमेलवर मागणी करावी. अत्‍यावश्‍यक वाहनांची ने-आण करावी. इतर बाबींची ने-आण केल्‍याचे आढळल्‍यास कडक कारवाई करण्‍यात येईल, असेही जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन यांनी बैठकीत सांगितले.
अत्‍यावश्‍यक सेवांच्‍या वाहनांमध्‍ये माल चढविणे व उतरविणे या कामी माथाडी कामगार व हमालांची मोठया प्रमाणात गरज आहे. संचारबंदी काळात या सेवेत व्‍यत्‍यय करू नये, म्‍हणून सहाययक आयुक्‍त कामगार व अध्‍यक्ष माथाडी कामगार युनियन यांना जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन यांनी सूचना दिल्‍या.
या कामगारांना ते ज्‍या ठिकाणी सेवा देणार आहेत ते ठिकाण नमूद करण्‍यात यावे. जिल्‍हयातील अत्‍यावश्‍यक सेवा घ्‍यावयाच्‍या सर्व ठिकाणी माथाडी कामगार यूनियन, हमाल यूनियन यांनी हमाल उपलब्‍ध करून दयावेत. अडचण आल्‍यास जिल्‍हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक यांचेशी संपर्क साधावा.
सदयपरिस्थितीमध्‍ये संचार बंदीच्‍या काळात कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीमध्‍ये धान्‍यांची उलाढाल बंद असल्‍यामुळे ठोक विक्रेते यांच्‍याकडे मालाची कमतरता जाणवू नये, म्‍हणून नोंदणीकृत आडती यांनी ग्रामीण भागात गाळे आपसात घेवून धान्‍यांचे अंतर राखून (सोशल डिस्‍टंन्‍स) खरेदी करावी. त्‍यानूसार ठोक विक्रेते अत्‍यावश्‍यक सेवांच्‍या कृषी प्रक्रिया उद्योग याठिकाणी मालाच्या उपलब्‍धतेसाठी सहकार्य करावे. जिल्‍हयातील बेघर, अतिशय गरीब व गरजू व्‍यक्‍तींना मदत करण्‍यासाठी एमआयडीसी असोसिएशन व्‍यापारी व उत्‍पादक यांना मदतीचे आवाहन यावेळी जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले. या कामात मदत देण्‍यासाठी सुसाहय व्‍हावे म्‍हणून जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत पासेसचे वितरण करण्‍यात येणार आहे, असेही जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगितले.
यावेळी संचारबंदीच्‍या काळात माथाडी कामगार उपलब्‍ध होण्‍याच्‍या अनुषंगाने एमआयडीसी असोसिएशन, उपनिबंधक अध्‍यक्ष, माथाडी असोसिएशन यांची बैठक घेण्‍यात आली.
000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...