Tuesday, May 14, 2024

वृत्त क्र. 422

 डेंग्यू ताप आजार टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी 

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष सुर्यवंशी यांचे आवाहन

 

नांदेड दि. 14 :- डेंगी ताप विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासाच्या मादीमार्फत होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्याचे रूपांतर डासात होते. कोणतेही साठविलेले पाणी हे आठ दिवसांपेक्षा जास्त ठेवू नाही. याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून डासाची उत्पत्ती कमी करुन नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्याची आवश्यकता आहे. 

 

नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेत राष्ट्रीय डेंग्यु दिन गुरुवार 16 मे 2024 रोजी साजरा होत आहे. 2024 या वर्षीचे  घोषवाक्य  समुदायाच्या संपर्कात रहा, डेंग्यूला नियंत्रित करा असे आहे. नागरिकांमध्ये जागरुकता आणून डासांपासून होणाऱ्या डेंग्यू आजारास प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात येतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासाच्या मादीमार्फत होतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. उदा. सिंमेट टाक्या, रांजण, प्लास्टिक रिकाम्या बादल्या, नारळाच्या करवंटया, घरातील शोभेच्या कुंडया, निरउपयोगी वस्तू, टायर्स व कुलर ईत्यादी. जास्त दिवस साठलेल्या ठिकाणी एडिस इजिप्टाय डासाची मादी अंडी घालते. एक डास एकावेळी दिडशे ते दोनशे अंडी घालते व यातून या डासाचा मोठा फैलाव होतो.

 

डेंगी ताप आजारात रुग्णास दोन ते सात दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोके, सांधे, स्नायु दु:खीचा त्रास होतो. रुग्णास उलट्या होतात. डोळ्याच्या आतील बाजू दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक-तोंड यातून रक्त स्त्राव होतो. अशक्ततपणा, भुक मंदावते, तोंडाला कोरड पडते ही लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांनी वेळेत जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी व उपचार करुन घेणे आवश्यक आहे.

 

नांदेड जिल्ह्यात मागील तीन वर्षांची डेंग्युची परिस्थिती पुढीलप्रमाणे आढळते. ( घेतलेले तपासलेले रक्तजल नमुने) कंसाबाहेर डेंग्यु दुषित रुग्ण, नंतरच्या (कंसात मृत्यू रुग्ण). सन 2021- (687144 (निरंक). सन 2022  (744) 93 (निरंक). सन  2023 -(1490) 292 (निरंक) तर 30 एप्रिल 2024 अखेर- (33676 (निरंक).

 

भविष्यात डेंगीताप या आजाराचा उद्रेक होवू नाही. यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत पुढील साधे व सोपे प्रतिबंधात्मक उपायांची नागरिकांनी अंमलबजावणी करावी. आपल्या घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे आठवडयातून एकदा रिकामे करावीत. या साठयातील आतील बाजू व तळ घासुन पुसुन कोरडा करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत. आंगण व परिसरातील खड्डे बुजवावेतत्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. ग्रामीण भागात ज्यांच्या शेतामध्ये शेततळे आहेत त्यांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करुन गप्पी मासे सोडावीत. झोपताना पूर्ण अंगभर कपडे घालावीत. पांघरुन झोपावे. सायंकाळी 6 ते 8 यावेळेत दारे खिडक्या बंद कराव्यात. खिडक्यांना जाळया बसवाव्यात. झोपतांना चांगल्या मच्छरदाणीचा वापर करावा. आपल्या घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास घर संपूर्ण फवारुण घ्यावे. फवारलेले घर किमान दोन ते अडीच महिने सारवून रंगरंगोटी करु नये. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी इत्यादींची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. दर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकाऊ ऑइल टाकावे. डेंगी तापाची लक्षणे आढळल्यास तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध करुन दिली आहे.

नागरिकांनी दक्षता घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. योग्य काळजी, वेळीच केलेला उपचार प्रत्येकाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवतो. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावेअसे आवाहन नांदेडचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष सुर्यवंशी यांनी केले आहे.

00000

वृत्त क्र. 421

 अर्धापूर येथील मुलांचे वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

नांदेड दि. 14 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह अर्धापूर येथे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबतची प्रवेश प्रक्रीया सुरु झाली आहे. अर्धापूर तालुक्यातील इयत्ता आठवी, अकरावी व पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या इच्छूक व पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

अर्धापूर तालुक्यातील गावातील विद्यार्थी जे तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत अशा इच्छूक व पात्र विद्यार्थी व पालकांनी इयत्ता आठवी, अकरावी व पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज मुलांचे वसतिगृह, ग्रामीण रुग्णालय बाजूला, पांगरी रोड, अर्धापूर येथील कार्यालयात विनामुल्य भरुन द्यावेत. विहित कालावधीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही यांची नोंद विद्यार्थी व पालकांनी घ्यावी, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

0000  

वृत्त क्र. 420

 कापूस लागवड 1 जूननंतरच करावी

कापूस बियाणांची खरेदी अधिकृत विक्रेत्याकडून करावी – कृषि विकास अधिकारी

नांदेड दि. 14 :- येत्या खरीप हंगामात कापूस पिकाच्या उत्पादकतेत वाढ होण्यासाठी व चांगल्या प्रकारे उत्पादन घेण्यासाठी कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस बियाणांची खरेदी जिल्ह्यातील अधिकृत विक्रेत्यांकडून पावती घेवूनच करावी. अनाधिकृत विक्रेते व फेरीवाले यांच्याकडून कापूस बियाण्याची खरेदी करु नये. तसेच कापूस लागवड 1 जूननंतरच करावी, असे आवाहन जिल्हा परिषदचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.

