Sunday, April 11, 2021

रेमेडिसिव्हीर इंजेक्शनच्या व्यवस्थापन व यातील काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश

 

रेमेडिसिव्हीर इंजेक्शनच्या व्यवस्थापन व यातील काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश  

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- कोरोना विषाणूमुळे जिल्ह्यात असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता केवळ भितीपोटी रेमेडिसिव्हीर इजेंक्शनबाबत ज्यांना आवश्यकता नाही ते सुध्दा यासाठी आग्रह करतांना दिसून येत आहेत. कोविड बाधित रुग्णांच्या प्रकृतीनुसार आरोग्य विभागातर्फे काळजीपूर्वक गरजू असलेल्या बाधितांना रेमेडिसिव्हीर इजेंक्शनचा उपचार केला जात आहेत. मात्र याची मागणी केवळ भितीपोटी मोठ्या प्रमाणात वाढल्याने याचा तुटवडा निर्माण होणे स्वाभाविक आहे. अशा स्थितीत याच्या प्रभावी नियोजनासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा -2005 आणि भारतीय साथ रोग अधिनियम 1897 अन्वये रेमडिसिव्हीर इजेंक्शन औषधाचे वितरण व विक्री यातील गैरप्रकार रोखण्यासाठी पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.

1)     कोविड रुग्णालयाने त्यांचे रुग्णालय शासन मान्यता प्राप्त असलेले प्रमाणपत्र त्यांचे सलग्न असलेले मेडिकल स्टोअरचे परवाने यांच्यासह घाऊक विक्रेता किंवा सी.ॲन्ड.एफ एजंट यांच्याकडे लेखी मागणी नोंदवावी.

2)     रेमेडिसिव्हीर इजेंक्शनची मागणी करतांना रुग्णालयातील रुग्ण संख्या विचारात घेवून व ज्या रुग्णांना खरोखरच रेमडिसिव्हर इजेंक्शनची आवश्यकता आहे, अशी संख्या विचारात घेवून तीन दिवस पुरेल एवढ्या रेमेडिसिव्हीर इजेंक्शनची मागणी नोंदवावी. या औषधाची मागणी नोंदविण्यापुर्वी केंद्र व राज्य शासनाचा कोविड क्लिक मॅनेजमेंट प्रोटोकॉल विचारात घेण्यात यावा.

3) घाऊक औषध विक्रेत्यांनी किंवा सी.ॲन्ड.एफ  एजंट यांनी रुग्णाची कागदपत्राची योग्य प्रकारे

    शहानिशा केल्यानंतर संबंधित रुग्णालयाच्या मागणीप्रमाणे औषध पुरवठा करावा. त्याबाबतचे लेखी

   अभिलेख जतन करावे.

3)     औषध दुकानावरुन थेट रेमेडिसिव्हीर औषधाची विक्रीवर बंदी घालण्यात येत असून रेमडिसिव्हर औषधाचा पुरवठा स्टॉकिस्टद्वारा केवळ कोविड हॉस्पिटल, हॉस्पिटलला संलग्न असलेल्या मेडिकल येथे करण्यात यावा.

5) सर्व घाऊक विक्रेत्यांनी किंवा सी.आय.ॲन्ड.एफ  एजंट यांनी दररोज विक्री केलेल्या रेमेडिसिव्हीर

    इंजेक्शन माहिती उदा :- कोविड रुग्णालयाचे नाव , संलग्न मेडिकलचे नाव, बिल क्रमांक, दिनांक, 

   एकूण विक्री संख्या इत्यादीबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासन कार्यालयास दररोज सादर

   करावी.

6) ज्या रुग्णालयाच्या आवारात संलग्न मेडिकल स्टोअर नाही त्यांनी स्वत: रेमेडिसिव्हीर इंजेक्शन

    खरेदी घाऊक औषध विक्रेते किंवा सी.आय.ॲन्ड.एफ  एजंट यांच्याकडून करावी. तसेच औषधे व

    सौंदर्य प्रसाधने कायद्यातील तरतुदीनुसार औषध खरेदी व वितरणाबाबत अभिलेख ठेवावा. व

    त्यामध्ये खरेदी केलेला साठा औषधाचे नांव, समुह क्रमांक , औषध पुरवठ्याचा दिनांक , रुग्णाचा  

    तपशिल , पुरविलेले इंजेक्शन, डॉक्टरांचे नाव, आकारलेली किंमत इत्यादी माहिती अद्यायावत

    ठेवावी. इंजेक्शन खरेदी वापर, विक्री व शिल्लक साठा याचा ताळमेळ ठेवावा.

7) रुग्णालयांनी स्वत: कोविड  रुग्णांना औषधे उपलब्ध करुन द्यावीत. रुग्णांच्या नातेवाईकास बाहेरुन

     घेवून येण्यास सांगू नये.

