वृत्त
प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वाहनांची तपासणी
नांदेड, (जिमाका) दि. 13 :- येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाद्वारे 8 ते 12 नोव्हेंबर 2023 या कालावधीत 208 वाहनांची प्रदुषण नियंत्रण तपासणी करण्यात आली. यात 31 दोषी वाहनांवर कारवाई करून 10 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 115 व 116 मधील तरतुदीनुसार मान्यता प्राप्त वायु प्रदुषण तपासणी केंद्राकडून वाहनाची वायु प्रदुषण विषयक तपासणी करून वाहनाला प्रमाणपत्र देण्याविषयी तरतुद आहे.
मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी प्रदुषणकारी वाहनांवर कारवाई करून वायुप्रदुषणाला आळा घालण्याच्या हेतुने विविध विभागांना 15 डिसेंबर 1999 रोजी निर्णयाद्वारे निर्देश दिले आहेत. तसेच SUO MOTO जनहित याचिकेद्वारे 6 नोव्हेंबर 2023 रोजी आदेशामध्ये परिवहन विभागास प्रतिवादी केले आहे. सदर आदेशातील परिच्छेद क्र. 7 (i) अन्वये वाहनांची पीयुसी तपासणी मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार करण्याबाबत आदेशीत केलेले आहे.
त्याअनुषंगाने या मोहिमेमध्ये प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेडच्या वायुवेग पथकाद्वारे 8 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत 208 तपासलेल्या वाहनांपैकी 31 दोषी वाहनांवर कारवाई करून 10 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
0000