Friday, September 5, 2025

 विशेष लेख :

सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड :  प्रतापगड 

सह्याद्रीच्या उंचसखल डोंगररांगांमध्येदाट जंगलांच्या कुशीत आणि नागमोडी घाटांच्या वळणावर अभिमानाने उभा असलेला प्रतापगड हा मराठा इतिहासातील एक सोनेरी पान आहे. या गडाचे सामरिक महत्त्व केवळ त्याच्या उंचसखल भौगोलिक रचनेत नाहीतर आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्या आणि घाटांवर ठेवलेल्या नियंत्रणातही दडलेले आहे. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस 13 कि.मी. वर हा किल्ला असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची 1,092 मी. आहे. पूर्वेकडील बाजूस 340 मी. आणि पश्चिमेकडे 870 मी. खोल दरी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी खोरे जिंकल्यानंतर मोरो त्रिंबक पिंगळे यांना 1656 मध्ये हा किल्ला बांधून घेण्याची आज्ञा दिली.

प्रतापगड हा बालेकिल्ला आणि त्याच्या सभोवतालचा खालचा भागअशा दोन प्रमुख भागात विभागलेला आहे. डोंगराच्या शिखरावर असलेल्या बालेकिल्ल्यात राजवाडासदरकेदारेश्वर मंदिरेपाण्याच्या टाक्या आणि धान्य-रसद साठवणीसाठीच्या कोठाऱ्या यांसारखी महत्त्वाची बांधकामे होती. तर दक्षिण व पूर्व उतारावर बांधलेल्या खालच्या भागात पहिली तटबंदी आणि प्रचंड बुरुज शत्रूला दरीतच अडकवून ठेवण्यासाठी होती.

मुख्य किल्लामाची आणि बालेकिल्ला असे या किल्ल्याचे तीन भाग होतात. मुख्य किल्ला व बालेकिल्ला भागांत तलाव असून संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याच्या चोहोबाजूंस भक्कम तटबंदी व बुरूज आहेत. बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ 3,660 चौ. मी.तर मुख्य किल्ल्याचे 3,885 चौ. मी असून दक्षिणेकडील बुरूज 10 ते 15 मी. उंचीचे आहेत. त्यांपैकी रेडकाराजपहाराकेदार इ. बुरुजांचे अवशेष टिकून आहेत. बुरूज वैशिष्ट्यपूर्ण असून निमुळत्या डोंगर धारेच्या शेवटी आहे. या भागाला माची म्हणतात. कारण अशाच स्वरूपाचे बांधकाम राजगड (सुवेळा व संजीवनी)तोरणा ( झुंजार) या किल्ल्यांवरील माच्यांना आहे. किल्ल्याची तटबंदी काही ठिकाणी तब्बल 40 फूट उंच असून तिच्या भक्कम रचनेमुळे प्रतापगड अभेद्य बनला होता. संपूर्ण बांधकाम काळ्या पाषाणात केले गेले आहे. गडाच्या उंच बुरुजांवरून जावळीच्या खोऱ्यातील डोंगर-दऱ्यांवर सतत नजर ठेवता येत असेत्यामुळे शत्रूच्या हालचाली वेळेत ओळखणे सोपे होत असे.

मुख्य किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे पार करून जावे लागते. दोन्ही दरवाजांवर शरभाच्या प्रतिमा दिसतात. दोन दरवाजे पार केल्यावर तुळजा भवानीचे मंदिर आहे. या देवालयासमोर दोन उंच दीपमाळा आहेत. त्या जवळच नगारखान्याची इमारत आहे. भवानी देवीचे मूळ मंदिर दगडी गाभाऱ्याचे होते. 1820 मध्ये सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी तेथे लाकडी मंडप बांधला.

अरुंदनागमोडी चढणाऱ्या वाटा आणि दारांच्या पुढे लपवलेले मजबूत अडथळे यामुळे कुणालाही सरळपणे गडावर प्रवेश करणे शक्य नव्हते. महादरवाजा तर संरक्षणकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. गोमुखी शैलीत बांधलेला हा दरवाजा रचनेत इतका कुशल होता कीअरुंद मार्गाने आत येणाऱ्या शत्रूंना दोन्ही बाजूंच्या बुरुजांतून सहज हल्ल्याच्या टप्प्यात आणले जाई.

