Tuesday, August 25, 2026

राज्यात एकाचवेळी झालेल्या ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन लाखांहून अधिक नागरिकांच्या सहभागातून जलसंधारणाचा संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. हा केवळ शासनाचा विषय नसून प्रत्येक नागरिकाच्या भवितव्याशी निगडित विषय आहे. या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा महाराष्ट्रातील जनतेची जलसंधारणाबाबतची जागरूकता आणि सहभागाची भावना अधोरेखित करणारा आहे, असे मत मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले.

मुंबईतील वरळी येथे या उपक्रमाला सुरुवात झाली. त्याचवेळी राज्यभरातील विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, कर्मचारी, महाविद्यालयीन तरुणाई तसेच विविध सामाजिक घटकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. राज्यात ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’, ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’, ‘अमृत सरोवर’, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आदी विविध माध्यमांतून जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी ‘वॉक फॉर वॉटर’ प्रभावी माध्यम ठरले आहे.
१५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत राज्यात ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावागावांत पाणलोट विकास, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, गाळ काढणे, भूजल पुनर्भरण आणि मृदसंवर्धनाच्या कामांना गती देण्यासोबतच अभियानादरम्यान काही निवडक गावांमध्ये जलशोषक खड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात येणार आहे. ‘वॉक फॉर वॉटर’मधून महाराष्ट्राने दिलेला संदेश आता प्रत्यक्ष कृतीत उतरवून जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक करूया,' असेही मंत्री राठोड यांनी आवाहन केले.



 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०२६' अंतर्गत ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटी रुपयांच्या लाभाचे वितरण

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने'च्या दुसऱ्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वितरित.

 वृत्त क्रमांक 

आपले सरकार सेवा केंद्रांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष कार्यशाळा

नागरिकांना पारदर्शक, सुलभ व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या सूचना

नांदेड(जिमाका), दि. २५ : नांदेड तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्रांची गुणवत्ता वाढवून नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या सेवांचा दर्जा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने तहसील कार्यालयाच्या सभागृहात आज आपले सरकार सेवा केंद्र चालकांची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेस नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, नायब तहसीलदार (महसूल) सुनील माचेवाड यांनी उपस्थित सेवा केंद्र चालकांना मार्गदर्शन केले. यावेळी आपले सरकार सेवा केंद्र जिल्हा प्रकल्प अधिकारी नीरज धामणगावे, जिल्हा समन्वयक केदार चोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या निर्देशानुसार तसेच जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, नागरिकांसाठी सोयी-सुविधा, योग्य ब्रँडिंग, माहिती फलक, तांत्रिक सुविधा तसेच नागरिकाभिमुख सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या निकषांची पूर्तता करून केंद्रांचे गुणवत्ता मानांकन सुधारण्याबाबत कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

आपले सरकार सेवा केंद्र तसेच ग्रामपंचायत स्तरावरील सेवा केंद्रांचे गुणवत्ता मानांकन, कार्यपद्धती आणि सन्मानाची प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. नागरिकांना वेळेत, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या सूचना सर्व सेवा केंद्र चालकांना देण्यात आल्या.

शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यास अथवा नियमांचे पालन केले जात नसल्यास नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिला. तसेच नियमबाह्य पद्धतीने काम करणाऱ्या किंवा शासनाच्या निर्देशांचे सातत्याने पालन न करणाऱ्या सेवा केंद्र चालकांवर परवाना रद्द करण्यासह नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या.

या कार्यशाळेस नांदेड तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांना अधिक दर्जेदार, पारदर्शक आणि सुलभ सेवा देण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

***


 वृत्त क्रमांक 

जिल्ह्यात 26 ते 28 ऑगस्टदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

नांदेड (जिमाका), दि. 25 : नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे दि. 26 ते 28 ऑगस्ट 2026 दरम्यान निघणाऱ्या पोळा मिरवणुका तसेच पंचक्रोशी यात्रा आणि नारळी पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 36 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

माहूर येथे नारळी पौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणात पंचक्रोशी यात्रा भरणार आहे. या कालावधीत महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. तसेच रेणुकामाता मंदिर, महादेव मंदिर, दत्तात्रय मंदिर, देवदेवेश्वरी, रेणुकामाता मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवणे तसेच यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राखणे आवश्यक असल्याने हे आदेश देण्यात आले आहेत.

आदेशाची अंमलबजावणी दि. 26 ऑगरोजीच्या मध्यरात्रीपासून ते दि. 28 ऑगस्ट 2026 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत नांदेड जिल्ह्यातील पोलीस ठाणे माहूर हद्दीत पोलीस निरीक्षक तथा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 36 नुसार विविध अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

या अधिकारांतर्गत रस्त्यावरून किंवा रस्त्यावर जाणाऱ्या मिरवणुकीतील अथवा जमावातील व्यक्तींनी कोणत्या रीतीने चालावे व कसे वागावे, मिरवणुका कोणत्या मार्गाने व कोणत्या वेळी जाव्यात किंवा जाऊ नयेत, तसेच मिरवणुकीच्या मार्गात अडथळा निर्माण होणार नाही याबाबत निर्देश देण्याचे अधिकार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

तसेच मिरवणुका व जमावाच्या प्रसंगी पूजा-अर्चेच्या ठिकाणी गर्दी होऊन रस्ता किंवा सार्वजनिक जागेत अडथळा निर्माण होऊ नये, रस्ते व रस्त्यांच्या आसपास वाहने व्यवस्थित उभी राहतील याची दक्षता घ्यावी, सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवावे, याबाबत सूचना देण्याचे अधिकारही प्रदान करण्यात आले आहेत.

मिरवणुकीदरम्यान किंवा सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल, अशा कोणत्याही कृतीस प्रतिबंध करण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्याचे अधिकार राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 33, 35 ते 40 आणि 42, 43, 45 अन्वये यापूर्वी दिलेल्या आदेशांच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पोलीस ठाणे माहूर हद्दीत कार्यक्रम, मिरवणूक, सूचना, मार्ग व वेळ याबाबतची माहिती संबंधित पोलीस उपनिरीक्षक अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय पूर्वप्रसिद्धीस देऊ नये, तसेच शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल अशा घोषणा देऊ नयेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मुंबई पोलीस कायदा, 1951 मधील कलम 134 नुसार कारवाई करण्यात येईल. सदर प्रतिबंधात्मक आदेश दि. 26 ऑगस्ट 2026 रोजीच्या मध्यरात्रीपासून ते दि. 28 ऑगस्ट 2026 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहेत.

**

राज्यात एकाचवेळी झालेल्या ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन लाखांहून अधिक नागरिकांच्या सहभागातून जलसंधारण...