'भारताचे नवनिर्माण'
केंद्र सरकारच्या तीन वर्षपूर्तीनिमित्त लोकराज्यचा
विशेषांक
मुंबई, 5 : केंद्र
सरकारच्या तीन वर्षपूर्तीनिमित्त लोकराज्यचा मे 2017 चा
विशेषांक प्रकाशित झाला आहे. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाखती आणि
विविध विभागांच्या विकासकामांची माहिती हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र
मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 26 मे 2017 रोजी 3 वर्षे पूर्ण होत आहेत. भारत निर्माणाच्या दृष्टीने ही तीन वर्षे
महत्त्वपूर्ण ठरली आहेत. त्याचा सर्वांगीण आढावा या विशेषांकात घेण्यात आला आहे.
या अंकासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लेख लिहिला असून त्यात
केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या व दूरदृष्टीच्या निर्णयांवर त्यांनी भाष्य केले
आहे. त्यासोबतच निश्चलनीकरण, ऊर्जानिर्मिती, विविध योजनांची माहिती व त्यांची संकेतस्थळे आदी विषयांवर उपयुक्त माहिती
अंकात देण्यात आली आहे.
केंद्रीय रस्ते
वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, अवजड
उद्योगमंत्री अनंत गिते, ऊर्जा राज्यमंत्री पियूष गोयल,
संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, गृहराज्यमंत्री
हंसराज अहिर आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विशेष मुलाखतीत
त्यांच्या खात्यामार्फत महाराष्ट्रात होत असलेल्या विविध विकासकामांविषयी माहिती
दिली आहे. केंद्र सरकारने विविध ॲप्स लॉन्च केले असून नागरिकांसाठी ते उपयोगी पडत
आहेत. त्याविषयी लेखाचा अंकात समावेश आहे.
दूरदर्शनवरून
प्रक्षेपित आणि आकाशवाणीवरून प्रसारित 'मी मुख्यमंत्री बोलतोय' या कार्यक्रमातील मुख्यमंत्री आणि जनता यांच्यातील संवाद अंकात समाविष्ट
करण्यात आला आहे. कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी कामगारांसाठी
घेण्यात आलेले विविध निर्णय व कायद्याविषयीची माहिती तर सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी पणन व्यवस्थेतील
सुधारणांबाबत माहिती दिली आहे. सायबर गुरू, यशकथा, प्रेरणा, प्रासंगिक, आपले गाव,
आरोग्य आणि स्मरण ही सदरे वाचनीय व माहितीपूर्ण आहेत. अंकाची किंमत 10 रुपये आहे. अंक सर्वत्र उपलब्ध आहे.
००००