Tuesday, August 23, 2016

महा-अवयवदान अभियान यशस्वी करण्याचा निर्धार
जास्तीत जास्त समंतीपत्र नोंदणीसाठी नागरिकांना आवाहन
जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत विविध उपक्रमांचे नियोजन

नांदेड, दि. 23 :- आरोग्य विभागाच्यावतीने 30 ऑगस्ट  ते 1 सप्टेंबर या कालावधीत आयोजित महा-अवयवदान अभियान यशस्वी करण्याचा निर्धार आज जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत करण्यात आला. अवयदानाविषयी जाणीव जागृती करण्यासाठी घरा-घरापर्यंत पोहचण्यासाठी नियोजन करा, असे निर्देश समितीचे सहअध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून दिले.
जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात झालेल्या या बैठकीस आमदार डी. पी. सावंत, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, समितीच्या समन्वयधिकारी तथा डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॅा. कानन येळीकर, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॅा. विजय कंदेवाड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. जी. एच. गुंटूरकर, पोलीस उपअधीक्षक विश्र्वनाथ नांदेडकर, इंडियन मेडीकल असोसिएशन-नांदेडचे अध्यक्ष डॅा. संजय कदम, रोटरी क्लबच्या डॅा. करूणा पाटील, लायन्स क्लबचे जयेश ठक्कर, डॅा. शाम तेलंग आदींसह विविध वैद्यकीय संघटनांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था आदींचे प्रतिनीधींची उपस्थिती होती.
या तीन दिवसांच्या कालावधीत मानवी अवयवदान व प्रत्योरापण विषयाबाबत व्यापक अशी जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगे नांदेड जिल्ह्यात या मोहिमेला जोडूनच 18 ऑगस्ट 2016 पासून मानवी अवयवदान संमत्री पत्र नोंदणीस  सुरवात  करण्यात  आल्याची माहिती, डॅा. कंदेवाड यांनी दिली. या अभियानात आता ऑनलाईन पद्धतीनेही समंतीपत्र भरण्याचीही सुविधा उपलब्ध झाली, असल्याने विविध कार्यालये, मोठ्या आस्थापना आदींना एकत्रित पद्धतीने अर्ज भरता येणार असल्याचे सांगण्यात आले
मंगळवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता भव्य जनजागरण फेरी काढण्यात येणार आहेत. फेरीत  सहभागी होणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना तसेच विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, नर्सीग महाविद्यालय, वैद्यकीय व्यावसायिकांच्या विविध संघटनाचे सदस्य, स्वयंसेवी संस्था आदींच्या सहभागाबाबत  तसेच त्यांच्यासाठीच्या अनुषांगीक सुविधांबाबत जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. बुधवार 31 ऑगस्ट रोजी विविध महाविद्यालयांच्या समन्वयातून निबंध, रांगोळी आणि वक्तृत्त्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांतील विजेत्यांना गुरुवार  1 सप्टेंबर रोजी या जनजागृती अभियानाच्या जिल्हास्तरीय समारोप समारंभात पारितोषिकांचे वितरण होणार आहे. यादिवशीही रक्तदान शिबीर, अवयदान नोंदणी शिबीर, तसेच जनजागृती मोहिमेतील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या घटकांना, संमती पत्र नोंदणीत सर्वाधिक नोंदणी गौरव असा कार्यक्रम होणार आहे.
अवयदानाबाबत कुटुंबा-कुटुंबात चर्चा व्हावी, तरच भविष्यात अवयवदानाचे प्रमाण वाढेल यासाठी रुग्ण कल्याण समित्यांमार्फत, तसेच ग्रामीण भागात पोहचून आणि कौटुंबिक सहभाग वाढावा यासाठी घरा-घरापर्यंत पोहचण्याचे नियोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी दिले. वरीष्ठ महाविद्यालयांसह, वैद्यकीय तसेच अन्य महाविद्यालये, विद्यापीठ स्तरापर्यंत  पोहचून  युवकांचा सहभाग वाढेल यासाठी प्रयत्न करण्याची सूचनाही करण्यात आली. या अभियानात विविध व्यावसायिकांच्या संघटना, संस्था यांचा सहभाग घेण्याची सूचना आमदार श्री. सावंत यांनी केली. महा-अवयवदान अभियानासाठी समंतीपत्र नोंदणीचे उद्दीष्टपुर्तीसाठी माहिती-तंत्रज्ज्ञान क्षेत्रातील विविध घटकांचा सहभाग घेण्यात यावे , असे आयुक्त श्री. उन्हाळे यांनी सूचित केले. या तीन दिवसाच्या कालावधीत सहभागी होणाऱ्या विविध घटकांसाठी कार्यक्रमस्थळीही समंतीपत्र नोंदणीची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्ह्याला समंतीपत्र नोंदणीसाठी दिलेल्या उद्दीष्टाहून अधिक नोंदणी करण्याचा निर्धार बैठकीत सर्वच घटकांनी व्यक्त केला. डॅा. कंदेवाड यांनी अभियानाबाबत  सादरीकरण  केले  व आभार मानले.
अवयवदानाचे समंती पत्र कुठे भरता येईल ?
नांदेड शहरात श्री गुरुगोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि डॅा. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-विष्णुपूरी या तीन ठिकाणी शनिवार 27 ऑगस्ट 2016 पर्यंत.
तर आँनलाईन पद्धतीने – www.dmer.org  या संकेतस्थळावर, Organ Donation Campiagn 2016  या ठिकाणी क्लिक केल्यास, समंतीपत्राबाबतचे पृष्ठ उघडते. त्या ठिकाणी सुलभपणे समंतीपत्र भरता येते. याठिकाणी मराठी व इंग्रजीमधूनही समंतीपत्र भरता येते.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...