प्रतापगडाचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे त्याची सुसंरचित जलव्यवस्था. किल्ल्यावर चार प्रमुख पाण्याच्या टाक्या आहेत. यापैकी दोन बालेकिल्ल्यात तर दोन खालच्या भागात आहेत. पावसाचे पाणी साठवण्यासाठी नैसर्गिक उतारांचा कुशलतेने वापर करण्यात आला होता. त्यामुळे गडावरील लोकसंख्येला वर्षभर पुरेल इतका पाणीपुरवठा व्हायचा. ही योजना मराठ्यांच्या अभियांत्रिकी व व्यूहनीती कौशल्याचा अद्वितीय नमुना ठरते.

प्रतापगडचे ऐतिहासिक महत्त्व अफझलखान छत्रपती शिवाजी महाराज भेट व त्याप्रसंगी झालेला अफझलखानाचा वध या घटनेमुळे वाढले (1659). छत्रपती राजाराम महाराज सुद्धा जिंजीस जात असताना प्रथम प्रतापगडास आले. स्वातंत्र्योत्तर काळात या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. त्याचे अनावरण 1957 च्या नोव्हेंबर महिन्यात तत्कालीन पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनी केले.

       आजही हजारो लोक केवळ त्या क्षणाशी नाते जोडण्यासाठी प्रतापगडावर भेट देतात. गडावर दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अफझलखान भेटीचे नाट्यरूप सादरीकरणसांस्कृतिक कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी निगडित उपक्रम यामुळे प्रतापगड महाराष्ट्राच्या अस्मिता आणि सांस्कृतिक एकतेचे केंद्र ठरतो.

प्रतापगड मराठ्यांच्या धैर्यरणनीती आणि स्वराज्याच्या स्वप्नाचा जिवंत साक्षीदार आहे. सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला हा गड आजही भूतकाळ आणि वर्तमान यांना जोडणारा एक अढळ दुवा आहे.

युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा मानंकन दिले असून त्यात प्रतापगडाला विशेष स्थान मिळाले आहे. त्यामुळे प्रतापगड आज केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता जगाच्या सांस्कृतिक वारशाचा एक अनमोल ठेवा म्हणून गौरवला जातो.

 

- संजय डी.ओरके

विभागीय संपर्क अधिकारी,

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,

मंत्रालयमुंबई.

००००

 विशेष वृत्त :

राज्यातील 93.51 टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण;

उर्वरित विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीसाठी विशेष शिबिरे

मुंबईदि. : राज्यातील दोन कोटी चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी 93.51 टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण शालेय शिक्षण विभागामार्फत पूर्ण झाले आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि आधार क्रमांकाच्या प्रमाणीकरणाकरीता विभागामार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. आता उर्वरित विद्यार्थ्यांची प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (आधार)(UIDAI) सहकार्याने विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

राज्यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करुन अशा आधारधारक मुलांची नोंद संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांमार्फत सरल प्रणालीअंतर्गत करण्यात येते. शिक्षण विभागाकडील विविध लाभाच्या योजनांचा लाभ सर्व पात्र विद्यार्थ्यांना देण्यासाठी देखील आधार क्रमांक प्रमाणीकरण आवश्यक आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाबाबत शासनाच्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये समावेश करण्यात आला असून विद्यार्थ्यांची आधार पडताळणी करण्याचे काम प्राधान्याने करण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. शिक्षण विभागाने प्रत्येक गटसाधन केंद्रावर दोन असे एकूण 816 आधार संच उपलब्ध करुन दिलेले आहेत. विविध माध्यमाच्या शाळांमधून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि आवश्यक दुरुस्ती दोन्‍ही कामे सध्या गटस्तरावर सुरू आहेत. तथापिआधार प्राधिकरणामार्फत विद्यार्थ्यांच्या आधारकार्डवरील माहितीमध्ये विसंगती आढळून येत असल्यामुळे पडताळणी प्रलंबित राहत आहे.

राज्यातील विविध माध्यमांच्या शाळांमधून 2 कोटी 4 लाख 63 हजार 392 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत यापैकी 1 कोटी 91 लाख 35 हजार 296 विद्यार्थ्यांची नावे आधार प्राधिकरणाकडील माहितीशी जुळत असल्याने वैध ठरली आहेत. उर्वरित पाच लाख 27 हजार 602 विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड उपलब्ध नाहीत. तर, 63 हजार 009 विद्यार्थ्यांची आधार पडताळणी प्रलंबित आहे. तसेच, 7 लाख 37 हजार 485 विद्यार्थ्यांचे आधार अवैध ठरले आहेत.

