Friday, February 21, 2025

वृत्त क्र. 779

मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य

-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन उत्साहात

 

स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून  फडणवीस

संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी -  तारा भवाळकर

 

नवी दिल्ली, दि.21 : भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजातच जन्मतात आणि समाजाच्या निर्मितीत मोठी भूमिका निभावतात. मराठी भाषेने महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील अनेक महापुरूषांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य केले आहेअसे गौरवोद्गार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे काढले. भारतीय भाषांमध्ये कधीही वैरभाव नव्हता. येथील सर्व भाषांनी एकमेकांना समृद्ध केले असून भाषिक भेदांपासून दूर राहून भाषा संवर्धित  करणे ही सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केले.

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससंमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवारसंमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ.तारा भवाळकरमावळते अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणेअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबेकार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळेकोषाध्यक्ष प्रकाश पागेसंमेलनाचे निमंत्रक संजय नहार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

साहित्य संमेलनासाठी आलेल्या सर्वांचे मराठीत स्वागत करून प्रधानमंत्री म्हणालेमराठी साहित्य संमेलन एका भाषेपुरते मर्यादित नाही. त्यास स्वातंत्र्य संग्रामाचा गंध असून तो एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे. 1878 पासून देशातील अनेक महान व्यक्तींनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.  या परंपरेशी जोडेले जाण्याचा मला विशेष आनंद आहे. जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून होत असलेले संमेलनाचे आयोजन प्रशंसनीय आहे. ज्ञानेश्वरांनी 'माझ्या मराठाचि बोलू कौतुकेअमृताते पैजा जिंकेअसे म्हटले आहे. मराठी भाषेवर माझे खूप प्रेम आहे. मराठी भाषा शिकण्याचे प्रयत्न मी निरंतर करीत आहे. अशा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम पूर्ण करण्याची संधी मिळाल्याचे मला मोठे समाधान आहेअसेही श्री मोदी यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे 300 वे जयंती वर्ष आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचे अमृत महोत्सवी  वर्ष साजरे केल्याच्या पार्श्वभुमीवर हे संमेलन होत आहेअसे सांगून पंतप्रधान म्हणाले, 100 वर्षापूर्वी राष्ट्रीय  स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. वेदापासून विवेकानंदांपर्यंत  नव्या पिढीला पोहोचविण्याचा संस्कारयज्ञ या माध्यमातून चालविला जात आहे. संघाच्या माध्यमातून मराठी भाषा आणि परंपरेशी जोडले जाण्याची मला संधी मिळाली.  मराठी एक परिपूर्ण भाषा असल्याचे स्पष्ट करताना प्रधानमंत्री म्हणालेमराठीत शुरतेसोबतच वीरता देखील आहेसौंदर्य आणि संवेदना दोन्ही आहेतसमानता आणि समरसता आहेमराठीत अध्यात्म आणि आधुनिकताही आहे. शक्तीभक्ती आणि युक्तीदेखील आहे. देशाला आध्यात्मिक ऊर्जेची गरज असतांना महाराष्ट्राच्या थोर संतांनी ऋषींचे ज्ञान मराठीत जनतेसमोर ठेवले. संत ज्ञानेश्वरसंत तुकारामरामदाससंत गाडगे महाराजतुकडोजी महाराजगोरा कुंभार आदी अनेक संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली. आधुनिक युगात ग.दि.माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या गीत रामायणाने समाजावर प्रभाव टाकला आहे.

गुलामीच्या शेकडो वर्षाच्या कालखंडात मराठी भाषा आक्रमणकर्त्यांपासून मुक्तीचा जयघोष बनली. छत्रपती शिवाजी महाराजसंभाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांसारख्या वीरांनी शत्रूंना मागे सारले. स्वातंत्र्य संग्रामात वासुदेव बळवंत फडकेलोकमान्य टिळकवीर सावरकरांनी इंग्रजांची झोप उडवली. मराठी साहित्याने देशप्रेमाची धारा प्रवाहीत झाली. या साहित्याने देशप्रेमाचा जागर केलाजनतेला नवी ऊर्जा दिली. अशा शब्दात मराठीची महती व्यक्त करून पंतप्रधान म्हणालेमराठी साहित्याने समाजातील वंचितशोषितांसाठी मुक्तीचे दरवाजे खुले करण्याचे कार्य केले. महात्मा ज्योतिबा फुलेसावित्रीबाई फुलेमहर्षि कर्वेडॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक मराठी समाजसुधारकांनी नवा विचार देण्यचे कार्य केले. मराठी भाषेने  समृद्ध दलित साहित्य देण्याचे कार्य केले. मराठी भाषेने प्राचीन विचारांसोबत  विज्ञानही मांडले. महाराष्ट्राने प्रागतिक विचार स्विकारले. मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. मुंबईने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला पुढे नेले.

