Tuesday, August 31, 2021

 अतिवृष्टीने पुरात वाहून गेलेल्यांच्या शोध कार्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शर्तीचे प्रयत्न  

नांदेड (जिमाका) दि. 31 :- जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विविध ठिकाणी सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे काही भागात नदी-नाल्यांना अचानक पूर आले. अचानक आलेल्या या पुरामुळे कंधार तालुक्यातील गगनबीड येथे 30 ऑगस्ट रोजी रात्री 7.45 वाजेच्या सुमारास 26 वर्षाचा तरुण उमेश रामराव मदेबैनवाड हा मोटारसायकलसह पुरात वाहून गेला. तसेच लोहा तालुक्यातील कोष्टेवाडी येथील 32 वर्षाचा युवक ज्ञानेश्वर माधव वाघमोडे हा पुरात वाहून गेला. मुखेड तालुक्यातील उंद्री (पदे) येथे 31 ऑगस्ट रोजी सकाळी अतिवृष्टीमुळे गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याला अचानक पूर आला. यात 15 वर्षीय कमलाकर दत्तात्रय गडाळे हा मुलगा शौचास गेला असतांना वाहून गेला. लोहा तालुक्यातील सावरगाव येथे गावाजवळील नाल्यांना पूर आल्याने या पुरात 52 वर्षीय मणकर्णाबाई बापुराव दगडगावे व 45 वर्षीय पार्वतीबाई संभाजी दगडगावे या वाहून गेल्या. यातील मणकर्णाबाई दगडगावे, कमलाकर गडाळे व ज्ञानेश्वर वाघमोडे यांचे मृतदेह जवळच्या शिवारात आढळून आले. दोन व्यक्तींचा शोध जिल्हा प्रशासनातर्फे सुरु आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घटनास्थळांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने काल रात्री नियोजन करुनही पाण्यात उतरता आले नसल्याचे कंधार येथील तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी सांगितले. कंधारचे उपविभागीय अधिकारी पी. एस. बोरगावकर हेही शोध कार्यावर लक्ष ठेवून आहेत. महसूल व पोलीस दलाची टिम या शोध कार्यात प्रयत्नाची शर्त करत आहेत. तथापि पाणी उसरल्याबरोबर शोध कार्य वेगात सुरु करण्यात आले आहे. शोध कार्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आपत्ती विभागामार्फत तातडीने बोटीची व्यवस्था केली असून बचाव कार्य पथकातील युवकांना त्यांनी सर्व बाबी समजून घेऊन सूचना दिल्या. गरज पडल्यास वेळप्रसंगी शोधासाठी सीआरपीफ, एसडीआरएफ किंवा एनडीआरफची टीमला बोलविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

00000



No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...