Friday, November 24, 2017

दयाळा एवढे द्यावे, रंग फुलाचे जावे
-प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी
                                                     नांदेड ग्रंथोत्सवामध्ये रंगली काव्यमैफल
           
नांदेड दि. 24 :- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने आयोजित नांदेड ग्रंथोत्सव-2017 मध्ये सुप्रसिध्द ज्येष्ठ कवी प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक नामवंत कवींनी आपल्या कविता सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.
            किनवट येथील . मार्तंड कुलकर्णी यांनी प्रारंभी सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावरील पोवाडा गाऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सिंधुताईचे जीवनपट या पोवडयातून उलगडून दाखविला. भगवान अंजनीकर यांनी "दबलेला" आवाज, मनोज बोरगांवकर यांनी सादर केलेले "आत्महत्येपूर्वीचे स्वगत" रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन गेले. पूजा डकरे यांनी " क्षणक्षण आयुष्य " या कविताव्दारे आयुष्यात घडणाऱ्या घटनांची मांडणी केली. अशोक कुबडे यांनी "पत्र शेवटचे लिहीते आई" ही कविता तसेच अनिकेत कुलकर्णी या त्यांच्या सुरेल स्वरात गायीलेली गजल दाद मिळवून गेली. प्रा. रविचंद्र हडसनकर यांची "एक कविता गावाकडची" सर्वांना गावाकडील निखळ वातावरणात घेऊन गेली. महेश मोरे यांची "डिजीटल व्हिलेज ", देविदास फुलारी यांची "आम्ही आहोत ऑनलाईन" ही सुखद हास्य फुलवून गेली.
            काव्यमैफलीचे सूत्रसंचालक बापू दासरी  यांची "बापू म्हणे कचरा गेला" ही गजल तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी "अस्पर्शित ग्रंथाची व्यथा" ही कविता सादर केली.
            शेवटी काव्यमैफलीचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी "कधीही नष्ट होणारी जात ", "पुतळयाचे मनोगत" "दयाळा" या कवितेतून "दयाळा एवढे दान द्यावे, रंग फुलाचे जावे" ही कविता सादर करुन काव्यमैफलीचा अविस्मरणीय समारोप केला.

000000
ग्रंथोत्सवाकथाकथनाने आणली रंगत
           
नांदेड दि. 24 :- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेडच्यावतीने आयोजित नांदेड ग्रंथोत्सव-2017 मध्ये डॉ. जगदीश कदम यांचे अध्यक्षतेखाली कथाकथनाचा कार्यक्रम संपन्न झाला यात डॉ. नागनाथ पाटील, प्रा. नारायण शिंदे, प्रा. रविचंद्र हडसनकर, प्रा. शंभुनाथ कहाळेकर डॉ. शंकर विभूते यांनी कथा सादर केल्या.
            प्रा. शिंदे यांनी "मोठी माय" या कथेतून मोठी आई, तिच्याशी असलेले नातेसंबंध, मोठया आईची बिडीच्या व्यसनाची वाईट सवय त्यातून तिचा झालेला दु:खद अंत याचा मोठया वडीलांना बसलेला धक्का या कथेतून मांडून श्रोत्यांना भावनाविवश केले. प्रा. कहाळेकर यांनी विज्ञानकथा सादर करुन उपस्थितांच्या मनातील विज्ञानविषयीचे कुतूहल जागृत केले. प्रा. हडसनकर यांनी सादर केली "आईसकांडी" ही कथा सर्वांना खळखळून  हसवून गेली. या कथेत आईसकांडीसाठी मुलगा काय काय उपदव्याप करतो याचे अस्सल ग्रामीण चित्र प्रा. हडसनकर यांनी हुबेहुब साभिनय रंगविले.
            डॉ. विभूते यांनी आपल्या "आमदार गणप्या" या कथेतून एका भन्नाट युवकाची जीवनकथा भन्नाट पध्दतीने मांडून श्रोत्यांना मनमुराद हसविले. डॉ.नागनाथ पाटील यांनी "बाजार" या कथेतून गावाकडील बाजाराचे चित्रण उभे करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.
            कथाकथनाचे अध्यक्ष डॉ. कदम यांनी "मुडदे'' या कथेतून धिसाडी समाजाची व्यथा आपल्या हदयस्पर्शी सादरीकरणातून सादर केली. कथेतील पत्नीची घालमेल,पतीविषयीची तिची काळजी समाजातील वाईट नजर असलेल्या नराधमांबाबतची तिची कठोर पाऊले याबाबत डॉ. कदम यांनी सुरेख मार्मिक मांडणी केली. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी तर आभार राजेंद्र हंबिरे यांनी मानले.