देशाची भाषिक विविधता आपल्या एकतेचा मजबूत आधार असून मराठी याचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगताना प्रधानमंत्री म्हणालेभाषा एखाद्या आईप्रमाणे मुलांना नवा विचार देतेविकासाशी जोडते,  भेद करीत नाही. भाषेने माणूसकीच्या विचारांना अधिक व्यापक केले आहे. मराठीने इतर भाषेतून साहित्य स्विकारले आणि त्या भाषांनाही समृद्ध केले. अनेक चांगल्या रचनांचे मराठीत भाषांतर झाले आणि मराठीतीतील  उत्तम साहित्याचे इतर भाषात भाषांतर झाले. भाषांनी स्वत: सोबत इतरांना समृद्ध केले. हा समरसतेचा प्रवाह आणखी पुढे नेण्याची गरज आहे.

मराठीसोबत सर्व प्रमुख भाषेतून उच्च शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील युवक आता मातृभाषेतून उच्च शिक्षण घेवू शिकेलअसे सांगून प्रधानमंत्री म्हणालेसाहित्य समजाचा आरसा असतो. त्यामुळे साहित्य संमेलनसाहित्यिक संस्थांची देशाच्या विकासात महत्वाची भूमिका आहे.  मराठीतीत महान विभूतींनी स्थापन केलेले आदर्श आणखी पुढे नेण्याचे कार्य महामंडळ करेलअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजमाध्यमांद्वारे मराठी साहित्यात योगदान देणाऱ्या युवकांना प्रोत्साहन द्यावेयुवकांच्या स्पर्धांचे आयोजन करावेअसे आवाहन त्यांनी केले. 

शिवाजी महाराजांकडून स्वभाषेचा आग्रह आणि अभिमान – फडणवीस

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे संमेलन दिल्लीत होणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेजगभरातील मराठी माणसांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाले. परकीय आक्रमकांनी आपल्या भाषेला प्रदुषित करण्याचा प्रयत्न केल्यावर शिवाजी महाराजांनी राजकारभारात मराठीचा उपयोग करण्याचा निर्णय केला. सर्व फारसीऊर्दु शब्द वगळून मराठीचे शब्द आणण्याची परंपरा त्यांनीच सुरू केली. स्वभाषेचा अभिमान आणि आग्रह छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच आपण शिकलो आहोत. संमेलन होत असलेल्या तालकटोरा स्टेडिअममध्ये 1737 मध्ये  मराठ्यांनी आपली छावणी लावून दिल्ली जिंकली होती. आता आमचा मराठी माणूस आपल्या विचारांनी  दिल्ली जिंकणार आहे. विश्व मराठी संमेलनात पु.ल. देशपांडे म्हणाले होतेआपल्या मातृभाषेवर प्रेम करणाऱ्याला माया आणि वात्सल्य समजतं आणि तो दुसऱ्या भाषेवरही प्रेम करतो. मराठी भाषेने असे सर्वांना आपलेसे केले आहे. ती लोकभाषा  होऊनलोकसाहित्य निर्माण झाल्याने मराठी समृद्ध झाली.  संतांनी मराठी भाषा अधिक समृद्ध केली.  कलासाहित्यसंस्कृती मराठी माणसाच्या ठायी वसलेली आहे. त्यामुळेच वेगवेगळी साहित्य संमेलने महाराष्ट्रात होत असतातत्यात बोली भाषांना स्थान मिळत असते. दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठीची सेवा करण्याची संधी सर्वांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार असल्याचे सांगून 100 वे अधिवेशनही भव्य स्वरुपात साजरे करण्यात येईलअसेही श्री.फडणवीस म्हणाले.

संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी -  भवाळकर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विविध बोलींचे संमेलन आहे आणि पंतप्रधानांना भेट दिलेली विठ्ठलाची मूर्ती ही महाराष्ट्राच्या उदार संस्कृतीचे प्रतिक असल्याचे नमूद करून डॉ.तारा भवाळकर म्हणाल्यामराठी भाषेचे महत्व संत ज्ञानेश्वरसंत एकनाथांनी मांडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन करण्यापूर्वी संतांनी त्यासाठी पोषक भूमी तयार केली होती. मराठी भाषा संतांनी टिकवली. भाषा जीवनात असावी लागते. भाषा जैविक गोष्ट असूनती बोलली तर जीवंत रहाते. महाराष्ट्राला पांडुरंगांचे स्मरण मराठीतून करायला लावणाऱ्या संतांनी मराठी जिवंत ठेवली. ज्या दिवशी आईने पहिली ओवी बाळासाठी म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली  असेल. संतांनी विठ्ठलाशी संवाद साधतांना मराठी भाषेतून साधला. संत खऱ्या अर्थाने पुरोगामी विचाराचे होते.  या सर्वांना मिळून मराठी भाषेचे अभिजातपण आले आहे. मराठी बोलीतून पसरली म्हणून शिवाजीमहाराजांना खेड्यापाड्यातून मावळे मिळाले. भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असते. भाषा ही आपलेपण निर्माण करणारीजोडणारी गोष्ट असली पाहिजेतोडणारी नाही. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होण्यासाठी स्त्री असण्यापेक्षा गुणवत्त हा महत्वाचा आधार आहे. दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र विचारातूनसाहित्यातून जीवंत राहिला आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रेमाचा संदेश दिला जावाअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वर्तमान काळात साहित्यिकांवर महत्वपूर्ण जबाबदारी - पवार

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलेच साहित्य संमेलन दिल्ली येथे होत असून त्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याबद्दल विशेष आनंद असल्याचे सांगून श्री.पवार यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल श्री. मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणालेसंत परंपरेपासूनच सर्वसमावेशक विचार मांडण्याचे काम मराठी साहित्यिकांनी सातत्याने केले. महिला साहित्यिकांच्या योगदानाने मराठी साहित्य समृद्ध झाले आहे. समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम साहित्यिकांनी केले. साहित्यिकांची जबाबदारी वाढली असून समाजाला  समाजसुधारकांच्या विधायक मार्गाने नेण्याचे काम साहित्यिकाने करण्याची आवश्यकता आहे. नव्या पिढीला पुस्तकांशी बांधून ठेवण्यासाठी नव्या माध्यमांचा कल्पकतेने वापर करायला हवा. नव्या पिढीमध्ये साहित्याची गोडी टिकून राहिली तरच साहित्याला भवितव्य असेल. महिलांना अध्यक्षपदाचा मान  अधिकाधिक मिळाला तर महिला साहित्यिकांची परंपरा आणखी वेगाने पुढे जाईल. राजकारण आणि साहित्यातील संबंध पूर्वीपासून आहेते परस्पराला पूरक आहेत असेही श्री.पवार म्हणाले.

श्री.नहार म्हणालेदिल्लीतील साहित्य संमेलनाच्या माध्यमातून लेखणी आणि ग्रंथालयाचे महत्व पोहोचविणारे आहे. पंतप्रधानांच्या हस्ते संमेलनाचे होणारे उद्घाटन राज्याच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले जाईल. देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राच्या सकारात्मक भूमिकेची पायाभरणी करणारे हे संमेलन आहे.

प्रास्ताविकात श्रीमती तांबे यांनी संमेलनाच्या आयोजनाविषयी माहिती दिली. मराठी मनाचं देशाच्या राजधानीशी असलेलं नातं जवळ आणणारं हे संमेलन असल्याचे त्यांनी सांगितले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि रुकय्या मकबूल यांच्या नवकार मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शमिका अख्तर यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधवविधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदेमाजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेलोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर,  विनय सहस्रबुद्धे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.  

0000
















 वृत्त क्रमांक 209

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष

नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा दौरा 

नांदेड दि. 21 फेब्रुवारी :- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

शुक्रवार 21 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून रात्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम. शनिवार 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वा. शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूरकडे प्रयाण रोजगार मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2 ते 3.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 3.30 वा. नांदेड विमानतळाकडे प्रयाण व तेथून पुणेसाठी प्रयाण करतील.

