Tuesday, August 19, 2025

वृत्त क्रमांक 876 

नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल : आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

 

  • नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
  • मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी 4 लाख रुपयाची मदत 

नांदेड दि. 19 ऑगस्ट :- राज्यात मागील 4 दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भासवाडी या गावामध्ये पाणी शिरले. या गावांमध्ये मोठ्याप्रमाणात जनावरांचे नुकसान होऊन 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसानही झाले आहे. या नुकसानीचा अंदाज घेऊन नुकसानग्रस्त गावातील नागरिकांना शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. यावेळी मृत्तांच्या वारसदारांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत धनादेश स्वरुपात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. 

आज नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे दौऱ्यावर आले. त्यांनी मुखेड तालुक्यातील हसनाळ या गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी करुन येथील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. तसेच मारजवाडी या पुर्नवसीत गावालाही त्यांनी भेट देऊन तेथील गावकऱ्यांशी संवाद साधला. 

याप्रसंगी आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, परिसरातील शेतकरी, नागरिक आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार डॉ. तुषार राठोड यांनी या भागात पूरपरिस्थितीमुळे झालेल्‍या नुकसानीची माहिती मंत्री गिरीश महाजन यांना दिली. 

यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. त्यांच्या या समस्यांबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन त्या सोडविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. तसेच या भागातील नुकसानग्रस्तांचा रोष जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर असल्याचे कळल्यानंतर याबाबत लवकरच चौकशी करुन दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. 

मृतांच्या वारसदारांना मदत

नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसदारांना यावेळी प्रत्येकी 4 लाख रुपयाची मदत धनादेश स्वरुपात आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते देण्यात आला. मृत्यू झालेल्या व्यक्ती व त्यांचे वारसदार याप्रमाणे आहेत. मृत्य व्यक्ती पिराजी म्हैसाजी थोटवे (वय 70) त्यांचे वारस मारोती पिराजी थोटवे मुलगा. चंद्रकला विठ्ठल शिंदे (वय 35) त्यांचे वारस विठ्ठल व्यंकटराव शिंदे पती. ललिताबाई गोविंद भोसले (वय 60) त्यांचे वारस मुलगा जगदीश गोविंद भोसले व मधुकर गोविंद भोसले. भीमाबाई हिरामण मादाळे (वय 65) त्यांचे वारस संग्राम हिरामण मादाळे, राहुल हिरामण मादाळे मुले. गंगाबाई गंगाराम मादाळे (वय 65) त्यांचे वारस मुलगी लालाबाई व्यंकट मादाळे यांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

00000






 दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीत हसनाळ (प.मु.) या गावात पुराचे पाणी शिरल्यामुळे खालील पाच जणांचा मृत्यू झालेला आहे.

1. पिराजी म्हैसाजी थोटवे वय 70
2. चंद्रकला विठ्ठल शिंदे वय 45
3. ललिताबाई भोसले वय 60
4. भीमाबाई हिरामण मादाळे वय 65
5. गंगाबाई गंगाराम मादाळे वय 65
वरील सर्वांचे मृतदेह सापडले आहेत.
तसेच दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी मुखेड - उदगीर रस्त्यावरील धडकनाळ येथील पुलावरून एक कार व एक ऑटो मधील सात जण पुराच्या पाण्यात वाहून गेले होते यातील 03 जणांना वाचविण्यात उदगीर अग्निशमन दलाला यश आहे असून उर्वरित 04 बेपत्ता जणांपैकी 03 जणांचा मृतदेह सापडले आहेत.
वाचविण्यात आलेल्या व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे आहेत.
1. नारायण इबिते, गौडगाव कर्नाटक
2. आसिफ शेख, उदगीर
3. मोहम्मद शोएब, निझामाबाद
चार बेपत्ता व्यक्तींपैकी तीन व्यक्ती मयत झाले असून तिघांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत
1. समीना शेख वय 48 रा. जागतियाल, तेलंगणा
2. हसीना शेख वय 29 जागतियाल, तेलंगणा
3. महेबूब शेख रा. गवंडगाव ता. देगलूर
खालील एक महिला अजूनपर्यंत बेपत्ता असून तिचा शोध घेणे चालू आहे.
1. आफरिन शेख वय 30 रा. जागतियाल, तेलंगणा

 वृत्त क्रमांक 875 

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा नांदेड दौरा  

नांदेड दि. 19 ऑगस्ट :- राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे बुधवार 20 ऑगस्ट 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे राहील.  

बुधवार 20 ऑगस्ट 2025 रोजी वाशिम येथून सायं. 5 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सायं 6.10 वा. नांदेड विमानतळ येथून पुणे विमानतळाकडे प्रयाण करतील. 

0000



वृत्त क्रमांक 874 

समाज कल्याणच्या विविध योजनेची कार्यशाळा संपन्न 

नांदेड दि. 19 ऑगस्ट :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण नांदेड कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणा-या विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच स्वाधार योजना या सर्व योजना ऑनलाईन प्रणालीवर राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत यशवंत महाविद्यालय बाबानगर नांदेड येथे नुकतीच 19 ऑगस्टी रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. 

