Tuesday, August 31, 2021

 अतिवृष्टीने पुरात वाहून गेलेल्यांच्या शोध कार्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शर्तीचे प्रयत्न  

नांदेड (जिमाका) दि. 31 :- जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विविध ठिकाणी सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे काही भागात नदी-नाल्यांना अचानक पूर आले. अचानक आलेल्या या पुरामुळे कंधार तालुक्यातील गगनबीड येथे 30 ऑगस्ट रोजी रात्री 7.45 वाजेच्या सुमारास 26 वर्षाचा तरुण उमेश रामराव मदेबैनवाड हा मोटारसायकलसह पुरात वाहून गेला. तसेच लोहा तालुक्यातील कोष्टेवाडी येथील 32 वर्षाचा युवक ज्ञानेश्वर माधव वाघमोडे हा पुरात वाहून गेला. मुखेड तालुक्यातील उंद्री (पदे) येथे 31 ऑगस्ट रोजी सकाळी अतिवृष्टीमुळे गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याला अचानक पूर आला. यात 15 वर्षीय कमलाकर दत्तात्रय गडाळे हा मुलगा शौचास गेला असतांना वाहून गेला. लोहा तालुक्यातील सावरगाव येथे गावाजवळील नाल्यांना पूर आल्याने या पुरात 52 वर्षीय मणकर्णाबाई बापुराव दगडगावे व 45 वर्षीय पार्वतीबाई संभाजी दगडगावे या वाहून गेल्या. यातील मणकर्णाबाई दगडगावे, कमलाकर गडाळे व ज्ञानेश्वर वाघमोडे यांचे मृतदेह जवळच्या शिवारात आढळून आले. दोन व्यक्तींचा शोध जिल्हा प्रशासनातर्फे सुरु आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घटनास्थळांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने काल रात्री नियोजन करुनही पाण्यात उतरता आले नसल्याचे कंधार येथील तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी सांगितले. कंधारचे उपविभागीय अधिकारी पी. एस. बोरगावकर हेही शोध कार्यावर लक्ष ठेवून आहेत. महसूल व पोलीस दलाची टिम या शोध कार्यात प्रयत्नाची शर्त करत आहेत. तथापि पाणी उसरल्याबरोबर शोध कार्य वेगात सुरु करण्यात आले आहे. शोध कार्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आपत्ती विभागामार्फत तातडीने बोटीची व्यवस्था केली असून बचाव कार्य पथकातील युवकांना त्यांनी सर्व बाबी समजून घेऊन सूचना दिल्या. गरज पडल्यास वेळप्रसंगी शोधासाठी सीआरपीफ, एसडीआरएफ किंवा एनडीआरफची टीमला बोलविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

00000



 अधीक्षक अभियंता उप्पलवाड सेवानिवृत्त 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- येथील सिंचन भवन विभागाचे अधिक्षक अभियंता महाजन रामजी उप्पलवाड आपल्या 33 वर्षाच्या सेवेनंतर 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. उमरी तालुक्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेले महाजन यांनी प्रतिकुल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. सन 1990 मध्ये त्यांची नेमणूक पाणीपुरवठा विभागात सहायक अभियंता श्रेणी 2 या पदावर झाली होती. आपल्या कार्यकाळात त्यांनी लातुरच्या भूंकपग्रस्तांचे पुनवर्सनाचे तसेच जलसिंचन व्यवस्थापन वैशिष्टपूर्ण काम करणारे ते अभियंता होते. सन 1999 मध्ये उपल्लवाड यांची नियुक्ती कार्यकारी अभियंता नांदेड यांच्या कार्यालयात सहायक अभियंता श्रेणी 1 मध्ये झाली.

 

त्यानंतर 2007 मध्ये त्यांच्या उल्लेखनिय कामाची दखल घेवून प्रशासनाने त्यांना कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती दिली. सन 2009 मध्ये ते अधिक्षक अभियंता पाटबंधारे मंडळ नांदेड या कार्यालयात कार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले. याच काळात त्यांनी सिंचन व्यवस्थापनाची कामे केली. त्यानंतर सन 2017 मध्ये नांदेडचे अधिक्षक अभियंता म्हणून उर्ध्व पैनगंगा मंडळ या कार्यालयात अधिक्षक अभियंता म्हणून रुजू झाले. आपल्या 33 वर्षाच्या सेवेनंतर ते सोमवार 31 ऑगस्ट रोजी अधिक्षक अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.

00000



 जिल्ह्यातील 100 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 100 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. बुधवार 1 सप्टेंबर 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, रेल्वे हॉस्पिटल या 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंद सिंघजी जिल्हा रुग्णालयात, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, रेल्वे हॉस्पिटल या 17 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 30 ऑगस्ट 2021 पर्यंत एकुण 10 लाख 16 हजार 923 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 8 लाख 45 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 65 हजार 640 डोस याप्रमाणे एकुण 11 लाख 10 हजार 670 डोस प्राप्त झाले आहेत.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 

नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित तर दोन कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 40 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 742 एवढी झाली असून यातील 88 हजार 58 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 23 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 661 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसआर तपासणीद्वारे मुदखेड येथे 1 व उमरी 1 असे एकुण 2 बाधित आढळले आहेत. 

आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 23 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7, किनवट कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 7, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 128, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 145 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 10 हजार 634

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 7 हजार 635

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 742

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 58

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 661

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-8

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-23

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...