वृत्त क्र. 745
जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यात
भाग घ्यावा
– जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत
अभ्यास दौऱ्यासाठी 30 जुलैपर्यत अर्ज
करण्याचे आवाहन
नांदेड दि. 18 जुलै :- कृषी
विभागामार्फत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी देशाबाहेरील अभ्यास दौरे सन 2025-26 ही योजना राबविण्यात येत आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी या परदेश अभ्यास दौऱ्यासाठी
30 जुलै 2025 पूर्वी संबंधित तालुका कृषि
अधिकारी कार्यालयात अर्ज करावेत. तसेच अर्ज केलेले शेतकरी यांनी 4 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय,
नांदेड येथे दुपारी 2 वाजता उपस्थित रहावे. प्राप्त
अर्जातून जिल्हास्तरीय समितीसमोर सोडत काढण्यात येणार असून यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी
यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,
दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
या आर्थिक वर्षात जिल्हास्तरावरून निवड करताना प्रति जिल्हा
किमान 1 महिला शेतकऱ्याची व किमान 1 राज्य तथा केंद्रीय शासन
स्तरावरील विविध कृषी पुरस्कार प्राप्त व पीकस्पर्धा विजेते शेतकरी असे एकूण पाच शेतकऱ्याची
निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक
तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात/ कृषी मालाचे पणन व बाजार
पेठेतील मागणी, कृषी माल प्रक्रिया याबरोबरच त्यादेशांमध्ये उपयोगात
येत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर जिल्ह्यातील तसेच राज्यातील
शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर / शेतीमध्ये करण्यासाठी सहाय्य करणे. विविध देशांनी विकसित
केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्यादेशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष
चर्चा करून तसेच क्षेत्रीय भेटी, संबंधित संस्थाना भेटी इत्यादीद्वारे
शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे
देशाबाहेर अभ्यासदौरे सन 2025-26 ही योजना राबविण्यात येत आहे.
या आर्थिक वर्षात जिल्हास्तरावरून निवड करताना प्रति जिल्हा
किमान 1 महिला शेतकऱ्याची व किमान 1 राज्य तथा केंद्रीय शासन
स्तरावरील विविध कृषी पुरस्कार प्राप्त व पीकस्पर्धा विजेते शेतकरी असे एकूण पाच शेतकऱ्याची
निवड करण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची निवड करण्यासाठी काही निकष निश्चित
करण्यात आले आहेत. यामध्ये अभ्यास दौऱ्यासाठी जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा.
स्वतःच्या नावे चालू कालावधीचा (मागील सहा महिन्यातील ) सातबारा व ८-अ उतारा,
उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे तसे त्याने स्वयंघोषणापत्रात नमूद
करावे. ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे वय 25 वर्ष पूर्ण असावे तसेच कमाल वयाची अट नसून शेतकरी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त
असणे बंधनकारक आहे. शेतकरी वैध पारपत्र(पासपोर्ट) धारक असावा. शेतकरी कुटुंबामधून फक्त
एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यास अर्ज सादर
करताना शारीरिकदृष्टया तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक
आहे. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी,
खाजगी संस्थेत नोकरीस नसावा. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार नसावा तसे त्याने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद करावे, शासनाकडून अभ्यास दौऱ्यासाठी सर्व घटकातील (संवर्गातील) शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या
50 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपये यापैकी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून
देय आहे. सन 2025-26 मध्ये खालील प्रमाणे शेतीचे वैशिष्ठे,
दिवस कंसात देश / देशाचा गट देण्यात आले आहे -1. फलोत्पादन, सेंद्रियशेती आणि दुग्धोत्पादन- दौरा 12 दिवस- ( युरोप - नेदरलँड्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स) 2.आधुनिक
कृषी तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन व कृषीयांत्रिकीकरण - दौरा 9 दिवस- (इस्राईल) 3.
सेंद्रिय शेती व आधुनिक कृषी तंत्रज्ञान- दौरा 10 दिवस- (जपान) 4.फळे व भाजीपाला पिकांचे काढणी पश्चात
तंत्रज्ञान (Post-Harvest Technology) आणि व्यवस्थापन प्रणाली-
दौरा 12 दिवस – (मलेशिया, व्हिएतनाम व फिलीपाइन्स)
5.विविध कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता
वाढवण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि कृषी एक्पो – दौरा 8 दिवस
– ( चीन ) 6. आधुनिक कृषी अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान – दौरा 8 दिवस –( दक्षिण कोरिया ) याप्रमाणे दौरे नियोजित असून इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी
विहित वेळेत 30 जुलै 2025 पूर्वी संबंधित
तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज करावेत असे कृषी विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे
कळविले आहे.
000000