Tuesday, May 10, 2022

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी

एसटीपी प्रकल्पाचे केले कौतुक

 

·       असे प्रकल्प आणखी व्हावेत

·       विसावा गार्डन येथील सांडपाणी प्रकल्पाची पाहणी

 

नांदेड, (जिमाका) दि. 10 :- पर्यावरणाच्या दृष्टिने सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन त्याचा पूर्नवापर हा अत्यंत महत्वाचा आहे. बऱ्याच नगरात असे प्रकल्प नसल्याने ते पाणी थेट जवळ असलेल्या नदी-नाल्यात जाऊन मिसळते. जलस्त्रोतांचे प्रदूषण जर रोखायचे असेल तर एसटीपी प्रकल्पाशिवाय चांगला पर्याय नाही, असे प्रकल्प जागोजागी व्हावेत, असे सांगून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या एसटीपी प्रकल्पाचे कौतुक केले.

 

नांदेड महानगराच्या नागरी वस्तीतील सांडपाणी प्रक्रियेविना थेट नदीत जाऊन मिसळू नये या उद्देशाने नांदेड महानगरात उभारण्यात आलेल्या सांडपाणी प्रकल्पाची पाहणी आज राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष केली. यावेळी त्यांच्या समवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या प्रकल्पाबाबत मंत्री महोदयांना माहिती दिली.

 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे वाडी बु. येथील नांदेड उपजिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन समारंभानिमित्त आले होते. उद्घाटनापूर्वी त्यांनी आवर्जून या प्रकल्पाची पाहणी करून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व महानगरपालिकेचे कौतुक केले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी हा प्रकल्प अत्यावश्यक असल्याने मनपाला सूचना करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेने शहरात एक सर्वेक्षण करून प्रदूषित होणाऱ्या  ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प याची स्थान-निश्चिती केली. त्यामध्ये नऊ ठिकाणी हे प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि अवघ्या दहा महिन्यात त्यांची उभारणीही झाली.

 

नांदेड शहरात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, माता गुजरीजी विसावा उद्यान, स्नेहनगर पोलीस वसाहत, अबचल नगर वसाहत, असर्जन परीसर अशा नऊ प्रकल्पांमधून आजघडीला प्रक्रिया केलेले 2 हजार 210 केएलडी पाणी उपलब्ध होत आहे. आणखी नऊ प्रकल्पांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू असून त्याद्वारे 2 हजार 700 केएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. प्रक्रिया करून उपलब्ध झालेल्या या पाण्याचा वापर स्वच्छतागृहात फ्लश करण्यासाठी, तसेच विसावा उद्यानातील झाडांची जोपासना करणे, परीसराची स्वच्छता करणे, बांधकाम, ड्रेनेज लाईन साफ करणे यासाठी हे पाणी वापरले जात आहे. यामुळे महापालिकेच्या शुद्धीकरण केलेल्या पाण्याची या कामासाठीची मागणी कमी झाली आहे.  तसेच महत्वाचे म्हणजे हे अशुद्ध पाणी नदीत मिसळणे थांबल्यामुळे गोदावरी नदीच्या जलप्रदूषणात घट झाली आहे.

000000  



 आज दोन कोरोना बाधित  

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 36 अहवालापैकी 2 अहवाल पॉझीटीव्हआढळले. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 807 एवढी झाली असून यातील 1 लाख 112 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 1 हजार 291

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 81 हजार 285

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 807

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 112

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक

000000

 मुदखेड येथे पक्के शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी शिबिराचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :-  प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने मुदखेड या तालुक्याच्या ठिकाणी पक्के व शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी शिबिराचे आयोजन मंगळवार 17 मे 2022 रोजी आयोजन करण्यात आले आहे.

 

या दिनांकामध्ये स्थानिक सुट्टी जाहीर झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास शिबिराच्या तारखेत बदल होऊ शकतो. या शिबिराचा लाभ घेणाऱ्यांनी गुरुवार 12 मे 2022 रोजी कार्यालयीन वेळेस अपॉईमेंट सुरू राहतील. सर्व अर्जदारांनी अपॉईमेंट घेवून कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्रासह या शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभाग नांदेड यांनी केले आहे.

00000

सर्वसामान्यांच्या जीवनमानाला समृद्ध करणाऱ्या

सेवा-सुविधा कसोशीने उपलब्ध करून देऊ

-    पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

 

· वाडी बु. येथे उपजिल्हा रुग्णालयाचे मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन

·   जिल्हा प्रशासनाच्या तत्परते बद्दल गौरव

 

नांदेड, (जिमाका) दि. 10 :- मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे आव्हान परतवून लावण्यासाठी राज्यातील आरोग्याच्या सेवा-सुविधा भक्कम करणे आणि दुसऱ्या बाजुला राज्याच्या कानाकोपऱ्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे यावर आपल्या महाविकास आघाडी सरकारने भर दिला. हे करत असतांना सर्वसामान्यांच्या हिताचे जे वचन आम्ही दिले त्याची पूर्तता करण्याची पराकाष्टा आम्ही घेत आहोत. नांदेड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे हे भूमिपूजन त्याचेच द्योतक असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

 

वाडी (बु.) येथे नांदेड उपजिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी  राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आरोग्य मंत्री राजेश टोपे, खासदार हेमंत पाटील, खासदार संजय जाधव, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार संतोष बांगर, महापौर जयश्री पावडे, माजी मंत्री कमलकिशोर कदम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, वाडी बु. सरपंच अश्विनी रमेश लोखंडे, दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, आनंदराव बोंढारकर, उपसरपंच साधनाताई पावडे, गोविंदराव नागेलीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

