Friday, February 27, 2026

  वृत्त क्रमांक  

दहावीचा इंग्रजीचा पेपर जिल्ह्यातील सर्व 178 केंद्रांवर सुरळीत  - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, दि.२७ फेब्रुवारी:- आज इयत्ता 10 वीची परीक्षा जिल्ह्यातील 178 केंद्रांवर सुरळीत पार पडली. इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी एकूण 48,832 परीक्षार्थ्यांपैकी 47,725 परीक्षार्थी उपस्थित होते. उपस्थितीची टक्केवारी 97.73 इतकी नोंदविण्यात आली.

प्रत्येक केंद्रावर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे तसेच ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेराच्या सहाय्याने पूर्णवेळ नियंत्रण ठेवण्यात आले. त्यामुळे सर्व 178 परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत व कॉपीमुक्त वातावरणात पार पडली.

आजच्या इंग्रजीच्या पेपरसाठी जिल्हास्तरावरील सुमारे 66 अधिकारी 66 परीक्षा केंद्रांवर पूर्णवेळ उपस्थित होते. तसेच शिक्षण विभागाचे 7 अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व तालुकास्तरावरील अधिकारी अशा एकूण 112 अधिकाऱ्यांनी भरारी पथकांमार्फत सर्व 178 केंद्रांना भेट देऊन उपस्थिती नोंदविली. त्यामुळे परीक्षा प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्यात आली.

दरम्यान, जिल्हा परिषद हायस्कूल, बेटमोगरा ता. मुखेड येथील केंद्रावर एका परीक्षार्थ्याच्या जागी तोतया परीक्षार्थी उपस्थित असल्याचे भरारी पथक प्रमुख जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे यांच्या निदर्शनास आले. संबंधिताविरुद्ध मंडळ नियमावली तसेच भारतीय न्यायसंहिता कलम 163 आणि महाराष्ट्र गैरप्रकार अधिनियम 1982 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.

इयत्ता 10 वी व 12 वीच्या सर्व परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. यासाठी विद्यार्थी व पालकांनी सकारात्मक सहकार्य करावे. तसेच यापुढील सर्व परीक्षांमध्ये तोतया परीक्षार्थी आढळू नयेत यासाठी परीक्षा प्रक्रियेशी संबंधित सर्व घटकांनी विशेष दक्षता घ्यावी आणि प्रत्येक परीक्षार्थ्याची ओळख पडताळूनच परीक्षा दालनात प्रवेश द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

०००००

 वृत्त क्रमांक  

मागासवर्गीयांसाठी व्यवसाय अनुदान योजना; 

10 मार्चपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 27 फेब्रुवारी:- जिल्हा परिषद, नांदेड अंतर्गत समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद २०टक्के सेस अंतर्गत खालील अर्थसहाय्याच्या योजना कार्यान्वित आहेत.

योजना प्रकार :

मागासवर्गीयांना व्यवसायासाठी अनुदान, मागासवर्गीय महिलांना व्यवसायासाठी अनुदान, प्रती लाभार्थी कमाल 40 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष खर्च कमी झाल्यास पावतीनुसार अनुदान देय राहील.

अटी व शर्ती :

योजना ग्रामीण भागातील (अ.जा./अ.ज./विजाभज) प्रवर्गातील पुरुष व महिलांसाठी स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी आहे. लाभार्थी ग्रामीण भागातील असावा. वय 18 ते 50 वर्षे दरम्यान असावे. वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले मूळ जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. रहिवासी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. उद्योगासाठी ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र (NOC) आवश्यक आहे. व्यवसायासाठी स्वतःची जागा असावी. भाड्याची जागा असल्यास भाडेकरार व पावती आवश्यक. अंतिम निवडीचे अधिकार विषय समिती/प्रशासनाकडे राहतील. लाभार्थ्याने जिल्हा परिषदेच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. व्यवसाय सुरू केल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवक/ग्रामपंचायत अधिकारी/विस्तार अधिकारी (पंचायत समिती) यांचेकडून घेणे आवश्यक राहील.

