Tuesday, June 2, 2020


जिल्ह्यात आतापर्यंत 121 रुग्ण बरे
          नवीन तीन रुग्ण पॉझिटिव्ह
नांदेड (जिमाका) दि. 2 :- कोरोना विषाणुची बाधा झालेला उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथील एक रुग्ण आज बरा झाल्याने त्याला रुग्णालयातून सुट्टी दिली. या रुग्णावर डॉक्टरांनी यशस्वी उपचार केल्यामुळे या रुग्णाच्या परिवारातील सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात मंगळवार 2 जून रोजी सायं.  5  वा. प्राप्त झालेल्या 67 अहवालापैकी 60 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. नवीन 3 रुग्णांचा स्वॅब पॉझिटिव्ह आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकुण रुग्ण संख्या आता 152 झाली आहे. या तीन रुग्णांपैकी 7 वर्षांची मुलगी, 4 वर्षाचा मुलगा हे रुग्ण लोहार गल्ली नांदेड येथील तर 55 वर्षे वयाचा एक पुरुष रुग्ण कुंभारटेकडी सराफा बाजार नांदेड येथील आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 121 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत रुग्णालयात 23 रुग्णांवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली औषधोपचार सुरु आहेत. त्यातील तीन रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 52 65 वर्षांच्या दोन स्त्री रुग्ण तर 38 वर्षाचा एक पुरुष रुग्ण आहे.
आतापर्यंत एकूण 152 रुग्णांपैकी 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून 121 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरित 23 रुग्णांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 8 रुग्ण, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 12 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 2 रुग्ण, मुंबई येथे संदर्भित करण्यात आलेला एक रुग्ण आहे. उर्वरित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत.
कोरोना विषयी जिल्ह्याची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 40 हजार 922, घेतलेले स्वॅब 4 हजार 153, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 546, आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 3, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 152, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 155, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 28, मृत्यू संख्या 8, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 121, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 23, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 267 एवढी आहे.
दिनांक 1 जून  रोजी प्रलंबित असलेल्या 176 स्वॅब तपासणी अहवालापैकी 67 तपासणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित 109 अहवाल आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील. 2 जून रोजी  158 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यांचे अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
000000


शेतकरी गटांनी बांधावर खत वाटपासाठी घेतला पुढाकार
कृषी विभागाच्या पुढाकारातून 3 हजार शेतकरी गटाची स्थापना
नांदेड (जिमाका) दि. 1 :- खरीप हंगाम लक्षात घेता कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात शेतकऱ्यांची खते-बियाण्यांसाठी शहरात गर्दी होऊ नये म्हणून शेतकरी गटांनी हे साहित्य एकत्रित खरेदी करुन शेतकऱ्यांना ते थेट बांधावर उपलब्ध करुन देण्याचा सुरक्षित मार्ग अवलंबिला आहे. कृषि विभागाच्या पुढाकाराने खते व बियाणांचे प्रातिनिधिक वाटप गुंडेगाव येथे आमदार मोहन हंबर्डे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बांधावर करण्यात आले.
यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव, कृषि अधिकारी सुनिल सानप, कृषि सहाय्यक चंद्रकांत भंडारे, गुंडेगावचे पोलीस पाटील भगवान हंबर्डे, नामदेव हंबर्डे व निवडक शेतकरी उपस्थिती होते.
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटामार्फत खते-बियाणे खरेदी केल्यास आर्थिक बचतीसह कोरोनाच्या संसर्गापासून त्यांना दूर राहता येईल' असे याप्रसंगी आमदार मोहन हंबर्डे म्हणाले.  उपविभागीय कृषि अधिकारी श्री सुखदेव यांनी शेतकऱ्यांना बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रयोग, बिजप्रक्रिया, बियाणे निवड, खरीप हंगाम पूर्व तयारी याविषयी मार्गदर्शन केले.
गुंडेगावचे कृषि सहाय्यक चंद्रकांत भंडारे यांनी माती, पाणी परिक्षणाचे महत्व विषद केले व शेतकऱ्यांनी मृद तपासणी करुनच पिकांची लागवड करावी असे सांगितले.
कोरोना संकटापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करुन शेतकऱ्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कृषि सहाय्यक श्री. भंडारे यांनी आभार मानले.
नांदेड जिल्हयात सुमारे 3 हजार शेतकरी गट स्थापन करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला. आतापर्यंत 1 हजार 53 गटांनी 8 हजार 100 टन खते आणि 3 हजार 300 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवले आहेत. या गटांना कृषि विभाग सहाय्य करीत आहे. शेतकऱ्यांच्या वाहतुकीच्या खर्चात यामुळे बचत होण्यास मदत होत आहे. मोठ्या प्रमाणावर एकत्रित खरेदी केल्यामुळे किंमतीमध्ये बचत होत असून सध्या बाजारात मुबलक खते आणि बियाणे उपलब्ध आहेत.  चांगला पाऊस झाल्यावर पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.
00000

