Monday, August 22, 2016

विधायक, समाजपयोगी उपक्रमांनी
गणेशोत्सव साजरा करावा
लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव
अभियानासाठी उत्सव मंडळांची बैठक संपन्न 
नांदेड, दि. 22  विधायक व समाजपयोगी उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करुन जिल्ह्याचा  लौकिक वाढवावा, असे आवाहन आज येथे लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान तसेच लोकमान्य उत्सव यानिमित्ताने आयोजित बैठकीत करण्यात आले. जिल्ह्यातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीची ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे संपन्न झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी होते.
बैठकीस लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान व लोकमान्य महोत्सव समितीचे सदस्य बस्वराज मंगरुळे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय ऐनपुरे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, मनपा उपायुक्त रत्नाकर वाघमारे, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के आदींची उपस्थिती होती.
बैठकीत जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या अभियानातील स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी  होण्याचे  आवाहन करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे 160 वी जयंती वर्षे सुरु आहे. तसेच सार्वजनिक  गणेशोत्सव चळवळीला 125 वर्षे पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने हे सांस्कृतिक उपक्रम यंदा वर्षभर राबविण्यात येणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव अभियानात गणेशोत्सव मंडळांना स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाओ, व्यसनमुक्ती, जलसंवर्धन या एका कल्पनेवर आधारीत देखावा सादर करणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट 2016 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. त्यासाठी तालुकास्तर, जिल्हास्तर आणि विभाग स्तरापर्यंत समित्या स्थापन करण्यात आल्या असून या स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक उत्सव मंडळांनी आपली उपक्रमशिलता व लोकाभिमुखता दर्शवणारा सहभाग घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले. स्पर्धेसाठी तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी तसेच महानगरपालिका क्षेत्रात शिक्षणमंडळाचे प्रशासन अधिकारी यांच्यामार्फत अर्ज स्विकारले जाणार आहेत. तालुकास्तरासाठी अनुक्रमे 25 हजार, 15 हजार व तृतीय क्रमांकासाठी 10 हजार रुपये असे बक्षिस आहे. तर जिल्हा स्तरासाठी प्रथम क्रमांकाला 1 लाख, द्वितीय क्रमांकासाठी 75 हजार तर तृतीय क्रमांकासाठी 50 हजार रुपयांचे बक्षिस आहे. विभागीय स्तरावर अनुक्रमे 2 लाख, दिडलाख व एक लाख रुपये अशी बक्षिसे आहेत.
नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक उत्सव मंडळांनी या अभियानात सक्रिय सहभाग दर्शवावा व उपक्रमशिलतेतून वेगळा लौकीक निर्माण करावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. यावेळी उपस्थित उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शंकाचे निरसन करुन घेतले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी प्रास्ताविक केले. उपायुक्त श्री. वाघमारे यांनी आभार मानले.

000000
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने
  दारु विक्री बंदचे आदेश
नांदेड, दि. 22 :- जिल्ह्यात सप्टेंबर ते डिसेंबर 2016 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायीच्या सार्वत्रिक तसेच रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवार 24 ऑगस्ट 2016 रोजी मतदान होत आहे व शुक्रवार 26 ऑगस्ट रोजी मतमोजणी होत आहे. या मतदान व मतमोजणीसाठी संबंधीत ग्रामपंचायत हद्दीतील गावात दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी काढले आहेत.
जिल्ह्यातील  किनवट, माहूर, भोकर, हदगाव, नांदेड, मुखेड व उमरी या तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुकीसाठी मतदान व मतमोजणी होणार आहे. त्यासाठी मतदानाचा अगोदरचा दिवस मंगळवार 23 ऑगस्ट 2016 रोजी पूर्ण दिवस, मतदानाचा दिवस 24 ऑगस्ट रोजी पूर्ण दिवस आणि मतमोजणीचा दिवस शुक्रवार 26 ऑगस्ट 2016 रोजी मतमोजणी पूर्ण होई पर्यंत दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी. तसेच शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये, याकरीता मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार परिसरातील सर्व सीएल-3, एफएल-2 एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल/बिआर-2 व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्या अंतर्गत मद्य विक्रीस पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारका विरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे. 