00000

वृत्त क्रमांक 208

आनंदी विकास यांची आज 

आकाशवाणीवर मुलाखत

नांदेड दि.२१ फेब्रुवारी : नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे गीत नांदेडच्या सुप्रसिद्ध गायिका, संगीतकार आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केले आहे. दिल्ली अ.भा.साहित्य संमेलनात आज या गीताचे सादरीकरण झाले या गीताला संगीतबद्ध करणाऱ्या नांदेडकर संगीतकार आनंदी विकास यांची आकाशवाणीवर आज अकरा वाजता मुलाखत प्रसारित होणार आहे.

नांदेड आकाशवाणी च्या 101.1 मेगाहटसवर शनिवारी ही मुलाखत श्रोत्यांना ऐकता येणार आहे. नांदेड आकाशवाणी व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांनी या मुलाखतीची निर्मिती केली असून उद्या अकरा वाजता ही मुलाखत प्रसारित होणार आहे. नांदेडकर संगीतकाराला मिळालेली ही संधी व ज्येष्ठ गायकांना संगीतकार आनंदी विकास कसे संगीतबद्ध केले याबद्दलची माहिती या मुलाखतीतून ऐकायला मिळणार आहे.

जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी ही मुलाखत घेतली आहे. उद्या अकरा वाजता होणाऱ्या या प्रसारणाचा आनंद घ्यावा,असे आवाहन आकाशवाणीचे केंद्रप्रमुख विश्वास वाघमारे यांनी केले आहे. या गाण्यासाठी सुप्रसिद्ध गायक हरिहरन, शंकर महादेवन, मंगेश बोरगावकर, प्रियंका बर्वे,सागर जाधव, शमिमा अख्तार यांनी पार्श्वगायन केले आहे.या गीताचे संगीत संयोजन प्रथमेश कानडे, ध्वनिमुद्रन मन्मथ मठपती, ध्वनि मिश्रण आदित्य देशमुख यांनी केले आहे.

0000



वृत्त क्रमांक 207

महसूल राज्य क्रीडा स्पर्धेमध्ये 

आठ विभागांच्या झुंजी सुरू !

                                                                                                                                                                        नांदेड दि. 21 फेब्रुवारी : राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेमध्ये आज उद्घाटनानंतर विविध स्पर्धांच्या झुंजीला सुरुवात झाली.आठ विभाग एकमेकांसोबत लढणार असून यातील पहिल्या फेरीच्या लढती आज पहिल्या दिवशी नांदेड मधील विविध क्रीडागणावर पार पडल्या.

राज्यस्तरीय स्पर्धेच्या निमित्ताने जवळपास दोन हजारावर खेळाडू या ठिकाणी दाखल झाले आहेत. खोखो पासून लॉन टेनिस पर्यंत पाणी क्रिकेट पासून बुद्धिबळापर्यंत लढती सुरू झाल्या आहेत. 

आज उद्घाटनानंतर सर्वप्रथम क्रिकेटच्या सामन्याला सुरुवात झाली. काल संभाजीनगरचा पराभव करून पुण्याने पहिला सामना जिंकला होता . आज सकाळी पहिल्या सत्रात भूमि अभिलेख आणि नोंदणी व मुद्रक विभाग विरुध्द नाशिक विभाग या सामन्यात नाशिक विभाग हा 112 धावांनी विजयी झाला. तर दुपारच्या दुसऱ्या सत्रामध्ये कोकण विभाग विरुद्ध नागपूर विभाग यांच्यामध्ये क्रिकेटची लढत झाली हा सामना कोकण विभागाने जिंकला.

टेबल टेनिस पुरुष एकेरी मध्ये अमरावती विरुध्द छ. संभाजीनगर या लढतीत छ. संभाजीनगर तर नागपूर विरुध्द भुमी अभिलेख व नोंदणी मुद्रांक विभाग यामध्ये नागपूर विभागाने लढत जिंकली आहे.  

आज पहिला सामना सकाळी 11 वाजता इंदिरा गांधी मैदान स्टेडियम येथे पुरुषाच्या खो-खो स्पर्धेला सुरवात झाली. नागपूर विरुध्द अमरावती विभाग संघाच्या लढतीत नागपूर विभाग विजयी झाला. दुपार सत्रात नाशिक विरुध्द कोकण विभागात लढत झाली यात कोकण विभाग जिंकला. दुपार सत्रात छ.संभाजी नगर विरुध्द भुमी अभिलेख व मुद्रांक विभाग या लढतीत छ. संभाजी नगर यांनी हा सामना जिंकला. 