जिल्ह्यात कापूस पिकाचे 20 लाख 10 हजार 500 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. परंतु गतवर्षीची कापूस उत्पादकता विचार करता कापूस पिकाच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कापूस पिकाची लागवड नगदी पिक म्हणून केली जाते. कापूस पिकाची उत्पादकता मागील काही वर्षे गुलाबी बोंडअळीमुळे कमी झालेली आहे. परंतु गतवर्षी कापूस पिकाची पेरणी 1 जूननंतर केल्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव न झाल्यामुळे कापूस पिकाच्या उत्पादकता मध्ये 2022 च्या तुलनेत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 1 जूननंतरच कापूस पिकाची पेरणी करावी, असे जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

वृत्त क्र. 419

 ईअर टॅगिंग शिवाय 1 जूनपासून पशुधनाची खरेदी-विक्री बंद

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

ईअर टॅगिंग शिवाय पशुधनास कोणत्याही सेवा- सुविधा मिळणार नाहीत

नांदेड दि. 13 :- राज्यातील सर्व पशुधनाची ईअर टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व पशुपालकांनी भारत पशुधन प्रणालीवर पशुधनाची माहिती अद्ययावत करावी. 1 जून 2024 नंतर ईअर टॅगिंगशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री बंद करण्यात आली आहे. तसेच पशुधनास पशुवैद्यकीय संस्थादवाखान्यातून देय होणाऱ्या पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाहीत यांची नोंद पशुपालकांनी घ्यावीअसे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकरअपर पोलीस अधिक्षक खंडेराय धरणेउपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायकजिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. राजकुमार पडीलेजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकरसहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रविणकुमार घुले तसेच वनविभागनगरपालिकामहानगरपालिकेचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.

नांदेड जिल्ह्यात धर्माबाद वगळता 15 तालुक्याच्या ठिकाणी पशुचा बाजार भरतो. बाजाराच्या ठिकाणी पशुधनास आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजे. तसेच त्यांची वाहतुक व खरेदी - विक्री तसेच त्यांना देय सोयी सुविधासाठी पशुपालकांनी आपल्या पशुधनास प्राधान्याने ईअर टॅगिंग करुन घ्यावेअसे जिल्हाधिकारी यांनी  सांगितले. तसेच जिल्ह्यात पशुधनाची बेकायदेशिर वाहतूक होणार नाही यासाठी पशुसंवर्धन विभाग व पोलीस विभागाने समन्वयाने काम करावे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवणार नाही यांची काळजी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.

प्राण्यांवर होणाऱ्या क्रूरतेला आळा घालण्यासाठी शासनाने प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. या कायद्यामध्ये कलम 38 (1) नुसार पशुधन बाजाराचे नियमन नियम 2017 जाहिर केलेले आहे. या कायद्यानुसार जिल्हास्तरीय पशुधन बाजार सनियंत्रण समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. या समितीद्वारे बाजाराच्या ठिकाणी पशुधनास पुरेसा निवारागोठेखाद्यचारापाणीप्रकाशपशुधनास चढणे व उतरण्यासाठी रॅम्पन घसरणारी जमीनआजारी व अंपग वयस्कर पशुधनासाठी स्वतंत्र व्यवस्थागर्भवती प्राणी व लहान पशुधनास स्वतंत्र व्यसस्थापशुवैद्यकीय सुविधाचारा वैरण साठवणूक व पुरवठयासाठी व्यवस्थापाणीपुरवठा व स्वच्छता गृहेमृत पशुधनाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था इत्यादी विविध सुविधांची खात्री जिल्हास्तरीय पशुधन बाजार सनियंत्रण समितीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते याबाबत माहिती पशुसंवर्धन विभागाने पीपीटी द्वारे सादर केली.

0000

वृत्त क्र. 418

 स्ट्रॉंग रूमच्या पाहणीला चार उमेदवारांची उपस्थिती

सीसीटीव्ही फुटेज व सुरक्षा व्यवस्थेबद्दलची दिली माहिती

नांदेड दि. १३ : १६ - नांदेड लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील स्ट्रॉंग रूमची पाहणी करण्याकरिता आज जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रक्रिया पूर्ण केली. चार उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थिती यावेळी होती.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड येथे लोकसभेचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी पार पडले. 27 एप्रिल रोजी सहा विधानसभा क्षेत्रातील सर्व मतयंत्रे येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये स्ट्रॉंग रूममध्ये सीलबंद करण्यात आली आहे.  27 एप्रिलला उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी तसेच निवडणूक निरीक्षक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या स्ट्रॉंग रूमला सील करण्यात आले.

त्यानंतर तीनस्तरीय सुरक्षा व्यवस्थेच्या निगराणी मध्ये स्ट्रॉंग रूममध्ये ही मतंयंत्रे सुरक्षित ठेवण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आज पुन्हा एकदा स्ट्रॉंग रूमची सुरक्षा व्यवस्था व स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी सर्व उमेदवारांना प्रशासनाने आमंत्रित केले होते.

23 उमेदवारांपैकी प्रतिनिधी व उमेदवार असे मिळून चार जण उपस्थित होते.तर यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. 27 तारखेपासूनच्या फुटेजला यावेळेस दाखवण्यात आले. तसेच आयोगाच्या निर्देशानुसार अन्य खुलासे करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...