000000000
लोकसेवा आयोगाच्या कर सहाय्यक
परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  
नांदेड, दि. 22 :- राज्य लोकसेवा आयोग कर सहाय्यक परीक्षा-2016 ही परीक्षा  रविवार 28 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत नांदेड शहरातील एकूण 19 केंद्रावर घेण्यात येत आहे. या परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
या परीक्षा केंद्राच्या परिसरात सदरच्या दिवशी सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000000 
लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक
परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश  
नांदेड, दि. 22 :- राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2016 ही परीक्षा  रविवार 21 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 आणि दुपारी 3 ते 4 या कालावधीत नांदेड शहरातील एकूण पाच केंद्रावर घेण्यात येत आहे. या परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.
या परीक्षा केंद्राच्या परिसरात सदरच्या दिवशी सकाळी 8 वाजेपासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000000 
मागासवर्गीय वसतिगृह प्रवेशासाठी
अर्ज भरण्यास मूदतवाढ
नांदेड, दि. 22 :-  मागासवर्गीय  मुलांचे  या  वसतीगृहात सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 11 वी , पदवी  व पदव्युत्तर  प्रथम  वर्ष  व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांकडून रिक्त जागा भरण्यासाठी  ऑनलाईन अर्ज 15 ऑगस्ट 2016 पर्यंत मागविण्यात आले होते. अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ होवून मंगळवार 30 ऑगस्ट 2016 पर्यंत वाढविण्यात आली आहे.  
सामाजिक  न्याय  व  विशेष  सहाय्य विभागामार्फत  नांदेड जिल्ह्यातील मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह नांदेड, गुणवंत नांदेड, अर्धापूर, हदगाव, भोकर, उमरी, नायगाव, बिलोली, धर्माबाद तसेच मुलींचे शासकीय वसतीगृह नांदेड-2, भोकर, हदगाव, उमरी, देगलूर, माहूर, मुखेड एकूण 16 वसतीगृहे कार्यरत आहेत. प्रवेश गुणवत्ता व आरक्षणावर आधारीत असून प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास व भोजन तसेच शैक्षणिक साहित्य, बेडींग साहित्य, निर्वाह भत्ता इत्यादी सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्यात येतात. विद्यार्थ्यांनी मुदत वाढीबाबतची नोंद घेवून त्यानुसार http://mahaescholmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरावेत. अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहाचे गृहपाल यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.

000000
राष्ट्रीय लोकन्यायालयाचे 10 सप्टेंबर रोजी आयोजन
नांदेड, दि. 22 :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हा न्यायालयात व सर्व तालुका न्यायालयात शनिवार 10 सप्टेंबर 2016 रोजी जामिनपात्र फौजदारी गुन्हयातील  तडजोड  योग्य  प्रकरणांच्या  राष्ट्रीय  लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने  राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या माध्यमातून पक्षकार, वकिल यांनी आपली जास्तीत जास्त जामिनपात्र फौजदारी गुन्हयातील तडजोडयोग्य प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यासाठी ठेवून आपसात निकाली काढावीत, असे आवाहन  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  सविता बारणे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. आर. कुरेशी यांनी केले आहे.
            मागील  लोकन्यायालयास  नांदेड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता पुन्हा एकदा त्यांना ही सुवर्ण संधी चालून आली आहे. राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या  माध्यमातून तडजोड झाल्यास पक्षकारांचा वेळ, पैसा, श्रम वाचून कायमस्वरुपी निकाल पदरात पडतो. तेंव्हा या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये अधिकाधिक प्रकरणे निकाली काढण्यासाठी जास्तीत जास्त प्रकरणे ठेवावीत तसेच पक्षकारांनी आपली प्रकरणे  निकाली  काढण्यासाठी  संबंधित  न्यायालयास, जवळच्या विधी सेवा समिती  किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. कुरेशी यांनी केले आहे.

