Tuesday, June 2, 2020


शेतकरी गटांनी बांधावर खत वाटपासाठी घेतला पुढाकार
कृषी विभागाच्या पुढाकारातून 3 हजार शेतकरी गटाची स्थापना
नांदेड (जिमाका) दि. 1 :- खरीप हंगाम लक्षात घेता कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात शेतकऱ्यांची खते-बियाण्यांसाठी शहरात गर्दी होऊ नये म्हणून शेतकरी गटांनी हे साहित्य एकत्रित खरेदी करुन शेतकऱ्यांना ते थेट बांधावर उपलब्ध करुन देण्याचा सुरक्षित मार्ग अवलंबिला आहे. कृषि विभागाच्या पुढाकाराने खते व बियाणांचे प्रातिनिधिक वाटप गुंडेगाव येथे आमदार मोहन हंबर्डे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बांधावर करण्यात आले.
यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव, कृषि अधिकारी सुनिल सानप, कृषि सहाय्यक चंद्रकांत भंडारे, गुंडेगावचे पोलीस पाटील भगवान हंबर्डे, नामदेव हंबर्डे व निवडक शेतकरी उपस्थिती होते.
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटामार्फत खते-बियाणे खरेदी केल्यास आर्थिक बचतीसह कोरोनाच्या संसर्गापासून त्यांना दूर राहता येईल' असे याप्रसंगी आमदार मोहन हंबर्डे म्हणाले.  उपविभागीय कृषि अधिकारी श्री सुखदेव यांनी शेतकऱ्यांना बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रयोग, बिजप्रक्रिया, बियाणे निवड, खरीप हंगाम पूर्व तयारी याविषयी मार्गदर्शन केले.
गुंडेगावचे कृषि सहाय्यक चंद्रकांत भंडारे यांनी माती, पाणी परिक्षणाचे महत्व विषद केले व शेतकऱ्यांनी मृद तपासणी करुनच पिकांची लागवड करावी असे सांगितले.
कोरोना संकटापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करुन शेतकऱ्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कृषि सहाय्यक श्री. भंडारे यांनी आभार मानले.
नांदेड जिल्हयात सुमारे 3 हजार शेतकरी गट स्थापन करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला. आतापर्यंत 1 हजार 53 गटांनी 8 हजार 100 टन खते आणि 3 हजार 300 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवले आहेत. या गटांना कृषि विभाग सहाय्य करीत आहे. शेतकऱ्यांच्या वाहतुकीच्या खर्चात यामुळे बचत होण्यास मदत होत आहे. मोठ्या प्रमाणावर एकत्रित खरेदी केल्यामुळे किंमतीमध्ये बचत होत असून सध्या बाजारात मुबलक खते आणि बियाणे उपलब्ध आहेत.  चांगला पाऊस झाल्यावर पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1158 नीती आयोगाच्या मूल्यांकनात #किनवट आकांक्षित तालुका राज्यातून चौथ्या क्रमांकावर तर देशातून 51 व्या क्रमांकावर ...