Monday, July 28, 2025

जागतिक #निसर्गसंवर्धन दिन


 

वृत्त क्र. 775

शेतकऱ्यांनी हुमणी अळी या बहुभक्षीय किडींचे योग्य व्यवस्थापन व नियोजन करावे –जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी 

नांदेड दि. 28 जुलै :- हुमणी अळी (होलोट्रीचीया प्रजाती) ही एक बहुभक्षी कीड असून महाराष्ट्रामध्ये होलोट्रीचीया सेरेंटा या प्रजातीमुळे प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर या पिकाचे नुकसान होते. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी हुमणी अळी या बहुभक्षीय किडींचे योग्य व्यवस्थापन व नियोजन करावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. 

पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी सायंकाळच्या वेळी शेतातील कडुलिंब, बोर आणि बाभुळ या झाडांचे निरीक्षण करावे. त्यासाठी झाडाखाली प्रकाश सापळे लावावे. एक मादी भुंगा नष्ट झाल्यास त्यापासुन तयार होणाऱ्या ४० ते ५० अळयांचा नाश होतो. सातत्याने हि किड येणाऱ्या भागात बाभुळ, कडूनिंब आणि बोर हयासारख्या झाडावर किटकनाशकाची पहिली फवारणी करावी. भुंग्यांची संख्या प्रत्येक झाडावर सरासरी २० अगर त्यापेक्षा जास्त असेल तर नियंत्रणाची मोहीम राबवावी. किटकनाशकांचा वापर करतांना मजुरांना संरक्षण साधने पुरवावीत. गरज भासल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर ३ आठवडयांनी करावी. 

हुमणी अळीची प्रौढ मादी पाऊस पडल्यानंतर जमिनीत अंडी देते. हया किडींची अळी अवस्था नुकसान कारक असून ती विविध पिकांच्या मुळावर आपली उपजीवीका करते. उदा. ज्वारी, बाजरी, मका, भात, गहु, ऊस, मिरची, मुंग, करडई, वांगी, कापूस आणि सुर्यफुल ई. पिकाची मुळे खाल्यामुळे पिके उधळून जमिनीवर कोलमडून पडतात. 

या किडीचे जीवनचक्र एक वर्षाचे असून ती आपली उपजीविका जमिनीमधे करते. हि किड अळी अवस्थेत 6 ते 8 महिण्याची असून या अवस्थेत खरीप व रब्बी पिकांची मुळे खाऊन पिकाचे नुकसान करते. एक मादी दररोज एक अंडी घालते. एक मादी मे ते जुलै महिन्यात पोषक वातावरणानुसार 40 ते 50 अंडी घालते. अंडी 3 ते 5 दिवसात उबवून त्यातून बारीक पिवळसर अळया निघतात. त्या अळ्या गवताच्या कुंजलेल्या मुळ्या खाऊन जगतात. पूर्ण वाढ झालेली अळी 3 त 5 सेंमी रुंद, मांसळ पांढुरकी अथवा मळकट पणुढ-या रंगाची "C" आकाराची असते. 

शेतात निरिक्षण घेतेवेळी एकरी 20 ठिकाणचे मातीचे नमुने (1 फुट x 1 फुट x 6 इंच खोल) घेवून त्यात हुमनी अळया आहेत का ? ते शोधावे, तसेच पिकामधे विशिष्ट ओळीमधे प्रादूर्भावग्रस्त झाडाची पाने पिवळी पडून सुकतात. अशी झाडे आढळल्यास ती मुळासकट उपटुन मुळे कुरतडलेली आहेत का? हे पहावे.

सौम्य प्रादुर्भाव तुरकळ ठिकाणीच असल्यास जैविक मित्र बुरशी मेटॅरायझियम 4 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पिकांच्या मुळाशी आळवणी करावी किंवा मेटॅरायझियम 1 किलो प्रति 100 किलो शेणखतात मिसळून प्रति हेक्टरी शेतात फेकावे. मित्र बुरशीचा वापर करतांना ओलावा असणे आवशक असते.

लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास व्यवस्थापनाकरीता खालील पैकी एका रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा. फिप्रोनिल 40 टक्के + इमिडॅक्लोप्रिड 40 टक्के दाणेदार 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन द्रावण खोडांजवळ टाकावे. किंवा कार्बोफ्यूरॉन 3 टक्के दानेदार ३३.३० किलो किंवा थायोमेथोक्झाम 0.4 टक्के + बायफेनथ्रिन 0.8 टक्के दानेदार 12 किलो प्रति हेक्टर किंवा थायोमेथोक्झाम 0.9 टक्के फिप्रोनिल 2 टक्के दानेदार 12 ते 15 किलो प्रति हेक्टर खोडांजवळ जमिनीत ओलावा असतांना मातीत मिसळून दयावे.

00000

वृत्त क्र. 774

महाराष्ट्र ऑटो आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी

मंडळाच्या सभासद नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 28 जुलै :- नांदेड जिल्हातील सर्व रिक्षाचालक आणि टॅक्सी चालक संघटना तसेच रिक्षाचालक आणि टॅक्सी चालक यांनी महाराष्ट्र ऑटो आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या सभासद नोंदणीसाठी या लिंकवर https://ananddighekalyankarimandal.org ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत ककरेज यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ, मुंबई ची स्थापना केलेली आहे. या कल्याणकारी मंडळाचा उद्देश पुढीलप्रमाणे आहे. वय 65 वर्षावरील चालकासाठी सन्मान निधी योजना, जिवन विमा व अपंगत्व विमा योजना कर्तव्यावर असतांना, आरोग्य विषयक लाभ योजना, कामगार कौशल्य वृध्दी योजना, कर्तव्यावर असतांना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृती योजना आहेत.

महाराष्ट्र ऑटो आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची https://ananddighekalyankarimandal.org ही अधिकृत लिंक आहे. या लिंकव्दारे रिक्षाचालक आणि टॅक्सी चालक सभासद नोंदणीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करू शकतात, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.

00000

वृत्त क्र. 773

एकाच अपिलार्थीचे 81 अपील राज्य माहिती आयोगाने फेटाळले

19 अपिलार्थींचे 7 हजार 567 व्दितीय अपील फेटाळले

नांदेड, 28 जुलै :- नांदेड येथील जनक रामराव गायकवाड या अपिलार्थीने राज्य माहिती आयोग, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत दाखल केलेले 81 द्वितीय अपील आयोगाने फेटाळले आहेत. यासोबतच 19 अपिलार्थींनी दाखल केलेले 7 हजार 567 व्दितीय अपील आयोगाने सुनावणी घेऊन फेटाळले आहेत.

अपिलार्थी यांनी विविध ग्रामपंचायत कार्यालयाकडे 81 माहितीचे अर्ज सादर केलेले आहेत. अशा मोठ्या प्रमाणावर माहिती अर्ज करणाऱ्या खालील नमूद अपिलार्थी यांची द्वितीय अपिले आयोगाने सुनावणी घेऊन फेटाळलेली आहेत. आयोगाकडील सदरील निर्णय आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. 

बहुतांश अपिलार्थी कार्यालयाकडे वारंवार अर्ज सादर करतात. अपिलार्थी व्यक्तिशः माहितीची मागणी करुन त्याप्रमाणे माहिती प्राप्त करुन घेण्यासाठी कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. अपिलार्थी यांनी जेवढ्या ग्रामपंचायत कार्यालयाकडे माहिती अर्ज सादर केले त्या सर्व ग्रामपंचायत कार्यालयात स्वतंत्र जन माहिती अधिकारी पदनिर्देशित आहेत. मात्र अशा सर्व जन माहिती अधिकारी यांचेसाठी केवळ एकच प्रथम अपिलीय अधिकारी पदनिर्देशित आहेत. बहुतांश वेळा अपिलार्थी जेवढे माहितीचे अर्ज दाखल करतात जवळजवळ तेवढेच प्रथम अपिले दाखल करतात. या परिस्थितीत दैनदिन कामकाज सांभाळून अपिलाची यांच्या दाखल प्रथम अपिलावर कार्यवाही करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. मोठ्या संख्येने प्राप्त झालेल्या अर्जाचा विपरित परिणाम दैनंदिन शासकीय कामकाजावरुन होऊन सर्वसामान्य नागरिकांना नैसर्गिक न्याय देता येणे शक्य होत नाही.

