Saturday, July 21, 2018


बारावी परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या
विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज 31 जुलै पासून सुरु  
नांदेड, दि. 21 :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2018 या परीक्षेसाठी खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नाव नोंदणी अर्ज (फॉर्म नं. 17) http://form17.mh-shc.ac.in या संकेतस्थळावर सोमवार 30 जुलै 2018 पासून स्विकारण्यात येणार आहेत, असे विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी कळविले आहे.   
सोमवार 30 जुलै 2018 ते शनिवार 25 ऑगस्ट 2018 या कालावधीत विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन भरावीत. मंगळवार 31 जुलै 2018 ते शनिवार 27 ऑगस्ट 2018 कालावधीत विद्यार्थ्यांनी मुळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क कनिष्ठ महाविद्यालयास जमा करावीत. शुक्रवार 31 ऑगस्ट 2018 रोजी कनिष्ठ महाविद्यालयानी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000

 नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब बोर्डाचे
 तीन सदस्‍य निवडून देण्यासाठी पात्र मतदारांची नाव नोंदणी सुरु
नांदेड, दि. 21 :- नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब बोर्डाचे तीन सदस्‍य निवडून देण्‍यासाठी मतदार यादी तयार करण्यात येत आहे. पात्र मतदारांचे नाव नोंदणीचे अर्ज संबं‍धीत तहसीलदार यांचेकडे शनिवार 18 ऑगस्‍ट 2018 पर्यंत स्विकारले जातील, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
नांदेड शिख गुरुव्‍दारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब अधिनियम 1956 च्‍या कलम 6 पोटकलम दोन अन्‍वये बोर्डाचे तीन सदस्‍य निवडून देण्‍यासाठी मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी पुढील सूचना देण्‍यात आल्या आहेत. नियम तीन खाली शासनाने दिनांक 1 जूलै 2018 ही अर्हता तारीख निर्दिष्‍ट केली आहे. मतदार यादीत नाव दाखल करण्‍यास पात्र असलेल्‍या मतदारांना 20 जूलै 2018 या तारखेपासून 30 दिवसात त्‍यांचे नाव मतदार यादीत नोंदविता येईल. महाराष्‍ट्र विधानसभा निवडणुकीसाठी असलेल्‍या मतदार यादीत दिनांक 1 जुलै 2018 रोजी ज्‍यांची नावे आहेत व जे सामान्‍यत: जुन्‍या हैद्राबाद संस्‍थानचा भाग महाराष्‍ट्र राज्‍यात समाविष्‍ट केलेल्‍या भागात राहतात. (औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्‍मानाबाद, नांदेड, बीड लातूर, हे जिल्‍हे व चंद्रपुर जिल्‍ह्यातील राजूरा, कोरपणा, जीवती तहसील) अशा सर्व शिख मतदारांना या निवडणकीसाठी तयार होणाऱ्या मतदार यादीत नाव नोंदविता येईल. मतदार यादीत नाव नोंदविण्‍यासाठी सोबत मतदानाचे ओळखपत्र किंवा नोंदणीकर्त्‍यांचे मतदार यादीतील नावांची छायांकित प्रत जोडण्‍यात यावी.
महाराष्‍ट्र राज्‍यात सामील झालेल्‍या भूतपुर्व हैद्राबाद राज्‍याच्‍या भागात अर्थात  औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्‍मानाबाद, नांदेड, बीड लातूर हे जिल्‍हे व चंद्रपुर जिल्‍ह्यातील राजूरा, कोरपणा, जीवती तहसील भाग हा मतदारसंघ आहे. सामान्‍यत: या क्षेत्राबाहेर राहणाऱ्या शिख मतदारांना मतदार यादीत नावे नोंदविता येणार नाहीत.
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्जाचे नमुने संबंधीत तालुक्‍याच्‍या तहसीलदारांकडे देण्‍यात आले आहेत. मतदार यादीत नाव नोंदविण्‍यासाठीचा अर्ज नमुना नं. 1 मध्‍ये संबं‍धीत तहसीलदार यांचेकडे दिनांक 20 जूलै 2018 ते 18 ऑगस्‍ट 2018 या कालावधीत स्विकारले जातील. प्रारुप मतदार यादी तयार झाल्‍यानंतर मतदार संघातील सर्व संबंधीत जिल्‍हाधिकारी यांच्‍या कार्यालयात तसेच जिल्‍हाधिकारी नांदेड यांच्‍या www.nanded.gov.in या संकेतस्‍थळावर (वेबसाईटवर) व गुरुव्‍दारा बोर्डाच्‍या कार्यालयात नियम आठ प्रमाणे उक्‍त मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात येईल. नियम 9 व 10 प्रमाणे कार्यवाही झाल्‍यानंतर नियम 11 नुसार अंतिम मतदार यादी  प्रसिध्‍द करण्‍यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000

आषाढी एकादशी निमित्त
सोमवारी स्थानिक सुट्टी
नांदेड, दि. 21 :-  शासन निर्णयाद्वारे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सन 2018  साठी स्थानिक सुट्ट्या निश्चित केल्या आहे. त्यानुसार सोमवार 23 जुलै 2018 रोजी आषाढी एकादशी (पंढरपूर यात्रा) निमित्त नांदेड जिल्ह्यात स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सोमवार 23 जुलै रोजी आषाढी एकादशी (पंढरपूर यात्रा) निमित्त या दिवशी नांदेड जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालये व इतर शैक्षणिक संस्थांना ही सुट्टी लागू राहिल.
हा आदेश नांदेड जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये, तसेच केंद्र शासनाची कार्यालये आणि बँका यांना लागू राहणार नाही, असेही या अधिसुचनेत म्हटले आहे.
मंगळवार 6 नोव्हेंबर 2018 रोजी नरक चतुर्दशी निमित्त नांदेड जिल्ह्यास स्थानिक सुट्टी राहील. यापुर्वी कंधार ऊर्ससाठी बुधवार 4 एप्रिल 2018 रोजी स्थानिक सुट्टी देण्यात आली होती.
000000


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 7.19 मि. मी. पाऊस
नांदेड, दि. 21 :- जिल्ह्यात शनिवार 21 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 7.19 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 115.04 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 414.69 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 43.67 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 21 जुलै 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 10.13 (489.33), मुदखेड- 8.00 (578.01), अर्धापूर- 18.00 (435.68), भोकर- 9.25 (574.25), उमरी- 3.67 (463.65), कंधार- 11.83 (405.16), लोहा- 1.50 (414.82), किनवट- 1.00 (392.12), माहूर- 2.25 (542.25), हदगाव- 3.00 (537.31), हिमायतनगर- 1.33 (516.35), देगलूर- 8.50 (156.83), बिलोली- 16.20 (276.00), धर्माबाद- 0.67 (305.65), नायगाव- 2.00 (320.80), मुखेड- 17.71 (226.82). आज अखेर पावसाची सरासरी 414.69 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 6635.03) मिलीमीटर आहे.  
00000


  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...