00000
नांदेड-मुंबई-नांदेड विमानसेवा सुरु लाभ घेण्याचे आवाहन
मुंबई, दि. 24 : ‘उडानया योजनेत समाविष्ट असलेल्या नांदेड येथील विमानतळावरुन नांदेड-मुंबई-नांदेड अशी विमानसेवा सुरु झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी तसेच सामान्य प्रशासन विभागाने दिली आहे.
नांदेड येथील विमानतळावरुन ट्रु जेटया विमान कंपनीकडून दि. 16 नोव्हेंबर 2017 पासून दररोज नांदेड-मुंबई-नांदेड अशी एटीआर-72 विमानाद्वारे विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी या 72 आसनी विमानातील सुमारे 75 टक्के जागा भरण्यात आल्या होत्या.
नांदेड ते हैद्राबाद ही 72 आसनी विमानसेवा यापूर्वी दि. 27 एप्रिल 2017 पासून सुरू करण्यात आली आहे. आता नांदेड- मुंबई विमानसेवेमुळे नांदेड हे शहर मुंबई आणि हैद्राबाद या मोठ्या शहरांशी हवाई वाहतुकीद्वारे जोडले गेले आहे.
हैद्राबाद-नांदेड विमानसेवेंतर्गत हैद्राबाद येथून सकाळी 9 वाजता विमान प्रस्थान करुन नांदेड येथे सकाळी 10 वाजता आगमन, नांदेड येथून दुपारी 2.40 वाजता प्रस्थान आणि हैद्राबाद येथे दुपारी 3.40 वाजता आगमन असे वेळापत्रक आहे.
नांदेड- मुंबई विमानसेवेंतर्गत नांदेड येथून सकाळी 10.35 वाजता विमानाचे प्रस्थान होऊन मुंबई येथे दुपारी 12.10 वाजता आगमन, तर मुंबई येथून दुपारी 12.45 वाजता प्रस्थान आणि नांदेड येथे दुपारी 2.20 वाजता आगमन असे विमानसेवेचे वेळापत्रक आहे.
दि. 29 ऑक्टोबर 2017 ते 15 नोव्हेंबर 2017 या कालावधीत नांदेड विमानतळ तात्पुरता बंद ठेवून रनवे आणि टॅक्सीवेची दुरुस्ती करण्यात आली. आता 300 प्रवासी क्षमता असलेला हा विमानतळ आधुनिक सोयी-सुविधेसह सुसज्ज असून येथून रात्रीसुध्दा विमान उड्डाणे शक्य आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या विमानसेवेचा लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

००००
मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू
नांदेड, दि. 25 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून सोमवार 27 नोव्हेंबर पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून मंगळवार 26 डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000
गरीब, गरजू रुग्णांसाठी किनवट येथे
वैद्यकीय, दंत शिबिराचे मोफत आयोजन
नांदेड दि. 24 :- श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सोमवार 27 ते गुरुवार 30 नोव्हेंबर या कालावधीत आदिवासी भागातील गरीब व गरजू रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा किनवट येथे वैद्यकीय व दंत शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरास येणाऱ्या सर्व गरजू रुग्णांनी 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत नाव नोंदणी करुन दुपारी 2 ते 4 यावेळेत आरोग्य तपासणी करुन घ्यावी. तपासणी अंती रोगनिदान झालेल्या रुग्णांची 28 ते 30 नोव्हेंबर याकालावधीत आवश्यक ती शस्त्रक्रिया जिह्यातील नामांकित सर्जन व भूलतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली मोफत करण्यात येणार आहे. सोमवार 27 नोव्हेंबर रोजी शिबिरास श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड व डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार आहेत.
या आरोग्य तपासणी शिबिरात हैड्रोसील (अंडवृद्धी), हार्निया, अपेंडिक्स, शरीरातील सर्व गाठीची शस्त्रक्रिया, दंत शल्यचिकित्सा, रुग्णांचे एक्सरे, ईसीजी, सोनोग्राफी, रक्त तपासणी, ऑपरेशन व औषधोपचार मोफत करण्यात येईल. वैद्यकीय व दंत शिबिराचा गरीब, गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी केले आहे.

00000
आनंद शोधू नका ! निर्माण करा !
- ॲड. अनंत खेळकर
           
नांदेड दि. 24 :- सध्या धकाधकी ताणतणावाच्या वातावरणात जगताना आनदांचे क्षण दुर्लभ होत चालले असून याचे महत्वाचे कारण मनुष्य आनंदाचा शोध घेत असतो. तसे करता आनंद शोधण्यापेक्षा तो निर्माण करा, असे आग्रही प्रतिपादन प्रसिद्ध हास्य कलाकार अॅ. अनंत खेळकर यांनी केले.
            नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित नांदेड ग्रंथोत्सव 2017 अतंर्गत अकोला येथील ॲड. खेळकर यांचा तुफान विनोदी कार्यक्रम "माझ्याजवळ बसा खुदुखुदु हसा" चे आयोजन कुसुम सभागृह येथे बुधवारी करण्यात आले होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, अप्पर कोषागार अधिकारी नीळकंठ पांचगे जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी ॲड. खेळकर यांचे ग्रंथ स्फुर्तिचिन्हासह स्वागत केले.
            ॲड. खेळकर यांनी सभागृहातील प्रेक्षकांवर भुरळ पाडल्यागत सतत दीड तास त्यांची हसवणूक केली. मार्मीक इरसाल कविता, भन्नाट किस्से, शेरोशायरी यांच्या सादरीकरणासोबतच विनोदातून अंतर्मुखसुध्दा करण्यास त्यांनी भाग पाडले. रोजच्या जीवनात घडत असलेल्या प्रसंगातून विनोद कसा निर्माण हाेतो वा निर्माण करुन जगणे कसे आल्हाददायक करता येते हे त्यांनी सोदाहरण त्यांच्या उत्तम शैलीतून पटवून दिले. वैदर्भिय, मराठवाडा, पुणे मुंबई या भागातील पाहुणचाऱ्याच्या पध्दती, राहणीमान, नवरा-बायकोमधील काळानुरुप बदलत जाणारे प्रेम, मुलाच्या गुणवत्तेबाबत वडिलांना असलेला आत्मविश्वास, जुगाड टेक्नॉलाजी, मोबाईला अतिरेकी वापर, या सर्व विषयावर विनोदाची पेरणी करुन त्यांनी सभागृह टाळयांच्या कडकडाटाने हास्याच्या फुलबाज्याने गजबजून गेले हेाते. ॲड. खेळकर यांच्या या हास्य कार्यक्रमाचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घेऊन ॲड.खेळकर यांच्या विनोदी सादरीकरणाची अमीट छाप सर्व नांदेडकरांच्या मनावर कोरल्या गेली हे मात्र निश्चीत.
00000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...