वृत्त क्र. 630
तीर्थ दर्शनासाठी समाज कल्याण विभागाकडे अर्ज दाखल करा
ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा ; 31 ऑगस्ट शेवटची तारीख
नांदेड दि. 24 जुलै :- राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना भेटी देणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थ क्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 18 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी 25 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
या योजनेमध्ये
महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थ स्थळांचा समावेश राहील. यात
निर्धारित तीर्थस्थळांपैकी एकाच स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा
एक वेळ लाभ घेता येईल. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30 हजार रूपये
इतकी राहील यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल.
लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. लाभार्थ्याचे वय 60 वर्षे पूर्ण असावे. लाभार्थ्याचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा कमी असावे यापेक्षा जास्त नसावे. अर्जासोबत रहिवासी प्रमाणपत्र,आधार कार्ड / मतदान कार्ड, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य/केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृध्दापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा किंवा तहसीलदार किंव्हा तत्सम सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले ज्येष्ठ नागरीक प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, उत्पन्नाचे प्रमाणपत्र (लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखाच्या आत असावे किंवा पिवळे/ केशरी रेशन कार्ड आवश्यक आहे. जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर व या योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र सोबत जोडावे लागेल. 75 वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एकाला त्यांच्यासोबत नेण्याची परवानगी असेल परंतु अर्जदार त्याच्या अर्जात असे नमूद करणे आवश्यक आहे की त्याचा जीवनसाथी/सहाय्यक देखील प्रवास करण्यास इच्छुक आहे.
वरील कागदपत्रे पूर्ण
करणारे लाभार्थ्यांनी 25 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज
कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर, नांदेड
येथे परिपूर्ण अर्ज सादर करावेत. तसेच यापूर्वी अर्ज दाखल केलेल्या लाभार्थ्यांनी
उपरोक्त प्रमाणे कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क
साधावा, असेही आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
00000