Monday, August 22, 2016

विधायक, समाजपयोगी उपक्रमांनी
गणेशोत्सव साजरा करावा
लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव
अभियानासाठी उत्सव मंडळांची बैठक संपन्न 
नांदेड, दि. 22  विधायक व समाजपयोगी उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करुन जिल्ह्याचा  लौकिक वाढवावा, असे आवाहन आज येथे लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान तसेच लोकमान्य उत्सव यानिमित्ताने आयोजित बैठकीत करण्यात आले. जिल्ह्यातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीची ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे संपन्न झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी होते.
बैठकीस लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान व लोकमान्य महोत्सव समितीचे सदस्य बस्वराज मंगरुळे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय ऐनपुरे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, मनपा उपायुक्त रत्नाकर वाघमारे, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के आदींची उपस्थिती होती.
बैठकीत जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या अभियानातील स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी  होण्याचे  आवाहन करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे 160 वी जयंती वर्षे सुरु आहे. तसेच सार्वजनिक  गणेशोत्सव चळवळीला 125 वर्षे पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने हे सांस्कृतिक उपक्रम यंदा वर्षभर राबविण्यात येणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव अभियानात गणेशोत्सव मंडळांना स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाओ, व्यसनमुक्ती, जलसंवर्धन या एका कल्पनेवर आधारीत देखावा सादर करणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट 2016 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. त्यासाठी तालुकास्तर, जिल्हास्तर आणि विभाग स्तरापर्यंत समित्या स्थापन करण्यात आल्या असून या स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक उत्सव मंडळांनी आपली उपक्रमशिलता व लोकाभिमुखता दर्शवणारा सहभाग घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले. स्पर्धेसाठी तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी तसेच महानगरपालिका क्षेत्रात शिक्षणमंडळाचे प्रशासन अधिकारी यांच्यामार्फत अर्ज स्विकारले जाणार आहेत. तालुकास्तरासाठी अनुक्रमे 25 हजार, 15 हजार व तृतीय क्रमांकासाठी 10 हजार रुपये असे बक्षिस आहे. तर जिल्हा स्तरासाठी प्रथम क्रमांकाला 1 लाख, द्वितीय क्रमांकासाठी 75 हजार तर तृतीय क्रमांकासाठी 50 हजार रुपयांचे बक्षिस आहे. विभागीय स्तरावर अनुक्रमे 2 लाख, दिडलाख व एक लाख रुपये अशी बक्षिसे आहेत.
नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक उत्सव मंडळांनी या अभियानात सक्रिय सहभाग दर्शवावा व उपक्रमशिलतेतून वेगळा लौकीक निर्माण करावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. यावेळी उपस्थित उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शंकाचे निरसन करुन घेतले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी प्रास्ताविक केले. उपायुक्त श्री. वाघमारे यांनी आभार मानले.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...