Thursday, November 7, 2024

  वृत्त क्र. 1043

राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन

नांदेड, दि. 7 नोव्हेंबर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परीषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत राज्यस्तरीय शालेय 14 वर्षांतील मुले- मुली बेसबॉल क्रीडा स्पर्धा पीपल्स महाविद्यालय मैदान, नांदेड येथे 6 जानेवारी ते 8 नोव्हेंबर, 2024 दरम्यान पार पडणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन सचिव नांदेड एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती शामल पत्की, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या हस्ते आज झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाअध्यक्ष सी.ए.डॉ प्रवीण पाटील यांनी भूषविले. यावेळी प्रमुख उपस्थिती पीपल्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर.एम.जाधव, प्रमुख पाहुणे एस एम पटेल, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त जे.ई.गुपिले,  सुरज सोनकांबळे, नृसिंह आठवले, महाराष्ट्र राज्य बेसबॉल संघटनेचे तांत्रिक समितीचे गोकुळ तांदळे, कोल्हापूरचे सचिव राजेंद्र बनसोडे, ज्ञानेश काळे, क्रीडाअधिकारी संजय बेतीवार, क्रीडा मार्गदर्शक प्रकाश होनवडजकर, बालाजी शिरसीकर, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, विपुल दापके, हौशी बेसबॉल जिल्हा संघटना नांदेडचे सचिव आनंदा कांबळे, निवड समिती सदस्य प्रदीप पाटील, वैष्णवी कासार, छ.संभाजीनगरचे सचिव तथा पंच प्रमुख गणेश बेटूदे, पीपल्स महाविद्यालयाचे प्राध्यापक विलास वडजे हे उपस्थीत होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुकेश बिराजदार यांनी तर आभार प्रदर्शन क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर यांनी केले. आज झालेल्या सामन्यासाठी संतोष आवचार, आकाश साबणे, सोमनाथ सपकाळ, विशाल कदम, बालाजी गाडेकर, राहुल खुडे, गौस शेख यांनी पंच म्हणून तर गुणलेखक म्हणून सायमा बागवान, अमृता शेळके इत्यादींनी भूमिका निभावली.

स्पर्धा पार पाडण्यासाठी क्रीडा कार्यालयातील संतोष कणकावार वरिष्ठ लिपिक, दत्तकुमार धुतडे, संजय चव्हाण, आनंद जोंधळे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, विद्यानंद भालेराव, सोनबा ओव्हाळे, यश कांबळे, शेखअक्रम,चंदू गव्हाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी, जिल्हा संघटना आदी परिश्रम घेत आहेत.

आज झालेल्या सामन्यांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे

मुले विभाग - 1) कोल्हापूर वि. वी छ. संभाजीनगर (15-0) होम रन, 2) लातूर वि. वीनागपूर (7-1) होम रन, 3) पुणे वि. वी मुंबई (10-4) होमरन4) अमरावती वि. वीनाशिक (17-1) होमरन तर मुली विभाग - 1) मुंबई वि. वी नाशिक (7-5) होमरन, 2) अमरावती वि. वी लातूर (16-3) होमरन, 3) नागपूर वि. वी छ. संभाजीनगर (13-5) होमरन, 4) पुणे वि. वी कोल्हापूर (15-0) होमरनया स्पर्धा पिपल्स कॉलेज, नांदेड येथे आयोजीत करण्यात आले असून, यास्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडू, क्रीडा प्रेमी, रसीकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

00000






 वृत्त क्र. 1042

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 3 लाख 38 रुपयांचा मुद्देमाल जप्त 

नांदेड जिल्हयाच्या दलाकडून 16 धडक कारवाई

नांदेड, दि. 7 नोव्हेंबर : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहितेमध्ये अवैध मद्य जप्त करण्याची धडक कारवाई नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. 6 नोव्हेंबर रोजी विभागाने 16 ठिकाणी धाडी टाकून एकूण 3 लाख 38 हजार 980 रुपयांच्या मुद्देमालाची दारू जप्त केल्याची माहिती नांदेडचे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे.

6 नोव्हेंबर रोजी झालेल्या कारवाईमध्ये विविध ठिकाणी एकुण 16 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हस्तगत करण्यात आलेल्या जानमालामध्ये एकूण 16 गुन्हे, वारस 16, अटक आरोपी 16, रसायन 450 लि. देशी मद्य 94.20 लि., जप्तवाहन संख्या 03  जप्त असे एकूण सर्व मुद्येमाल 3 लाख 38 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे पार पाडावी यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागास दक्ष राहण्याचे व आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश दिले आहेत. त्यानंतर जिल्ह्यामध्ये विभागामार्फत धाडी टाकण्याचे सत्र सुरू आहे. निवडणूक काळामध्ये यामध्ये अधिक वाढ करण्यात आली असून अवैध दारू विक्रीवर विभागाची काटेकोर नजर आहे.  

जिल्ह्यात आचारसंहिता लागू असून या काळामध्ये कोणीही अवैध मद्य खरेदी करू नये. तसेच स्वत:जवळ बाळगू नये, असे आवाहन विभागाने केले आहे. मद्याचा गैरवापर निवडणूक काळात होत असल्यास या संदर्भात विभागाला नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 1800 233 9999 व व्हॉटसॲप क्र. 8422001133 यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या कारवाईमध्ये अधिक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नमाला गायकवाड, जावेद कुरेशी, आशिष महिंद्रकर, सरकाळे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

0000

  वृत्त क्र. 1041

बल्क एसएमएस व्हाईस, एसएमएस विनापरवानगी जारी केल्यास कारवाई करणार : जिल्हाधिकारी

माध्यम  प्रमाणिकरण   व सनियंत्रण समितीची करडी नजर

आज बल्क एसएमएस संस्थाच्या प्रतिनिधी समवेत बैठक

नांदेड, दि. 7 नोव्हेंबर : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक 2024 व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे. आचारसंहिता कालावधीत  उमेदवारांकडून मतदाराना मतदान करण्याबाबत विना परवानगी  बल्क एसएमएस देण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या उमेदवारांना प्रचारासाठी बल्क एसएमएस पाठवायचे आहेत, त्यांनी माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची परवानगी घेवूनच एसएमएस पाठविण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा माध्यम  प्रमाणिकरण  व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी केले आहे.

निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे बल्क एसएमएस, ई-पेपर, व्हीडीओ, ऑडीओ, रेडीओ चॅनेलवरील कोणत्याही जाहिरातीला परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी शिवाय इलेक्ट्रॉनिक्स फॉरमॅटवरील कोणतीही जाहिरात दिल्यास कारवाई केली जाईल.

बल्क एसएमएस बाबत उमेदवारांच्या सर्व प्रतिनिधी समवेत उद्या दुपारी 1 वाजता माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्यावतीने बैठक आयोजित केली आहे.  तरी बल्क एसएमएस, व्हाईस सेवा पुरविणाऱ्या मेसेज एजन्सीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवनातील माध्यम कक्षात बैठकीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले आहे.

रेडिओ संदेश बल्क एसएमएस बंदी

निवडणूक दिनांकाच्या 48 तासाच्या शांतता काळामध्ये आकाशवाणी व खाजगी चॅनलवरील निवडणूक विषयीच्या बाबीचे प्रसारण बंद करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तसेच मोबाईल वरील बल्क एसएमएस सेवाही या काळात बंद ठेवण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. 48 तास आधी मोबाईलवर अशा प्रकारे आदेश आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी एसएमएस सेवा देणाऱ्या एजन्सीची असेल, यांची सर्वानी नोंद घ्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...