पुरुष फुटबॉल खेळात अमरावती विरुध्द नाशिक संघाच्या सामन्यात नाशिक विभाग एका गोलने विजयी ठरले. कबड्डी पुरुष यामधे नाशिक विरुध्द कोकण विभागाच्या सामन्यात कोकण विभागाने बाजी मारली. तर कॅरम पुरुष वैयक्तीक खेळामध्ये छ. संभाजीनगर विरुध्द कोकण विभागाच्या सामन्यात छ.संभाजीनगर विजयी ठरले. तसेच अमरावती विरुध्द नोंदणी मुद्रांक व भुमी अभिलेख विभाग यांच्या सामन्यात अमरावती विजयी ठरले आहे. 

बॅडमिंटन पुरुष एकेरी स्पर्धेत जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉलमध्ये कोकण विभाग विरुध्द नोंदणी मुद्रांक व भुमी अभिलेख सामन्यात कोकण विभागाने विजय मिळविला. तर नागपूर विरुध्द नाशिक सामन्यात नागपूर विजयी ठरले. अमरावती विरुध्द पुणे या सामन्यात अमरावती विभागाने विजय मिळविला.

 बॅडमिंटन पुरुष दुहेरी मध्ये अमरावती विरुध्द नाशिक सामन्यात अमरावती विभागाने बाजी मारली आहे. तर छ.संभाजी नगर विरुध्द कोकण विभाग यात छ. संभाजीनगरने बाजी मारली. 

लॉनटेनिस पुरुष एकेरीमध्ये नोंदणी मुद्रांक व भुमी अभिलेख विभाग विरुध्द नागपूर सामन्यात नागपूर विभागाने विजय मिळविला. छत्रपती संभाजीनगर विरुध्द नाशिक यांच्यामध्ये छ.संभाजीनगरने विजय मिळविला आहे. दुपार सत्रात  पुणे विरुध्द नोंदणी मुद्रांक व भुमी अभिलेख विभाग, नागपूर विभाग या सामन्यात पुणे विभागाने बाजी मारली आहे. कोकण विरुध्द अमरावती यामध्ये अमरावती विभाग विजयी झाला.  

लॉनटेनिस पुरुष दुहेरीमध्ये नोंदणी मुद्रांक व भुमी अभिलेख विभाग विरुध्द अमरावती सामन्यात अमरावती विभागाने विजय मिळविला. तर नाशिक विरुध्द कोकण सामन्यात कोकण संघाने विजय मिळविला. पुणे विरुध्द नागपूर संघाच्या लढतीत पुणे विभागाने बाजी मारली आहे. 

लॉनटेनिस एकेरी 45 वर्षावरील पुरुषाच्या सामन्यात अमरावती विरुध्द नागपूर विभागाच्या सामन्यात अमरावती विभाग विजयी ठरला आहे. तर लॉनटेनिस दुहेरी 45 वर्षावरील पुरुषाच्या सामन्यात नाशिक विरुध्द छ.संभाजी नगर सामन्यात छ.संभाजीनगर विभागाने बाजी मारली.तर नागपूर विरुध्द पुणे विभागाच्या लढतीत पुणे विभागाने विजय मिळविला आहे. 

खो-खो महिलामध्ये नागपूर विरुध्द पुणे या लढतीत नागपूर विभाग सरस ठरला. नाशिक विरुध्द कोकण सामन्यात कोकण संघ जिंकला. तर थ्रो बॉल महिला या खेळात नोंदणी मुद्रांक व भुमी अभिलेख विभाग विरुध्द नागपूर लढतीत नागपूर विभाग विजयी ठरला. तर अमरावती विरुध्द कोकण विभागाच्या लढतीत कोकण विभागाने बाजी मारली आहे.

कॅरम महिला वैयक्तीक खेळात छ.संभाजी नगर विरुध्द नागपूर सामन्यात छ.संभाजी नगर विभाग विजयी झाला. तसेच कोकण विरुध्द नोंदणी मुद्रांक व भुमी अभिलेख विभागाच्या लढतीत कोकण विभागाने विजय मिळविला आहे. पुणे विरुध्द नाशिक यात पुणे विभागा जिंकला. 

