Sunday, September 26, 2021

नांदेड जिल्ह्यात 6 कोरोना बाधित तर 3 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 26 :-  जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 624अहवालापैकी 6 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 315 एवढी झाली असून यातील 87 हजार 648 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 16 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 651 एवढी आहे. आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 16 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 10, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3, व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 30 हजार 458

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 27 हजार 199

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 315

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 648

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 651

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-4

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-16

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

 नांदेड जिल्हयात राष्ट्रीय लोक अदालत संपन्न 

13 कोटी 46 लाख 90 हजार रक्कमेची विविध प्रकरणात तडजोड 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय नांदेडचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक तालुक्यासह कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय येथे पण त्या-त्या न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्हयात एकुण 4 हजार 206   प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली आहेत. यात 13 कोटी 46 लाख 90 हजार 622  इतक्या रक्कमेबाबत विविध प्रकरणत तडजोड झाली. 

प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी लोकअदालत यशस्वी झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.  लोक अदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हयातील सर्व न्यायाधीश, पॅनलवरील न्यायाधीश, वकील सदस्य, पॅनल सदस्य, विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यामध्ये दिवाणी, फौजदारी, एन.आय.अॅक्ट., बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात, भूसंपादन, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे  प्रकरणे व इतर, तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय यांच्या प्रकरणाचा व विविध बॅंकाचा तसेच विद्युत प्रकरणे, टेलिफोन, मोबाईल यांचे दाखलपुर्व प्रकरणांचा समावेश होता. तसेच तीन दिवस घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत 1 हजार 251 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहे. 

नांदेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष, जिल्हा सरकारी वकिल तसेच जिल्हयातील सर्व विधिज्ञ आणि विविध विमा कंपनी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभाग अधिकारी, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, न्यायालयीन व्यवस्थापक, प्रबंधक व कर्मचा-यांचे सहकार्य मिळाले. लोकअदालत यशस्वी व जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर, जिल्हा न्यायाधीश के. एन. गौतम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. एस. रोटे यांनी विशेष प्रयत्न केले.

00000

 आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व अवजारे वाटप 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना पिक विमा पोहोचावा यासाठी आम्ही आग्रही असून शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी केले. राज्य शासनाच्या कृषी  यांत्रिकीकरण योजनेंतर्गत महाडीबीटी पोर्टल वरील लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने वडवणा येथे ट्रॅक्टर व कृषी अवजारे वाटपाचा लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. 

यावेळी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायणराव कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवीशंकर चलवदे, तहसीलदार किरण अंबेकर, जि. प. सदस्य साहेबराव धनगे, बालाजीराव सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी सिद्धनाथ मोकळे, प्रकाश पाटील, सतिश सावंत आदी उपस्थित होते. 

याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना आश्वासित करुन कृषि कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर असल्याचे सांगितले. तहसीलदार किरण अंबेकर यांनी ई पीक नोंदणी बदल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रस्तावना तालुका कृषी अधिकारी सिद्धेश्वर मोकळे यांनी तर सुत्रसंचालन किशोर नरवाडे यांनी केले. 

या कार्यक्रमास तालुक्यातील सरपंच  देविदास सरोदे, वैजनाथ सूर्यवंशी हनुमान चंदेल, बालाजी पोपळे, सचिन पाटील, रोहिदास हिंगोले, गजानन कदम, घनश्याम सूर्यवंशी, विश्वास कदम रतन भालेराव, परमेश्वर पाटील,कमलेश कदम, प्रल्हाद जोगदंड,होनाजी जामगे,संतोष भारसावडे, गणेशराव बोखारे, गणेशराव शिंदे बाबासाहेब जोगदंड व तालुक्यातील व गावकरी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी ईरबाजी कदम, संतोष कदम, गोविंद कोकाटे, पांडुरंग कदम  संजय पोहरे ,नागोराव कदम मारोती कदम व सर्व गावकरी यांनी परिश्रम घेतले.

00000



 माहूर गडावरील 'रोप वे' ला गती ! राज्य शासन व 'वॅपकॉस'मध्ये करार 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- रेणुकामातेचे देवस्थान असलेल्या माहूर गडावर 'रोप वे' उभारण्यासंदर्भात राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या 'वॅपकॉस लिमिटेड' मध्ये करार झाला आहे. यामुळे  माहूर गडाच्या विकासकामाला गती मिळाली आहे. 

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत बांधकाम विभागाच्या औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे आणि 'वॅपकॉस'चे प्रतिनिधी दीपांक अग्रवाल यांनी औरंगाबाद येथे या करारावर स्वाक्षरी केली. माहूर गड येथील रेणुकादेवी मंदीर, श्री दत्त शिखर मंदीर, अनुसया माता मंदिरासाठी 'रोप वे' उभारणे तसेच रेणुकादेवी मंदिरासाठी 'फुट ओव्हर ब्रीज' 'लिफ्ट' उभारण्याच्या कामाला केंद्रीय मार्गनिधी अंतर्गत सुमारे 51 कोटी रूपयांची मंजुरी मिळाली आहे. 

