Wednesday, August 3, 2022

लेख

घराघरांनाही ओढ आता तिरंग्याची !

नागरिकीकरणामध्ये कोणतेही लोकशाहीप्रधान राष्ट्र हे नागरिकांना कायद्याने सज्ञान करण्यावर भर देत असते. शिक्षणाच्या माध्यमातून हा जबाबदार नागरिकत्वाचा पाया भक्कम होत असतो. या दृष्टिकोनातून आपण जेव्हा भारतीय म्हणून विचार करू तेव्हा स्वाभाविकच प्रत्येकाची मान आपल्या लोकशाही प्रगल्भतेबाबत उंचावल्याशिवाय राहणार नाही. पारतंत्र्यातील असंख्य जखमा अंगावर घेऊन आपण स्वतंत्र झालो. एका बाजुला फाळणीची ताटातूट तर दुसऱ्या बाजुला काही भागात पेटलेल्या दंगली भारताने स्वातंत्र्याच्या प्रक्रियेत अनुभवलेल्या आहेत.

स्वातंत्र्य लढ्याचा मुख्य पाया हा अहिंसात्मक लढ्याचा, सहनशिलतेचा, सहिष्णुतेला प्राधान्य देणारा होता. हे मूल्य प्राधान्याने जर कोणी दिले असेल तर ते म्हणजे महात्मा गांधी यांनी. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रेरणेसाठी अनेक प्रतिक म्हणून आपण जवळ केलीत. या प्रतिकात राष्ट्र भावनेला जागृत करणारी गीते होती, शांतता पूर्ण एकात्मता साधत सूत कातण्यासाठी वापरलेला चरखा होता, विदेशी कपड्यांचा त्याग करून आपल्या स्वदेशी कापसातून विणलेले जाडे-भरडे खादीचे कापड होते, डोक्यावर चढवलेली साधी टोपी सुद्धा होती. या प्रतिकांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला अधिक पवित्र केले, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या परीने दिलेले योगदान व त्यासाठी असलेली तळमळ आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. स्वातंत्र्यासाठी आपल्या पूर्वजांनी काय सहन केले नसेल? याची साक्ष जर घ्यायची असेल तर जालीयनवाला बाग येथील बंदुकीच्या गोळ्यांनी आपल्या पंजाबी बांधवांच्या शरीरातून चाळणी झालेल्या भिंती, मूठभर मीठ उचलले  म्हणून रक्तबंबाळ झालेली आपल्या पूर्वजांची डोकी, रस्त्यावर झेललेले चाबुकांचे फटकारे ते नंदूरबार येथे भर शहरात बाल झालेला आपला शिरीषकुमार… सारा आलेख किती घेणार आपण डोळ्यांपुढे ! सायमन परत जा पासून भारत छोडो आंदोलनापर्यंत.

स्वातंत्र्याच्या इतिहासाला जर आपण सतत प्रवाहित ठेवले तर यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांप्रती, हुतात्म्यांप्रति आणि स्वातंत्र्याच्या मूल्याप्रति आपल्याला अधिक प्रामाणिक व राष्ट्राशी कटिबद्ध होता येईल. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील पाऊलखुणांना जपत ते मूल्य, ती प्रेरणा, ती राष्ट्र भक्ती, ती कटिबद्धता, त्यावेळी एकसंघ होऊन आपल्या पूर्वजांनी जपलेली एकात्मता आणि आपल्या राष्ट्राप्रती कर्तव्य तत्परता जर पुढच्या पिढीपर्यंत अधिक घट्ट पोहोचवायची असेल तर आपल्याला अधिक जबाबदार भूमिका बजवावी लागेल.

ही भूमिका प्रगल्भ करण्यात स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, मराठवाडा मुक्ती दिन व इतर प्रासंगिक दिनानिमित्त होणारे ध्वजवंदन प्रत्येकाच्या मनामनात चैतन्य निर्माण करणारे आहे यात शंका नाही. कधी काळी कित्येक वर्षांपूर्वी शाळेच्या प्रभातफेरीत राष्ट्रप्रेमाचे प्रत्येकाने दिलेले नारे व ती पाऊलवाट प्रत्येकाच्या मनात ताजी असेल. या दिनानिमित्त ध्वजवंदनानंतर झालेले राष्ट‍्रगीत व नकळत तिरंग्याला सलामी देण्याकरिता भूवयांच्या वर हाताची टेकलेली बोटे व मनातील करुणा भाव कसा कोणाला विसरता येईल ? आजही राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर आपण बहुतांश शहारून जातो, उभे राहून तोंडाने राष्ट्रगीत म्हणतो.