कॅरम महिला एकेरी मध्ये छ.संभाजीनगर विरुध्द नागपूर सामन्यात छ.संभाजी नगर विभागाने विजय मिळविला आहे. तर कोकण विरुध्द भुमी अभिलेख व मुद्रांक विभाग यामध्ये कोकण विभागाने बाजी मारली. कॅरम महिला दुहेरी मध्ये नागपूर विरुध्द छ. संभाजीनगर यामध्ये छ. संभाजीनगरने बाजी मारली. तर अमरावती विरुध्द कोकण या लढतीत कोकण विभागाने बाजी मारली. भूमी अभिलेख आणि नोंदणी व मुद्रांक विभाग विरुध्द पुणे या लढतीत पुणे विभागाने बाजी मारली. 

टेबल टेनिस महिला एकेरी मध्ये कोकण विरुध्द पुणे विभागाच्या लढतीत पुणे विभागाने विजय मिळविला, तर नाशिक विरुध्द अमरावती यामध्ये अमरावती विभागाने बाजी मारली. तसेच नागपूर विरुध्द छ. संभाजीनगर यात नागपूर विभागाने बाजी मारली. टेबल टेनिस महिला दुहेरीमध्ये नाशिक विरुध्द पुणे लढतीत पुणे विभागाने बाजी मारली तर नागपूर विरुध्द छ. संभाजीनगर विभागाने बाजी मारली. 

बॅडमिंटन महिला एकेरी सामन्यात पुणे विरुध्द नाशिक सामन्यात नाशिक विभाग तर नागपूर विरुध्द अमरावती लढतीत अमरावती विभाग जिंकला. तसेच छ. संभाजी नगर विरुध्द भूमी अभिलेख व नोंदण मुद्रांक विभागा या लढतीत छ. संभाजीनगरने बाजी मारली. रिंग टेनिसमध्ये नाशिक विभाग विजयी ठरला आहे.   

बॅडमिंटन महिला दुहेरीमध्ये भूमी अभिलेख व नोंदणी मुद्रांक विभाग विरुध्द अमरावती या लढतीत अमरावती विभागाने बाजी मारली. तर नागपूर विरुध्द नाशिक यात नाशिक विभागाने बाजी मारली. छ. संभाजीनगर विभाग विरुध्द पुणे या लढतीत छ. संभाजीनगर विभागाने बाजी मारली आहे. उद्याही मोठ्या प्रमाणात सर्व खेळांचे सामने होणार असून प्रेक्षक म्हणून सगळ्यांनाच या ठिकाणी परवानगी आहे.

00000















वृत्त क्रमांक 206

 

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत लाभाच्या योजनेसाठी  

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन  

 

नांदेड दि. 21 फेब्रुवारी :- केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना (न्युक्लिअस बजेट योजना) सन 2024-25 अंतर्गत गट अ व गट क मधील वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी मार्च 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावीतअसे आवाहन किनवट येथील प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कावली मेघना यांनी केले आहे. न्युक्लिअस बजेट योजना सन 2024-25 गट-अ अंतर्गत उत्पन्न निर्मितीच्या योजना व क गट मानव साधन संपत्ती विकासाच्या व कल्याणात्मक योजना करीता हे अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांच्या कार्यक्षेत्रातील नांदेड जिल्ह्यात समाविष्ठ टिएसपीओटीएसपी क्षेत्रातील लाभार्थी यांच्यामार्फत न्युक्लिअस बजेट योजना सन 2024-25 करीता निधी उपलब्ध होण्याच्या अधिन राहून पुढील योजनेकरीता अर्ज मागविण्यात आली आहेत.

 

-गट उत्पन्न निर्मितीच्या योजना 

·  शंभर टक्के अनुदानावर अदिम (कोलाम) शेतकऱ्यांना वन्यजीवापासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी तार कुंपन अर्थसहाय्य करणे (डीबीटीद्वारे).

· 85 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना वन्य जीवापासुन शेतीचे संरक्षण करण्यासाठी तारकुंपनासाठी अर्थसहाय्य करणे (डीबीटीद्वारे).

·   शंभर टक्के अनुदानावर अदिम (कोलाम) जमातीच्या शेतकरी लाभार्थ्यांना सिंचन सुविधे करीता शेतीमध्ये बोअरवेल करणे साठी अर्थ सहाय्य करणे (डीबीटीद्वारे).

·   85 टक्के अनुदानावर सर्वसाधारण अनुसूचित जमातीच्या शेतकरी लाभार्थ्यांना सिंचन सुविधे करीता शेतामध्ये बोअरवेल करणे साठी अर्थ सहाय्य करणे (डीबीटीद्वारे).