8) कोविड रुग्णालयांनी रुग्णांना औषधाची किंमत शासनमान्य दरानेच आकारावी.

9) कांही कारणाने रेमडिसिव्हर इंजेक्शन या औषधाचा पूर्ण डोस देण्यास आला नाही, तर त्याचा

    उर्वरित साठा हॉस्पिटल , मेडिकल स्टोअरमध्ये परत करण्यात यावा. व त्यांचा अभिलेख ठेवावे.

10) कोविड रुग्णालयामध्ये काम करणारे कर्मचारी यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात यावे.

     रुग्णालयामध्ये गैरप्रकार हाणार नाही याची दक्षता घ्यावी. रुग्णालयात गैरप्रकार आढळून आल्यास

    रुग्णालय व्यवस्थापनास जबाबदार धरण्यात येईल.

11) सर्व कोविड रुग्णालयांनी ज्या रुग्णांकरिता रेमडिसिव्हर इंजेक्शन वापरले गेले आहेत. त्या

    औषधाच्या बाटलीवरील लेबल काढून रुग्णाच्या केस पेपरसोबत लावावेत.

12) सर्व कोविड रुग्णालयाशी संलग्नित असलेले मेडिकल दुकानदारांनी रेमडिसिव्हर औषधाचा  

     काळाबाजार, गैरवापर रोखणे अनुषंगाने मा. प्रधानसचिव यांनी यांच्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत

     पालन करावे व परिशिष्ठ ब मध्ये संबंधित रुग्णालयामार्फत माहिती भरुन दिल्याशिवाय रुग्णांना

    औषध विक्री करु नये.

 या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथ रोग  नियंत्रण अधिनियम 1897 तसेच भारतीय दंडविधान 1860 चे कलम 188 व औषध व सौंदर्य  प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 प्रमाणे सर्व दंडनिय कार्यवाहीस पात्र राहतील.

 00000

 

 

 

 

 आम्ही आणखी प्रयत्नांची शर्त करु

नांदेड जिल्हा वासियांनो गतवर्षीसारखे सहकार्य द्या

--- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :-  जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी खांद्याला-खांदा लावून प्रयत्नांची शर्त करीत आहेत. गतवर्षी कोरोनाचे आव्हान नवीन असूनही नागरिकांच्या सहकार्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव आपण लवकर आटोक्यात आणू शकलो.  यावर्षीही चाचण्यांचे प्रमाण आपण खुप मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. तात्काळ निदान आणि लवकर उपचार यावर आपण भर देत आहोत. असंख्य आव्हाने असूनही आजवर नागरिकांचे सहकार्य निर्विवाद राहिले आहे. आणखी आपला सर्वांना एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेत आपले कर्तव्य पार पाडावयाचे आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने ( आम्ही सर्व प्रयत्नांची शर्त करीत असून नांदेड जिल्हा वासियांनो गतवर्षीसारखेच आपले सहकार्य द्या) या शब्दात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागरिकांना साद घातली आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे, फारच गरज असेल तर योग्य मास्क घालून जे काम आहेत ते तात्काळ उरकून घरी परतणे, बाहेर सॅनिटायझरचा वापर करणे, घरी व वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ करणे हे सुत्र पाळलेच पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

0000

 

या आठवड्यात नांदेडच्या वैद्यकीय सुविधेत दोनशे खाटांच्या जंबो कोविड सेंटरची भर

युध्द पातळीवर काम पूर्णत्वाकडे

ऑक्सिजन व व्हेंटेलिटरची सुविधा

 


नांदेड (जिमाका) दि.
11 :-

नांदेड जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात जिल्हा प्रशासनाने वाढविले असून वेळेच्या आत निदान आणि तात्काळ उपचार सुरु करण्यावर आरोग्य विभागाने भर दिलेला आहे. प्रकृती खालावेपर्यंत रुग्णांनी वाट न पाहता त्वरीत तपासणीनंतर उपचारावर भर हे अत्यावश्यक आहे. जिल्ह्यातील ज्या व्यक्तींनी कोविड संसंर्गाकडे दुर्लक्ष केले आहे अशा व्यक्तींची प्रकृती अतिगंभीर झालेली निदर्शास येत आहे. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सेवा सुविधांमध्ये अधिक भर पडावी या उद्देशाने नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड येथे जंबो कोविड हॉस्पिटल पूर्णत्वास आले असून येत्या चार ते पाच दिवसात ते अतिगंभीर रुग्णांच्या उपचारासाठी सुरु होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने शर्थीचे प्रयत्न केले जात असून आवश्यकता नसताना जनतेने घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

000

1 हजार 135 कोरोना बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी नांदेड जिल्ह्यात 1 हजार 859 व्यक्ती कोरोना बाधित 27 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