बालकांचे पाचव्या वर्षी व पुन्हा पंधराव्या वर्षी आधार बायोमेट्रिक अद्ययावत करणे आवश्यक असल्याने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याकरिता विशेष मोहीम राबविण्याची सूचना केली आहे. तसेच सर्व शाळांनाही आवाहन करण्यात आले आहे. याकरिता प्राधिकरण व शिक्षण मंत्रालयाने संयुक्त उपक्रम राबवत युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस’ (UDISE+) या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार बायोमेट्रिक अपडेटची स्थिती उपलब्ध करून दिली आहे. या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची आधार प्रमाणित माहिती यापुढे बंधनकारक असून त्याचा उपयोग विविध योजना व विद्यार्थी लाभांशी जोडण्यात येणार आहे. तसेच NEET, JEE, CUFT यासारख्या स्पर्धा व विद्यापीठ परीक्षांमध्ये नोंदणी करताना विद्यार्थी व त्यांच्या पालकांना अडचणी येऊ नयेत याकरिता वेळेत बायोमेट्रिक अपडेट करणे महत्त्वाचे असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

आधार अद्ययावत करणे ही प्रक्रिया शाळांमधून शिबिरांच्या माध्यमातून अधिक वेगाने पूर्ण होऊ शकते. या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागामार्फत शालेय शिक्षण आयुक्तांना आधार प्राधिकरणाच्या मदतीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिबिरे आयोजित करण्यात यावीत आणि आधारची नोंदणी व आधार अद्ययावत करणे याबाबत सर्व संबंधितांना आवाहन करण्यात यावे असे कळविले आहे. यामुळे राज्यातील उर्वरित विद्यार्थ्यांची आधारशी संबंधित माहिती संलग्नित करण्यासाठीविद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाच्या माहितीमधील विसंगतीत्यामधील त्रुटी/ तफावत दूर करून आधार क्रमांक वैध करण्यासाठी व त्याकरिता येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी या विशेष मोहिमांमध्ये आधार प्राधिकरणाची नक्कीच मदत होणार आहे.

००००

बी.सी.झंवर/विसंअ/

 वृत्त क्र. ३५८१

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून

आतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

·         ,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

 

मुंबई, दि. ५ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान ७१५९ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांतून तब्बल ३ लाख २६ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने आणि विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लाखो नागरिकांपर्यंत मोफत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचला.

तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या ९,९६० रुग्णांना तज्ज्ञांकडे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले. तसेचनागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली असून ९५ रक्तदान शिबिरांतून एकूण ६,८६२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या अभियानात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षमहात्मा फुले जन आरोग्य योजनाशासकीय वैद्यकीय महाविद्यालयेजिल्हा रुग्णालये तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. राज्यभरातील मोठ्या संख्येतील गणेश मंडळांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य करून लोकाभिमुख उपक्रम अधिक परिणामकारक करण्यास हातभार लावला.

२८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ दरम्यान ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानात मोफत आरोग्यसेवा :

•          एकूण आरोग्य शिबिरे : ७,१५९

•          एकूण लाभार्थी रुग्ण : ३,२६,००१

•          एकूण पुरुष लाभार्थी : १,५६,५६०

•          एकूण महिला लाभार्थी : १,४१,१०८

•          लहान बालक लाभार्थी : २८,३३३

•          संदर्भित रुग्ण (पुढील उपचारासाठी पाठवलेले) : ९,६६०

•          एकूण रक्तदान शिबिरे : ९५

•          एकूण रक्तदाते : ६,८६२

महाराष्ट्रातील ३.२६ लाख नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला असून,८६२ दात्यांनी रक्तदान करून समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

जिल्हानिहाय सर्वाधिक योगदान

•          सर्वाधिक शिबिरे : सोलापूर - १२३६

•          सर्वाधिक रुग्ण तपासणी :  सोलापूर – ६२,१८१

•          सर्वाधिक संदर्भित रुग्ण :  पुणे -१५९९

•          सर्वाधिक रक्तसंकलन :  पुणे - १६५०

•          बालकांचा सर्वाधिक सहभाग :  पुणे – ७८५०

गणेशोत्सवासारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कल्पना प्रत्यक्ष उतरविण्यात आली. ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून हजारो नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याची संधी मिळाली. तपासणीदरम्यान आढळलेल्या रुग्णांना पुढील मोफत उपचारही दिले जाणार असल्याचे श्री. रामेश्वर नाईक, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख यांनी कळविले आहे.