प्रस्तुत प्रकरणात, अपिलार्थी यांनी आयोगाकडे व्दितीय अपिले दाखल करताना प्रयोजनामध्ये, माहिती दिली नसल्यामुळे, असे कारण नमूद केलेले आहे. अपिलार्थी यांनी त्यांच्या माहिती अर्जाव्दारे मागणी केलेल्या माहितीचे अवलोकन केले असता, अपिलार्थी यांनी मागणी केलेली माहिती विस्तृत, व्यापक व मोघम स्वरुपाची आहे. अशी माहिती एकत्रित करण्याकरिता सार्वजनिक प्राधिकरणाकडील मनुष्यबळ व साधनसामग्री मोठ्या प्रमाणावर वळवावी लागते. ही बाब माहिती अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम 7 (9) नुसार योग्य ठरत नाही. यामुळे अशा स्वरुपाचे माहिती अर्ज व्यवहार्य ठरत नाहीत. कारण माहिती अधिकारामागील भूमिका व उद्दिष्ट सफल होत नाहीत.

प्रस्तुत प्रकरणात, अपिलार्थी यांनी विविध ग्रामपंचायत कार्यालयाकडे 81 माहितीचे अर्ज सादर केलेले आहेत या अपिलार्थी यांची व्दितीय अपिले आयोगाने सुनावणी घेऊन फेटाळलेली आहेत. आयोगाकडील सदरील निर्णय आयोगाच्या www.sic.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले आहेत. 

प्रस्तुत प्रकरणात संबंधितांनी आयोगासमोर केलेला युक्तिवाद तसेच मा. सर्वोच्च न्यायालय, मा.उच्च न्यायालय व मा.केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग यांनी वेळोवेळी पारित केलेले निर्णय विचारात घेता, एकाच व्यक्तीने मोठ्या संख्येने माहिती अधिकार कायद्याखाली माहिती अर्ज अपिले करणे माहिती अधिकार कायद्यामध्ये अभिप्रेत अपेक्षित नाही. यावरुन अपिलार्थी हे माहिती अधिकार कायद्याचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग करुन संबंधित शासकीय कार्यालयास / प्राधिकरणास वेठीस धरत आहेत. त्यांच्या या कृतीमुळे संबंधित शासकीय कार्यालये, प्राधिकरणांचे दैनंदिन कामकाज ठप्प होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. अशा मोठ्या स्वरुपात अर्ज करण्याच्या सवयीमुळे संबंधित शासकीय कार्यालये / प्राधिकरणे यांचा बहुमुल्य वेळ व शक्ती अधिक प्रमाणात खर्ची पडुन सदर शासकीय कार्यालयांकडून सर्व सामान्य जनतेला ज्या सेवा देणे अभिप्रेत आहे, त्या महत्वाच्या शासकीय कामकाजावर गंभीर परिणाम होण्याचा धोका देखील निर्माण झालेला आहे. अपिलार्थी यांनी माहिती अर्थान्वये मागणी केलेल्या माहितीतून कोणतेही व्यापक जनहित साध्य होत असल्याचे स्पष्ट होत नाही. वारंवार मोठ्या प्रमाणात माहितीचे अर्ज करुन मागणी केलेल्या माहितीच्या मागणीमुळे शासकीय यंत्रणेतील मनुष्यबळ व साधन सामग्री यावर ताण येत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन शासकीय कामे पूर्ण करण्याच्या शासकीय कार्यालयाच्या / प्राधिकरणाच्या क्षमतेवर विपरित परिणाम होऊन शासकीय कामकाजाचा खोळंबा होईल व असे माहिती अधिकार कायद्यास अभिप्रेत नाही, असे आयोगाचे स्पष्ट मत झालेले आहे.

