Monday, March 20, 2017

डिजीटल प्रदानांतर्गत शुक्रवारी
नांदेडमध्ये डिजीधन मेळावा
जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात कॅशलेसप्रात्यक्षिकांची दालने
नांदेड दि. 20 :- केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या धोरणानुसार डिजीटल प्रदान मोहिमेअंतर्गत डिजीधन मेळावा शुक्रवार 24 मार्च 2017 रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण नियोजन भवन परिसरात हा मेळावा होणार आहे. मेळाव्याच्या पुर्वतयारीबाबत आज जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी बचत भवन येथे आढावा बैठक घेतली.
बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, कृषि विकास अधिकारी पंडितराव मोरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर, यांच्यासह महापालिका, विविध बँकांचे, डिजिटल पेमेंटशी निगडीत संस्था आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डिजीधन मेळाव्याचा मुख्य कार्यक्रम नियोजन भवनमध्ये होणार आहे. या मेळाव्यात डिजीटल प्रदानाशी निगडीत बँका, तसेच विविध व्यापारी कंपन्या, शासकीय विभाग आदी सहभागी होणार आहेत. त्यासाठी सुमारे पन्नासहून अधिक दालनांची उभारणी करण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रात दहा वाजता मेळाव्यात सहभागी दालनांचे उद्गाटन होईल. त्यानंतर दुपारच्या सत्रात साडे तीन वाजता मेळाव्यासाठी निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात भाग्यवान विजेत्याची (लकी ड्रॅा) काढण्यात येणार आहे. या विजेत्यांना मुख्य समारंभात सन्मानितही करण्यात येणार आहे.
 रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच डिजीटल व्यवहारांची माहिती व्हावी या उद्देशाने आयोजित या मेळाव्यात डिजीटल व्यवहार करणाऱ्यांसाठी भाग्यवान बक्षीस विजेत्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. मेळाव्यात बँका, आधार क्रमांकाशी निगडीत तसेच विविध डिजीटल प्रदान क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या, मोबाईल कंपन्या, खते, इंधन आदी कंपन्याही सहभागी होणार आहेत.  याठिकाणी डिजीटल प्रदानाच्या व्यवहारांची प्रात्यक्षिके तसेच खरेदी आदीबाबत माहिती दिली जाणार आहे. मेळाव्यास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...