Monday, March 20, 2017

दिव्यांग लाभार्थींना साहित्य खरेदी अनुदानाबाबत आवाहन 
नांदेड, दि. 20 :- जिल्ह्यात वय 18 वर्ष पूर्ण झालेल्या दिव्यांग व्यक्तींनी स्थानीक स्वराज्य संस्थांच्या स्वउत्पन्नातील अपंगासाठी राखून ठेवलेल्या 3 टक्के अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खाती जमा करता यावे, यासाठी त्यांनी खरेदी केलेल्या साहित्य व उपकरणाबाबतची माहिती तात्काळ त्या-त्या तालुक्यांच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावीत, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.
याबाबतच्या प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ज्या लाभार्थ्यांनी तालुका पंचायत समिती मार्फत अर्ज दाखल केले आहेत व ज्यांचे अर्ज पात्र झालेले आहेत अशा लाभार्थ्यांनी 24 मार्च 2017 पुर्वी अर्जामध्ये नमूद केल्यानुसार साहित्य, उपकरणाची मागणी केल्याप्रमाणे नियोजन विभागाच्या 5 डिसेंबर 2016 रोजीच्या शासन निर्णयान्वये संबंधित लाभार्थी यांनी खरेदी केलेल्या वस्तुची व सादर केलेल्या पावतीची शहानिशा करुन पूर्णपणे खातरजमा झाल्यावर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गत सुनिश्चित केलेल्या अनुदानाची रक्कम जमा करण्यात यावी, असे सुचीत केले आहे.
त्याप्रमाणे लाभार्थी यांनी 30 हजार रुपयापर्यंतचे साहित्य, उपकरणाची खरेदी करुन त्याची खरेदी पावती विस्तार अधिकारी यांच्या मार्फत गटविकास अधिकारी तालुका पंचायत समिती यांचेकडे जमा करावी अन्यथा लाभार्थीं यांना सदर योजनेचा लाभ दिला जाणार नाही.  पात्र लाभार्थी यांची यादी तालुका पंचायत समिती यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यानुसार योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यात येईल, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी कळविले आहे.

0000000
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष
निवडीसाठी आज विशेषसभा
नांदेड दि. 20 :- नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष उपाध्‍यक्ष पदाच्‍या निवडसाठी मंगळवार 21 मार्च 2017 रोजी दुपारी 2 वा. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात विशेषसभा बोलाविण्यात आली आहे. त्यासाठी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक विभागाने केले आहे. या निवडसभेचे पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सुरेश काकाणी काम पाहणार आहे.   
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात निवडणूक विभागाने म्हटले आहे की, नांदेड जिल्‍हयातील सर्व नवनिर्वाचित जिल्‍हा परिषद सदस्‍यांना मंगळवार 21 मार्च 2017 रोजी होणा-या जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष  पदाच्‍या निवड प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याबाबत संबंधित तहसिलदार यांच्या कळविण्यात आले आहे.  त्यानुसार जिल्‍हयातील सर्व नवनिर्वाचित सदस्यांना सूचित करण्‍यात येते  जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष उपाध्‍यक्ष पदाच्‍या निवड प्रक्रियेसाठीची विशेषसभा मंगळवार 21 मार्च 2017 रोजी दु. 2.00 वा. जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्‍हाण सभागृह येथे आयोजित केलेली आहे. या निवडीसाठी इच्छुकांना नामांकनपत्रे सकाळी दहा ते  दुपारी बारा या कालावधी पिठासीन अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी यांच्याकडे दाखल करता येणार आहेत. याविशेषसभेस उपस्थित राहतांना सर्व नवनिर्वाचित जिल्‍हा परिषद सदस्‍यांनी निवडून आल्‍याचे प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र सोबत ठेवावे, असे आवाहनही करण्‍यात आले आहे.

000000
डिजीटल प्रदानांतर्गत शुक्रवारी
नांदेडमध्ये डिजीधन मेळावा
जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात कॅशलेसप्रात्यक्षिकांची दालने
नांदेड दि. 20 :- केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या धोरणानुसार डिजीटल प्रदान मोहिमेअंतर्गत डिजीधन मेळावा शुक्रवार 24 मार्च 2017 रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन परिसरात हा मेळावा होणार आहे. मेळाव्याच्या पुर्वतयारीबाबत आज जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी बचत भवन येथे आढावा बैठक घेतली.
बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, कृषि विकास अधिकारी पंडितराव मोरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर, यांच्यासह महापालिका, विविध बँकांचे, डिजिटल पेमेंटशी निगडीत संस्था आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डिजीधन मेळाव्याचा मुख्य कार्यक्रम नियोजन भवनमध्ये होणार आहे. या मेळाव्यात डिजीटल प्रदानाशी निगडीत बँका, तसेच विविध व्यापारी कंपन्या, शासकीय विभाग आदी सहभागी होणार आहेत. त्यासाठी सुमारे पन्नासहून अधिक दालनांची उभारणी करण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रात दहा वाजता मेळाव्यात सहभागी दालनांचे उद्गाटन होईल. त्यानंतर दुपारच्या सत्रात साडे तीन वाजता मेळाव्यासाठी निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात भाग्यवान विजेत्याची (लकी ड्रॅा) काढण्यात येणार आहे. या विजेत्यांना मुख्य समारंभात सन्मानितही करण्यात येणार आहे.
 रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच डिजीटल व्यवहारांची माहिती व्हावी या उद्देशाने आयोजित या मेळाव्यात डिजीटल व्यवहार करणाऱ्यांसाठी भाग्यवान बक्षीस विजेत्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. मेळाव्यात बँका, आधार क्रमांकाशी निगडीत तसेच विविध डिजीटल प्रदान क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या, मोबाईल कंपन्या, खते, इंधन आदी कंपन्याही सहभागी होणार आहेत.  याठिकाणी डिजीटल प्रदानाच्या व्यवहारांची प्रात्यक्षिके तसेच खरेदी आदीबाबत माहिती दिली जाणार आहे. मेळाव्यास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...