या विकास कामाबाबतच्या करारावर स्वाक्षरी झाल्याने साडेतीन शक्तीपिठांमध्ये समावेश असलेल्या रेणुकामातेच्या मंदिरात 'रोप वे'ने जाऊन दर्शन घेण्याचे भाविकांचे स्वप्न लवकर पूर्णत्वास येत आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर विशेषतः वयोवृद्ध भाविकांचा त्रास कमी होणार असून, माहूर गडाला भेट देणाऱ्या नागरिकांमध्ये मोठी वाढ होणे अपेक्षित आहे. त्यातून या तीर्थक्षेत्राच्या विकासासमवेत जिल्ह्यातील पर्यटन स्थळाच्या विकासालाही आता गती मिळेली आहे.

0000



 जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह

ढगांच्या गडगडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 27 व 28 सप्टेंबर रोजी दोन दिवस नांदेड जिल्ह्यासाठी ऑरेंज व यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 27 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तर 28 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. 

वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना : काय करावे आणि काय करु नये विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. 

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. 

पूर परिस्थितीत : काय करावे आणि काय करू नये 

पूर येण्यापूर्वी : अफवांकडे दुर्लक्ष करा, शांत रहा, घाबरू नका. आपत्कालीन परिस्थितीसाठी एस.एम.एस. चा उपयोग करा. आपले मोबाईल फोन चार्ज करून ठेवा. हवामानातील बदलांची अद्ययावत माहितीसाठी रेडीओ ऐका, टी.व्ही. पहात रहा, वर्तमानपत्र वाचत रहा. गुरेढोरे /पशूच्या सुरक्षिततेची सोय सुनिश्चित करून घ्या. सुरक्षित जगण्यासाठी आवश्यक वस्तूंसह आपत्कालीन कीट तयार ठेवा. आपली कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू जलरोधक (वाटर-प्रूफ) बॅग मध्ये ठेवा. जवळपास असलेली निवारा/पक्के घराकडे जावयाचे सुरक्षित मार्ग जाणून घ्या. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशनाचे पालन करा. कमीत कमी एका आठवड्यासाठी पुरेसे खाण्याजोगे अन्न आणि पिण्यासाठी पाणी साठवा. पूर असलेल्या क्षेत्रातील कालवे, नाले, ड्रेनेज वाहिन्या यापासून नागरिकांनी सतर्क/जागरूक रहावे. 

पूर दरम्यान : पूर प्रवाहात प्रवेश करू नका. सिवरेज लाईन, गटारे, नाले, पूल,नदी, ओढे इत्यादी पासून दूर रहा. विद्युत खांब आणि पडलेल्या वीज लाईन पासून दूर रहा. ओपन ड्रेन किंवा धोक्याच्या ठिकाणी चिन्हे (लाल झेंडे किंवा बॅरीकेड्स) सह चिन्हांकित करा. पुराच्या पाण्यामध्ये चालू नका किंवा गाडी चालवू नका. लक्षात ठेवा, दोन फुट वाहणारे पुराचे पाणी मोठ्या मोटारींना सुद्धा वाहून नेऊ शकते. ताजे शिजलेले किंवा कोरडे अन्न खा. आपले अन्न झाकून ठेवा. उकळलेले/क्लोरीन युक्त पाणी प्या. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जंतुनाशकाचा वापर करा. 

पूर येऊन गेल्यानंतर : मुलांना पुराच्या पाण्यामध्ये किंवा जवळपास खेळू देऊ नका. कोणतीही खराब झालेली विद्युत वस्तू वापरू नका, त्यापूर्वी तपासणी करा. सूचना दिल्या असल्यास, मुख्य स्विचेस आणि विद्युत उपकरण बंद करा तसेच ओले असल्यास विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका. तुटलेली विद्युत खांब आणि तारे, तीक्ष्ण वस्तू आणि मोडतोड अथवा पडझड झालेल्या वस्तूंपासून सावध रहा. पुरातील पाण्यात वाहून आलेले अन्न खाऊ नका. मलेरिया पासून बचाव करण्यासाठी डासांच्या जाळीचा वापर करा. सापांबद्दल सावधगिरी बाळगा कारण पुरामध्ये सर्पदंश होण्याची शक्यता असते. जर गटार लाईन फुटली असेल तर शौच्यालयाच्या किंवा पिण्याच्या पाण्याचा नळ वापरू नका. आरोग्य विभागाने सांगितल्याशिवाय नळाचे पाणी पिऊ नका. 

पूर आल्यावर सुरक्षित ठिकाणी जाण्याची वेळ आल्यास : घरातील वस्तू  पलंगावर आणि टेबल्सवर ठेवा. शौच्यालयाच्या वाडग्यात वाळूच्या बॅग्स ठेवा आणि सांडपाणी परत येऊ शकते (बॅक फ्लो). ते टाळण्यासाठी सर्व ड्रेन होल झाकून ठेवा. वीज आणि गॅस कनेक्शन बंद करा. उंच मैदान/सुरक्षित निवारा येथे जा. आपत्कालीन कीट, प्रथमोपचार बॉक्स, मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे आपल्या बरोबर घ्या. खोल, अज्ञात पाण्यात प्रवेश करू नका; पाण्याची खोली तपासण्यासाठी काठी वापरा. जेंव्हा सक्षम अधिकारी आपल्या घराची तपासणी करून ते राहण्यास योग्य असल्याबाबत सांगतील व घरी परत जाण्याची परवानगी देतील तेंव्हाच घरात प्रवेश करा. कौटुंबिक संप्रेषण योजना बनवा. ओली झालेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ आणि निर्जंतुक करा, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...