स्वातंत्र्यदिनापासून ध्वजवंदनेला, राष्ट्रध्वजाला वेगळे पावित्र्य आहे ते यामुळेच. या देशातील प्रत्येक कष्टकऱ्यांपासून, श्रमिकांपासून, शेतकऱ्यांपासून, शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून, प्रत्येक नागरिकांपासून सर्वांच्या मनामध्ये राष्ट्रध्वजाबद्दल एक आदराची भावना आहे. हा आदर असणे स्वाभाविक आहे. यासोबत एक आदरयुक्त भीती  पण आहे. या भितीपोटी अनेक समज व गैरसमजही आहेत. माझ्या राष्ट्राचा ध्वज, तिरंगा हा ठराविक कार्यालय आणि शासकीय मैदानापुरताच मर्यादित न राहता तो माझ्या घरावरही फडकला जावा यात एक परिपक्वता आहे. नागरिक म्हणून प्रत्येकावर टाकलेला हा विश्वास आहे. हा विश्वास प्रत्येकाने आपल्या घरावर निसंकोचपणे तिरंगा लावून तो दृढ केला पाहिजे.

यात नियमांचा काटेकोरपणा जरूर आहे. प्रामुख्याने हिरवी बाजू ही जमिनीकडे असली पाहिजे तर केशरी बाजू ही आकाशाकडे असली पाहिजे. तिरंग्याचा आकार हा आडवा तीन व उभा दोन म्हणजेच 3 : 2 या प्रमाणात पाहिजे. तिरंगा हा प्लास्टिकचा असता कामा नये. यापूर्वी केवळ खादी, लोकर, सूताच्याच ध्वजाला मान्यता होती. हा निर्णय आता अधिक व्यापक करीत पॉलिस्टर, सिल्क यांचाही वापरता येईल. राष्ट्रध्वज हा घरोघरी उभारण्यासाठी त्याला दोरी लावून शाळेत आपण जसे पाहतो तसेच लावणे अभिप्रेत जरी असले तरी सर्वच इच्छूक नागरिकांना ते जमेलच असे नाही. त्या ऐवजी हर घर तिरंगा या उपक्रमात आता आपल्याला आपल्या घरावर हा तिरंगा काठीवर, घरात उपलब्ध असलेल्या पाइपच्या साह्याने उभारता येईल. फक्त पाइपला झेंडा लावल्यानंतर तो व्यवस्थित बांधून घेतला पाहिजे. जेणेकरून वाऱ्यामुळे तो उडून जाणार नाही.

तिरंग्यावर कोणत्याही प्रकारचे अक्षर किंवा चिन्ह लिहू नये. ज्या ध्वजस्तंभावर तो लावला जाणार आहे त्या स्तंभावर दुसरे काही लावू नये. राष्ट्रध्वज हा मळलेला अथवा फाटलेला किंवा चुरगळलेला असू नये. याचा अन्य कोणत्याही प्रकाराच्या शोभेसाठी वापर करता येणार नाही. राष्ट्रध्वज फाटणार नाही याची काळजी संबंधितांनी घेतली पाहिजे. थोडक्यात यातील भावना या अधिक स्वच्छ आहेत. तिरंग्याप्रति आदरयुक्त भावना हीच वास्तविक महत्त्वाची गोष्ट आहे.

लोकांनीही आपल्या तिरंग्याप्रती व या उपक्रमाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहून आपला सहभाग घेतला पाहिजे. यातील जे नियम आहेत ते समजण्यास क्लिष्ट नाहीत. यातील आदरयुक्त भावना महत्त्वाची आहे. आपला तिरंगा हा साहस, धैर्य याचे प्रतीक जरी असला तरी यातील सर्वसामावेशकता महत्त्वाची आहे. नियमांचा अधिक बाऊ न करता मनातली भिती व दडपण प्रत्येक नागरिकांनी बाजूला सारून हर घर तिरंगा उपक्रमाकडे बघायला हवे. या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला आपल्या घरावर तिरंगा फडकवून प्रत्येकाने साक्षीदार व्हायला हवे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या कालावधीत नागरिक म्हणून आलेले प्रगल्भत्व जपायला हवे. चला… घरोघरी तिरंगा लावण्यासाठी पुढे सरसावू यात. आपणही बदलाचा एक भाग बनू यात.