1 हजार 135 कोरोना बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी  

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 859 व्यक्ती कोरोना बाधित

 27 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 6 हजार 679 अहवालापैकी 1 हजार 859 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 857 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 हजार 2 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 57 हजार 610 एवढी झाली असून यातील 43 हजार 897 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 12 हजार 382 रुग्ण उपचार घेत असून 230 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी                   डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 7 ते 10 एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 996 एवढी झाली आहे.   दिनांक 7 एप्रिल रोजी  जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल हडको नांदेड येथील 68 वर्षाचा पुरुष, व्यंकटेश नांदेड येथील 50 वर्षाचा पुरुष, लक्ष्मी नगर नांदेड येथील 60 वर्षाची महिला, भोकर तालुक्यातील भोसी येथील 60 वर्षाची महिला, शिवनगर नांदेड येथील 60 वर्षाचा पुरुष, नायगाव तालुक्यातील नर्सी येथील 60 वर्षाचा पुरुष, निजाम कॉलनी येथील 65 वर्षाचा पुरुष, बिलोली येथील 70 वर्षाचा पुरुष, साईबाबा नगरी उमरी येथील येथील 79 वर्षाचा पुरुष, दिनांक 8 एप्रिल रोजी कृष्णा नगर नांदेड येथील 38 वर्षाचा पुरुष,  सिडको नांदेड येथील 54 वर्षाचा पुरुष, भावसार चौक नांदेड येथील 67 वर्षाचा पुरुष, उमरी कोविड केअर सेंटरे येथे उमरी तालुक्यातील धानोरावाडी येथील 75 वर्षाचा पुरुष, गोदावरील कोविड रुग्णालय सन्मित्र कॉलनी नांदेड येथील 70 वर्षाच्या पुरुष, दिनांक 9 एप्रिल रोजी शासकीय आयुर्वदिक महाविद्यालय येथे राज कॉर्नर नांदेड येथील 50 वर्षाची महिला, विवेक नगर नांदेड येथील 50 वर्षाची महिला, हनुमानगड नांदेड येथील 61 वर्षाची महिला, मुखेड कोविड रुग्णालय मुखेड तालुक्यातील दापका येथील 60 वर्षाची महिला, यशोसाई कोविड रुग्णालय बालाजी नगर नांदेड येथील 68 वर्षाची महिला, दिनांक 10 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी येथे उमरी तालुक्यातील सिंधी येथील 60 वर्षाची महिला, हडको नांदेड येथील 65 वर्षाची महिला, प्रकाश नगर नांदेड येथील 73 वर्षाचा पुरुष, लोहा येथील 60 वर्षाचा पुरुष, कंधार तालुक्यातील मंगल सांगवी येथील 78 वर्षाचा पुरुष, सराफा नांदेड येथील 71 वर्षाचा पुरुष, वानेगांव ता. नांदेड येथील 60 वर्षाचा पुरुष उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.19 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 448, बिलोली 43, हिमायतनगर 26, मुदखेड 4, हिंगोली 4, नांदेड ग्रामीण 29, देगलूर 39, कंधार 2, मुखेड 34, परभणी 2, अर्धापूर 7, धर्माबाद 2, किनवट 4, नायगाव 64, भोकर 23, हदगाव 52, लोहा 37, उमरी 37 असे  एकूण 857 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 351, बिलोली 29, नांदेड ग्रामीण 66, देगलूर 9, अर्धापूर 48, धर्माबाद 7, भोकर 26, हदगाव 21, हिमायतनगर 6, माहूर 36, उमरी 32, कंधार 26, मुदखेड 63, हिंगोली 3, किनवट 109, मुखेड 82, परभणी 2, लोहा 53, नायगाव 33 असे एकूण 1 हजार 2 व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.

 

जिल्ह्यात 12 हजार 382 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 267, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 116, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 226, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 177, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 144, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 183, देगलूर कोविड रुग्णालय 50, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर 66, बिलोली कोविड केअर सेंटर 374, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 28, नायगाव कोविड केअर सेंटर 102, उमरी कोविड केअर सेंटर 96, माहूर कोविड केअर सेंटर 35, भोकर कोविड केअर सेंटर 20, हदगाव कोविड रुग्णालय 48, हदगाव कोविड केअर सेंटर 129, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 114, कंधार कोविड केअर सेंटर 26, धर्माबाद कोविड केअर सेंटर 120, मुदखेड कोविड केअर सेंटर 19, अर्धापूर कोविड केअर सेंटर 38, बारड कोविड केअर सेंटर 35, मांडवी कोविड केअर सेंटर 11, महसूल कोविड केअर सेंटर 101, एनआरआय कोविड केअर सेंटर 91, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 146, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 978, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 2 हजार 984, खाजगी रुग्णालय 1 हजार 658 असे एकूण 12 हजार 382 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 8, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 5, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 10 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 74 हजार 158

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 9 हजार 940

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 57 हजार 610

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 43 हजार 897

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 77

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.19 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-48

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-88

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-376

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-12 हजार 382

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-230.

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...