पुढील अपीलार्थीची आयोगाने द्वितीय सुनावनी घेवून अपीले फेटाळली आहेत. केशवराव निंबाळकर यांची आयोगाकडे दाखल 2788 द्वितीय अपिले 26 जुन 2024 तर 842 द्वितीय अपिले 19 डिसेंबर, 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. शरद दाभाडे यांची 159 द्वितीय अपिले 26 एप्रिल, 2024 तर 985 द्वितीय अपिले 27 सप्टेंबर, 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. मोतीराम गयबु काळे यांची आयोगाकडे दाखल 463 द्वितीय अपिले 23 सप्टेंबर, 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. बाळासाहेब भास्कर बनसोडे यांची आयोगाकडे दाखल 256 द्वितीय अपिले 20 डिसेंबर, 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. श्रीमती अनिता नितीन वानखेडे यांची आयोगाकडे दाखल 116 द्वितीय अपिले 06 सप्टेंबर 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. बाबुराव धोंडु चव्हाण यांची आयोगाकडे दाखल 198 द्वितीय अपिले 20 जानेवारी 2025 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. जयभीम नरसिंगराव सोनकांबळे यांची आयोगाकडे दाखल 176 द्वितीय अपिले 01 ऑक्टोबर 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. हरि प्रताप गिरी यांची आयोगाकडे दाखल 296 द्वितीय अपिले 28 ऑगस्ट 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. विनोदकुमार भारुका यांची आयोगाकडे दाखल 236 द्वितीय अपिले 28 ऑगस्ट 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत.  गिरीश म. यादव यांची आयोगाकडे दाखल 206 द्वितीय अपिले 23 ऑगस्ट 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. संजय हाबु राठोड यांची आयोगाकडे दाखल 100 द्वितीय अपिले 30  ऑगस्ट 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. रायभान किसन उघडे यांची आयोगाकडे दाखल 216 द्वितीय अपिले 30 सप्टेंबर 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. बालाजी बळीराम बंडे यांची आयोगाकडे दाखल 156 द्वितीय अपिले 01 ऑक्टोबर 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. भालचंद्र साळुंके यांची आयोगाकडे दाखल 103 द्वितीय अपिले 24 जानेवारी 2025 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत.  मिलिंद दगडु मकासरे यांची आयोगाकडे दाखल 125 द्वितीय अपिले 30 ऑगस्ट 2024 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत.  ज्ञानेश्वर धायगुडे यांची आयोगाकडे दाखल 86 द्वितीय अपिले 24 जानेवारी 2025 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत. सुरज नंदकिशोर व्यास यांची आयोगाकडे दाखल 63 द्वितीय अपिले 24 जानेवारी 2025 रोजी सुनावणी घेऊन फेटाळली आहेत.

00000

 वृत्त क्र. 772

सीआरपीएफचा 87 वा स्थापना दिवस मुदखेड येथे उत्साहात साजरा 

नांदेड दि. 27 जुलै:- मुदखेड येथे सेंट्रल ट्रेंनिग महाविद्यालयात, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स (सीआरपीएफ) दलाचा 87 वा स्थापना दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महानिरीक्षक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य ख्वाजा सजनुद्दीन यांनी सर्व अधिकारी, जवान आणि त्यांच्या कुटूंबियांना शुभेच्छा देवून सीआरपीएफ दलाच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला. सीआरपीएफची स्थापना 27 जुलै 1939 रोजी नीमच मध्यप्रदेश येथे क्राऊन रिप्रेझेंटेटिव्हज पोलीस म्हणून झाली. स्वातंत्र्यानंतर त्याची पुनर्रचना केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणून करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी 27 जुलै हा दिवस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. 

यावेळी महानिरीक्षकांनी शहीद सैनिकांना श्रध्दांजली वाहिली. क्वार्टर गार्डमध्ये त्यांना मानवंदना देण्यात आली आणि विशेष सैनिक संमेलनाला संबोधित करताना त्यांनी देशसेवेतील सैन्याच्या शिस्त, वचनबद्धता आणि योगदानाचे कौतुक केले. 

स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मुदखेड शहरात भव्य सायकल रॅली, सामुहिक वृक्षारोपन आणि केंद्रीय विद्यालयातील मुलांसह संस्थेच्य कॅम्पमधील मुलांसाठी विविध श्रेणीमध्ये चित्रकला स्पर्धा यांचा समावेश होता. यासोबतच प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थीमध्ये उत्साहाने क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष दिनानिमित्त सर्वाना एकता आणि उत्सवाचा अनुभव देण्यासाठी संस्थेच्या सर्व कॅन्टीनमध्ये बडा खाना या विशेष सामूहिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. 

कमांडंट कम चीफ ट्रेनिंग ऑफिसर वेद प्रकाश त्रिपाठी, डेप्युटी कमांडंट अरुण कुमार आणि मोहम्मद शाहनेवाज, असिस्टंट कमांडंट करणजीत सिंग आणि वासुदेव, वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश कुमार आणि संस्थेचे अधीनस्थ अधिकारी, सैनिक, प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी या प्रतिष्ठित कार्यक्रमास उपस्थित होते.