000000
गणेशोत्‍सव मंडळांनी परवानगी घेवूनच
वर्गणी गोळा करावी - धर्मादाय उपआयुक्त
नांदेड, दि. 22 गणेशोत्सवासाठी वर्गणी गोळा करताना मंडळानी परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच  त्याबाबत  सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त नांदेड यांनी कळवले आहे.
धर्मादाय उपआयुक्त कार्यालय नांदेड यांच्यामार्फत सोमवार 22 ऑगस्ट 2016 ते शनिवार 3 सप्टेंबर 2016 या कालावधीत रविवार व शासकीय सुट्ट्या वगळून गणेश चतुर्थीसाठी कार्यालयीन वेळेत परवाना देण्याचे काम चालू करण्यात आले आहे.
परवाना मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे राहतील. विहित नमुन्यातील अर्ज व अर्जावर 10 रुपये कोर्ट फी स्टॅम्प, जागा मालकाचे संमतीपत्र, पोलीस स्टेशन नाहरकत, ठराव, गेल्यावर्षीचा जमा खर्च हिशेब पावत्यासह, मंडळातील सर्व सदस्यांचे छायांकित ओळखपत्र, नवीन मंडळ असल्यास नगरसेवक, सरपंच यांचे नाहरकत प्रमाणपत्र ही कागदपत्रे जोडावीत. गणेश मंडळांनी परवानगी घेवून वर्गणी गोळा करावी, असे आवाहन धर्मादाय उप आयुक्त प्रणिता श्रीनिवार  यांनी केले आहे.

000000

लेख -

छतावरील पावसाच्या पाण्यातून जलसंवर्धनाचा
नांदेड पाटबंधारे कार्यालयाचा यशस्वी प्रयोग

नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) नांदेड हे कार्यालय अधीक्षक अभियंता नांदेड पाटबंधारे मंडळ नांदेड कार्यालयाच्या अंतर्गत नांदेड शहरात चैतन्यनगर वसाहतीमध्ये आहे. या कार्यालयाची ईमारत भव्य आहे व या इमारतीचे बांधकामाधील क्षेत्रफळ दिड हजार  चौरस मीटरहून अधिक आहे.
कार्यालयीन इमारतीच्या स्लॅबवर पडणाऱ्या पावसाचे पाणी या इमारतीच्या चारही बाजूने वाहुन जात होते. मुळातच उन्हाळ्यात शहरामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली होती. त्याची चर्चाही होत असे. त्यातूनच कार्यकारी अभियंता एस. एस. अवस्थी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून आपल्या परिसरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पावसाळयातील इमारतीच्या छतावरील वाहुन जाणारे पाणी जमिनीमध्ये मुरवून कार्यालयामध्ये असलेल्या विंधन विहरीचे पुनर्भरण करण्याचे निश्चित केले.
चैतन्यनगर नांदेडच्या उंच भागात कार्यकारी अभियंता श्री. अवस्थी यांनी सन 2000 मध्ये स्वत:च्या निवासस्थानी छताचे पाणी जमिनीत मुरवून विंधन विहीरीचे पुनर्भरण केले आहे. त्यामुळे या विहीरीला अखंड पाणी उपलब्ध होत असल्याने त्याच धर्तीवर विभागाच्या इमारतीत ही संकल्पना राबविण्यात आली. हे काम कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून वैयाक्तिक वर्गणीव्दारे करण्याचे ठरविले व यासाठी निधी संकलित करुन हे काम पुर्ण करण्याचे निश्चित केले.
रेन रुफ वॉटर हार्वेस्टिंगचे संक्षिप्त विवरण : कार्यालयीन इमारतीच्या छताचे क्षेत्रफळ 1533.40 चौ.मी. आहे. त्यातील आतल्याबाजूस पडणारे पावसाचे पाणी रुफ रेन वॉटर  हार्वेस्टिंगसाठी विचारात घेण्यात आले. त्याचे क्षेत्रफळ 920. चौ.मी. आहे. नांदेडचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान 955 मी.मी. आहे. त्यापैकी 75 टक्के पर्जन्यमान विचारात घेता, या छतावर साधरणत: एकूण पावसाळयात 7 लक्ष लीटर पाणी उपलब्ध होते व हे पाणी रेन रुफ वॉटर हार्वेस्टिंग केली नसती तर वाहुन गेल्यामुळे पाणी जमिनीमध्ये मुरले नसते.
इमारतीच्या मध्यभागी एकूण मोकळी जागा 209.25 चौ.मी. आहे व या मोकळया जागेच्या मध्यभागी एक हौद या पूर्वीच बांधलेला होता. सदर हौदाची लांबी 1.53 व रुंदी 1.53 मी. एवढी आहे व या हौदास जमिनीमध्ये 3 मीटर खोदण्यात आले.जमिनीखालील भागहा खडकाळ आहे. दगड हा सछिद्र खडकाळ संवर्गातील दिसून आला. त्यामुळे पाणी जमिनीमध्ये मुरण्यास व झिरपण्यास अनुकुल परिस्थिती आहे. तसेच या खोदलेल्या हौदामध्ये जाड वाळुचा  एक थर व कोळशाचा थर व त्यावर पुन्हा जाड वाळुचा एक थर अशी रचना केली. हौदामध्ये अंदाजे 7 ते 8  हजार लीटर पाणी सामवण्यासाठी मोकळी जागा आहे. त्यामुळे छतावरील पाणी 4 ईंची पाईपद्वारे चार लाईन मार्फत एकत्रित आणलेले आहे. ते सर्व पाणी हौदामध्ये एकत्रित सोडण्यात आलेले आहे. उपरोक्त रुफ रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या 920 चौ.मी. क्षेत्रफळाचे पाणी हौदात आणण्यासाठी 4 इंची पी.व्ही.सी.पाईपची 220 फुट पाईप लाईन करण्यात आली. हौद फिल्टर करण्यासाठी व पाईप लाईनसाठी आणि इतर कामासाठी मिळून 16 हजार रुपये खर्च आला. अशाप्रकारे  पाणी जमिनीमध्ये मुरविण्यासाठी योजना केल्यामुळे यापूर्वी छतावरुन वाहुन येणारे पाणी इमारतीच्या मध्यभागी जमा होऊन सुव्यवस्थितपणे जमिनीमध्ये मुरविले जात आहे.
अशा प्रकारे रेन रुफ वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे संपूर्ण पावसाळयानंतर जमिनीमध्ये छतावरील एकूण सात लाख लिटर पाणी जमिनीमध्ये मुरविले जाणार आहे. त्यामुळे विंधन विहीरींचे चांगल्या प्रकारे पुनर्भरण होणार आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्या एकत्रित योगदानाचे सुफळ या पावसाळयानंतर लागलीच दिसणार आहे. सर्वांनी एक राष्ट्रीय कार्य पार पाडल्याचा एक वेगळाच आंनद असल्याचे, कार्यकारी अभियंता सु. सं. अवस्थी यांनी प्रतिक्रीयाही नोंदविली आहे.

रेन रुफ वॉटर  हार्वेस्टिंगची छायाचित्रे खालीलप्रमाणे -
1)     फोटो क्रं.1 :- कार्यालयीन इमारतींचे नाव दर्शविणारा फोटो.
2)     फोटो क्रं.2 :- इमारतीचे छत दर्शविणारा फोटो.
3)     फोटो क्रं.3-6:- इमारतीच्या छतावरील पाणी वेगवेगळया चार इंची पीव्हीसी  पाईपव्दारे हौदाकडे
                     आणलेल्या पाईप लाईनचे फोटो -4.
4)   फोटो क्रं.7 :- हौद खोलीकरणाचा फोटो.
5)    फोटो क्रं.8:- हौदामध्ये जाड वाळू व कोळसा व त्यावर पुन्हा जाड वाळू चा थर दिल्यावरचा फोटो.
6)     फोटो क्रं.9:- हौदामध्ये कचरा पडू नये म्हणुन त्यावर लावण्यात आलेल्या आच्छदनाचा फोटो.
7)    फोटो क्रं.10 :- हौदा लगत असलेल्या विंधन विहीरीचा फोटो.







-         संकलन जिल्हा माहिती कार्यालय नांदेड 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...