·  85 टक्के अनुदानावर सर्वसाधारण आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना तुषार सिंचन खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे (डीबीटीद्वारे).

·  85 टक्के अनुदानावर सर्वसाधारण आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना ठिबक सिंचन खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे (डीबीटीद्वारे).

·   100 टक्के अनुदानावर अदिम (कोलाम) जमातीच्या लाभार्थ्यांना शेळीगट (3 शेळी व 1 बोकड) खरेदी.

·    85 टक्के अनुदानावर सर्वसाधारण अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शेळीगट खरेदीसाठी अर्थसहाय्य करणे (डीबीटीद्वारे).

·  अदिम (कोलाम) जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना विविध व्यवसाय करणे करीता 100 टक्के अर्थसहाय्य देणे (डीबीटीद्वारे).

·         अदिम (कोलाम) जमातीच्या महिला बचत गटास मंगल कार्याकरीता लागणारे (मंडप संच व भांडी व संबधित साहित्य) भाडयाने देणे हा व्यवसाय करणे करिता 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य करणे डीबीटीद्वारे.

·  85 टक्के अनुदानावर आदिवासी महिला बचत गटास मंगल कार्या करीता लागणारे साहित्य (मंडप संच व मांडी व संबंधित साहित्य) भाडयाने देणे हा करणे करीता अर्थसहाय्य डीबीटीद्वारे.

·  85 टक्के अनुदानावर आदिवासी महिला बचतगटांना दालमिल स्थापन करणे करीता अर्थसहाय्य करणे डीबीटीद्वारे.

· 85 टक्के अनुदानावर आदिवासी सुशिक्षित युवकांच्या समुहांना-युवतीच्या समुहांना-बचतगटांना संगणक संचप्रिंटरयुपीएस व तत्सम साहित्य घेऊन सेतु केंद्र लावण्यासाठी अर्थ सहाय करणे.

·  आदिवासी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर विविध व्यवसाय करण्याकरीता अर्थसहाय्य करणे (नळ फिटींगइलेक्ट्रीकलअॅटोमोबाईलसुतारकाम व इतर पावसाय).

 

या योजनांचे अर्जआवेदन पत्र परिपुर्ण भरून मार्च 2025 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जि. नांदेड येथे सादर करावीत. अर्जासोबतअर्दादाराचे पासपोर्ट साईज फोटोअनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्रआधार कार्डबँकेचे खातेरहिवासीप्रमाणपत्रउत्पन्नाचे प्रमाणपत्रशेतीविषयक योजने करीता सात/बारासिंचन विषयक योजनेकरीता शेतात पाणी उपलब्ध असल्याचे तलाठी यांचे प्रमाणपत्रआधार लिंक असलेले मोबाईल क्र.बचत गटाच्या योजना करीता बचतगट नोंदणी प्रमाणपत्र व अर्जा सोबतअर्दाराराचे पासपोर्ट साईज फोटोसर्व सदस्याचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्रआधार कार्डबचतगटाचे बँकेचे खातेरहिवासी प्रमाणपत्रउत्पन्नाचे प्रमाणपत्र व मोबाईल क्रमांकअद्यावत केलेले राशन कार्ड 12 अंकी क्रमांकाचे व शासन वेळोवेळी विहित करतील असे कागदपत्र

 

क गटमानव साधन संपत्ती विकासाच्या व कल्याणात्मक योजना

वैद्यकीय व अभियांत्रिकी पदवी चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप घेण्यासाठी डी.बी.टी. व्दारे अर्थसहाय्य करणे. या योजनेकरीता अर्जदाराचे पासपोर्ट साईज फोटोअनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्रआधार कार्डबँकेचे खातेरहिवासीप्रमाणपत्रउत्पन्नाचे प्रमाणपत्र व शिक्षण घेत असल्याबाबत कॉलेजचे प्रमाणपत्र/गुणपत्रकअर्जामध्ये नमुद करण्यात आलेली माहितीसह अर्ज सादर करण्यात यावेतविहित नमुन्यातील कोरे अर्ज प्रकल्प अधिकारीएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट येथे सेवायोजन कक्षात उपलब्ध आहेत. सर्व अनुसूचित जमातीच्या सर्व लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा. याबाबतचे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी केले आहे.