-विनोद रापतवार,
जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड




Attachments area

 नांदेड जिल्ह्यात 8 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 74 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, देगलूर 1, नायगाव 1, उमरी 2  तर ॲटीजन तपासणीद्वारे देगलूर 1 असे एकूण 8 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 215 एवढी झाली असून यातील 1 लाख 441 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 82 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 4  व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 12 असे एकूण 16  रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 59, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 21, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2 असे एकुण 82 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 13 हजार 483
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 92 हजार 879
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 215
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 441
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.31 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 00
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-82
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00
0000

 जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 13 ऑगस्ट रोजी

राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 3 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्यावतीने शनिवार 13 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व संबंधित पक्षकारांनी या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्रीकांत ल.आणेकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश श्रीमती डी.एम.जज यांनी केले आहे.

 
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी,
 मोटार अपघात दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज तसेच बॅंकांची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे या लोक न्यायालयात ठेवण्यात येणार आहेत.
याशिवाय 
या लोक अदालतीत विद्युत कंपनीविविध बॅंकाभारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पुर्व प्रकरणे तसेचघरकुल योजना संबधीचेमहानगर पालीकानगरपरिषद व गा्रमपंचायतचे थकीत मालमत्ताकराची दाखलपुर्व प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हयातील सर्व विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. पक्षकारांनी येताना आपले अधिकृत ओळखपत्र घेवून यावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 जिल्ह्यात आतापर्यत सरासरी 753.50 मि.मी. पावसाची नोंद


नांदेड (जिमाका) दि.
 3 :- जिल्ह्यात बुधवार 3 ऑगस्ट रोजी सकाळी 8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 0.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 753.50 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात बुधवार 3 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड- 00 (712.80), बिलोली-1.10 (729.10), मुखेड- 00 (683.30), कंधार-00 (693.50), लोहा-00 (682.30), हदगाव-00 (709.30), भोकर-00 (881.10), देगलूर-5.10 (646.50), किनवट-00 (859.90), मुदखेड- 00 (894.20), हिमायतनगर-00 (1029.30), माहूर- 00 (680.30), धर्माबाद- 00 (877.40), उमरी- 00(918.90), अर्धापूर- 00 (679.90), नायगाव-00 (683.80मिलीमीटर आहे.

0000

 मध केंद्र योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 3 :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशा पालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. यासाठी पात्र व्यक्ती / संस्थाकडुन अर्ज मागविण्यात आली आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, उद्योग भवन, एमआयडीसी परिसर शिवाजीनगरनांदेड या कार्यालयाशी भ्रमणध्वनी क्रमांक- 9921563053 किंवा दुरध्वनी क्रमांकावर 02462-240674 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

योजनेची वैशिष्टे- मध उद्योगांचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान. 50 टक्के स्वगुंतवणुक शासनाच्या हमी भावाने मध खरेदी/ विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती करणे आहे. तर या योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहेत. वैयक्तीक माधपाळ पात्रतेसाठी अर्जदार साक्षर असावा. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य. वय 18 वर्षापेक्षा जास्त व 10 दिवस प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. केंद्र चालक प्रगतशील मधपाळ व्यक्ती पात्रतेसाठी किमान 10 वी उत्तीर्ण, वय वर्ष 21 पेक्षा जास्त अशा व्यक्तीच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तिच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तिच्या नावे एक एकर शेती जमीन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेत जमीन असावी. लाभार्थ्यांकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्था पात्रतेसाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1 हजार चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. एक एकर शेत जमिन स्वमालकीची / भाडयाने घेतलेली असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावीत. अटी व शर्तीमध्ये लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापुर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहुन देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चीत केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहीलअसे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

00000

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्रातील निर्लेखित वस्तुचा 12 ऑगस्ट रोजी लिलाव

नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड येथील टेबल, खुर्च्या, रॅक, बेंच वापरात नसलेल्या व मोडकळीस आलेल्या निर्लेखित वस्तुंचा लिलाव करावयाचा आहे. जाहीर लिलावात भाग घेण्यासाठीच्या अटी व नियम कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यात आलेले आहेत. शहरातील इच्छुक व गरजु खरेदीदारांनी लिलावात भाग घेण्यासाठी शुक्रवार 12 ऑगस्ट 2022 रोजी कार्यालयास कैलास बिल्डिंग, वर्कशॉप रोड, कैलास नगर, नांदेड भेट द्यावी. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दु.क्र. (02462) 251674 वर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.

0000 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...