विद्यार्थ्यांचे प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज पाठविण्यास 6 जून पर्यंत मुदतवाढ



नांदेड (जिमाका) दि. 2 :-  भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील महाडिबीटी पोर्टल प्रणालीमधील महाविद्यालयाच्या लॉगीनवर विद्यार्थ्यांचे प्रलंबित असलेले अर्ज समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगिनवर फॉरवर्ड करण्यासाठी शनिवार 6 जून 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 
भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क प्रतिपूर्ती, व्यवसायिक पाठ्यक्रमाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेंतर्गत कनिष्ठ, वरिष्ठ अनुदानित, विनाअनुदानित, व्यावसायिक व बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी महाडीबीटी पोर्टल प्रणाली अंतर्गत www.mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे.
अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत महाडीबीटी पोर्टल प्रणालीमध्ये ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर लाभाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या / महाविद्यालयाच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करण्यात येते.
महाविद्यालयाच्या लॉगिनवर प्रलंबित असलेल्या अर्जाची महाविद्यालयस्तरावर छानणी करुन आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करीत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयाच्या लॉगीनमधून समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगीनवर फॉरवर्ड करण्यात यावे.
विनाअनुदानित व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज (हार्ड कॉपी) व आवश्यक कागदपत्रे समाज कल्याण कार्यालयास छाननी प्रक्रियेसाठी बुधवार 10 जून 2020 पूर्वी सादर करावेत.
कॉलेज लॉगिनवर प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज शनिवार 6 जून 2020 पर्यंत समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगिनवर फॉरवर्ड न केल्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत महाविद्यालयाची राहील, याची नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेडचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस मावळदकर यांनी केले आहे.
00000

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सर्व घटकांना • महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण निर्णय




नांदेड (जिमाका) दि. 2 :- कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत राज्यातील सर्वच कुटुंबाना उपचारासाठी मोफत लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोरोनाबाधित रुग्ण व कोरोनाची लागण नसलेल्या इतर आजाराच्या सर्व लोकांना या निर्णयामुळे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत.   
सुधारीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेशी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना संलग्नीकरण करून एकत्रित स्वरुपात 1 एप्रिल 2020 पासून अंमलात आली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी व सनियंत्रण राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत केली जाते.
शासकीय व पालिका रुग्णालयाचे सध्या कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत असल्याने शासकीय रुग्णालयांसाठी राखीव असलेल्या 134 उपचारांपैकी 120 उपचारांचा लाभ यापुढे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील अंगिकृत खाजगी रुग्णालयात 31 जुलै 2020 पर्यंत घेता येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत काही किरकोळ, मोठे उपचार व तपासण्या समाविष्ट नाहीत असे उपचार व तपासण्या सदरील योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये सर्व लाभार्थ्यांना सीजीएचएसच्या दरानुसार (NABH / NABL ) उपलब्ध करुन देण्यात येतील. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत 996 आजारावरील उपचाराची सोय असून, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत 1 हजार 209 आजारावर उपचार केले जातात.
राज्यातील जवळपास 85 टक्के नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत. 23 मे 2020 रोजी शासनाने काढलेल्या आदेशानुसार राज्यातील आता प्रत्येक व्यक्तीला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार घेण्याची सुविधा मिळणार आहे. आतापर्यंत योजनेचा लाभार्थी नसलेल्याना सुद्धा आता महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत लाभ मिळणार आहे.
या योजनेचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा व योजनेच्या अधिक माहितीसाठी अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्राशी संपर्क साधावा. दूरध्वनीद्वारे टोल फ्री नंबर 155388  किंवा 1800 233 22 00  या क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आरोग्य हमी सोसायटी नांदेडचे जिल्हा समन्वयक डॉ दिपेशकुमार शर्मा  यांनी केले आहे.
000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...