Tuesday, June 2, 2020

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सर्व घटकांना • महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण निर्णय




नांदेड (जिमाका) दि. 2 :- कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत राज्यातील सर्वच कुटुंबाना उपचारासाठी मोफत लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोरोनाबाधित रुग्ण व कोरोनाची लागण नसलेल्या इतर आजाराच्या सर्व लोकांना या निर्णयामुळे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत.   
सुधारीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेशी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना संलग्नीकरण करून एकत्रित स्वरुपात 1 एप्रिल 2020 पासून अंमलात आली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी व सनियंत्रण राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत केली जाते.
शासकीय व पालिका रुग्णालयाचे सध्या कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत असल्याने शासकीय रुग्णालयांसाठी राखीव असलेल्या 134 उपचारांपैकी 120 उपचारांचा लाभ यापुढे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील अंगिकृत खाजगी रुग्णालयात 31 जुलै 2020 पर्यंत घेता येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत काही किरकोळ, मोठे उपचार व तपासण्या समाविष्ट नाहीत असे उपचार व तपासण्या सदरील योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये सर्व लाभार्थ्यांना सीजीएचएसच्या दरानुसार (NABH / NABL ) उपलब्ध करुन देण्यात येतील. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत 996 आजारावरील उपचाराची सोय असून, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत 1 हजार 209 आजारावर उपचार केले जातात.
राज्यातील जवळपास 85 टक्के नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत. 23 मे 2020 रोजी शासनाने काढलेल्या आदेशानुसार राज्यातील आता प्रत्येक व्यक्तीला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार घेण्याची सुविधा मिळणार आहे. आतापर्यंत योजनेचा लाभार्थी नसलेल्याना सुद्धा आता महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत लाभ मिळणार आहे.
या योजनेचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा व योजनेच्या अधिक माहितीसाठी अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्राशी संपर्क साधावा. दूरध्वनीद्वारे टोल फ्री नंबर 155388  किंवा 1800 233 22 00  या क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आरोग्य हमी सोसायटी नांदेडचे जिल्हा समन्वयक डॉ दिपेशकुमार शर्मा  यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...