वृत्त क्रमांक 230
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांतर्गत
अवसायकांची नामतालिका (पॅनल) साठी मागविण्यात आले अर्ज
नांदेड दि. 25 फेब्रुवारी :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 102 अन्वये जिल्ह्यातील अवसायनातील संस्थांचे कामकाजासाठी अवसायकांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात आली आहेत, असे आवाहन लातूर सहकारी संस्था विभागीय सहाय्यक निबंधक, अधिन विभागीय सहनिबंधक अरुण शेंदारकर यांनी केले आहे.
याबाबत अर्जाचा विहित नमुना विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर विभाग, लातूर, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत लातूर यांच्या कार्यालयात 25 फेब्रुवारी ते 14 मार्च 2025 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 14 मार्च 2025 पर्यंत आहे. प्राप्त अर्जाची छाननी 20 मार्च 2025 रोजी पूर्ण करून 21 मार्च 2025 पर्यंत प्रारुप नामतालिका प्रसिद्ध करणे व 25 मार्च 2025 रोजी हरकती मागवणे व 27 मार्च 2025 रोजी हरकतीचा निर्णय करून 28 मार्च 2025 रोजी अंतिम नामतालिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
अर्ज कोणाला करता येणार
न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश व सेवानिवृत्त विधी अधिकारी, प्रॅक्टीसिंग अॅडव्हॉटस्, चार्टर्ड अकौन्टट, कॉस्ट अकौन्टर, कंपनी सेक्रेटरी, राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, भूविकास बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँका, नागरी सहकारी बँका, राज्य सहकारी बँका यांच्या सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले सेवानिवृत अधिकारी, सहकार विभागातील सेवानिवृत वर्ग-1, वर्ग-2 चे अधिकारी आणि सहकार अधिकारी प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी दर्जाचे कर्मचारी,महसूल विभागातील सेवानिवृत उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी, कंपनी लिक्विडेटर म्हणून कामकाज केलेले अनुभवी व्यक्ती. सहकारी संस्थेचे लेखापरिक्षण केले असल्याचे 5 वर्षाचे अनुभवी प्रमाणित लेखापरिक्षक हे व्यक्ती अर्ज करू शकतील.
अर्जदाराची अर्हता
अर्ज करणाऱ्या सदर व्यक्तीवर कोणत्याही स्वरुपाचे गुन्हे दाखल नसावेत. शासकीय सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी असल्यास त्यांची कोणत्याही प्रकारची खातेनिहाय चौकशी चालू नसावी. व सेवेत कोणताही ठपका ठेवलेला नसावा. वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत असावी. शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा. प्रॅक्टसिंग ॲडव्होकेटस व चार्टर्ड अकौन्टट, कॉस्ट अकौन्टट, कंपनी सेक्रेटरी यांना सहकारी संस्थेचे कामकाजाचा 5 वर्षांचे अनुभव असणे आवश्यक आहे. कोणत्याही सहकारी संस्थेचा थकबाकीदार नसावा किंवा कलम 83 व कलम 88 च्या कार्यवाहीमध्ये जबाबदार धरलेला नसावा. (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व त्याखालील नियमांतर्गत अपात्र नसावा). सदर व्यक्तीचा सहकार खात्याने काळ्या यादीमध्ये समाविष्ट केलेला नसावा. सदर व्यक्ती संबंधीत विभागाच्या विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असावा. जसे लातूर, धाराशीव, बीड व नांदेड जिल्ह्यातील. सदर व्यक्ती एकावेळी एकाच जिल्ह्यातून अर्ज दाखल करू शकेल.
याबाबतची जाहीर सूचना या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असेही आवाहन लातूर सहकारी संस्थाचे विभागीय सहाय्यक निबंधक, अधिन विभागीय सहनिबंधक अरुण शेंदारकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
00000