00000








वृत्त क्र. 771

श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विजय दिन साजरा

नांदेड दि. 27 जुलै:- भारताच्या इतिहासात अनेक वेळा परकीय आक्रमणांचा सामना करावा लागला. तथापि भारतीय स्वराष्ट्राच्या संकल्पनेला विसरले नाहीत. अनेक योध्दे, क्रांतीकारकांनी एक राष्ट्र या संकल्पनेसाठी लढा दिला. 1999 मध्ये झालेल्या कारगील युध्दामध्ये भारतीय सैनिकांनी अतुलनीय पराक्रम केलेला आहे. 26 जुलै हा विजय दिन केवळ एक दिवस नसून तो भारताच्या शौर्य, बलिदान व स्वराज्याच्या संस्कृतीचा उत्सव आहे. हा विजय दिवस साजरा करून राष्ट्र भक्तीचा संकल्प पुन्हा जागविण्यासाठी श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले.

त्या अनुषंगाने श्री गुरूगोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे 26 जुलै रोजी विजय दिन साजरा करण्यात आला. विजय दिनानिमीत्त माजी सुभेदार गोविंद शेवाळकर,  लक्ष्मण विश्वास,  सखाराम जोशी तसेच विरांगणा श्रीमती सरोजनी शिनगार पुतळे, श्रीमती शितल कदम यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख वक्ते उभेदळ पी. बी. शि. नि. यांनी आपल्या भाषणात ऐतिहासीक काळात राजे महाराजांनी लढलेल्या लढाया त्यांचे शौर्य तसेच भारताला स्वातंत्र्य मिळवून देणेसाठी ज्या वीर योध्यांनी प्राणांची आहुती दिली या सर्वांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमादरम्यान भारताने लढलेल्या आजपर्यंतच्या लढाया याबाबतची चित्रफीत दाखवण्यात आली. तसेच भारताने आज केलेली शस्त्रांमधील प्रगती त्यांची ओळख चित्रफितीच्या माध्यमाव्दारे प्रशिक्षणार्थ्यांना दाखवण्यात आली. कारगील युध्दात प्रत्यक्ष सहभाग घेतलेले माजी सुभेदार सखाराम जोशी यांनी आपले युध्दातील अनुभव कथन केले. उदयोग निरीक्षक तथा माजी सैन्य अधिकारी सतीश चव्हाण यांनी आपल्या भाषणात प्रत्येक नागरीक हा सैनिक आहे फक्त भावना जागृत व्हायला पाहिजे तसेच सैनिक हा एक विचार आहे, प्रत्येकाने जबाबदारी योग्य पध्दतीने /सदसदविवेक बुध्दीने निभावणे म्हणजे सैनिक होय असे आपल्या भाषणात नमूद केले. Submarine life चे आयुष्य कशाप्रकारचे असते यावर प्रकाश टाकला. प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो. चे कार्यक्रमाधिकारी पोतदार डी. ए. यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

00000

दि. २७ जुलै 2025

 वृत्त क्र. 770

लिंबूवर्गीय फळे क्षेत्रविस्तार,प्रक्रिया,मूल्यवर्धन  संधींचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - विलास शिंदे

सह्याद्री फार्मर प्रोडूसर कंपनी, नाशिक यांचे जिल्हास्तरीय कार्यशाळेत आवाहन 

नांदेड, दि. २७ जुलै:- शनिवारी कै.शंकररावजी चव्हाण मुख्य सभागृह,जिल्हा नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे कृषी विभाग आणि आत्मामार्फत संत्रा,मोसंबी, कागदी लिंबू या फळांचा क्षेत्र विस्तार प्रक्रिया आणि मूल्यवर्धन संधीबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यशाळेस संपूर्ण जिल्हाभरातून 400 पेक्षा अधिक फळ बागायतदार शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.

 नांदेड जिल्ह्यात मोसंबी,कागदी लिंबू,संत्रा या पिकाखाली फळबाग लागवड करण्यास असलेला वाव, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमधून उपलब्ध असलेले अनुदान सहाय्य याविषयी प्रास्ताविकातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी मार्गदर्शन केले. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आणि नुकत्याच येऊ घातलेल्या कृषी समृद्धी योजनेमधून शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध असलेल्या फळबाग लागवड, पॅक हाऊस, कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया संधीविषयी माहिती दिली. तसेच या योजनांचा लाभ प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावातील शेतकरी बांधवांनी एकत्रित येऊन शेतकरी गटे, शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणेविषयी तसेच ॲग्रीस्टॅक प्रकल्पांतर्गत   शेतकरी ओळखपत्र प्राप्त करण्याविषयी मार्गदर्शन केले. 

सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी,नाशिक  विलास शिंदे हे सदर कार्यशाळेस मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभले होते. त्यांनी सोयाबीन कपाशी सारखी पारंपारिक पिकांचे अर्थशास्त्र आणि फळे,भाजीपाला,फुल शेती या पिकांचे अर्थशास्त्र व उत्पादनाच्या,उत्पन्नाच्या मूल्यवर्धनाच्या आणि निर्यातीच्या संधीविषयी मार्गदर्शन केले आणि फलोत्पादन पिकांकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वाटचाल करावी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून प्रक्रिया उद्योगांसोबत   खरेदी करार  करणेविषयी माहिती दिली. 

कार्यशाळेचे डॉ. शिंदे, प्रमुख शास्त्रज्ञ,कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी यांनी  कागदी लिंबू,संत्रा,मोसंबीच्या प्रक्रियेस सुयोग्य अशा जातीच्या लागवड प्रयोगाविषयी माहिती दिली. सरते शेवटी शेतकऱ्यांनी या विषयावर विविध प्रश्न आणि शंका विचारून लिंबूवर्गीय फळपीक नवीन वाणांचे लागवड साहित्य, जुन्या फळबाग झाडावर नवीन वाणांचे ग्राफ्टिंग करणे इत्यादी माहिती घेतली. 

सदर कार्यशाळेस डॉ.देविकांत देशमुख, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र,पोखरणी कैलास वानखेडे, कृषी उपसंचालक, श्रीमती अर्चना गुंजकर, प्रकल्प संचालक,आत्मा, श्री. रणवीर, उपविभागीय कृषी अधिकारी किनवट, गीते, उपविभागीय कृषी अधिकारी देगलूर, श्री. शिरफुले नोडल अधिकारी,स्मार्ट तथा उपविभागीय कृषी अधिकारी, नांदेड तसेच  तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेचे यशस्वी आयोजनासाठी श्री मिरगेवार, तंत्र अधिकारी आणि आत्माअंतर्गत सर्व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी विशेष परिश्रम घेतले.

०००००





 

दि. २६ जुलै 2025

 वृत्त क्र. 769

कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी 

नागरिकांनी सहकार्य करावे- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख 

नांदेड, दि. २६ जुलै : सध्याच्या पावसामुळे आणि त्यानंतरच्या दमट वातावरणामुळे कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता, नांदेड आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि इतर कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग कटीबद्ध असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी सांगितले आहे.

आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना:

जनजागृती अभियान: आरोग्य सेवक घरोघरी जाऊन नागरिकांना या आजारांची माहिती देतील आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना समजावून सांगतील.

डास उत्पत्ती स्थानांचा शोध व निर्मूलन: साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे घरातील आणि घराबाहेरील कुंड्या, टायर, नारळाच्या करवंट्या, पाण्याच्या टाक्या इत्यादी ठिकाणी पाणी साचू न देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी डास उत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट करतील.

फवारणी मोहीम: आवश्यकतेनुसार डासांचा प्रादुर्भाव असलेल्या परिसरात फवारणी केली जाईल.

ताप सर्वेक्षण: आशासेविका व आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन तापाच्या रुग्णांचा शोध घेतील आणि त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला व उपचार मिळवून देण्यास मदत करतील.

तात्काळ उपचार: ताप आल्यास तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात किंवा डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी आणि उपचार घ्यावा. स्व-औषधोपचार टाळावा.

नागरिकांना आवाहन

नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे आणि आपल्या परिसरात स्वच्छता राखावी. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळून पाण्याची भांडी रिकामी करावीत. खिडक्यांना जाळ्या लावाव्यात आणि झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.

आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे आपल्या हातात आहे. कोणताही ताप किंवा आजाराची लक्षणे दिसून आल्यास त्वरित उपकेंद्र व प्रा  आ केंद्र अशा शासकीय संस्थांशी संपर्क  साधावा असे आव्हान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख. हिवताप अधिकारी डॉ. अमृत चव्हाण यांनी केले.

०००००

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...