या कार्यशाळेसाठी यशवंत महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राचार्य व उपप्राचार्य तसेच शिष्यवृत्ती विभागातील कर्मचारी, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यशाळेस प्रमुख उपस्थिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्याना भारत सरकार शिष्यवृत्ती व स्वाधार योजनेच्याबाबत मार्गदर्शन केले. जास्तीतजास्त प्रमाणात अर्ज भरून मंजुरीसाठी समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावे तसेच शिष्यवृत्ती व स्वाधार योजनेच्या बाबतीत अर्ज करत असताना विद्यार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन  समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

000000



विशेष लेख                                                                   

दि. 19 ऑगस्ट 2025                                                                                        

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सदाशिव बडवणे यांना

मिळाली उपचारासाठी 1 लाख रुपयांची मदत ! 

राज्यातील नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन लाभावे, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरीब, गरजू रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. यामुळे त्यांच्यासाठी या योजनेच्या माध्यमातून मोठा आधार निर्माण झाला आहे. आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेकदा आरोग्यपूर्ण जीवन जगताना अनेक अडचणी निर्माण होताना दिसत आहेत. अनेकदा एखाद्या कुटुंबावर अचानक गंभीर आजाराचा आघात होतो. रुग्णासह संपूर्ण कुटुंबाचा धीर खचून जातो. अशावेळी मुख्यमंत्री सहायता निधीतून रूग्ण व त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळताना दिसत आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचाराकरिता अर्थसहाय्य करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळण्यासाठी रुग्णांना आता मुंबईला जाण्याची गरज राहिली नसून प्रत्येक जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्षाची स्थापना 1 मे 2025 पासून करण्यात आली आहे. रुग्णांना आता त्यांच्या स्वत: जिल्ह्यात उपचारासाठी मदतीसाठी अर्ज करता येणार असून अर्जावर झालेल्या कार्यवाहीची माहितीसुध्दा त्यांच्या जिल्ह्याच्या कक्षात मिळणार आहे.  

नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे. या कक्षमार्फत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत या निधीच्या माध्यमातून 539 रुग्णांना मदत केली आहे. यासाठी 4 कोटी 42 लाख 24 हजार एवढा निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय नांदेड कक्षाच्यावतीने दिली आहे. 

नांदेड जिल्ह्याच्या या कक्षाच्या माध्यमातून मदत घेतलेल्या रुग्णांकडून याबाबत त्यांच्या शब्दात त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात येत आहेत. यावेळी आपण नांदेड तालुक्यातील पिंपळगाव कोरका येथील रुग्ण सदाशिव गणेशराव बडवणे वय वर्षे 55 यांच्या कुटूंबियाच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यांचा मुलगा राहुल यांनी सांगितले की, वडिलांना एके दिवशी अचानक ताप आला मग त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता नांदेड येथे श्री गंगा हॉस्पिटल यांनी ताप मेंदुला गेला असल्याचे सांगितले. यासाठी त्यांना बराच खर्च येणार होता. यावेळी त्यांच्याकडे पैशाची व्यवस्था नव्हती. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असून अल्पभुधारक शेतकरी आहेत. अशाच परिस्थितीत अचानक आजारपण यामुळे कुटूंबातील कर्ता माणूस आजारी पडल्यामुळे कुटूंबातील इतर सदस्यांना पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी खूप धावपळ करावी लागली. यातच रुग्ण कोमात गेला. त्यानंतर श्री गंगा हॉस्पिटल नांदेड येथे त्यांच्यावर 17 ते 18 दिवस उपचार करण्यात आले. यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मदतीसाठी अर्ज केला व सर्व कागदपत्रांची पूर्तता केली.  त्यानंतर त्यांचा अर्ज तात्काळ मंजूर होवून त्यांना मदत कक्षाकडून 1 लाख रुपयांची मदत मिळाली. या मदतीमुळे त्यांच्यावर यशस्वी उपचार करुन ते यातून सुखरुप बरे झाले व घरी परतले आहेत. 

या मदत निधीमुळे त्यांचा मुलगा राहुल व मुलगी जयश्री, पत्नी पार्वतीबाई बडवणे यांनी महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाच्या माध्यमातून मदत मिळाल्यामुळे त्यांच्या वडीलांचे जीव वाचला याबाबत त्यांनी मनापासून आभार मानले. गरजू व पात्र लाभार्थ्यांना या मदतीमुळे खूप मोठा आधार मिळत असून ही मदत गरजू रुग्णांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरत आहे.  

अलका पाटील

उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

00000



 आपल्या अद्वितीय शौर्याने हिंदवी स्वराज्याचा विस्तार बंगालपर्यंत करणारे 'सेनासाहिबसुभा श्रीमंत राजे रघुजी भोसले' यांच्या जीवनकार्याची व त्यांच्या ऐतिहासिक तलवारीची माहिती देणारी ही AV...



 वृत्त क्रमांक 873 

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचा दौरा 

नांदेड दि. 19 ऑगस्ट :- राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे आज नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे राहील. 

मंगळवार 19 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई येथून खाजगी विमानाने दुपारी 4.45  वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सायं. 5 वा. नांदेड येथून मोटारीने मुखेडकडे प्रयाण व पुरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करतील. सायं. 7.15 वा. मोटारीने नांदेडकडे प्रयाण. सायं. 8.30 वा . नांदेड येथे आगमन व राखीव.

0000

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...