अर्ज प्रक्रिया :

पात्र लाभार्थ्यांनी Website : mhdivyang.com संकेतस्थळावर नोंदणी करावी, त्यानंतर परिपूर्ण अर्ज पंचायत समितीमार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांच्या कार्यालयात 10 मार्च 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र वीरेंद्र आऊलवार यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्रमांक  

श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत “राष्ट्रीय विज्ञान दिन” उत्साहात साजरा

नांदेड,दि. २७ फेब्रुवारी:- भारताचे महान भौतिकशास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी ‘रमण परिणाम’ हा महत्त्वपूर्ण शोध लावला. 

प्रकाशकिरणांचा पदार्थांशी होणारा परस्परसंवाद आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विकिरणाचा अभ्यास हा या शोधाचा गाभा होता. या अद्वितीय संशोधनासाठी त्यांना १९३० मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. विज्ञान क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ ठरले.

विज्ञानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा या उद्देशाने भारत सरकारने १९८६ साली २८ फेब्रुवारी हा दिवस “राष्ट्रीय विज्ञान दिन” म्हणून घोषित केला. तेव्हापासून हा दिवस देशभर विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची थीम “Women in Science: Catalysing Viksit Bharat (विज्ञानातील महिला – विकसित भारताची प्रेरक शक्ती)” अशी निश्चित करण्यात आली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांच्या योगदान व नेतृत्वाचा गौरव हा या थीमचा केंद्रबिंदू आहे.

त्या अनुषंगाने श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे २७ फेब्रुवारी २०२६ रोजी “राष्ट्रीय विज्ञान दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून लेखक व समीक्षक शिवाजीराजे पाटील उपस्थित होते. तसेच संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य धिरज बीडवे, संस्थेचे प्राचार्य श्री कंदलवाड व्ही. डी., सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. संस्थेतील शिल्प निदेशिका सौ. हिसवनकर एम. आर. यांनी प्रास्ताविक करताना डॉ. सी. व्ही. रमण यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला व विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख वक्ते शिवाजीराजे पाटील यांनी दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे स्थान स्पष्ट करत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी खेळीमेळीचा संवाद साधला. प्रशिक्षणार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोतदार डी. ए. (रा. से. योजना कार्यक्रमाधिकारी) यांनी केले. प्राचार्य श्री कंदलवाड व्ही. डी. यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

०००००




"हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादुर साहिब जी के 350वें शहीदी समागम की भव्य तैयारियाँ! 🙏✨
श्रद्धा और सेवा का संगम, जहाँ हर कोना गुरु साहिब की महिमा से सजाया जा रहा है। आइए, इस पावन अवसर का हिस्सा बनें।
📍 ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई
📅 28 फरवरी और 1 मार्च, 2026


 वृत्त क्रमांक  

मराठीचा अभिमान जपू या ; मराठीतच संवाद साधू या – अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव

नांदेड, दि.२७ फेब्रुवारी:- मराठी साहित्यातील लखलखते नक्षत्र आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या हस्ते जिल्हा ग्रंथालयात विविध विषयांवरील ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रंथालयात मराठी साहित्य, स्पर्धा परीक्षा, इतिहास, विज्ञान आदी विविध विषयांवरील ग्रंथांचे आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले होते.
यावेळी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगून दैनंदिन व्यवहारात मराठीतच संवाद साधण्याचे आवाहन केले. मराठीतील मान्यवर लेखक व कवी यांचे स्मरण ठेवून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासोबतच अवांतर वाचनाची सवय जोपासावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे तसेच ग्रंथालय शास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात कुसुमाग्रज तसेच इतर मराठी साहित्यिकांच्या साहित्याचे विशेष प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
या कार्यक्रमास स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी व अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात तहसीलदार विकास बिरादार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी, प्रतिभा पापुलवार, अजय वट्टमवार, श्रद्धा रनखांबे, दिगांबर शिंदे, रघुवीर श्रीरामवार, राजू पाटील आदींचा सहभाग होता.
००००००




  नवी मुंबई हिंद दी चादर श्री गुरू तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्ताने खारघर येथील कार्यक्रम #हिंददीचादर #श्रीगुर...