Friday, November 24, 2017

ग्रंथोत्सवाकथाकथनाने आणली रंगत
           
नांदेड दि. 24 :- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेडच्यावतीने आयोजित नांदेड ग्रंथोत्सव-2017 मध्ये डॉ. जगदीश कदम यांचे अध्यक्षतेखाली कथाकथनाचा कार्यक्रम संपन्न झाला यात डॉ. नागनाथ पाटील, प्रा. नारायण शिंदे, प्रा. रविचंद्र हडसनकर, प्रा. शंभुनाथ कहाळेकर डॉ. शंकर विभूते यांनी कथा सादर केल्या.
            प्रा. शिंदे यांनी "मोठी माय" या कथेतून मोठी आई, तिच्याशी असलेले नातेसंबंध, मोठया आईची बिडीच्या व्यसनाची वाईट सवय त्यातून तिचा झालेला दु:खद अंत याचा मोठया वडीलांना बसलेला धक्का या कथेतून मांडून श्रोत्यांना भावनाविवश केले. प्रा. कहाळेकर यांनी विज्ञानकथा सादर करुन उपस्थितांच्या मनातील विज्ञानविषयीचे कुतूहल जागृत केले. प्रा. हडसनकर यांनी सादर केली "आईसकांडी" ही कथा सर्वांना खळखळून  हसवून गेली. या कथेत आईसकांडीसाठी मुलगा काय काय उपदव्याप करतो याचे अस्सल ग्रामीण चित्र प्रा. हडसनकर यांनी हुबेहुब साभिनय रंगविले.
            डॉ. विभूते यांनी आपल्या "आमदार गणप्या" या कथेतून एका भन्नाट युवकाची जीवनकथा भन्नाट पध्दतीने मांडून श्रोत्यांना मनमुराद हसविले. डॉ.नागनाथ पाटील यांनी "बाजार" या कथेतून गावाकडील बाजाराचे चित्रण उभे करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.
            कथाकथनाचे अध्यक्ष डॉ. कदम यांनी "मुडदे'' या कथेतून धिसाडी समाजाची व्यथा आपल्या हदयस्पर्शी सादरीकरणातून सादर केली. कथेतील पत्नीची घालमेल,पतीविषयीची तिची काळजी समाजातील वाईट नजर असलेल्या नराधमांबाबतची तिची कठोर पाऊले याबाबत डॉ. कदम यांनी सुरेख मार्मिक मांडणी केली. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी तर आभार राजेंद्र हंबिरे यांनी मानले.

00000

No comments:

Post a Comment

  महत्त्वाचे वृत्त  क्र.  108      चिकन, अंडी खाणे शंभर टक्के सुरक्षित नांदेडमध्ये बर्ड फ्लूची लागण नाही     ·           कोणत्याही अफवांना ब...