Monday, January 6, 2020


ध्येय निश्चित करून पत्रकारिता करा
-  लेखा अधिकारी नीळकंठ पाचंगे
नांदेड दि. 6 :-  पत्रकारितेत येताना अगोदर ध्येय निश्चित करा म्हणजे पत्रकारितेच्या उच्च शिखरावर पोहचण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन उच्च शिक्षण विभागातील लेखा अधिकारी निळकंठ पाचंगे यांनी आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यम शास्त्र संकुलात आयोजित दर्पण दिन कार्यक्रमात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे हे होते. यावेळी  प्रशासन अधिकारी राजेंद्र चव्हाण, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मीरा ढास यांची प्रमुख उपस्थिती होती.  
            यावेळी बोलताना श्री. पाचंगे म्हणाले की, पत्रकारिता क्षेत्र हे खूप विस्तारलेले आहे त्यात अनेक पैलू आहेत या पैकी कुठले पैलू आपण निवडणार आहोत ते पहिले निश्चित करा म्हणजे त्या क्षेत्रातील दिग्गज म्हणून तुम्ही पुढे येताल. तसे पाहिले तर कुठल्याही क्षेत्रात आता सहज काम करणे सोपे नाही त्या करिता त्या त्या क्षेत्राचा सूक्ष्म अभ्यास करणे गरजेचे आहे. प्रत्येक क्षेत्रात तज्ञ म्हणून काम केले तर त्या व्यक्ति व कामाचा ठसा समाज मनावर उठून राहतो. पत्रकारिता क्षेत्रात जाऊ इच्छिनार्‍यानी त्या दृष्टीने आपले ध्येय निश्चित करावे म्हणजे त्याचा फायदा समाज व सर्वांना होईल व यशाच्या उच्च शिखरावर जाण्यास मदत होईल.
            आचार्य अत्रे, बाळशास्त्री जांभेकर यांच्यासह अनेक पत्रकारांच्या कामांची उदाहरणे देत पत्रकारितेच्या उज्वल परंपरेची माहिती श्री. पाचंगे यांनी यावेळी दिली. प्रशासनातील अनुभव पत्रकारांसोबतच्या अनुभावातून आलेले प्रसंग यावेळी त्यांनी सांगून विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले. माध्यम शास्त्र संकुलात सुरू असलेल्या मीडिया स्टुडिओचे काम पाहून आपण प्रभावित झालो असून त्याचा लाभ या भागातील विद्यार्थ्यांना होईल असा विश्वास त्यांनी  व्यक्त केला.   
       यावेळी बोलताना प्रशासन अधिकारी राजेंद्र चव्हाण म्हणाले की, दर्पण नावा प्रमाणे काम पत्रकारांनी करावे आपल्या कामाचे मूल्यमापन आरशात करावे म्हणजे झालेल्या चुका सुधारण्यास मदत होईल व समाज उपयोगी कामे होतील, आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येकजण पत्रकार झाला आहे. सिटिजन जर्नलिजम चा हा जमाना आहे त्या मुळे मूळ पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांनी सजग राहण्याचे सध्याचे दिवस आहेत.  पत्रकार व या क्षेत्रात जाऊ इछिनार्‍यानी अगोदर समाजमानाचा अभ्यास करावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मीरा ढास यांचेही समयोचीत भाषण झाले. 
डॉ. दीपक शिंदे यांनी माध्यम शास्त्र संकुलात चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच आदर्श पत्रकारिता करण्यासाठी दिले जाणारे प्रशिक्षण याची माहिती दिली. पत्रकारितेच्या जाज्वल्य इतिहासाची सांभाळ  करणारे विद्यार्थी या संकुलात घडत आहेत हे त्यांनी सांगितले. मराठवड्यातील उपलब्ध नाही अशा  अत्याधुनिक अशा मीडिया स्टुडिओ चे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे यावेळी डॉ. शिंदे यांनी सांगितले. 
   माध्यम शास्त्र संकुलातील  विद्यार्थ्यानी तयार केलेल्या काही लघु चित्रपटाचे निरीक्षण ही मान्यवरांनी केले. विद्यार्थ्यानी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे ही मान्यवरानी दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुचिता जोगदंड यांनी तर आभार  शुभम नर्तावर यांनी मानले.
कार्यक्रमास डॉ. राजेंद्र गोणारकर,डॉ. सुहास पाठक, डॉ. सचिन नरंगले, डॉ. कैलास यादव,  डॉ. संतोष खामीतकर, डॉ.एस एन लोखंडे, प्रा.प्रीतम लोनेकर, प्रा. राहुल पुंडगे, प्रा. अनुजा बोकारे, ज्ञानेश्वर पुयड, बालाजी लुटे, दत्ता हंबरडे,आसाराम काटकर  यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.     
00000


पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर
यांना जिल्हा माहिती कार्यालया अभिवादन
           
नांदेड दि. 6 :-  नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त दर्पकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मीरा ढास यांनी पुष्पहार अर्पण करुन  विनम्र अभिवादन केले.
          यावेळी जिल्हा माहिती कार्यालयात आयोजीत कार्यक्रमास छायाचित्रकार विजय होकर्णे, विवेक डावरे, काशिनाथ आरेवार, शामराव सुर्यवंशी, अंगली बालनरस्या, श्रीकांत देशमुख यांनीही दर्पकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.  
0000


समाजाच्या हितासाठी सकारात्मक पत्रकारिता करावी
- पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर
नांदेड, दि. 6 :- समाजाच्या हितासाठी सकारात्मक पत्रकारिता व्हावी ज्यातून समाज घडविला जाईल, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय नांदेड व एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्यावतीने दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. गोविंद हंबर्डे तर प्रमुख पाहूणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार देवदत्त तुंगार, माधव अटकोरे, दै. सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी, प्रजावणीचे रवींद्र कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी मिरा ढास, प्राचार्य डॉ. गणेश जोशी, पत्रकार पंढरीनाथ बोकारे, बजरंग शुक्कला, गोपाळ देशापांडे, भारत दाढेल, महेंद्र देशमुख, सुरेश काशिदे, सुर्यकुमार यन्नावार, प्रविण खंदारे, संतोष जोशी, प्रशांत गवळे, सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे यांच्यासह विविध मुद्रीत, ईलेक्ट्रॉनिक, छायाचित्रकार माध्यम प्रतिनिधी व पत्रकारिता विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.
दर्पण दिनानिमित्त पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर म्हणाले की, पत्रकारितेने समाज आणि देश घडविला आहे. संघर्ष हा जीवनाचा पाया आहे. पोलीस आणि पत्रकार यांचे नाते अतूट आहे. पत्रकारांनी आपली लेखणी सकारात्मक विकासात्मक व सामाजिक न्यायासाठी वापरावी. समाजातील शोषित, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी लिखान करावे. नकारात्मक बाबी ह्या विकासाला अडसर ठरत असतात. त्यामुळे नकारात्मकता बाजूला ठेवून लिखाण करणे आवश्यक आहे. त्यांनाही अनेक घडामोडींची माहिती ठेवावी लागते, असे सांगून श्री मगर म्हणाले पाक्षिक, साप्ताहिक, वृत्तपत्र, इलेट्रॉनिक्स पत्रकारिता आणि आता सोशल मीडिया असा प्रवास सुरु आहे. हे सर्व जण समाज घडविण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु खरी बातमी प्रकाशित करणे ही जबाबदारी लक्षात ठेऊन पत्रकारिता व्हावी अशी अपेक्षाही पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी व्यक्त केली.
दै. सामनाचे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी यांनी दर्पण दिन व भित्तीपत्रकाचे महत्व सांगून पत्रकारांनी सत्यता, विश्वासर्हता, वस्तुस्थिती, मानवहित समजून लिखान केले पाहिजे.
जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मीरा ढास म्हणाल्या की , आरोग्य चांगले राहिले तर लिखाणातले कौशल्य आपण टिकून ठेऊ शकतो. माध्यमाला अनेक ठिकाणाहून माहितीचा स्त्रोत मिळत असतो. बातमीची सत्यता पडताळणी करुन लिखाण केले पाहिजे.
अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप करताना डॉ. गोविंद हंबर्डे यांनी माध्यम हे समाजाचे आधारस्तंभ आहे. माध्यम प्रतिनिधींनी आरोग्याकडे लक्ष देऊन या क्षेत्रात चांगले करिअर करावे, असे आवाहन त्यांनी केले.  
प्रास्ताविकात पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश जोशी यांनी पत्रकारितेतील आव्हाने स्विकारुन सकारात्मकतेच्या दिशेने पुढे गेले पाहिजे. तसेच वृत्तपत्र, पत्रकारिता महाविद्यालयाच्या वाटचालीची त्यांनी माहिती दिली.
सुरवातीला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. सूत्रसंचालन ऋषीकेश कोंडेकर यांनी केले तर आभार प्राध्यापक सतीश वाघरे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर प्रवीणकुमार सेलूकर, प्राध्यापक राजपाल गायकवाड, दिशा कांबळे , हनुमंत, जिल्हा माहिती कार्यालयाचे छायाचित्रकार विजय होकर्णे, विवेक डावरे, काशिनाथ आरेवार व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...