 0000

आजची मुख्य बातमी क्रमांक 205

महाराष्ट्राच्या प्रशासनाला विश्वासार्ह चेहरा देण्याचे काम महसूलचे - अपर मुख्य सचिव राजेश कुमार 

* महसूलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा नांदेडमध्ये थाटात प्रारंभ 

* माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केले ध्वजारोहण  

 नांदेड दि. 21 फेब्रुवारी :- कोणत्याही राज्याची, जिल्ह्याची ओळख तिथल्या महसूल प्रशासनाच्या कारभारावरून ठरते. राज्याचे प्रशासन कसे आहे हे महसूल कर्मचाऱ्यांच्या परिश्रम, वृत्ती व सचोटीवर ठरते.  महसूल कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक वृत्तीमुळे व दर्जेदार कामांमुळे देशात महाराष्ट्राची ओळख निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी आज येथे केले. महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे शानदार राजवैभवी उद्घाटन नांदेडमध्ये करण्यात आले. ध्वजारोहण माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केले.  

महसूलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा 21 ते 23 फेब्रुवारी नांदेडमध्ये संपन्न होत आहेत. आज श्री. गुरूगोविंद सिंघजी स्टेडियम येथे शुभारंभ झाला. यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार आनंद तिडके, आमदार श्रीजया चव्हाण, अपर मुख्य सचिव राजेशकुमार, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप गावडे,निवृत्त जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जीएसटीचे सहआयुक्त अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर आयुक्त महसूल नैना बोंदार्डे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, अपर आयुक्त प्रदिप कुलकर्णी, नितीन महाजन, सहायक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा, मेघना कावली,  निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदींची उपस्थिती होती.  

आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलतांना राजेशकुमार यांनी बारा वर्षानंतर या स्पर्धांचे आयोजन होत असल्याचा आनंद व्यक्त केला. या स्पर्धांचे नियोजन करणारे विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, यांनी दर्जेदार स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्यांनी कौतूक केले. नांदेडमध्ये असणाऱ्या क्रीडा विषयक पायाभूत सुविधा, निवासाची व्यवस्था यामुळे याठिकाणी केवळ महसूलच्याच नव्हे तर अंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा आयोजित केल्या जाऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.  

महसूल विभाग हा राज्याच्या प्रशासनाचा कणा असतो. यामुळे या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी दर्जेदारच असतात मात्र फायलींमध्ये प्रशासनाचे कसब दाखवणारे आता मैदानावर आपले प्राविण्य दाखविणार असल्याचा आनंद आहे. अगदी शिपाई पासून तर अप्पर मुख्य सचिवांपर्यंत आम्ही सगळे मैदानावर एक होऊन खेळतो. ही आमची एकजूट महसूलला वेगळी बळकटी देत असेही त्यांनी स्पष्ट केले.  

यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी उद्घाटनपर भाषण करतांना महाराष्ट्राच्या महसूल विभागाच्या सर्व क्षेत्रातील वाटचालीबद्दल गौरवउद्गार काढले. त्यांनी कर्मचाऱ्यांवरील ताण तणाव हलका करण्यामध्ये क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उपयोगी पडत असल्याचे सांगितले. या स्पर्धांना निधी कमी पडणार नाही, अशी तरतूद करण्याची सूचना केली. तत्पूर्वी त्यांनी ध्वजारोहण केले. तसेच खेळाडुंना शिस्त व सांघिक भावनेची शपथ दिली.  

याप्रसंगी खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार आनंद तिडके, आमदार बालाजी कल्याणकर यांनी शुभेच्छापर संबोधन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण नरमवार, महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे प्रतिनिधी पोपंटवार, महाराष्ट्र राज्य नायब तहसिलदार संघटनेचे अध्यक्ष किरण अंबेकर, महाराष्ट्र राजपत्रित संघटनेचे प्रतिनिधी डॉ. सचिन खल्लाळ, महाराष्ट्र राज्य अप्पर जिल्हाधिकारी संवर्गाचे प्रतिनिधी दिपाली मोतियेळे यांनीही संबोधित केले. यावेळी “अविरत महसूल” या राज्यस्तरीय स्मरणिकेचे अनावर करण्यात आले. राज्यातील जवळपास अडीच हजार कर्मचारी या स्पर्धेनिमित्त नांदेडमध्ये आले आहेत. पुढील 3 दिवस ही स्पर्धा नांदेड येथे रंगणार असून क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. 

0000














वृत्त क्र.  77 9 मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य ...