0000



वृत्त क्रमांक  940 

गणेश विसर्जनाच्या दिवशी उमरखेड ते हदगाव वाहतुकीमध्ये बदल 

नांदेड, दि. 5 सप्टेंबर :- हदगाव व उमरखेड शहरातील गणपती विसर्जन दरवर्षी पैनगंगा नदीमध्ये होते. गणेश विसर्जनाच्या दिवशी पैनगंगा नदी पुलावर गणेशभक्तांची मोठी गर्दी होते. याअनुषंगाने उमरखेड येथून हदगावकडे येणारी वाहतूक पैनगंगा नदीपासुन ते मल्लीनाथ हॉलपर्यंत शनिवार 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते रविवार 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 3 वाजेपर्यंत वळविण्यात येणार आहे. 

याबाबत मोटार वाहन कायदा 1999 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे. या अधिसुचनेनुसार संबंधीत सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हदगाव यांनी वाहतुकीच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.  

00000

वृत्त क्रमांक 939

नांदेड तालुक्यात १५ सप्टेंबरपर्यंत ई-पीक पाहणी

एमएसडब्लू व बीएसडब्लू विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ई पीक पाहणी होणार

नांदेड, दि.५ सप्टेंबर:- ई-पीक पहाणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व उप विभागीय  अधिकारी नांदेड डॉ. सचिन खल्लाळ  यांच्या मार्गदर्शना नुसार

नांदेड तालुक्यात ग्रामीण भागात  ई-पीक पहाणी करण्यासाठी जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र सिडको नांदेड येथील एमएसडब्लू व बीएसडब्लूच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य  घेण्यात येणार आहे. याबाबत या विद्यार्थ्यी यांना  नियोजन भवन नांदेड येथे  नविन ई-पीक पहाणी (डीसीएस) अँपचे पीपीटीव्दारे प्रशिक्षण ४ सप्टेंबर रोजी देण्यात आले. 

तहसिलदार नांदेड संजय वारकड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत शेतकरी लॉगीन मधून ई पीक पाहणी पुर्ण  करून घेण्याबाबत सुचना केल्या.

ई पीक पाहणीच्या अनुषंगाने  तहसील कार्यालयाच्यावतीने सर्व बीएसडब्लू व एमएसडब्लूच्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण देण्यात आले . एका गावामध्ये एक किंवा दोन-तीन असे विद्यार्थ्यांची नेमणूक केली असून, संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी त्या विद्यार्थ्यांना समजावून सांगून त्यांचे सहकार्य घेऊन ई पीक पाहणी डीसीएसव्दारे आपल्या गावातील 100 टक्के करावयाचे आहे . अशा सुचना ग्राम महसूल अधिकारी व मंडळ  अधिकारी यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मुदतीत यशस्वी करावे असे आवाहन तहसिलदार  नांदेड यांनी केले.

विद्यार्थ्यांना या अँप व्दारे काम करतांना गाव पातळीवर  ग्राम महसूल अधिकारी (तलाठी),ग्राम पंचायत  अधिकारी (ग्रामसेवक) व  सहाय्यक कृषी अधिकारी (कृषीसहाय्यक) ,सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,पोलिस पाटील , महसूल सेवक (कोतवाल),ग्राम रोजगार सेवक,आपले सरकार सेतू संचालक व ग्राम पंचायत ऑपरेटर,सीएससी सेंटर चालक यांनी एमएसडब्लू महाविद्यालयातील  नियुक्त सहाय्यक विद्यार्थ्यांना मदत करावी व मार्गदर्शन करावे अशा सुचना दिल्या. जे विद्यार्थी उत्कृष्ट कार्य  करतील त्यांची प्रशासना कडून नोंद घेण्यात येईल असे सांगितले. जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य मुजावर व प्राध्यापक विदयाधर रेड्डी  व  एस एस शिंदे  यांनी महाविद्यालया तर्फे विद्यार्थ्यांकडून मुदतीत अँप व्दारे काम करून सहकार्य करू असे सांगितले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी ई पीक पहाणी डीसीएस अँप डाऊनलोड केले.या प्रशिक्षणास तहसिलदार नांदेड संजय  वारकड, परिविक्षाधिन तहसिलदार अभयराज ननजुंडे,नायब तहसिलदार महसूल  सुनिल माचेवाड,मंडळ अधिकारी तरोडा शिवानंद स्वामी,अ का सुरेखा सुरुंगवाड ,ग्राम महसूल अधिकारी एम के पाटिल,मनोजकुमार जाधव,दिलीप पवार व माधव शिराळे अदि उपस्थित होते.

नांदेड तालुक्यातील सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सोसायटीचे अध्यक्ष पदाधिकारी व प्रतिष्ठित व्यक्ती यांनी एमएसडब्लूचे विद्यार्थी आल्यानंतर त्यांचे टेक्निकल मार्गदर्शन घेऊन आपल्या गावतील ई-पीक पाहणी शंभर टक्के करावी असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.

००००००







वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...