राज्याच्या सामान्यातील सामान्य जनतेशी बांधिलकी ठेऊन आम्ही विकास कामांकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहत आहोत. आव्हाने अनेक आहेत. नैसर्गिक आव्हानांची यात भर पडत चालली आहे. पाण्याचे दुर्भीक्ष, वातावरणातील बदल, वाढती उष्णता हे प्रश्न डोळ्यापुढे ठेऊन भविष्यातील महाराष्ट्राचे नियोजन करावे लागणार आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक विभागाला एक समर्थ नेतृत्व लाभलेले आहे. आपल्या अनुभवाच्या, कौशल्याच्या बळावर राज्याच्या विकासाचा मार्ग आम्ही अधिक भक्कम करू, असा विश्वास पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

 

या राज्यातील शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात घेण्यासाठी शासनाने कोणतीही कमतरता ठेवली नाही. आपल्या बळीराजाला कर्ज मुक्त करण्याचे आम्ही वचन दिले होते. कोरोना सारख्या आव्हानातही आम्ही ते पाळले. राज्यातील सर्वांच्या स्वाभिमानाशी निगडीत असलेले भव्य शिवस्मारक हे आमचे स्वप्न आहे. यासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची तरतूद आपण केलेली आहे. पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी लक्षात घेता त्यादृष्टिने आम्ही प्रयत्नशील असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेचा त्यांनी आवर्जून उल्लेख करत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे कौतुक केले.

 

नांदेड जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिने परिपूर्ण वैद्यकीय सेवा-सुविधा असाव्यात यावर आरोग्य विभागानेही लक्ष दिले आहे. उपजिल्हा रुग्णालयाची मागणी ही जिल्ह्यासाठी आवश्यक असून आता या नवीन रुग्णालयामार्फत अधिकाधिक लोकांच्या आरोग्याची काळजी घेता येईल, त्यांच्यावर उपचार करता येतील. ग्रामीण भागाच्यादृष्टिने हे उपजिल्हा रुग्णालय महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. व्हिडिओ कॉन्फरसिंन्सगद्वारे त्यांनी या उद्घाटन सोहळ्यात सहभाग घेऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.

 

सवंग लोकप्रियतेपेक्षा सर्वसामान्य जनतेला ज्या सुविधा गरजेच्या आहेत, ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या जाणून घेऊन, त्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी विचारविमर्ष करून त्या योजनांसाठी झटणारा हा आमचा नेता-कार्यकर्ता आहे, या शब्दात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आमदार बालाजी कल्याणकर यांचे कौतूक केले. फार आवश्यकता जर कुठे असेल तरच आक्रमकपणा व ऐरवी सदैव संयमीपणा ठेवल्याने कल्याणकरांची उपजिल्हा रुग्णालयाची मागणी शासनाने मान्य करण्यात कोणती कसूर ठेवली नसल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

 

नांदेड हे आरोग्याच्या सेवा-सुविधांबाबत एक हब म्हणून नावारुपास आले आहे. यात शासकीय रुग्णालयापासून येथील वैद्यकिय महाविद्यालयाने विश्वासर्हता निर्माण केली आहे. याच बळावर नांदेड येथे केवळ नांदेड जिल्ह्यातीलच नव्हे तर शेजारील हिंगोली, परभणी या व इतर जिल्ह्यातूनही उपचारासाठी रुग्णांचा इकडे ओढा आहे. आज ज्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन झाले आहे ते रुग्णालय पुर्णा, वसमत या तालुक्यांनाही आता अधिक सोईचे ठरणार असल्याने या भागातील लोकप्रतिनिधी म्हणून मला आनंद असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले.

 

कोरोनाच्या काळात मी दिल्लीतील एम्सची परिस्थिती स्वत: डोळ्यांनी पाहिली आहे. एम्स हॉस्पिटलच्या व्हरांड्यात जागा शिल्लक नव्हती. उपचाराला प्रतिसाद न दिल्याने मृत रुग्णांची संख्या काळजी करणारी होती. अशा स्थितीत महाराष्ट्र मात्र अत्यंत संयमाने उपलब्ध असलेल्या व्यवस्थेला सोबत घेऊन कोरोनाशी धैर्याने लढत होता. यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी जे नियोजन केले, जो कृतीआराखडा तयार केला, टीम तयार करून कुठेही न डगमगता सर्वसामान्य जनतेचा जो विश्वास संपादन केला याला तोड नाही असेही खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले. माहूर येथील रोप वे, औंढा नागनाथ येथील पर्यटन सुविधा आणि नांदेड येथील त्यादृष्टिने इतर सेवा-सुविधा याकडे त्यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधले.

 

नांदेड जवळील वाडी बु. परिसर, निळा, लिंबगाव, रहाटी, मालेगाव रोड, पासदगाव, कासारखेड, पुर्णा रोड, भावसार चौक, फरांदेनगर, पावडेवाडी या भागातील जवळपास 1 ते दीड लाख नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाकडे जाणे हे मोठ्या कसरतीचे आहे. या भागातील लोकांना आपल्या जवळपास रुग्णालयाची सुविधा असावी ही रास्त मागणी होती. सर्वसामान्यांच्या भावना लक्षात घेऊन या रुग्णालयासाठी आम्ही धरलेला आग्रह शासनाने मान्य करून युद्ध पातळीवर यासाठी जागाही उपलब्ध करून दिली. सर्वसामान्य लोकांच्या सेवेकरीता आता एक नवीन सुविधा लवकरच उपलब्ध होत आहे, याचा मनस्वी आनंद असल्याच्या भावना आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केल्या.

 

यावेळी माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी आमदार कल्याणकर यांच्या कार्यशैलीचे कौतूक केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी आपल्या प्रास्ताविक केले.  

000000






  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...